किमया
भाषा,… शब्दांची किमया
अर्थबोध मानभावी माया
जाण काय समजे ना कांही
वय तितुके बघ गेले वाया
हसणे रडणे भाव भावना
अंत:कळा हृदयास कळाया
कोश कठीण भिजण्यास हवे
स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया
……………………अज्ञात
भाषा,… शब्दांची किमया
अर्थबोध मानभावी माया
जाण काय समजे ना कांही
वय तितुके बघ गेले वाया
हसणे रडणे भाव भावना
अंत:कळा हृदयास कळाया
कोश कठीण भिजण्यास हवे
स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया
……………………अज्ञात
हलकेच खुणावे मज कोणी
अंतरी सुरस श्रावण गाणी
मन सुप्त कहाणी एकेरी
व्यापल्या साचल्या आठवणी
प्राजक्त क्षणांची ही वाणी
ओळखी सख्यांची आळवणी
उमले दरवळ कर्पुरी उरी
नि:संग नितळ जणु की पाणी
आकार निराकारात खुळा
भिरभिर घरभर ही चाचपणी
आनंद कधी विरहात भरे
सद्गदीत द्वय हृदय पापणी
……………… अज्ञात
नाते नाही मीच एकला
श्वासांमधुनी नाद ऐकला
कान्हा कान्हा बोले राधा
तूच आसरा तू विरंगुळा
कोषामधले उमलू पाहे
गंध आतला दाटुन आला
भेद तरी पण इथला तिथला
तूच आसरा यू विरंगुळा
मंद कशी ही झाली मेधा
अंध मती पथभर मन बाधा
न कळे कोणी का लपलेला
तूच आसरा तू विरंगुळा
........................अज्ञात
भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे
वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने
ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे
फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे
अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे
वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे
आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती
ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे
पवनासवे वराती मेघात सकल पाणी
सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी
सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी
अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी
........................अज्ञात
नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया
रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या ||
आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया
डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया ||
चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया
ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या ||
तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया
शेवटी मला पावला देवा तूच विठू राया ||
व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या
डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया ||
धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या
आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया ||
.
शब्द शब्द शब्दातच सारे
शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा
वडवानळ जळ शब्द पसारे
एक एकट्या एकांताचे
कूस छत्र घर शब्द सहारे
मुक्या जाणिवा गभुळ जखमा
आतुर माया शब्द शहारे
नभ संचित आकाश पवन घन
शब्दच वेडे ऋतु झरणारे
खोल ओंजळी लाव्हा अंकित
खुपणारे सल शब्द बोचरे
शब्द उतारा सकल प्रार्थना
आत्म संहिता शब्द खरे
.....................अज्ञात
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी
हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी ..
भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद
विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद ..
तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार
पेलतो विठ्ठल आमचा हा संसार ..
भक्त सारे गुंग मुखात अभंग
भजनात रंग कीर्तनात दंग ..
जातीभेदा वारीत नाही हो थारा
विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा ..
उच्चनीच नाही, नाही रावरंक
सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक ..
"विठ्ठल विठ्ठल"- गर्जता शिस्तीत
दिंडीला येई जोर, वाडीवस्तीत ..
बाल-वृद्ध चालता चालता वारीत
विठ्ठलाचा जयघोष मुखाने करीत ..
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे
मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे
आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी
एकांत सागराची पागोळते विराणी
थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे
ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे
कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे
साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी
मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना
........................अज्ञात
हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी
खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी
उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही
फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी
रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी
पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी
........................अज्ञात
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही
सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही
गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही
विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही
श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही
आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही
विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही
दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही
खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही
तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही
मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही
जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही