भाग ८
शेवटी दोन्ही वकिलांनी आपापल्या बाजू पुन्हा एकदा मांडल्या. सरकारी वकिलाने असे सांगितले की ह्या महिलेला मारहाण झालेली आहे, जीव घेण्याची धमकी दिली गेली आहे. तिच्यावरील जीवघेण्या आपत्तीमुळे तिच्या जबाबात त्रुटी होत्या पण मानवी मन हे अशा भयंकर घटना विसरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे तसे घडले. विविध छायाचित्रे आणि डॉक्टरांच्या जबानीवरून हे दिसते आहे ह्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्ही तिला न्याय द्या.
आरोपीच्या वकिलाने असे म्हणणे मांडले की आरोपीला विनाकारण गोवले आहे. महिलेच्या जबानीतील त्रुटी ह्या तिची स्टोरी खोटी असल्यामुळेच आहेत. पैशाचा व्यवहार फिसकटल्यामुळे त्या महिलेने खोटे आरोप केले आहेत. अपहरण, बलात्कार हे पूर्ण खोटे आहे. ज्याला मारहाण म्हणत आहेत ते आरोपीने स्वत:चा बचाव करण्याकरता केलेला प्रतिकार आहे. कायद्याने त्याला स्वत:चे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
ह्यानंतर न्यायाधीशाच्या ज्युरीकरता सूचना हा एक कार्यक्रम होता. ह्याचे दोन भाग होते. एक म्हणजे सर्वसाधारण तत्त्वे जी पाळणे आवश्यक असते आणि ह्या केसमध्ये असणारे विविध आरोप ह्यांचे मूल्यमापन कसे करायचे. जी तत्त्वे पाळायची ती अशी
१. आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादी वकिलाची आहे. बचाव पक्षाच्या वकिलावर अशी जबाबदारी नाही. सरकारी वकिलाने आरोप सिद्ध केला असे आपणास वाटत असेल तरच आरोपीला दोषी माना.
२. आरोपीला शिक्षा काय होईल ह्याचा विचार करू नका. दोषी आहे की नाही ह्याचाच विचार करा. शिक्षा देणे हे जजचे काम आहे. तुमचे नाही. हे सांगितले तरी ह्याचा अवलंब करणे थोडे अवघड गेले.
३. प्रत्येक आरोपाचा निर्णय वेगळा करा. अमक्या आरोपातून सुटला म्हणून मग पुढच्यात गोवू या असा विचार करू नका. प्रत्येक आरोपाचा विचार तटस्थपणे इतर आरोपांशी सरमिसळ न करता करा. पुन्हा हेही थोडे अवघड पथ्य होते.
४. थेट पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा हे दोन्ही कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. तुम्हीही दोन्ही बरोबरीचे माना. अर्थात प्रत्येक पुराव्याची विश्वासार्हता कितपत मानायची हे तुमच्यावर आहे. पण निव्वळ तो थेट पुरावा नाही म्हणून आपोआप रद्दबातल मानू नका. उदा. एका खोली शिरणारा माणूस असे सांगतो आहे की बाहेर पाऊस पडतो आहे. हा थेट पुरावा. पण एखादा माणुस बाहेरून येतो आणि त्याच्याकडे पाणी निथळणारी छत्री आहे. त्यावरून तुम्ही निष्कर्ष काढता की बाहेर पाऊस पडत आहे तर तो परिस्थितीजन्य पुरावा.
५. काय गोष्टी पुरावा मानायच्या नाहीत? वकिलांचे युक्तिवाद, आक्षेप, न्यायाधीशाने ज्या गोष्टी दुर्लक्षित करा असे सांगितले आहेत त्या, हे सगळे पुरावे मानायचे नाहीत. तुमच्या निर्णयप्रक्रियेतून ह्या गोष्टी पूर्ण वगळा.
६. एका घटनेची दोन (वा जास्त) स्पष्टीकरणे असतील तर तुम्ही त्यातले आरोपी ज्यात जास्त निर्दोष असेल ते स्पष्टीकरण ग्राह्य माना.
७. केवळ इंग्रजीतील कामकाज पुरावा समजा. समजा साक्षीदार वा अन्य कोणी वेगळ्या भाषेत बोलला असेल आणि ते भाषांतरित करून तुम्हाला ऐकवले असेल तर इंग्रजी भाषांतर हेच पुरावा माना. मूळ भाषेतले नाही, ती भाषा तुम्हाला कळत असली तरीही.
मग त्या ८ आरोपांचे तपशील दिले गेले. प्रत्येक आरोपाकरता ते सिद्ध व्हायला काय काय मुद्दे विचारात घ्यायचे वगैरे. उदा. मारहाणीचा आरोप. ह्यात आरोपीवर उघड उघड संकट (इमिनण्ट डेंजर) नव्हते, त्याने केलेला प्रतिकार प्रमाणाबाहेर जास्त तीव्र होता ह्यावर तो माराहानिकाराता दोषी आहे की नाही ते ठरणार. बलात्काराकरता दोघांचा संबंध आला आणि तो आरोपीने इच्छेविरुद्ध केला ह्यावर बलात्काराचा आरोप ठरणार. वगैरे.
हे सगळे ऐकून मग सगळे ज्यूरर चर्चाकक्षात रवाना झाले. आपापल्या वह्या तिकडे न्यायाची परवानगी होती. काही प्रमाणात तिथे आमची बडदास्त राखली गेली. कॉफी होती, डोनट वा केक असले काही खाणेही आणून ठेवले जायचे. .
आमच्यातला एक म्होरक्या निवडला गेला. त्याने उभे राहून फळ्यावर सगळे आरोप लिहिले. बहुतेक आरोपांबाबत निर्दोष असेच सगळ्यांचे मत पडले. पण एक आरोप जो हल्ला, मारहाणीचा होता. तिथे लोकांमध्ये फूट पडली. सुरवातीला ८ दोषी विरुद्ध ४ निर्दोष असे समीकरण होते. नंतर ते १० विरुद्ध २ निर्दोष असे बनले. आरोपीने जरुरीपेक्षा जास्त शक्ती वापरली का ह्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. प्रत्येकाने आपापले मुद्दे माण्डायचे. आणि मग त्यावर चर्चा, प्रतिप्रश्न. काही बायकांना आरोपीचा चांगलाच राग आला होता. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याने नक्कीच काहीतरी केलेले आहे असे विचार होते. दुसरीकडे असा विचार होता की रात्रीची वेळ, आरोपी ट्रक चालवतो आहे. ही महिला हल्ला करते. ट्रक कुठेतरी जाऊन आदळला तर काय ह्या भीतीने आरोपीने प्रतिकार केला आणि तो जास्त बलिष्ठ असल्यामुळे महिलेला इजा जास्त झाली. महिलेने खोडी काढली आहे. आणि आरोपीला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार कायद्यानेच मिळालेला आहे.
दोन दिवस उलटले तरी ह्या मुद्द्यावर एकमत झाले नाही. गुन्हेगारी खटल्यात सर्व ज्युररांचे एकमत झाले नाही तर त्या आरोपापुराता खटला रद्दबातल ठरतो (मिस्ट्रायल). शेवटी आम्ही जजसाहेबांचे दार ठोठावले (आलंकारिक अर्थाने!) त्यांना आम्ही कुठल्या मुद्द्यावर अडून आहोत ते सांगितले. परंतु जजने त्याने पूर्वी दिलेल्या सूचनाच पुन्हा दिल्या. कुठलीही नवी माहिती, मार्गदर्शन करण्यास त्याने असमर्थता दर्शविली. नि:पक्ष राहून तसे करणे शक्य नाही असे त्याने आम्हाला समजावले. एक तोडगा म्हणून आम्हाला पुन्हा एकदा कोर्टात आणुन दोनही वकिलांना त्या मुद्द्यावर पुन्हा युक्तिवाद करायला बोलावले. त्यांनी त्यांच्या परीने बाजू मांडल्या. सरकारी वकिलाने हेच अधोरेखित केले की एक असहाय महिला अशा प्रकारे अत्याचाराचा बळी ठरत आहे. आरोपीला कुठलीही इजा नाही उलट ह्या महिलेला इतकी इजा. हॉस्पिटलमध्ये trauma procedure लागू करण्याचा विचार केला इ. उलट आरोपीच्या वकिलाने असे मुद्दे मांडले की कधी कधी एखादा माणूस आपल्यावरील हल्ल्याचा प्रतिकार करताना अनवधानाने इजा करतो. त्यात मुख्य उद्देश प्रतिकार हा असतो, हल्ला थांबावा हा उद्देश असतो. कुणाला इजा व्हावी हा उद्देश नसतो. आणि जेव्हा असा हल्ला होतो तेव्हा समस्त पैलूंचा सार्वंकश विचार करून आदर्श प्रतिसाद देता येईल इतका वेळ नसतो. एखादा सेकंद वा त्याहून कमी वेळात काय ते ठरवायचे असते. जीवावरील संकट आलेले असताना कोण कसे वागेल हे सांगता येत नाही. आपला मुद्दा स्पष्ट करायला त्याने एक उदाहरण दिले : समजा मी एका दुकानाबाहेर उभा आहे. माझ्यावर एक माणूस अचानक हल्ला करतो. मी त्याला प्रतिकार करतो. पण तो पुन्हा हल्ला करतो. मग मी जास्त आक्रमक होतो. पण तो माणूस मागे हटत नाही. तो आणखी संतप्त हल्ला करतो. मग मी एक जोरदार ठोसा लगावतो. तो माणूस खाली पडतो पण पडता पडता त्याचे डोके जमिनीवरील टोकदार वस्तूवर आदळते आणि तो मरण पावतो. इथे मी हल्लेखोराला ठार मारण्याकरता प्रतिकार केला का? नाही.
हा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा आम्ही आमच्या खोलीत आलो. परंतु ह्या प्रयोगानंतरही कुणाचे फारसे मतपरिवर्तन झाले नाही. काही ज्युरर मंडळी ज्यात स्त्रिया जास्त होत्या त्यांना आरोपीवर विशेष राग होता. एका महिलेने तर असा दावा केला की आरोपी नियमितपणे महिलांना मारहाण करत असला पाहिजे. त्याचा चेहराच सांगतो आहे की तो अत्याचारी आहे वगैरे!
अर्थात आम्हाला अशा प्रकारे कल्पनाशक्ती वापरून निर्णय करायचा नव्हता. जे काही पुरावे आहेत ते आणि तेच ग्राह्य मानायचे असा स्पष्ट आदेश होता. ज्यूरर मंडळीनी असा प्रस्ताव मांडला की आरोपीची जबानी पुन्हा ऐकायला मिळावी. कोर्टाचा लेखनिक (क्लार्क) ते बाड घेऊन आला. त्याने ती जबानी वाचून दाखवली. (ही एक अशीच जुनाट पद्धतीची रीत. कोर्टाचे ध्वनिमुद्रण ऐकवायला काय हरकत होती? पण नाही!)
तर आमची चर्चा अजून अर्धा दिवसांनी लांबल्यावर सर्वांनी असे ठरवले की सगळ्या मुद्द्यावर एकमत होणार नाही. आम्ही ७ प्रकरणी निर्दोष आणि एका प्रकरणात एकमत नाही असा निर्णय घेतला. पुन्हा कोर्ट भरले. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. जजसाहेब आले. आमच्या म्होरक्याने आमचा निर्णय सांगितला. आठव्या आरोपात किती लोक एका बाजूला आणि किती दुसर्या बाजूला होते ते विचारले गेले. १० विरुद्ध २ असा आकडा होता. प्रत्येक ज्युररला "तुला हा निर्णय मान्य आहे का ?" असे विचारले गेले. प्रत्येकाने "हो मान्य आहे" असे सांगितले. मग क्लार्कने तो निर्णय वाचून दाखवला. निर्णय ऐकल्यावर आरोपी, त्याची बायको वगैरे डोळे पुसत होते. आम्हाला पुन्हा आमच्या खोलीत पाठवले. आमच्या वह्या, सगळे पुरावे हे काढुन घेतले गेले. कोर्ट रिकामे झाले. आम्ही पुन्हा कोर्टात आलो. वकील, क्लार्क, जज आणि ज्युरर एवढेच उरलो. आता जजने आमचे मनापासून आभार मानले. तुम्ही सर्वांनी मनापासून निर्णयप्रक्रियेत भाग घेतलात. म्हणुन कृतज्ञता व्यक्त केली. त्याची ही शेवटची केस होती. त्यानंतर त्याच्या कामाचे स्वरूप बदलणार होते त्यामुळे जरा जास्तच हळवा वाटला. मग जजने रजा घेतली. मग वकिलांनी आमच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. ह्याकरता थांबायचे बंधन नव्हते. पण ह्या केसबद्दल काय वाटले, काही प्रश्न आहेत का असे विचारले. तेव्हा पोलीस तपास इतका कच्चा का होता वगैरे प्रश्न उपस्थित केले गेले. वकिलांनी आपल्या परीने त्याचे स्पष्टीकरण दिले.
तर अशा प्रकारे एक महिना चाललेली केस पूर्ण झाली. कोर्ट कसे चालते, कायदे कसे वापरले जातात, वकील युक्तिवाद कसा करतात, ज्युरी निर्णय कसा देते असे बरेच काही शिकायला मिळाले. ज्यूरी ड्युटी हे एक मोठे संकट असते असा समज ऐकिवात होता तो ह्या बाबतीत तरी खरा वाटला नाही.
एक आणखी महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली की अशा गुन्ह्यात खरोखर काय घडले ते कळणे अवघड असते. जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारावरच निर्णय द्यावा लागतो. हात कायद्याने बांधलेले असणे म्हणजे काय ह्याचा प्रत्यक्ष अनुभव इथे आला.
समाप्त.
प्रतिक्रिया
24 May 2016 - 8:33 pm | रुस्तम
बरेच दिवसांनी आला हा भाग आता वाचून काढतो.
24 May 2016 - 8:36 pm | सुबोध खरे
शेवट निकाल काय लागला?
24 May 2016 - 8:37 pm | आतिवास
लेखमाला खूप आवडली.
एका वेगळ्या जगाची माहिती मिळाली. तुम्ही खूप छान लिहिलं आहे.
तुमचे आणखी लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा.
24 May 2016 - 8:44 pm | रुस्तम
जज ने निकाल काय दिला? काय शिक्षा दिली?
24 May 2016 - 8:55 pm | जेपी
वेगळी लेखमालिका आवडली..
पुलेशु.
24 May 2016 - 8:56 pm | बोका-ए-आझम
न्यायाधीशांनी बहुधा आरोपीला निर्दोष सोडलं असावं किंवा मग mistrial जाहीर केली असावी.
24 May 2016 - 9:39 pm | यशोधरा
एका वेगळ्या विषयावरची लेखमाला खूप आवडली.
24 May 2016 - 9:56 pm | अनुप ढेरे
छानच होती लेखमाला!
24 May 2016 - 10:00 pm | गामा पैलवान
शेंडेनक्षत्र,
तुमचा अनुभव रोचक आहे. अपरिचित दालनात काम कसं चालतं याचं जिवंत चित्रं डोळ्यासमोर उभं राहिलं. धन्यवाद. :-)
रच्याकने, पोलीस तपास कच्चा का राहिला होता?
आ.न.,
-गा.पै.
24 May 2016 - 10:18 pm | सस्नेह
चांगली लेखमाला.
केसचा निकाल दिला नाही त्यामुळे अर्धवट वाटली.
24 May 2016 - 11:13 pm | शेंडेनक्षत्र
ज्यूरीने आपला निर्णय दिला त्यानंतर जज काय ते ठरवणार. बहुधा आठवड्याभरात निर्णय झाला असेल. पण आम्हाला आमचे काम सोडून तो निकाल ऐकणे शक्य नव्हते. इतके दिवस कामावरुन रजा मिळवलेली असताना अशा प्रकारे कुतुहल शमवण्याकरता सुट्टी घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे मी तरी निकाल ऐकू शकलो नाही. केस इतकी गाजलेली नव्हती त्यामुळे पेपरात वा अन्य कुठे त्याचा गाजावाजा झाला नाही. बहुधा आरोपी सुटला असावा. कारण त्याने ६-७ महिने तुरुन्गात काढले होते. ते लक्षात घेऊन जजने त्याला सोडून दिले असावे असा अंदाज. कारण गंभीर गुन्ह्यापैकी कुठल्याही आरोपाखाली तो दोषी नव्हता. जर मला केसबद्दल नवी माहिती मिळवता आली तर नक्की सांगेन.
24 May 2016 - 11:39 pm | राघवेंद्र
मस्त लेखमाला.
खुप नवीन माहिती मिळाली.
16 Jun 2016 - 2:03 am | बोका-ए-आझम
Public Domain मध्ये आली असेल. त्यावरून माहिती कळू शकेल.
25 May 2016 - 12:43 am | एस
वाखुसाआ.
15 Jun 2016 - 11:44 pm | palambar
एक रुका हुवा फैसला सिनेमाची आठवण झाली
16 Jun 2016 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे
एका अनभिज्ञ असलेल्या प्रणालीची सुरस कथा ! सगळे भाग रोचक होते. काय निकाल लागला हे कळले असते तर अजून मजा आली असती.
16 Jun 2016 - 9:17 am | नाखु
निकाल लागतो न्याय मिळतोच असे नाही.
पोलीस तपास यंत्रणा,आणि वेळेवर व अचूक मिळवलेले सज्जड पुरावे नसतील तर (आणि पोलीस आर्थीक्+राजकीय प्रलोभनापासुन दूर राहीले नसतील भारतात प्रामुख्याने) न्याय मिळण्याची शकय्ता अगदी धूसर असते.
अनुभवी नाखु
16 Jun 2016 - 11:26 am | मुक्त विहारि
आवडली..
3 Dec 2020 - 3:44 pm | महासंग्राम
भारीच लेख माला 12 Angry Men आठवला