माणूस आणि पुस्तक

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
9 Dec 2021 - 7:12 pm

माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके. थोडक्यात काय अमुक पुस्तक किंवा व्यक्ती मला पूर्ण कळाली, असा दावा आपण करू शकत नाही. एखादा प्रचंड विनोदी प्रसंग रेखाटतांना लेखकाचे हृदय त्या क्षणी कदाचित आकंठ दुःखात बुडालेले असू शकते. आणि वरवर त्रासलेली दिसणारी व्यक्ती मनातून मात्र शांततेच्या सागरात पहुडलेली असू शकते. माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा.

धोरणमांडणीमुक्तकसमाजप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

9 Dec 2021 - 10:42 pm | श्रीगणेशा

विचार आवडला!
मना-मनांचा संवाद होणं महत्वाचं.

अनुस्वार's picture

11 Dec 2021 - 3:35 am | अनुस्वार

मनातलं बोललात. :-)

Bhakti's picture

10 Dec 2021 - 7:57 pm | Bhakti

आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते.
थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण
माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा.
+१११

अनुस्वार's picture

11 Dec 2021 - 3:35 am | अनुस्वार

आभारी आहे.