आमच्या कोर्टाचा पुकारा होताच आम्ही सगळे हळूहळू कोर्टात हजर झालो. दारात एक कडक चेहर्याची पोलिसाच्या वेषातली कृष्णवर्णीय स्त्री होती. ती शेरीफ असल्याचे कळले. त्या बाईने होतकरू ज्युररांच्या यादीत प्रत्येकाचे नाव पाहून मगच त्यांना बसायची अनुमती दिली. एक म्हातारा ज्यूरर होता त्याने डोक्यावर टोपी घातली होती ती त्याला काढायला लावली. थंडीचे दिवस होते. म्हातारा म्हणाला की त्याला थंडी वाजते आहे म्हणून तो टोपी घालून आला आहे पण कोर्टाचा नियम असल्यामुळे त्याला टोपी काढणे भाग पडले. ह्या प्रसंगावरून शेरीफ बाई कडक शिस्तीच्या असाव्यात असा अंदाज आला. एकंदरीत १०० लोक होतकरू ज्युरर म्हणून निवडले होते. स्थिरस्थावर झाल्यावर शेरिफाने जजला फोन करून बोलावले आणि यथावकाश न्यायमुर्ती कोर्टात आले. ते येताच "All rise for the judge अमुक तमुक" असा हुकुम शेरीफने सोडला. इतके दिवस सिनेमातच हा प्रसंग पाहिला होता. सगळे उभे राहिले. जज आला, बसला आणि सगळ्याना बसायला सांगितले. जज पन्नाशीतला श्वेतवर्णी माणूस होता. चेहर्यावरून तोही कडक वाटत होता. त्याने सर्वप्रथम सगळ्या ज्युरर लोकांचे आभार मानले. केस काय आहे ते सांगितले. एका चाळीशीतल्या माणसावर ३० वर्षीय स्त्रीवर बलात्कार केल्याचा मुख्य आरोप होता. जोडीला अपहरण, मारहाण आणि फोर्सड सेक्सचे अजून काही प्रकार (मी फार तपशिलात जाऊ इच्छित नाही!) असेही आरोप होते. ही केस पिपल व्हर्सेस व्हिक्टर अमुक तमुक अशी होती. अर्थात फिर्यादी हा सरकार, जिच्यावर अत्याचार झाले ती बाई नाही आणि आरोपी हा बचाव पक्ष. मग आरोपी, दोन्ही बाजूचे वकील ह्यांची ओळख करून दिली गेली. आरोपीने उभे राहून हौ आर यु डुइंग असे म्हणुन अभिवादन केले. असले भयंकर आरोप असणारा माणूस तेव्हा भीतीदायकच वाटला. ६ फूट उंच, मजबूत बांधा, काळेपांढरे बारीक कापलेले केस. चेहर्यावरून (आणि नावावरूनही) मेक्सिकन वाटला. ज्युरी ड्युटीचे बोलावणे आल्यावर लोकांशी गप्पा झाल्या होत्या त्यात आरोपी एखाद्या ग्यांगचा असेल आणि त्याला दोषी ठरवले तर ज्युरर मंडळींना ते लोक कसे मारू शकतात वगैरे रोमहर्षक कथा ऐकल्या होत्या त्याची आठवण झाली! जजने केसची माहिती दिली . वेळापत्रक दाखवले. ही केस महिनाभर चालणार होती. ज्युरींची निवड सुरु होण्यापूर्वी जजने ज्या उमेदवारांना अपरिहार्य कारणाने ही ड्युटी करणे शक्य नव्हते त्यांना आपापली बाजू मांडण्याची संधी दिली. ज्यांच्याकडे अशी काही कारणे नव्हती त्यांनी दुसर्या दिवशी ज्युरी निवडीकरता ९ वाजता यायचे. मग हे सगळे अपरिहार्य कारणवाले लोक कोर्टाबाहेर लाइन लावून उभे राहिले. सुट्ट्या तोंडावर आल्यामुळे असेल पण ही रांग मोठ्ठी होती. काही वेळ मला वाटले आपणही रांगेत जावे आणि काहीतरी सबब सांगावी. तशीही माझ्या मनात हे सगळे कायदेशीर, कलमे वगैरे कळेल की नाही ही धाकधूक होतीच. पण ती भलीथोरली रांग बघून तो विचार रहित केला.
दुसर्या दिवशी ठीक ९ वा. पुन्हा कोर्टात हजर. आता ज्युरींची निवड. कोर्टाच्या पुढच्या भागात एका बाजूला ज्युरी लोकांच्या खुर्च्या होत्या. निवड होण्यापूर्वी सगळे प्रेक्षकांकरता असणार्या बाकांवर बसले होतो. जसजसे नाव पुकारले जात होते तसे निवडलेले लोक पुढच्या खुर्च्यांवर स्थानापन्न होत होते. अचानक मला माझ्या नावाची एव्हाना परिचित खास अमेरिकन मोडतोड कानी आली आणि जाणवले की आपले नाव पुकारले गेले आहे! सांगितलेल्या नंबरच्या ज्युररच्या खुर्चीत जाऊन बसलो. काहीसा धास्तावलो होतो पण काहीतरी नवे शिकायला, अनुभवायला मिळणार म्हणुन उत्सुकही होतो. कंपनीत नुकताच एक प्रोजेक्ट हातावेगळा केला होता. ख्रिसमस जवळ आला होता त्यामुळे नवे मोठे काम लगेचच सुरु होणार नव्हते. त्यामुळे अशी ड्यूटी लागलीच तर हीच वेळ बरी आहे असा विचार केला.
आता ती निवडीची प्रक्रिया सुरु झाली. प्रत्येक ज्युररच्या खुर्चीत एक प्रश्नावली होती. प्रत्येकाने आपले नाव, किती वर्षे सध्याच्या घरात किती वर्षे आहे, बायकामुलांची जुजबी माहिती देणे अपेक्षित होते. शेवटचे दोन प्रश्न असे होते की आपले कुठल्या पोलिस वा वकील लोकांशी नाते वा मैत्री वा ओळख आहे का. आणि ह्या केसमध्ये ज्युरर म्हणून नि:पक्षपातीपणे आणि काटेकोरपणे भूमिका बजावायला आपण तयार आहोत का. आता काही लोकांना ती वापरून कटता येणे शक्य होते. पण सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी असे म्हणू शकत नव्हतो की मी हे काम चोख करू शकत नाही. त्यामुळे मी आपले होय, मी तसे करेन असेच म्हटलो. एका चीनी बाईने खणखणित आवाजात "मला मेक्सिकन लोकांचा तिरस्कार वाटतो" (आय हेट मेक्सिकन्स) असे सांगितले. मी आणि माझ्यासारखे अनेक लोक शहारले! इतक्या उघडपणे आपला वर्णद्वेष कुणी व्यक्त करेल असे वाटले नव्हते. केवळ ज्यूरी ड्यूटी टाळण्याकरता तिचा हा अतिरेकी प्रयत्न असावा असे म्हणून स्वतःची समजूत घातली! तिला तत्काळ डच्चू मिळाला. त्यानंतर गुन्ह्याच्या स्वरूपामुळे पुराव्यात मानवी गुह्यांगाची छायाचित्रे, जखमा वगैरे बघायला लागतील, लैंगिक संबंधांची तपशीलवार वर्णने पुरावा म्हणून ऐकावी लागतील. जर कुणाला असे सहन होत नसेल तर आताच सांगा असे जजने सांगितले. त्यात दोन चार आणखी लोक कटले. मग पुन्हा नवे लोक बसवले. त्यांची ओळख वगैरे सोपस्कार. एकंदरीत वेळकाढू प्रकार होता. आणि डच्चू मिळालेले सोडून सगळे उमेदवार कोर्टातच बसून होते. अंतिम निवड होईपर्यंत कुणाला जाऊ देत नव्हते. त्यानंतर अशा लोकांना हात वर करायला सांगितले जे किंवा ज्यांचे नातेवाईक एखाद्या गुन्ह्याचे बळी होते. काही लोकांनी हात वर केले पण कुणाला रजा दिली नाही. ह
हे सोपस्कार झाल्यावर वकिलांची गाळणी प्रक्रिया सुरु झाली. त्यांना एक कोटा दिलेला असतो. त्यानुसार कुठलेही कारण न देता ते कुठल्याही उमेदवार ज्युररला ते रजा देऊ शकतात. तो त्यांचा हक्क असतो. आपण मांडत असलेल्या बाजुचा ज्यूररवर अपेक्षित परिणाम होईल असे वकिलाला वाटत नसेल तर तो त्या व्यक्तीला ज्यूरर बनण्यापासून रोखतो. एखाद्याचा पूर्वग्रह, एखाद्याचा व्यवसाय, एखाद्याचा गुन्ह्यात आरोपी वा बळी म्हणून अनुभव अशा गोष्टी साधारणपणे बघितल्या जातात. पण असे कुठले कारण देणे त्यांना बंधनकारक नसते. जजने लोकांना समजावले की तुम्हाला जर अशा प्रक्रियेमुळे रजा दिली गेली तर वाईट वाटून घेऊ नका. हे असे होतेच. नथिंग पर्सनल. तुम्ही तुमची ड्यूटी केलेली आहे.
क्रमशः
प्रतिक्रिया
29 Mar 2016 - 7:40 pm | एस
वाचतोय. पुभाप्र.
29 Mar 2016 - 8:15 pm | राघवेंद्र
पु. भा. प्र.
29 Mar 2016 - 8:33 pm | श्रीरंग_जोशी
तुम्हाला एका गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात ज्यूरी म्हणून काम करायला मिळाले आहे. हे अनुभवकथन पुढे वाचण्याची उत्कंठा हा भाग वाचून वाढली आहे.
29 Mar 2016 - 9:26 pm | आदूबाळ
जबरी! म्हणजे ज्युरी ड्यूटीमधून कल्टी मारणं बर्यापैकी सोपं असावं.
जर समजा काही कारणाने रजा मिळाल्यास (ग्राह्य कारण असल्याने, किंवा त्या चिनी बाईसारखं वर्णद्वेषी असल्याने, किंवा अगदी प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक्समुळे) "ज्युरी ड्युटी केली" असं नोंद होतं का?
29 Mar 2016 - 10:05 pm | शेंडेनक्षत्र
एकदा का कोर्टात तोंड दाखवले की झाले. मग पुढे कुठे तुमची गच्छंती झाली तरी तुम्ही तुमचे कर्तव्य केले (यू हॅव फुल्फिल्ड युवर ड्युटी) अशी नोंद होते.
ड्युटी टाळणे अवघड नसते हे खरे पण प्रत्येकाने ती टाळण्याचा प्रयत्न केला तर खटल्याचे निर्णय नीट लागतील का असाही विचार केला पाहिजे. निव्वळ बेकार लोक, निवृत्त लोक अशीच जर ज्यूरर असतील तर ते केवळ त्यांचा दृष्टीकोन वापरतील. कित्येक लोकांकडून असेही ऐकले आहे की काही ज्यूरर काहीही ठरवा (दोषी की निर्दोषी) आणि संपवा ही केस एकदाची अशा वृत्तीने ड्यूटी करतात ते ही घातकच.
29 Mar 2016 - 10:44 pm | तुषार काळभोर
कित्येक लोकांकडून असेही ऐकले आहे की काही ज्यूरर काहीही ठरवा (दोषी की निर्दोषी) आणि संपवा ही केस एकदाची अशा वृत्तीने ड्यूटी करतात ते ही घातकच.
>>>
कोर्ट पिच्चरमधल्या वकिलीणबाई आठवल्या.
30 Mar 2016 - 10:42 am | राजाभाउ
किंवा "ईक रुका हुवा फैसला" मधील पंकज कपुर
30 Mar 2016 - 12:01 am | तर्राट जोकर
रोचक, हळु हळु पकड घेत आहे लिखाण.
30 Mar 2016 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे
एका वेगळ्या न्यायपद्धतिची रोचक ओळख होते आहे. पुभाप्र.
30 Mar 2016 - 12:51 am | उगा काहितरीच
असेच म्हणतो...
30 Mar 2016 - 1:19 am | मिहिर
रोचक आहे अगदी. वाचतोय.
30 Mar 2016 - 6:49 am | संजय पाटिल
छान लिहीताय , वाचतोय
30 Mar 2016 - 7:01 am | यशोधरा
वाचते आहे..
30 Mar 2016 - 8:08 am | बोका-ए-आझम
ही वर्णनं आजवर फक्त कादंबऱ्यांमध्ये वाचली होती. एकच उत्सुकता - ही घटना कुठल्या राज्यातली आहे?
30 Mar 2016 - 8:19 am | जुइ
वाचत आहे.
30 Mar 2016 - 8:44 am | नाखु
आणि कुठेच माहीती न मिळणार्या विषयावरील लेखन. लेखनशैलीही मस्त आहे.
आपण घरात धाकले का? आय डी वरून वाटते.
30 Mar 2016 - 8:46 pm | शेंडेनक्षत्र
घरातले धाकले शेंडेफळ असते असे मला वाटते.
30 Mar 2016 - 10:41 am | राजाभाउ
मस्त ! एका वेगळ्या विषया वरील लेखन. जॉन ग्रिशम च्या कादंबऱ्यांमध्ये याचे उल्लेख असतात म्हणजे हे वकील लोक त्या जुरीची सगळी इंत्यभुत माहीती काढतात ज्युरी निवडण्यापुर्वी वगैरे.
एक दोन प्रश्न हे ज्युरी कुठल्या प्रकारच्या खटल्या मध्ये असतात, म्हणजे केवळ गंभीर स्वरुपाच्या केसेस मध्ये का किरकोळ खटल्या मध्ये, दिवाणी दाव्यां मध्ये सुध्दा ?
समजा ज्युरी निवडताना एका वकीलाने एखाद्या ज्युरीला नाकारले पण विरुध्द पक्षाच्या वकीलाला तोच ज्युरी पाहीजे असेल तर काय करतात ?
पु, भा प्र.
30 Mar 2016 - 8:45 pm | शेंडेनक्षत्र
माझ्या माहितीप्रमाणे आरोपीला ६ महिन्यापेक्षा होणे शक्य असेल तर त्या फौजदारी खटल्याकरता ज्युरी लागतात. दिवाणी केसमधे असेच काही नियम असावेत.
अमका एक ज्युररच पाहिजे असा आग्रह व़कील करू शकत नाही. त्यांना फक्त एखादा ज्युरर नको असे म्हणण्याचा नकाराधिकार (व्हिटो) असतो.
30 Mar 2016 - 11:52 pm | स्रुजा
बेंच ट्रायल देखील होतेच ना? वकील बेंच ट्रायल साठी अपील करु शकतात माझ्या माहितीप्रमाणे. की हे फक्त सिव्हील केसेस मध्ये होतं?
तुम्ही छान लिहीताय , एका वेगळ्याच विषयाची फर्स्ट हँड ओळख. आता पर्यंत फक्त कोर्ट रुम ड्रामाज मध्येच वाचुन अथवा पाहुन माहिती मिळवली आहे याची.
31 Mar 2016 - 1:56 am | बोका-ए-आझम
पूर्णपणे अनभिज्ञ असणारे ज्यूरी मिळणं अशक्य आहे असं जर आरोपीच्या वकिलाला वाटलं तर तो स्थानबदल किंवा ज्यूरीविरहित खटल्याची मागणी करु शकतो. पण माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व राज्यांत होत नाही.
4 Apr 2016 - 12:23 pm | राजाभाउ
धन्यवाद.
30 Mar 2016 - 10:52 am | नीलमोहर
'द रनअवे ज्युरी' आणि जॉन ग्रिशॅमच्या इतरही पुस्तकांतून ज्युरी आणि रिलेटेड प्रोसेसबद्दल बरीच तपशीलवार माहिती मिळाली होती.
30 Mar 2016 - 6:43 pm | अजया
वाचतेय.पुभाप्र
30 Mar 2016 - 9:31 pm | मितभाषी
अनुभव कथन आवडले. सध्या जाॅन ग्रिशॅम चे द रन अवे ज्यूरी वाचत असल्याने एकूण ज्यूरी प्रक्रिया समजण्यास मदत झाली.
पुभाप्र
31 Mar 2016 - 12:22 am | बॅटमॅन
धिसिज़ द ट्रू वैभव ऑफ मिपा, हत्स ओफ्फ. _/\_