‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
17 Dec 2023 - 10:59 am

VB

प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं. साडेनऊ होऊन गेले तरी ‘वंदे’ काही आली नव्हती. त्यातच display board वर वंदे भारतप्रमाणे बऱ्याच गाड्यांचे फलाटही दर्शवले जात नव्हते. थोड्याथोड्या वेळानं या वेळा सतत बदलत जाऊन शेवटी दाखवलं गेलं की ‘हैदराबाद’ 3 नंबरवर आणि ती गेल्यानंतर वंदे भारत तिथं येईल. ‘हैदराबाद’पाठोपाठ आलेली चेन्नई-मुंबई पलीकडे 4 नंबरवर येऊन दाखल झाली. हैदराबाद गेल्यावर 5 वर आलेल्या इंटरसिटीचं WCAM-2 लोको 3 वरून पुढे इलेक्ट्रीक ट्रीप शेडच्या दिशेनं जाऊ लागलं होतं, पण शंटिंग सिग्नल ऑन असल्यामुळं ते फलाटाच्या शेवटाला वाट बघत उभं होतं. शेवटी फलाट मोकळा झाला आणि बरोबर अकरा वाजता वंदे भारत फलाटावर दाखल झाली.

मला अपेक्षित होतं की, आज ले असल्यामुळं ‘वंदे’ला या दोन गाड्यांवर प्राधान्य मिळेल, पण तसं झालेलं नव्हतं. गाडीत आमच्या जागेवर जाऊन बसलो. मला पाहिजे, अगदी तशीच सीट होती, पण window seat असून मला खिडकी नव्हती. कारण आमच्या सीट्सची रांग दोन खिडक्यांच्या मधल्या जागेत होती. वंदे भारतनं मला दिलेला हा पहिला धक्का. सीटवर आमच्यासाठी 1 लीटर पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. आता बघा – या गाडीत तीन तासांसाठी 1 लीटर पाणी मिळतं आणि शताब्दीच्या साडेआठ तासांसाठी अर्धा लीटर पाणी दिलं जातं – हे रेल्वे मंत्रालयाचं लॉजिक काही समजलं नाही. सध्याचा काळ असाच आहे! पावणेदोन तास लेट झालेली वंदे भारत आता 5 मिनिटांत सुटेल असं वाटलं होतं. दरवाजे बंद होत आहेत, अशी उद्घोषणाही झाली होती. पण गाडी हलत नव्हती. नंतर अशी उद्घोषणा थोड्याथोड्या अंतरानं अजून दोन वेळा झाली. पण दरवाजे काही बंद होत नव्हते. त्यामुळं बाहेर उभ्या असलेल्या डेक्कनला दोन नंबर घेऊन लगेच एक नंबरवरच्या निजामुद्दिन दुरंतोलाही सोडून देण्यात आलं. त्यामुळं अजून काही मिनिटं तरी वंदे सुटणार नव्हती. दरवाजे बंद हो रहें हैं, अशी पाचव्यांदा उद्घोषणा झाल्यावर मग लगेचच वंदे पुण्याहून निघाली होती. ती आता दोन तास 4 मिनिटं लेट झालेली होती.

आता गाडीत स्वागताची उद्घोषणा 3 भाषांमधून दुमुदुमू लागली, “आपले वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वागत आहे. पुढील स्टेशन कल्याण जंक्शन. भारतीय रेल्वे तुम्हाला आनंददायी आणि आरामदायी प्रवासासाठी शुभेच्छा देते.” पण या संपूर्ण उद्घोषणेत वंदे भारत एक्सप्रेस या शब्दांवर विशेष जोर दिलेला होता. म्हणजे ‘वं....दे भार...रत एक्स..प्रे..स’ असा काहीसा. आता गाडी वेग घेईल वाटलं, पण संगम पुलानंतर पुन्हा वेग कमी झाला. कारण शिवाजीनगरमध्ये लोणावळ्याकडे जाणारी मालगाडी मेन लाईनवर होती. जुन्या जमान्याचे, आपल्या कार्यकाळाच्या शेवटाकडे निघालेले, चॉकलेटी रंगाचे दोन WAG-5 कार्यअश्व पेट्रोलच्या टँकरसोबत तिथं उभे होते.

आता पुन्हा ‘वंदे’चा वेग कमी झाला. खडकीच्या बाहेर शेजारून उद्यान एक्सप्रेसला WAP-7 कार्यअश्व पुण्याकडे घेऊन गेला होता. काही वेळानंतर खानपानवाला चहा द्यायला आला, तेव्हा आम्हाला न देताच निघून गेला. त्यामुळं त्याला विचारलं, तर तो म्हणाला, बुकींगच्यावेळी नाश्ता घेतला असेल, तरच चहा-कॉफी मिळेल. तुम्हाला हवा असेल, तर पैसे द्यावे लागतील. वंदे भारतच्या पहिल्या प्रवासात बसलेला हा दुसरा धक्का. कारण तिकिटात खाणं-पिणं नको म्हटल्यावर त्याचे पूर्ण वजा झाल्याचं दिसत नव्हतं. शेवटी आम्ही त्याला पैसे देऊन चहा घेतला. तो मसाला चहा मला फारसा आवडला नाही.

पलीकडच्या काकांचा घरी व्हिडिओ कॉल सुरू झाला होता. कन्नडमधून जोरजोरात आणि कर्कश्श्य आवाजात घरातल्या लहान बाळाशी बोलणे सुरू होतं. माझ्या मागच्या सीटवरच्या काकांचा नाश्ता झाला होता आणि ते घरी कळवत होते, नाश्ता अगदी गारेगार होता. गाडी आधीच लेट आहे वगैरेवगैरे. बोलताबोलता पुढे थोड्या काळजीवजा सुरात ते सांगत होते, “परवा परतीला याच गाडीनं येणार आहे.”

वंदे भारतची प्रसार आणि सामाजिक माध्यमांवर तथाकथित रेलफॅन्स आणि पत्रकारांनी प्रचंड प्रमाणात जाहिरात केलेली आहे. गाडीत गेल्यावर गाडीच्या अंतर्गत रचनेत पूर्वीपेक्षा बदल झालेला नक्कीच दिसत होता. तरीही त्यामुळं त्यांच्यासारखं हुरळून जाणं होत नव्हतं, या गाडीच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी बऱ्याच वर्षांपूर्वीपासून माहीत असल्यामुळं असेल कदाचित!

लोणावळ्यानंतर खंडाळ्याला परत 11 मिनिटं वंदे भारत थांबली होती. आज मधली लाईन खाली कर्जतपर्यंत देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्यामुळं कर्जतकडे जाणारी सगळी वाहतूक अप लाईनवरूनच चालू होती. म्हणून गाड्यांना घाटात वेळ लागत होता. वंदे भारत खंडाळ्यात उभी असतानाच पेट्रोल टँकरची मालगाडी कर्जतकडून अत्याधुनिक WAG-12B इंजिनासह आणि तीन WAG-7 बँकर्सच्या मदतीनं खंडाळ्यात येऊन दाखल झाली होती.

माझी window seat असली तरी तिला खिडकी नव्हती. वंदे भारतमध्ये अशीच आसनव्यवस्था आहे. त्यामुळं मला बाहेर वाकून बघावं लागत होतं. मग शताब्दीप्रमाणं जरा सीट मागे करावी म्हटलं तर त्यासाठीची कळ तिथं दिसली नाही. हा आणखी एक धक्का! म्हणूनच विमानासारख्या सुविधा या गाडीत मिळत असल्याचा दावा केला जात असला तरी या गाडीपेक्षा शताब्दीमधल्या सीट आरामदायक असल्याचं वाटलं.

अखेर घाट संपला. लोणावळ्यापासून एक तरुणी मेकअपचं कीट काढून मेकअप करत बसली होती. तिचाही मेकअप आता होत आला होता. बाहेर आता मुंबईच्या लोकलची वर्दळ दिसू लागली होती.

कल्याणजवळ आल्यावर गाडीत उद्घोषणा दुमदुमू लागली, “पुढील स्टेशन कल्याण जंक्शन. कृपया गाडी थांबल्याशिवाय खाली उतरू नये.” आता गाडी पूर्ण थांबल्याशिवाय दरवाजे उघडत नसताना कोणी चालत्या गाडीतून कसं काय खाली उतरू शकेल? त्यानंतर दुपारी 2.12 ला, 2 तास 39 मिनिटं उशिरा पोहचली.
अखेर दुपारी 2.57 ला वंदे दादरला पोहचली आणि आम्ही तिथंच उतरण्याचा निर्णय घेतला, सीएसएमटीपर्यंत तिकीट असूनही. कारण आम्ही परतीला बसनं येणार होतो आणि पुढं जाऊन परत दादरला येण्यात आणखी वेळ गेला असता. वंदे भारतमध्ये बसल्यापासून मी तिची शताब्दीशी तुलना करून बघत होतो. त्यात मला खिडकीची सीट, नाश्त्याचा दर्जा, नाश्ता नको म्हटलं म्हणून चहाही नाही, अशा बाबतीत शताब्दीच सरस दिसत होती. चहा, नाश्ता, वाचायला पेपर, इतर काही सेवा आणि आसनांची रचना या बाबतीत वंदे भारत शताब्दीसारखीच होती. ही ईएमयू असल्यामुळं गाडीचा वेग बदलताना बसणारे जर्क्स वंदे भारतमध्ये जाणवत नाहीत आणि लोकलप्रमाणं ती चटकन वेग घेते. दरवाज्याची आणि शौचालयाची जागा बदलल्यामुळं आत येताना प्रशस्त जागा दिसते. या बाबी असल्या तरी वंदे भारतमधली आसनांची रचना योग्य वाटली नाही, कारण गाडीतील निम्म्याच आसनांना पूर्ण खिडकी मिळते. म्हणूनच असं वाटतं की, वंदे भारत शताब्दीची कॉपी आहे, पण ती शताब्दी नाही!

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2023/12/1.html
व्हिडिओ लिन्क
https://youtu.be/l6vi4KB5gb8?si=QpDwFTw4NFg3w1Vt

मांडणीवावरप्रवासदेशांतरविचारसमीक्षालेखअनुभवमतमाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Dec 2023 - 1:19 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

यालाच म्हणतात भ्रमाचा भोपळा फुटणे. लेख आटोपशीर छान झाला आहे. फोटोही आहे. असंच लिहीत जा.

सर टोबी's picture

17 Dec 2023 - 4:59 pm | सर टोबी

वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स.

पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

पराग१२२६३'s picture

17 Dec 2023 - 11:30 pm | पराग१२२६३

पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

पराग१२२६३'s picture

17 Dec 2023 - 11:31 pm | पराग१२२६३

अगदी बरोबर.

सौंदाळा's picture

18 Dec 2023 - 10:26 am | सौंदाळा

माहितीपूर्ण लेख
तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः
१. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे)
२. अंतर्गत स्वछता
३. आरामशीर आसनव्यवस्था
४. चांगली खान-पान सेवा
लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले.
नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही.
एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स's picture

18 Dec 2023 - 5:49 pm | विअर्ड विक्स

दिवस चुकला ...

वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला
साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही .

त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.