मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो. देवगिरीचा किल्ला आणि मग दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार केला. खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात आणि तोच वृत्तांत आपणासाठी इथे टंकत आहे. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण तपासून घ्यावे. या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.
महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.
ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.
किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात किल्ल्यामधे प्रवेश करतांना अनेक मोठे दरवाजे पार करावे लागतात. आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली चांद मिनारआहेत. इथेच हत्ती हौद आहे. तसेच जैन मंदिरही आहे. पुढे त्याची तोडफोड करुन येथे मशिद उभारलेली आहे, आणि नंतर त्याचीही तोडफोड करुन तेथे आता एका भारतमातेचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे बद्ल स्वातंत्र्यानंतर झाले असावेत.
चांद मीनार. या मंदिरातून म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे तर उजव्या बाजूला चांद मिनार आहे. दोनशे दहा फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार येथे आहे. आता तो प्रवेशासाठी बंद करण्यात आलेला आहे.चांदमीनाराच्या पुढे कालाकोट प्रवेशाद्वारानजिक हेमांडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात.पण आता या किल्यावरुन ते हटवण्याचे काम चालू आहे, पुरातत्वे विभागाला त्याच्याशी काही घेणे नाही. अशा अविर्भावात ते सर्व रस्त्याच्या कडेला पडून आहेत.
चीनी महलभिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार, पुढे एका डोंगरावर आहे, यावर पोचण्यासाठी पाय-या बांधण्यात आलेल्या आहेत. इथे तीन दरवाजे समकोन स्थितीत आहेत. शत्रुसैनिकावर समोरुन आणि मागच्या बाजूस हल्ला करता यावा या उद्देशाने तशी रचना असावी असे वाटते. याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चीनी महल म्हटल्या जती. यातील सजावटीसाठी चीनी टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.
रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या रंग महाल सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात.(इथेही आता प्रवेश करु देत नाही. पाच रुपयाची लाच देऊन इथे प्रवेश करता येतो.लोकांना याची उत्सुकता असत नाही. आणि लोक इथे प्रवेशाचा हट्टही करत नाही. कारण तिथे पाहण्यासारखे काय आहे, असे म्हण्तात.)
मेंढा तोफ या तोफेचे मुळ नाव शिकन तोफ होती असे म्हणतात. पण तिच्या आकारावरुन तिला मेंढा तोफ असे आता नाव प्रचलीत आहे. या तोफेवर दोन उल्लेख आहे, संपूर्ण खिताबासहीत एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे. असे मार्गदर्शकाराने सांगितले. बुरुजाच्या मध्यभागी तोफेचे तोंड फिरवण्याची व्यवस्था आहे.जेणेकरुन दुर-दुर मारा करण्यात यावा.
किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी यादवकालीन मार्ग दरी महालाच्या सभोवताली डोंगर पोखरुन केलेली दरी दिसते ते साधारणतः पन्नासकिल्ल्यावर प्रवेशासाठी आधुनिक लोखंडी पूल. ते शंभर फूट खोल असावी. इथे या किल्ल्यात वरच्या बाजुला प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता आहे. आणि सर्व बाजूंनी दरी आहे. आता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक आधुनिक पुल लोखंडाचा पर्यटकांसाठी केलेला आहे. आणि जुना पुल काहिसा विटा आणि दगडाचा वापर करुन बांधलेला आहे. हाच पुल पुर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत होता. दरीतील पाण्याची पातळी उभयबाजूंवरील बंधा-यावरुन नियंत्रीत करण्यात येत असे. धोक्याचे प्रसंगी शत्रुसैन्याला थोपवून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी दरीत सोडण्यात येत असे आणि दुसरे धरण बंद करण्यात येई. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असे. या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जात असे. आणि जो आधुनिक पूल दिसतो त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करतही असतील असे वाटते. म्हणून या किल्ल्यावर हल्ला करणे केवळ अशक्य असे वाटते. अर्थात फितुरीमुळे या किल्ल्याची वाट लागली हे सांगण्याची काही गरज नाही.
या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रुची दिशाभुल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत. भुयारी मार्ग आहेत. इथे पुल ओलांडला की, काही अंधारे रस्ते ओलांडावे लागतात. इथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधा-या पाय-या ओलांडाव्याच लागतात. आणि यालाच समांतर असा एक पर्यायी रस्ता इथे आहे, ज्याच्यातुन इथे मार्गदर्शन करणारे, किल्ला अजिक्य कसा राहिला. शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा कोणत्या, शत्रुने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीतच कसा जाईल. गुप्त कोठड्या, धुर सोडून शत्रुला अडवण्याची पद्धत, भुयारातुन लहान-सहान चाके सरकवून त्याचा फासासारखा वापर हे सर्व अद्भुत आहे, ते मात्र मार्गदर्शकाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते, या अंधा-या गुहेत आहेत. मार्गदर्शकाशिवाय या रस्त्याने प्रवेश करु नये. किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे, तो पार करतांनाही अंधा-या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतीचा आधार घेत-घेत हा रस्ता विना-मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात.
डोंगराळ वाटेवरच पाय-याची रांग लागली की तिथे एक गणपतीचे मंदिर आहे, तेव्हा केव्हापासून आहे, हे कोणासही निश्चित सांगता येत नाही.
बारादरी (बारा दरवाजांचे निवासस्थान ) बारादरी दमलेले पर्यटक जेव्हा पाय-यावरुन वर पोहचतात तेव्हा इथला बारादरीतले भव्य महालाच्या दर्शनाने जराशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. बारा कमाणी असलेली ही इमारत आहे, इथे अष्ट्कोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. त्यालगतच्या खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरीचे बांधकाम दगड-चुन्याने केलेले दिसते. चुन्याच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथे एक पाणी विक्रेता आहे एक रुपयात एक ग्लास विकून पर्यटंकाची तहान तो भागवतो.इथून पुढे गेले की, पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे कडे जातांना डोंगर पोखरुन एक गुहा इथे दिसते. जनार्धन स्वामी (किल्लेदार)इथे निवास करत असत एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणा-यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी.
याच गुहेत दोन भाग आहेत. एकीकडे अखंड प्रवाह असलेली जलधारा इथे आहे, मोतीटाका हे जलाशयाचे नाव. प्रत्येक रुतुत इथे पाणी साठलेले असते आणि याच साठविलेल्या पाण्यातुन येणा-या पर्यटकांची तहान एक-एक रुपयात बारादरीत ती मिटवीली जाते. पर्यटकांना माहित नसल्यामुळे धुर्त पाणी विक्रेता ते पाणी इथुनच आणून विकतो. सहजपणे, हाताने पाणी घेऊन पीता येणारी जलधारा याच गुहेत आहे.
किल्ल्यावरील सर्वात उंच भाग शिखरावर येईपर्यंत तीन-चार वेळेस बसत-उठत एकदाचा शिखरावर पोहचलो. श्वासोश्वासाची गती वाढलेली होती. थकून गेलो होतो. या पेक्षा वेरुळलेणी पाहणे परवडले असते असे शिखरावर आल्यावर वाटत होते आणि तेव्हाच या उंच जागेवरुन शहरातील आणि आजूबाजूचा डोंगरांचा परिसर नजरेत बसल्यावर येण्याचा थकवा आणि आलेला कंटाळ्याचा विचार दुर निघून गेला. चारही बाजूने उंच उंच दिसणारे डोंगर अत्यंत सुंदर दिसते .बाला हिसार हा शिखरावरील सर्वात उंच भाग आणि इथेच श्री दुर्गा नावाची तोफ शिखरावरील दुर्गा तोफ आहे. किल्ल्याचा सर्वात उंच भाग हा आहे. इथेच विजयी द्ध्वज लावण्याची व्यवस्था आहे, थकलेला पर्यटक इथे कितीतरी वेळ नुसता बसून असतो.
अतिशय सुरक्षीत असलेला यादवांच्या किल्ला केवळ फितुरीमुळे सत्तांतर झाले.त्या किल्ल्याचे केवळ आता भग्नावशेष शिल्लक राहिले, ज्यांच्या काळात बोली भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळाला, ज्यांच्या भरभराटीच्या काळात समृद्ध शेती जीवनाने काळ बहरलेला. होता. यादवांचे प्रशासन, त्यांच्या छत्रछायेत साहित्य आणि कलेने चमोत्कर्ष गाठलेला होता. इतिहासात उल्लेख केलेल्या लुटीचा येणारा उल्लेख... सहाशे मण सोने,सात मण मोती,दोन मण हिरेमाणकं आणि लक्षावधी रुपये, लुटले गेले. यादवांच्या पराभवानंतर झालेली प्रचंड लुटमार, अग्निकांड, आणि विनाशतांडवामुळे देवगिरीचे सौंदर्य पार कोमेजुन गेले. या आणि इतर इतिहासाच्या आठवणीने आम्ही किल्ला केव्हा उतरलो ते कळलेच नाही.
बारादरीवरुन घेतलेले छायाचित्रे
किल्ल्यावरुन दिसणारी तटबंदी
देवगिरी किल्ला : दौल्ताबाद. ता. जि. औरंगाबाद महाराष्ट्र ( औरंगाबादपासून १० कि. मी. अंतर )
प्रतिक्रिया
15 Dec 2007 - 12:10 am | मनोज
लेख महीतीपुर्ण आहे.
आम्ही मराठ्वाड्याचे आसल्याने जास्त पुळका
विषेश - छायाचित्रे खूप छान आहेत.
(फोटोप्रेमी) मन्या
15 Dec 2007 - 12:10 am | आजानुकर्ण
छायाचित्रे छान आहेत. लेख वाचून सवडीने प्रतिसाद देतो.
15 Dec 2007 - 12:16 am | विसोबा खेचर
बिरुटेशेठ,
केवळ अप्रतिम लेख! चित्रही सुरेख आहेत. विशेष करून रंगमहाल. शिखरावरील दुर्गा तोफही जबरा आहे!
औरभी आने दो..
तात्या.
15 Dec 2007 - 1:06 am | विकास
धन्यवाद बिरूटे साहेब, छायाचित्रे आवडली आणि लेख ही.
15 Dec 2007 - 3:18 am | धनंजय
मागे इथे गेलो होतो तेव्हाचे फोटो मिळाले तर चिकटवतो.
मी पूर्ण किल्ल्यासाठी वाटाड्या केला नव्हता, फक्त अंधेरीसाठी, त्यामुळे बर्याच ठिकाणी कुतूहल वाटले पण कोणाला काही विचारता आले नाही. तुमचा हा लेख त्यामुळे खूपच पथ्यावर पडला!
15 Dec 2007 - 3:27 am | ऋषिकेश
लहानपणी इथे गेलो होतो. मार्गदर्शक घेतला होता. इथला भुलभलैय्या मला चांगलाच लक्षात आहे. इतका निबीड अंधार.. तेल ओतण्याच्या जागा.. एका ठीकाणी असलेला एकदम कमी उंचीचा दरवाजा ज्यामुळे मान झुकवून आत यावे लागेल आणि झुकवली मान की उडव मुंडकं.. वगैरे रचना.. हा किल्ला इतके वर्ष अभेद्य कसा राहिला याची साक्ष जागोजाग पटते!!
बाकी लेख उत्तम!
15 Dec 2007 - 8:15 am | सहज
अप्रतिम लेख!! सुंदर छायाचित्रे!!
प्रा. डॉ. यांनी असेच अनेक गड फत्ते करावेत!!
15 Dec 2007 - 8:56 am | नंदन
डॉक्टरसाहेब, किल्ल्याचे वर्णन, तुमची शैली आणि छायाचित्रे आवडली. लेख माहितीपूर्ण आणि ओघवता आहे.
>>> खरे तर अनेकदा हा किल्ला चढलोय पण, वयपरत्वे जाणीवाही बदलत जातात असे म्हणतात
- हे वाक्य विशेष आवडले.
आपल्या कीबोर्डमधून उतरलेले [:)] आणखी असेच लेख येथे वाचायला आवडतील.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
अवांतर -- या लेखावरील प्रतिक्रिया पानाच्या मधोमध (सेंट्रली अलाईन्ड) का दिसत आहेत?
15 Dec 2007 - 10:12 am | प्रमोद देव
डॉक्टरसाहेब लेख उत्तम उतरलाय आणि छायाचित्रांनी त्याची रंगत वाढवलेय. अभिनंदन.
अजून अशाच प्रकारे छान माहितीप्रद लेख येऊ देत.
15 Dec 2007 - 1:30 pm | आनंदयात्री
आपल्या औरंगाबादेत अजुनही बरेच काही आहे ज्यावर बिरुटेसाहेब भरपुर लिहितील. सुंदर अन सचित्र लेख. आवडला. तुम्ही ज्याला दरी म्हटले आहे त्याला खंदक असे म्हटले जाते. भारतमातेच्या मंदिरात संघाचे अजुनही शिबिरे होतात, अन आम्ही त्याला आवर्जुन हजेरी लावयचो. हत्ती हौदाजवळच्या झाडीत अजुनही मोर आहेत. वडिलांबरोबर कित्येकदा किल्ला चढलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
15 Dec 2007 - 1:55 pm | धोंडोपंत
वा वा प्राध्यापक साहेब,
अप्रतिम लेख. सोबत अप्रतिम छायाचित्रे. क्या बात है !!
खूप आनंद वाटला आपला लेख वाचून. छायाचित्रांमुळे देवगिरीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले.
आपला,
(हर्षभरित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
15 Dec 2007 - 2:02 pm | धोंडोपंत
संपादक मंडळास विनंती,
अशा स्वरूपाचे लेख नेहमीच्या लेखमालेव्यतिरिक्त एखाद्या वेगळ्या कप्प्यात साठवून मुख्यपृष्ठावर ठेवता आले तर काही कालावधीनंतरही ते सहजतेने उपलब्ध होऊ शकतील.
नाहीतर होतं काय की नवीन लेखन आल्यावर जुने लेखन मागे मागे जातं, आणि पुन्हा वाचायचा असल्यास किंवा कोणाला लिंक द्यायची असल्यास फार शोधाशोध करावी लागते.
महाराष्ट्रातील किल्ले, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे अशा स्वरूपाचे कप्पे मुख्यपृष्ठावर उपलब्ध झाल्यास फार बरे होईल असे वाटते.
अर्थात ही एक सुचवण आहे.
आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
15 Dec 2007 - 2:09 pm | गारंबीचा बापू
लेख आवडला. सूचनेबद्दल पंतांशी सहमत.
बापू
16 Dec 2007 - 6:39 pm | स्वाती दिनेश
लेख आणि चित्रे दोन्ही ही सुंदर..शाळेत असतानाच्या औरंगाबाद, दौलताबाद, वेरुळ,अजिंठा ला केलेल्या सहलीची आठवण ताजी झाली.
स्वाती
17 Dec 2007 - 10:42 am | ध्रुव
अहो अप्रतिम.....
वचिन व चित्रे बघुन फार फार आनंद झाला.
--
ध्रुव
17 Dec 2007 - 1:45 pm | जुना अभिजित
दोन वेळा दौलताबादचा किल्ला पाहिला आहे. लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. सर्व चित्र नजरेसमोर उभे राहिले. अताथो दुर्गजिज्ञासा या घाणेकरांच्या पुस्तकात या किल्ल्यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. वेळ मिळाल्यास त्यातील काही गोष्टी मी इथे देतो. त्यात किल्ल्याच्या मागच्या बाजूला अजिबात तटबंदी नसल्याचा उल्लेख आहे. कदाचित तिकडे डोंगर असल्याने असे असावे.
गोवळकोंडा आणि दौलताबादचा किल्ला थोडेफार सारखे वाटतात. का कुणास ठाऊक. बारादरी सारखी गोवळकोंड्यलाही एक इमारत आहे. मात्र दौलताबाद बराच उंच आहे.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
21 Dec 2007 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया लिहिणा-या सर्वांचे, आणि वाचकांचेही मनापासून आभार, आपल्या कौतुकामुळेच आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 Dec 2007 - 5:57 pm | चित्रा
लेख आवडला, बरेच दिवस प्रतिक्रिया द्यायचे मात्र राहून गेले. चित्रेही छान.
लहानपणी औरंगाबादच्यासहलीला गेले होते आईवडिलांबरोबर ते आठवले.
25 Dec 2007 - 8:31 pm | सुधीर कांदळकर
छायाचित्रे देखील छानचित्रे आहेत. महंमद तघलखाने दिल्लीहून जेथे राजधानी हलविली तोच हा किल्ला काय?
31 Dec 2007 - 10:30 pm | ऋषिकेश
तुमचा हा लेख, म. टा. मधे वाचला. आनंद झाला
अभिनंदन!
लेख इथे वाचता येईल
-ऋषिकेश
4 Jun 2012 - 2:38 pm | नाना चेंगट
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही.
:)
5 Jun 2012 - 4:07 am | सुहास..
बरेच दिवसांत प्रा डॉ चा लेख दिसला नाही. >>>
झाल तुझं बोलुन ??
आम्ही गेले सहा महिने विनंती करतोय .....आता पुढल्ल्या औरंगाबाद भेटीत गगांपुरातून , नाहीतर मिलींद कालिजातुन उचलुन आणतो ( ख्यातीप्रमाण !! ) ;)
(अवांतर : हाच तो मटामधील लेख जेथुन आम्ही आंजावर आलो :) )
5 Jun 2012 - 6:47 am | नाना चेंगट
आणा आणा
नाही ऐकले तर गोळी मारा !
4 Jun 2012 - 3:06 pm | प्रचेतस
उत्तम आणि तपशीलवार लिखाण.
देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा.
वेरूळच्या अद्वितीय कैलास मंदिराची बांधणी देवगिरीवरच्या समर्थ शासनाशिवाय शक्य नाही. निदान मुख्य किल्ल्याच्या खंदकाचे, भुयारी बोगद्यांचे काम तर नक्कीच राष्ट्रकूटकालीन असावे. इतर तटबंद्यांचा साज नंतरच्या काळात बांधला गेला असावा.
5 Jun 2012 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवगिरी किल्ला यादवांनी बांधला असे सर्रास म्हटले जाते तरी तो त्यापेक्षाही खूप जुना-राष्ट्रकूटकालीन असावा. ८ व्या शतकाच्या आसपासचा.
अगदी बरोबर. राष्ट्रकूट राजा श्रीवल्लभ याने या दुर्गाची उभारणी इसवीसनाच्या आठव्या शतकात केली. पुढे यादव कुळातील वल्लभ यादवाने या बलाढ्य दुर्गाच्या साह्याने आपली राजवट सुरु केली.
एक आख्यायिका : एकेकाळी अदिमाया पार्वती अन भगवान शंकर याच परिसरात सारीपाट खेळायला बसले. त्या डावात पार्वती जिंकली ( एक असं शिल्प वेरुळच्या लेणीत आहे. सवडीनं डकवतो) पण संसाराचा डाव उधळून शंकर वेरुळच्या अरण्यात निघून गेले. देवी पार्वतीनं भिल्लीणीचं रुप घेतलं आणि तीही त्याच अरण्यात वास्तव्यास गेली. शंकर आणि भिल्लीण यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. कोणाचा (डिष्टर्ब ) संपर्क नको म्हणून सर्व देवांना वेरुळच्या डोंगरावर येण्यास शंकरांनी बंदी घातली पण शंकराच्या सहवासाला आतूर झालेली ही देवमंडळी तिथून जवळच असलेल्या डोंगरावर राहावयास आली, तो हाच डोंगर देवगिरी.
-दिलीप बिरुटे
4 Jun 2012 - 3:14 pm | sneharani
माहितीपुर्ण लिखाण!
:)
5 Jun 2012 - 1:19 am | सुनील
उत्खननात वर आल्यामुळे राहून गेलेला लेख वाचायला मिळाला.
चांगली माहिती.
एकनाथांचे गुरु जनार्दन येथिल किल्लेदार होते ही माहिती नव्यानेच समजली. गुरु जनार्दन सोळाव्या शतकातील तर किल्ला खिलजीने जिंकला तेराव्या शतकातच. म्हणजे ते खिलजीचे (की मोगलांचे?) किल्लेदार होते तर!
5 Jun 2012 - 9:21 am | मन१
आदिलशहा किंवा निजामशहाचे असावेत असे वटते.
वाटण्यास काहिही आधार नाही. पण उगीचच वाटते.
5 Jun 2012 - 9:54 am | कुंदन
मस्त हो प्रा डॉ!
प्रा डॉ , यकु आणि मि पा कर मिळुन एक दौरा आखावा का औ बादचा ?