त्या बाईच्या महत्त्वपूर्ण साक्षीत दुभाष्यामुळे काही वेळा घोटाळे होत. जिथे गुन्ह्याला सुरवात झाल्याचा आरोप होता तो बार हा मुख्यतः मेक्सिकन व दक्षिण अमेरिकेतील लोकांमधे लोकप्रिय होता. पीडित स्त्री तिथे बार टेंडर म्हणून काम करत होती. आरोपीचा वकील तिच्या मागील नोकर्यांबद्दल विचारत असताना तिने दोन वर्षे ह्या बारमधे काम केल्याचे सांगितले. पण दुभाष्या बाईने त्या बारच्या नावाचा अनुवाद केला. मूळ स्पेनिश नावाचा इंग्रजी अर्थ ऑफिस असा होता. त्यामुळे अनुवादित वाक्य "मग मी क्ष बारमधे काम करु लागले" ऐवजी "मग मी ऑफिसमधे काम करु लागले" असे बनले! सगळे ज्यूरर काही काळ बुचकळ्यात पडले, आता हे ऑफिस कुठून आले? पण नंतर थोडा विचार केल्यावर ते त्या बारचे नाव होते असे कळले.
पीडित स्त्रीच्या साक्षीनंतर वैद्यकीय अधिकार्याची साक्ष होती. वैद्यकीय अधिकारी एक महिला डॉक्टर होती. तिला इमर्जन्सी विभागाचा अनेक वर्षांचा अनुभव होता. अत्याचार झालेल्या महिलांना इस्पितळात दाखल केल्यावर पहिल्यांदा जे तपासतात (फर्स्ट रिस्पोण्डर्स) त्या विषयात ती अनुभवी होती. सरकारी वकिलाने तिला वैद्यकीय जाणकार म्हणून मान्यता मिळावी अशी विनंती केली. ती आरोपीच्या वकिलाने मान्य केली.
(त्या त्या विषयाच्या जाणकार लोकांची साक्ष होण्यापूर्वी दोन्ही वकील त्या जाणकार व्यक्तीला अमुक विषयातील तज्ञ म्हणून मान्यता देत असत. ह्याला स्टिप्युलेशन असे म्हटले जाते. कुठल्याही विषयावर उभय पक्षांचे एकमत असेल तर ते बिनातक्रार स्वीकारायचे असते. ज्युरर लोकांनीही ते तसे स्वीकारायचे अशी सूचना होती. हे निव्वळ तज्ञांच्या बाबतीतच नव्हे तर अन्य पुराव्यांबद्दलही होत असे)
डॉक्टरीणबाईंच्या साक्षीतही फार काही नवे कळले नाही. पीडित महिला प्रक्षुब्ध होती, रडत होती. प्रथम डॉक्टरला असे वाटले की जोरदार मानसिक धक्का बसलेल्या रुग्णाला जे उपचार लागतात ते इथे लागतात की काय (ट्रॉमा पेशंट). पण तिचे तपमान, रक्तदाब व अन्य मोजमापे घेतल्यावर तसे काही लागणार नाही असे तिने ठरवले.
ह्यानंतर तपासणी अधिकार्याची साक्ष होती.
इथे त्या स्त्रीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर जे काही घडले ते सांगितले गेले. विविध जखमांचे फोटो दाखवले गेले. बलात्काराचा आरोप असल्यामुळे त्या भागांच्या जखमांचे फोटोही होते. एकंदरीत फोटोंबद्दल इतकेच म्हणता येईल की जेवणाआधी ते पाहिले असते तर जेवण घशाखाली सहजासहजी उतरले नसते! सुदैवाने आम्हाला ते फोटो जेवणाच्या सुट्टीनंतर बघावे लागले! पण एकंदर प्रकार हा डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा होता. मुका मार, जखम, रक्तस्त्राव ह्याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती दिली गेली. (वकिलाची ही जबाबदारी असते की तज्ञ साक्षीदारांना असे प्रश्न विचारायचे जेणेकरून ज्युरर लोकांना किचकट वा तांत्रिक विषय सोपा करून सांगितला जाईल) पण मुख्य मुद्दा बलात्काराचा तो अनुत्तरीतच होता. एकंदरीत जखमा व शारीरिक तपासणीवरून हा बलात्कार होता का नाही ह्याविषयी खात्रीने सांगता येणार नाही असे म्हटले गेले. गळ्यावरील वणांकडे पाहून तिचा गळा दाबला गेला असावा, ती गुदमरली असावी असा अंदाज केला गेला. अर्थात इथेही थोडी संदिग्धता होती कारण त्वचेवर किती दाब दिल्यावर वण उठतो हे गणित प्रत्येकाकरता वेगळे असते.
नाकाचे हाड मोडले होते. वरचा ओठ सुजलेला होता. त्यामुळे खालून वरती असा काहीतरी आघात होऊन नाकाला दुखापत झाली असावी असा अंदाज व्यक्त केला गेला. समोर उभे राहून नाकावर ठोसा मारला असता तर अशा प्रकारची इजा होणे अवघड होते. आरोपीचा दावा होता की त्यांचा कार्यक्रम चालू असताना मधेच आरोपी दचकल्यामुळे त्याने डोके झटक्याने वर केले आणि नेमके महिलेच्या नाकावर आपटून तिला दुखापत झाली. वैद्यकीय अधिकार्याच्या म्हणण्यानुसार जखम अशा प्रकारच्या अपघाताशी सुसंगत होती. अर्थात हाताचा ठोसा बरोबर मध्यावर लागून तशी जखम होणे अशक्य नव्हते पण अवघड होते.
वैद्यकीय तपासणीत डी एन ए च्या नमुन्यावरुन आरोपी आणि संबंधित महिला ह्यांचा संबंध आला होता हे नक्की होते पण त्यात जबरदस्ती होती की नाही ह्याविषयी खात्रीने सांगण्याजोगे काही नव्हते. त्यामुळे डी एन ए पुरावेही कुचकामी होते. आरोपीने संबंध आल्याचे कधीच नाकारले नव्हते.
महिलेच्या जखमा वगैरे दाखवण्याकरता पुरावे म्हणून जे फोटो सादर केले गेले त्यावर एक लाल छटा होती त्यामुळे जखमा असतात त्यापेक्षा गंभीर वाटत होत्या. ते फोटो छापताना एक लाल फिल्टर लावून ते छापले होते त्यामुळे मुका मार वगैरे ठळक दिसू शकते. त्यामुळे फोटो जास्त गंभीर दुखापत असल्याचे दाखवत होते. पण नाकाच्या दुखापतीखेरीज बाकीच्या दुखापती तशा किरकोळ होत्या. बाईंना तपासणी करुन लगेचच डिसचार्ज देण्यात आला.
नंतर एक गळा दाबण्यामुळे होणार्या इजेचा तज्ञ आला (स्ट्रँग्युलेशन एक्स्पर्ट!). त्याने स्त्रीच्या गळ्यावरील वणावरून असा निष्कर्ष काढला की तिचा गळा दोन हातांनी दाबला गेला असला पाहिजे, पण दोन्ही हात एकाच वेळी वापरले गेले असतील असे सांगता येत नाही. एकदा एक आणि नंतर दुसरा असेही झाले असेल. कारण इथे बोटांचे ठसे उमटत नाहीत, नुसते वळ. गळा दाबल्यावर माणूस गुदमरतो त्याचेही प्रकार असतात. किती दाब दिला जातो आहे त्यावर ते ठरते. फक्त हवेचा मार्ग काही काळ बंद झाला तर एक त्रास, त्याबरोबर गळ्यातील निलेवर दाब येऊन मेंदूकडून येणार्या रक्ताचा रस्ता बंद झाला तर आणखी जास्त त्रास, दाब आणखी जास्त झाला तर धमनीवर दाब येऊन मग मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन ग्लानी येणे वा थेट मृत्यूच. एकंदर लक्षणांवरून तिघांपैकी मधला प्रकार झाला असावा असा अंदाज ह्या तज्ञाने व्यक्त केला.
त्यानंतर नशा आणि विषबाधा तज्ञ आला (टॉक्सिकॉलॉजीस्ट). ह्या तज्ञाने आम्हाला मोठ्ठे लेक्चर दिले. किती दारू प्यायल्यावर किती नशा होते, व्यक्तीचे वजन, दारु पिण्याचा अनुभव ह्याचा त्याच्या मद्यधुंद होण्यावर कसा परिणाम होतो. अन्न खाल्ले तर नशा चढायला वेळ कसा लागतो. अशी प्रचंड माहिती दिली. पण ह्या केसमधे त्याचा नक्की काय उपयोग हे मला आजवर कळलेले नाही! म्हणजे आरोपी नशेत होता का, ती महिला नशेत होती का? याविषयी काही नाही. पण बाकी माहिती अफाट. बाकी ज्यूरर लोकांनाही हाच प्रश्न पडला होता. बहुधा ज्यूरर लोकांनी नशा करुन कोर्टात येऊ नये असे सुचवायचे असावे! असो.
एकंदरीत ह्या प्रदीर्घ आणि माहितीप्रचुर साक्षींमुळे केसवर कुठलाही नवा प्रकाश पडला नाही.
यानंतर महत्त्वाची साक्ष ही आरोपीची होती. ती पुढच्या भागात.
प्रतिक्रिया
19 Apr 2016 - 11:52 am | उगा काहितरीच
पुभाप्र ...
19 Apr 2016 - 11:58 am | सस्नेह
खुसखुशीत शैलीमुळे वाचनानंदात भर पडतेय.
19 Apr 2016 - 12:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
वेगळा विषय, ओघवती लेखन शैली आणि सूक्ष्म निरीक्षणे या मुळे मालिका रंगतदार होत चालली आहे.
पुढचे भाग लवकर लिहा.
पैजारबुवा
19 Apr 2016 - 12:14 pm | एस
पुभाप्र.
19 Apr 2016 - 12:23 pm | मृत्युन्जय
तुमच्या लेखांच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेतच असतो. आठवा भाग लवकर येउ द्यात.
19 Apr 2016 - 12:35 pm | विवेक ठाकूर
बहुधा ज्यूरर लोकांनी नशा करुन कोर्टात येऊ नये असे सुचवायचे असावे! असो.
हा निष्कर्ष एकदम खास.
20 Apr 2016 - 1:21 pm | असंका
+१ ...
लैच भारी..
19 Apr 2016 - 6:33 pm | बोका-ए-आझम
आता तर एकदम जबरदस्त वळणावर येऊन ठेपलेली आहे. पुभाप्र!
19 Apr 2016 - 8:11 pm | जेपी
वाचतोय..
पुभाप्र..
19 Apr 2016 - 8:29 pm | तर्राट जोकर
भन्नाट. कोर्टाच्या रुक्ष वाटणार्या कामकाजात कसले कसले रोलर कोस्टर असू शकतात याचे याचि देहि याचि डोळा वर्णन आवडले.
मला तेरावा जुरर बनवून टाकलेत राव! ;-)
19 Apr 2016 - 8:38 pm | अभ्या..
मस्त मस्त वर्णन एकदम.
बादवे तजोनी हा तेरावा जुरर आयडी घ्यावा, तेजू तरी म्हणता येईल.
19 Apr 2016 - 8:30 pm | स्रुजा
आत्ता स्टिप्युलेशन चा तांत्रिक अर्थ आणि संदर्भ कळाला. पुढच्या भागाच्या उत्सुकतेत.. ही पूर्ण लेखमालाच छान होते आहे.
20 Apr 2016 - 12:31 pm | अजया
:)
आवर्जुन वाट बघावी अशी लेखमालिका! पुभाप्र
20 Apr 2016 - 12:54 pm | अत्रन्गि पाउस
एकंदरीत थोडीशी पीडाच आहे म्हणायची
20 Apr 2016 - 9:06 pm | शेंडेनक्षत्र
सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आभार. कोर्टाच्या कामकाजाविषयी लिहिताना कित्येकदा कंटाळवाणे तपशील येतातच. कायद्याच्या सर्व बाबी पूर्ण करण्याकरता काटेकोरपणा, तोचतोचपणा हा आवश्यक असतो.
तो सहन केल्याबद्दल आभार.
वेळ मिळेल तसे पुढचे भाग येतीलच.
29 Apr 2016 - 2:40 am | फेरफटका
पुढचा भाग कधी टाकताय?
29 Apr 2016 - 5:38 pm | तर्राट जोकर
+१