माया (भयगुढकथा)
अमावस्येची रात्र होती . रात्रीचे ८ वाजले होते . 'काल्या' बाबा राजीव सोबत आपलं सगळं समान घेवून आला .गुढघ्यापर्यंत काळी कफनी , खाली काळी लुंगी , कमरेला कमरपट्ट्या सारखं लाल कापड बांधलेलं . खांद्याला काळ्याच कापडाची झोळी. कपाळावर काळा टिळा. डोक्याला काळं फडकं गुंडाळलेल. ह्या सगळ्याला म्याचींग असा शरीराचा रंगहि काळाच . पण डोळे मात्र कमरपट्ट्याला म्याचींग असे लाल आणि बटबटीत .त्याच्या ह्याच अवतारामुळे ज्यांना तो माहित होता ते त्याला काल्या बाबा म्हणायचे . काल्या एक तांत्रिक होता . काळ्या शक्तींची उपासना करायचा तो . काही काळ्या शक्ती आणि सिद्धी वश होत्या त्याला .