पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत. रस्ता ही तशी अपेक्षा ठेवत नाही. किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या सोबत याच रस्त्यावरून प्रवास करत असतात. त्यांच्यासोबत प्रत्येकाच्या मनातली गणितं, काहींच्या मनातले प्रयोग, इतरांच्या मनातले खेळ, तर कुणाची शांती... रस्त्यावरून सारे काही चालत असते. मुक्तप्रवेश! शेवटी रस्ता सोडायचं स्वातंत्र्यही एवढं अस्सल आणि पवित्र जणू रस्त्यावर प्रवेश केलाच नव्हता. प्रवेश-मुक्त! रस्त्याचा उल्लेख गाळला म्हणून कुणीच हरकत घेत नाही. एकाच रस्त्यावरून जाणाऱ्यांचे मुक्काम वेगवेगळे का असतात? प्रवास सुद्धा सारखा नसतो. एवढे वैविध्य ठेवायचे होते तर मग रस्तेही वेगवेगळे ठेवायचे ना. तो एकच का? कारण नवीन रस्ता म्हटलं की अडखळायचं ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती. ओळखीच्या रस्त्यावर जरा पाणी साचलं तरी थबकतो आपण. मग सतत एकट्याने चालणे कसे शक्य झाले असते? म्हणून वेगवेगळे मुक्काम असले तरी रस्ता सोबतीच्या मित्रांशी वाटून घ्यावा लागतो. कोणते पाऊल शेवटचे ठरेल हे कुणालाच माहीत नाही. तरी प्रवासाची तयारी करायचा जोर काही ओसरत नाही. आपण पावले टाकायची तयारी ठेवायची फक्त. रस्ते आपली वाट पाहत थांबून आहेत.
प्रतिक्रिया
10 Dec 2021 - 2:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
केहेना क्या चाहते हो भाई? ८३ वाचने आणि एकही प्रतिक्रिया नाही?
10 Dec 2021 - 3:22 pm | अनुस्वार
10 Dec 2021 - 3:23 pm | अनुस्वार
एवढंच सांगायचंय.
तुम्ही वेळ दिलात म्हणून आभार. :-)
10 Dec 2021 - 2:38 pm | जेम्स वांड
जल्ला काय पण टोटल लागली नाय !
🤪 🤪 🤪 🤪
10 Dec 2021 - 3:57 pm | इरसाल
रस्ते आपली वाट पाहत थांबून आहेत.
ते जर आपली वाट पाहत थांबुन आहेत तर आपण कां म्हणुन चालायच ?????
10 Dec 2021 - 4:12 pm | अनुस्वार
त्यांच्यासाठी ओ. चालायचं आपल्याच आहे, रस्ता नाही म्हणून थांबू नका. रस्त्यांची सेवा अविरत राहील. तरी नाही सापडला रस्ता तर दुसऱ्या वाक्यात म्हटलंय की, 'आणा अंगात हत्तीचं बळ आणि तुडवा जमीन'. बळ पुरलं तर तुमच्या पाऊलखुणांचा पण एक रस्ता होईल.
10 Dec 2021 - 7:00 pm | मुक्त विहारि
मला चाकोरीबद्ध रस्ते आवडत नाहीत
10 Dec 2021 - 7:22 pm | अनुस्वार
नावाला जागता तुम्ही.