आठवणीतलं नवरात्र

भाग्यश्री कुलकर्णी's picture
भाग्यश्री कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Sep 2008 - 4:42 pm

नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे.

गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची. त्यात येणारे पाळणे, खेळणी, शुंभ करोतीचे पुस्तक (ते आजीकडे अजूनही आहे) व वाटेत असणार्‍या गाडगीळ बाईंची भेळ (तशी भेळ मला भयानक आवडते) ही तेथे जाण्यासाठीची पुरक असणारी प्रलोभनं.
बहुतेक नवरात्रीत हादगा असायचा. त्यावेळी घरोघरी हादगा खेळायला, त्यातली गाणी जास्तीत जास्त मला येत असल्यामुळे मी आघाडीवर असायची. आमच्याकडेही एखाद्या दिवशी पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरला जायचा. चारला बाहेर पडलेली वरात अख्ख्या ब्राह्मणपुरीत फिरून साडेआठपर्यंत घरी येताना खिरापतीनं पोट भरलेली मात्र फेर धरून पाय टाकलेले, अशा थाटात घरी परतायची.

'बालाजीची सासू, कसल्या भाज्या, कसल्या उसळी.... अशा खिरापती ओळखण्यासाठी लावलेला सूर अजुनही सगळ्या मैत्रिणींच्या आवाजानिशी आठवतो. आमच्याकडे राधाबाई नावाची एक कामवाली यायची. तिला राधाबाई म्हटल्यावर फार राग यायचा. तिला मावशीच म्हणायला लागायचं. तिच्या अंगात येत होतं.(तिच्या अंधार्‍या घरात एक- दोनदा बहिणीसोबत गेल्याचं आठवतंय.) मी खोदून खोदून तिच्याकडून माहिती मिळवायची, तेव्हा कळायचं नाही पण 'डोक्यात जट आल्यावर मी झाड झाले... असं काहीबाही ती सांगायची' त्यावेळी माझ्या वेण्या ती घालत असे. तेव्हा ती मुद्दाम माझ्या जटा (केसातला गुंता) न काढता ही मलाही झाड बनवेल अशी भीती कायम माझ्या मनात असायची.

नंतर मिरज सुटलं मी नाशिकला आले. आजीच्या माहेरी रेणूका मातेचं मंदिर आहे. नवरात्रीच्या आदल्या रात्री मंदिर, गाभारा, मंदिरातील भिंतीवरील प्रतिमा, देवीची दागिने, पुजेचा सामान, सगळं साफ करताना रात्रीचे 2-3 वाजायचे. मंदिराचा गाभारा अगदी लहान होता. त्यात किरकोळ अंगकाठीचाच माणूस जाऊ शकत असे. त्यामुळे बाकी मंदिरे साफसुफ करायला मलाच जावे लागायचे. ते नऊ दिवस वातावरण भारलेलं राही. संध्याकाळी देवीसमोर सडा, रांगोळी काढली जायची. आमच्या शेजारी मारवाडी रहायचे पण ते सुध्दा खूप उत्साहाने या साफसफाईच्या कामापासून तर सजावटीपर्यंत सगळ्यात भाग घ्यायचे. त्यांची मुलगी तर रांगोळ्या सुरेख काढायची. संध्याकाळी तासभर आरती मग प्रसाद वाटप, रोज नवा ड्रेस, आपलं घरचं मंदिर म्हणून आरती म्हणताना पुढे पुढे करणं, अशा बर्‍याच गमती जमती असायच्या.

अष्टमीचा होम, मग त्या दिवशी उपास अन् रात्री त्या धुराचा त्रास. कधी कधी रात्री ग्रुपने कालिकेला जायची धूम. एखाद्या रात्री गरबा बघायला जायचं. (तोवर आपल्याही गरबा चांगला जमेल याचा 'कॉ‍न्फिडन्स' नव्हता.) आजीच्या बहिणीच्या अंगात यायचं. अशा बर्‍याच बायका तेव्हा त्या मंदिरात जमायच्या. त्यांच्या विषयी काहीसं गुढ, भीती, कुतुहलही वाटायचं. त्याबरोबर ग्रुपनी त्यांची केलेली उडवाउडवीही आठवतेय. त्यानंतर भीतीही वाटायची, की़ त्यांना हसल्यावर काही झालं तर...? याच काळात आजीच्या बहिणीकडे कालीपूजा असायची, त्यावेळी ती बंगालीत काय बोलायची ते आम्हाला कळायचं नाही. पण तिच्याविषयी मात्र भीतीयुक्त गुढ कायम राहिलं. तिच्याकडचे प्रसादाचे रसगुल्ले मात्र आम्ही खायला जायचो.

नाशिकची कालिकादेवी प्रसिद्ध. नवरात्रात कालिकेला रोज बायका सकाळी लवकर उठून अंघोळ करून पहाटेच जातात. आम्हीही जात असू. सगळ्या मिळून जाताना वाट कशी संपली ते कळतंच नसे. एवढेच अंतर एरवी चालून जाऊ म्हटलं तर ते अशक्य वाटे. तिथल्या जत्रेत मजा करायला जायचं तर ते म्हणजे रात्रीचं आणि ग्रुपने तरच धमाल यायची.

गरब्याचं प्रस्थ आजकाल बरच वाढलय. आता इकडे मध्य प्रदेशात आल्यावर तर गल्लोगल्ली दांडिया दिसतात. आमच्या लहानपणी किंवा महाविद्यालयीन जीवनात वेगळ्या वातावरणात आम्ही राहिलो. त्यामुळे गरब्याचं अप्रुपही वाटतंय, पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्‍या वाळूसारखं वाटतंय.

हे ठिकाणसंस्कृतीदेशांतरसमाजजीवनमानराहणीप्रकटनविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

29 Sep 2008 - 4:46 pm | जैनाचं कार्ट (not verified)

पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्‍या वाळूसारखं वाटतंय.

वा सुंदर वाक्य !

मनातील विचार व्यवस्थीत प्रकट झाले आहे.. अभिनंदन !

लेखन आवडले ! अंबाबाईचे नाव घेताच कोल्हापुर आठवले होते आधी पण तुम्ही मिरजे बद्दल लिहत होता... कोल्हापुरला पण २० एक वर्षापुर्वी खुप मस्त पैकी नवरात्र होतं असे... त्याची कळत नकळत आठवण तुमच्या लेखामुळे झाली !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

शितल's picture

30 Sep 2008 - 5:32 am | शितल

भाग्यश्री,
छान लिहिले आहेस.
हादगा, नवरात्र हे दिवस म्हणजे अगदी सर्वत्र एक उत्साहाचे वातावरण असते.
कोल्हापुरच्या साईडला हादगा -खिरापत वाटणे हे खुप चालते.
आणि अंबाबाई देवळात तर खुप सुंदर रोशनाई असते आणि नऊ दिवस वेगवेगळ्या रुपातील अंबाबाईचे दर्शन होते, नऊ दिवस पालख्या निघतात .
:)

स्वाती दिनेश's picture

29 Sep 2008 - 5:50 pm | स्वाती दिनेश

पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्‍या वाळूसारखं वाटतंय.
हीच भावना मनात आली..
आमच्याकडे हादग्याला भोंडला म्हणतात.ऐलोमा पैलोमा.. खिरापती..ती मजा...
ह्म्म.. आता तर भोंडल्याची गाणीच माहित नाहीत कितिक जणांना..म्हणून आम्ही शाळांमध्ये ५ वी ते ७ वीच्या मुलींकडून भोंडल्याची गाणी पाठ करून घेतली आणि त्या मुलींचा भोंडला घातला,खिरापतीसकट..:)मुलींना खिरापत ओळखायला खूप मजा वाटली.
घंटाळीदेवीच्या अंगणात नवरात्राचे कितीतरी छान छान कार्यक्रम,व्याख्याने होत असत. विंदा,पाडगावकर,बापट या त्रयींचं काव्यवाचन मी प्रथम तिथेच ऐकलं. भावसरगम हा हृदयनाथांचा कार्यक्रम,पं भीमसेन जोशींची अभंगवाणी,प्रा.शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं आणि किती तरी..
अष्टमीला ब्राह्मण सेवासंघातल्या देवीला जायचं .तिचा मुखवटा तांदळाच्या उकडीचा असतो आणि तो चढवणं म्हणजेच एक मोठा सोहळा! घागरीफुंकणार्‍या बायकांविषयी भीतीयुक्त कुतुहल संघात आणि घंटाळीला अष्टमीला गेलो की वाटायचं..
आणि दसर्‍याला तर घंटाळीचं सारं देऊळच गोंड्याच्या फुलांनी(झेंडू) केशरी सोनपिवळं होत असे.(अजूनही होत असेल पण आता ते पहायला दसर्‍याला ठाण्यात असायला हवं.)
भाग्यश्री,तुझ्या लेखाने त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 8:29 pm | प्रभाकर पेठकर

त्यामुळे गरब्याचं अप्रुपही वाटतंय, पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्‍या वाळूसारखं वाटतंय.

हा आठवणींचा अमुल्य ठेवा हीच त्या रम्य बालपणाची देणगी. संवेदनशील मनाला ह्या आठवणी तात्काळ त्या बालपणात घेऊन जातात, आपण रममाण होतो. वर्तमान, त्याचे बंध, ते खोटेपणाचे मॅनर्स, ती मनावरील विविध दडपणं आणि नातीगोती टिकविण्याची केविलवाणी धडपड सर्व गळून पडतं आणि मन स्वच्छंदपणे त्या बंध विरहीत बालपणात बागडतं.

मन ताजंतवानं होऊन जातं. असह्य ताणाच्या वर्तमानातही खळखळून हसण्याची प्रेरणा देतं.

मस्त लिहिलं आहे. अभिनंदन.

कलंत्री's picture

29 Sep 2008 - 8:47 pm | कलंत्री

नॉस्टाल्जिआ साठी स्मृतीरंजन हा शब्द वाचल्याचे आठवते.

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 11:14 pm | प्रभाकर पेठकर

'स्मृतीरंजन' शब्द ढोबळ मानाने चालू शकेल. पण नॉस्टाल्जिआत वैफल्यावस्थेत नेणार्‍याही स्मूती असतात. नेहमीच 'रंजक' स्मृती असतीलच असे नाही.

रेवती's picture

29 Sep 2008 - 8:58 pm | रेवती

वाचून मला माझ्या लहानपणीचा भोंडला आठवला. माझी आई हौसेनं एका वेळेस पंधरा पंधरा खिरापती करायची. अगदी साखर खोबर्‍या सारख्या साध्या पदार्थापासून ते गुळाची पोळी, वेगवेगळे भात, भेळ, वाटली डाळ आणि काय काय.
लग्न झाल्यावर पहिल्यांदा अष्टमीला घागरी फुंकणे म्हणजे काय ते पाहीले. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे घागरी उदवून त्या अंगात येणार्‍या महीलांना द्यायला सांगितले. एका बाईंच्या अंगात सुपरवूमन आली (संचारली) कि काय, त्यांनी घागरीसकट पलायन केले. मी घाबरले तर सासूबाईंनी सांगितले कि येतील त्या परत तासाभराने. मी फार हसले त्यादिवशी. चित्पावन संघात सकाळी पुजेला गेल्यावर तिथल्या आजीबाईंनी विचारले,"अगों, कोकणस्थाची म्हणवतेंस तर रंग बरिक सांवळाच हों तुझा." लग्गेच दुसर्‍या बाईंनी उत्तर दिले कि हिचे माहेर देशस्थाचे हों. त्यानंतर अग्गोबाई!, होक्का, वगैरे बोलणी ऐकून जाम मजा वाटली.

रेवती

प्राजु's picture

29 Sep 2008 - 9:23 pm | प्राजु

सुंदर लिहिलं आहेस नवरात्र.
आम्ही माझ्या आत्याकडे जायचो. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात असायचं नवरात्र. मुखवटा उभा करून त्याला साडी दाग दागिने... सगळंच सुंदर.
नऊ दिवस सकाळ संध्याकाळ रोज ३०-३५ माणूस जेवायला.
रात्री आरती.. आणि अष्टमीला घागरी फुंकायच्या.. खेळ आणि गाणी.
सगळंच हातातून निसटून गेलंय..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

29 Sep 2008 - 10:01 pm | यशोधरा

एकदम सुंदर लिहिलय. खूपच आवडलं मला.

चित्रा's picture

30 Sep 2008 - 7:48 am | चित्रा

असेच म्हणते.

छान आठवणी आणि लेख. लहानपणी नवरात्रीला खूप मजा यायची. आमच्या गावच्या देवीच्या देवळाच्या बाहेर मस्त कमळाची फुले मिळतात या दिवसात.

भाग्यश्री's picture

29 Sep 2008 - 10:05 pm | भाग्यश्री

खूप मस्त लिहीलंयस गं.. सगळं लहानपण आठवलं!!

(तुझं नाव वाचून मी हबकलेच! म्हटलं हा लेख मी कधी लिहीला?किंवा मी इतकी फेमस कधी झाले की माझ्या नावाचे डुप्लीकेट आयडी आले! :)) ह.घे..! मीही भाग्यश्री कुलकर्णीच! :) )

झकासराव's picture

30 Sep 2008 - 8:19 am | झकासराव

लेख मस्तच लिहिलाय. :)
अवांतर : मी आता प्रश्नच विचारणार होतो की मि पा वर दोन दोन भाग्यश्री कुलकर्णी झाल्या की काय?
कारण मला माहीत असलेली भाग्यश्री एवढुशा वयात मिरज, नाशिक, पुणे आणि अमेरिका कधी कधी फिरली हा प्रश्न मनात आलाच. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मृदुला's picture

30 Sep 2008 - 4:24 am | मृदुला

आमच्याकडेही एखाद्या दिवशी पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरला जायचा

माझ्या लहानपणीची आठवण झाली. घरी रोज भोंडला (=हादगा) असे, आणि रोज एक खिरापत वाढवत जाई.
माझी माता तिचं १० तास काम करून त्यात ह्या खिरापती वगैरे मस्त करत असे. ती सुपरमाता आहे हे आता कळलंय.

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 8:33 am | विसोबा खेचर

छोटेखानी परंतु छान लेख...

जियो...

आपला,
(नवरात्रौत्सव प्रेमी) तात्या.

पारोळेकर's picture

30 Sep 2008 - 1:42 pm | पारोळेकर

बालपण डोळ्यासमोर उभा करणार लेख ......
लहाणपणी कंडारी (भुसावळ) येथील भोळे वाड्यात आम्ही मित्र -मैत्रिणी अशीच धम्माल करायचो.