अमेरिकेत रहाणारे देशी लोक दोन गोष्टींना घाबरून असतात एक म्हणजे टॅक्स ऑडिट अर्थात आयकर खात्याची धाड. भारतात ती बड्या फिल्म स्टार, उद्योगपतींवर पडते. इथे तसे नाही कुणाकडेही पडू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यूरी ड्युटीचे आमंत्रण! अनेक देशी लोक हे असले बोलावणे टाळण्याकरता वर्षानुवर्षे ग्रीन कार्ड बाळगून असतात. शक्य असूनही नागरिक बनत नाहीत. काय असते हे? अमेरिकन न्यायसंस्थेत खटला चालवण्याकरता ज्यूरी हा एक मोठा महत्त्वाचा घटक आहे. आरोपी, फिर्यादी, दोन्ही बाजूंचे वकील, न्यायाधीश हे तर आवश्यक आहेतच. पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांपैकी १२ जण ज्यूरी म्हणून निवडले जातात आणि दोन्ही बाजूंचे बोलणे, साक्षीपुरावे झाले की हे १२ लोकांचे मंडळ बसून चर्चा करते आणि आरोपी दोषी आहे की नाही ते ठरवते. केसचा प्रकार जसा असेल त्याप्रमाणे (फौजदारी, दिवाणी इ.) सगळ्यांचे एकमत होणे आवश्यक असते वा नसते. खटला जितका वेळ चालेल तितका वेळ ज्यूरी लोक गुंतून असतात. नोकरीवरून अनुपस्थित रहावे लागते. जर केस फार गाजत असेल तर त्या प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याकरता ज्यूरी लोकांना हॉटेलमधे बंद करून ठेवतात. (उदा. आपल्या छगन भुजबळाची केस अमेरिकेत चालली तर त्या ज्यूरींना तसे करतील!) सगळे साक्षीपुरावे ज्यूरींना काळजीपूर्वक ऐकावे लागतात. कितीही कंटाळा आला तरी! न्यायालयाचे नियम कडक असतात. केसबद्दल बाकी कुठे बोलायचे नाही, कोर्टात सादर होतील ते आणि तेच पुरावे मानायचे. इंटरनेट वा अन्य माध्यमातून स्वतः संशोधन करुन मत बनवायचे नाही. कोर्टात वेळेवर यायचे, मोबाईल वाजू द्यायचा नाही वगैरे वगैरे. एकंदरीत लोकांना ही पीडाच वाटते. पण खटला चालवण्याकरता तो एक अत्यंत आवश्यक घटक आहे.
तर अशा ह्या ज्यूरी ड्यूटीकरता मला एकदा बोलावणे आले! पहिल्यांदा माझे धाबे दणाणले! मित्रांशी बोललो तर त्यांनी विविध सल्ले देणे सुरु केले. अमुक केले तर ड्यूटी टळते, तमुक सबब दिली तर तमके होते वगैरे. एका दोघांनी असाही सल्ला दिला की एक वेगळा आणि चांगला अनुभव आहे. अमेरिकेत न्याय कसा दिला जातो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. ठरलेल्या दिवशी भल्या पहाटे ८ वाजता कोर्टात उपस्थित व्हायचे होते. तसा हजर झालो. कोर्टाचे प्रकरण आहे, वेळेत पोचतो का नाही, ट्रॅफिकची पीडा होऊ नये म्हणून लवकरच निघालो होतो. सोमवारचा दिवस. कोर्टात प्रचंड गर्दी. बहुतेक लोक हे ज्यूरी ड्यूटीच्या फेर्यातलेच होते. रिसेप्शनिस्टला घाबरत घाबरत आमंत्रण पत्रिका दाखवली. तिने हुकुम केला तसे एका ज्यूरी चेंबरमधे रवाना झालो. तो एक मोठ्ठा हॉल होता. अनेक खुर्च्या होत्या आणि चिकार गर्दीही. अमुक एक न्यायाधीश आणि अमुक एक कोर्ट क्रमांक ह्यांचा पुकारा झाला की मी त्या कोर्टात प्रवेश करणे आवश्यक होते. त्यामुळे प्रत्येक उद्घोषणेकडे जिवाचा कान करुन ऐकत होतो की ही आपलीच केस आहे की काय? तासा दोन तासांनी "ती" घोषणा झाली. आणि मी त्या कोर्टाकडे रवाना झालो. ज्यूरी ड्युटीमधे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा नुसती वाट बघायला लागते. कुठल्यातरी कारणाने कोर्टाचा खोळंबा होतो आणि ज्यूरी मंडळींना त्या चेंबरमधे पिटाळण्यत येते आणि मग नुसती वाट बघत बसा!
तर एकदाची ती घोषणा झाली आणि आलिया भोगाशी असावे सादर असे म्हणत मी कोर्टात दाखल झालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
28 Mar 2016 - 4:57 am | तर्राट जोकर
छान वेगळा विषय आणि अनुभव. लवकर पुढचे भाग टाका. लिखाणशैली चांगली आहे.
28 Mar 2016 - 4:58 am | राघवेंद्र
या विषयी वाचायला आवडेल. मी सध्या विसा वरती असल्यामुळे ज्युरी ड्युटी चे आमंत्रणाला नाही म्हणता आले.
पु. भा. प्र.
28 Mar 2016 - 4:58 am | जुइ
पुढील भाग वाचण्यास उत्सुक
28 Mar 2016 - 5:07 am | अत्रे
मस्त विषय। ज्युरी ड्युटी साठी पेड लिव्ह मिळते का हो?
28 Mar 2016 - 6:24 am | कंजूस
मजेदार
28 Mar 2016 - 6:27 am | बाजीप्रभू
अरे व्वा!! बऱ्याच दिवसांनी एक वेगळा विषय आणि नवीन माहिती. रच्याकने!! काय पात्रता असावी लागते?ज्यूरी ड्युटी करिता..
पु.ले.शु.
28 Mar 2016 - 7:31 am | प्राची अश्विनी
छान! पुभाप्र.
28 Mar 2016 - 8:11 am | शेंडेनक्षत्र
ज्यूरी ड्यूटी लागली तर पगार मिळतो का? ते कंपनीवर अवलंबून असते. सरकार ज्यूररला प्रत्येक कामाच्या दिवसाचा भत्ता देते. तो भत्ता म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असतो. आमच्या भागात त्या पैशात दिवसाच्या मूलभूत गरजाही भागणे शक्य नाही. पण अनेक कंपन्या पगारी सुट्टी देतात. त्याबद्दल कदाचित काही करात सूट मिळत असेल. पण काही नाही तर सुट्टी तर देतातच. ज्यूरी ड्यूटी केली म्हणून कुणाला काढून टाकले तर त्या कंपनीची धडगत नसते! कोर्टात जावे लागते आणि दंड वगैरे भरावा लागतो. हे कर्तव्य करणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते आणि कुणाला कधी बोलावणे येईल हे सांगता येत नाही त्यामुळे बहुतेक उद्योग बिनातक्रार जी लागेल ती रजा मंजूर करतात.
जाणत्या वयाचा (१८+ वर्षे) अमेरिकन नागरिक असणे आवश्यक आहे. बाकी काही वेगळी पात्रता नाही. मात्र इंग्रजी येत नाही/कळत नाही हे कारण असेल तर तुम्ही ती सबब वापरुन ड्यूटी टाळू शकता. कारण कोर्टाचे व्यवहार (अजून तरी) इंग्रजीतच होतात. अमेरिकेत राहून इंग्रजी न येणे कसे शक्य आहे हा प्रश्न पडणे शक्य आहे. पण मेक्सिकन लोक, चीनी, व्हिएटनामी असे काही गट आहेत ज्यांचे इंग्रजीवाचून काही अडत नाही.
28 Mar 2016 - 8:15 am | यशोधरा
वाचतेय..
28 Mar 2016 - 8:39 am | एस
पुभाप्र.
28 Mar 2016 - 8:52 am | अजया
रोचक लेख.पुभाप्र
28 Mar 2016 - 9:00 am | श्रीरंग_जोशी
रोचक विषयावरच्या लेखमालिकेची उत्तम सुरुवात.
अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून राहत असल्याने सोबत काम करणार्यांपैकी एखाद दुसर्या व्यक्तिची ज्यूरी ड्युटी लागलेली पाहिली आहे. माझ्या कंपनीत प्रत्येकाच्या रजेच्या वार्षिक कोट्यामध्ये १० दिवस ज्यूरी ड्युटीसाठी राखून ठेवले असतात (अमेरिकन नागरिक नसणार्यांसाठीही).
इथल्या वॄत्त वाहिन्यांवर राष्ट्रिय स्तरावर गाजलेल्या खटल्यांचे प्रक्षेपण काही वेळा पाहिले आहे (उदा. केसी अॅन्थनी, जोडी अरियास). अशा प्रक्षेपणांदरम्यान न्यायाधीशांना दाखवले जात असले तरी ज्यूरीजना अजिबात दाखवले जात नाही व त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते.
मिपावर स्वागत. पुभाप्र.
28 Mar 2016 - 9:00 am | अत्रे
ज्युरी पद्धतीमुळे निकाल उशीरा लागत असतील का? फक्त जज निर्णय करणार असतील तर निर्णय लवकर लागत असावा.
28 Mar 2016 - 1:09 pm | बोका-ए-आझम
त्यानुसार अमेरिकन पद्धतीत अटक केल्यावर २४ तासांच्या आत arraignment होते. यात आरोपीला Guilty or Not Guilty असं विचारतात. जर तो Not Guilty म्हणाला आणि त्याची Plea Bargain घेण्याची (सरकारी पक्ष जी सांगेल ती शिक्षा कबूल करुन खटला टाळण्याची) तयारी नसेल तर अटक केलेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत पोलिस आणि District Attorney Office यांना आरोपपत्र दाखल करावं लागतं. आरोपीसाठी त्याच्या वकिलाने जामीन मागणं आणि न्यायालयाने तो मान्य/अमान्य करणं वगैरे गोष्टी arraignment court मध्येच होतात. हा ६० दिवसांचा काळ प्रत्येक राज्यानुसार बदलतही असेल. पण या पद्धतीत निकाल उशिरा लागत नाहीत. मला वाटतं कॅलिफोर्नियात हा नियम आहे - की ज्यूरींनी Not Guilty असं सांगितल्यावर सरकारी पक्ष त्याविरूद्ध अपील करु शकत नाही. अपीलांसाठी वेगळं court of appeals असतं. त्यामुळे खटले लांबत नाहीत. आपल्याकडे खटले भरले की आरोपीने गुन्हा मान्य केला असला (पोलिसांसमोर) तरी खटला चालवलाच जातो. उदाहरणार्थ प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांची हत्या केल्याचं कबूल केलं तरीही त्यांच्यावर खटला चालवला गेलाच. शिवाय अमेरिकेत Witness Protection सारख्या तरतुदींमुळे गुन्हेगारी खटल्यांमध्ये साक्षीदार उलटण्याचं प्रमाण (विशेषतः माफियाविरोधी खटल्यांमध्ये) कमी आहे. त्यामुळे खटले निकाली निघतात.
29 Mar 2016 - 4:55 pm | अत्रे
धन्यवाद।
28 Mar 2016 - 10:31 am | इरसाल
या पुर्वी पिडांकाकांनी लिहीलेय याबद्द्ल.
28 Mar 2016 - 11:02 am | सस्नेह
जरा मोठे भाग टाकावे.
28 Mar 2016 - 11:05 am | आदूबाळ
तुम्ही सिलेक्ट होऊन प्रत्यक्ष ड्युटी करायला मिळाली की तुम्ही फक्त पूलमध्ये होतात, आणि निवड होताना बोलावलं होतं?
28 Mar 2016 - 11:05 am | पैसा
मस्त लिहिताय! लष्करच्या भाकर्या त्या ह्याच!
28 Mar 2016 - 11:32 am | अनुप ढेरे
मस्तं! पुढचं वाचायला आवडेल. आत्तापर्यंत फक्त सिनेमातून जुरींच्या गोष्टी पाहिल्या आहेत. प्रत्यक्ष अनुभव नक्कीच रोचक असेल.
28 Mar 2016 - 11:38 am | उगा काहितरीच
पुभाप्र ...
28 Mar 2016 - 11:40 am | प्रचेतस
मस्त सुरुवात.
जॉन ग्रिशमच्या अनेक कादंबर्या आठवल्या.
28 Mar 2016 - 11:42 am | बोका-ए-आझम
जाॅन ग्रिशॅम, मायकेल काॅनेली वगैरे लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये क्युरी सिलेक्शनविषयी बरंच वाचायला मिळालं आहे. पण ते सगळं वकिलांच्या दृष्टिकोनातून. आता अस्सल voir dire बद्दल वाचायला मिळेल तेही ज्यूररच्या दृष्टिकोनातून आणि तेही मराठीत. पुभाप्र!
28 Mar 2016 - 11:43 am | बोका-ए-आझम
.
28 Mar 2016 - 12:00 pm | गॅरी शोमन
अजुन माहिती हवी असेल तर एक रुका हुवा फैसला किंवा त्याचे मुळ इंग्रजी व्हर्जन १२ अॅग्री मेन पहायला हरकत नाही.
28 Mar 2016 - 1:56 pm | महासंग्राम
गॅरी भौ १२ अॅग्री मेन मस्तच आहे. एवढा जुना चित्रपट असला तरी कंटाळवाणा नाही होत. त्या मानाने एक रुका हुआ फैसला ठीक ठाक च आहे.
28 Mar 2016 - 12:11 pm | मृत्युन्जय
वाचतोय. पुभाप्र. मध्येच सोडुन देउ नका.
28 Mar 2016 - 12:12 pm | भीडस्त
आमच्यासारख्यांसाठी 'सितारोंके आगे जहाँ और भी है'ची आठवण करून देणारं लेखन.
पुढचे भाग मोठे आणि लवकर येउद्यात __/\__
28 Mar 2016 - 3:17 pm | प्रियाजी
खरोखरच संयमाची परिक्षा पाहणारे आणि जबाबदारीचे काम. अमेरिकेत ज्युरींना खटल्याच्या कामकाजामध्ये कोणतीही शंका असल्यास वादी/प्रतिवादी किंवा फिर्यादी/आरोपी अथवा त्यांच्या वकिलांना ते स्पष्टीकरण विचारू शकतात का? न्यायाधिशांचे मत ज्युरींपेक्षा वेगळे असल्यास प्रत्यक्षात काय निकाल दिला जातो? प्रत्यक्ष निर्णयात तशी नोंद केली जाते का? मला पुस्तकात लिहिल्यापेक्षा प्रत्यक्षात काय होते याची उत्सुकता असल्याने प्रश्न विचारले आहेत. पुभाप्र .
29 Mar 2016 - 2:30 am | पद्मावति
मस्तं लेख. खूप छान अनुभव कथन.
मलाही ज्युरी ड्युटी साठी बोलावलं होतं. मला खरंतर हा अनुभव घ्यायला खूप आवडला असता पण वेळेवर माझी ड्युटी वेव्ह केल्या गेली:(
पु.भा.प्र.
29 Mar 2016 - 3:50 am | निशदे
उत्तम.........
आत्तापर्यंत ऐकलेच आहे याबद्दल इतरांकडून. तुमचा अनुभव अजून नवीन माहिती निश्चितच देईल.
29 Mar 2016 - 3:04 pm | मन१
ह्यावरुन आठवले काही धागे --
ज्यूरी ड्यूटी
कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
29 Mar 2016 - 3:37 pm | सुधांशुनूलकर
वेगळ्या विषयावरची लेखमाला छान होईल.
कथनशैली छान आहे. थोडा मोठा लेख टाकायला हरकत नाही.
30 Mar 2016 - 8:52 pm | पीशिम्पी
आपल्याकडे खटले भरले की आरोपीने गुन्हा मान्य केला असला (पोलिसांसमोर) तरी खटला चालवलाच जातो. उदाहरणार्थ प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांची हत्या केल्याचं कबूल केलं तरीही त्यांच्यावर खटला चालवला गेलाच.
>>>>
मान्य पण बर्याच केसेस मध्ये आपले पोलिस ज्या प्रकारे आरोपीला गुन्हा मान्य करायला लावतात त्या मुळे खटला न्यायलयामध्ये जाणे योग्यच