भाग ५
पीडित महिलेची साक्ष बरीच मोठी होती. जवळपास प्रत्येक मोठ्या सुट्टीनंतर दुभाष्या बदलत असे. एकदा एक गंमतीदार दुभाष्या आला होता. अनुवाद करताना एखाद्या नटासारखे चेहर्यावरील हावभाव जिवंत असायचे. कधी खांदे उंच करून, भुवया उंचावून, डोळे मोठ्ठे करून आपले भाषांतर सादर करायचा. तमाम ज्युरी मंडळींची करमणूक होत होती. तो दुभाष्या गेल्यावर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे जसा दुभाष्या असे तसे त्या साक्षीदार बाईंचा उत्साह कमीजास्त होत असे. ह्या नटसम्राटाच्या वेळी तिच्या उत्तरात एक जोश होता. नंतर काही शांत दुभाषी आले. त्यावेळेस बाईंची उत्तरेही थंड होत गेली. एव्हाना बर्याच जणांना असे वाटू लागले होते (मलाही) की ह्या भयंकर आरोपात तितकेसे तथ्य नसावे. त्यामुळे त्या खटल्याचा गंभीरपणा थोडा कमी झाला होता (निदान ज्युररपुरता तरी).
सरकारी वकिलाने केलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून असे वाटत होते की आरोपी जवळजवळ एक तास त्या बाईला मारहाण करत होता. इतक्या आडदांड माणसाने इतक्या लहानाखोर्या बाईला इतके दीर्घकाळ मारले तर तिला खूपच इजा व्हायला हवी होती. पण तसे दिसले नाही. डोक्टरांनी तपासणी करून २-३ तासात तिला सोडून दिले असे तिनेच सांगितले.
आता आरोपीचा वकील उलटतपासणी करायला उठला. नेहमीचा सभ्य भाषेत बोलणारा वकील आता वेगळाच वाटत होता. आक्रमक आणि आवाजाला एक धार होती. त्याने बाईंची पार्श्वभूमी कळेल असे प्रश्न विचारले. ती अशिक्षित वगैरे नव्हती. law विषयात पदवी घेण्याकरता तिने मेक्सिकोच्या कुठल्यातरी महाविद्यालयात अनेक वर्षे अभ्यासक्रम केला होता. वकील फार खोलात जाताच सरकारी वकीलाने ह्या प्रश्नांचा केसशी संबंध नसल्याचा आक्षेप नोंदवला आणि मग वकीलसाहेबांना आपला ओघ आवरता घ्यावा लागला. तिने बारमध्ये किती मद्य प्यायले होते? तिची कार कुठे होती? आरोपीचा ट्रक कुठे होता? धमक्या सुरु झाल्यावर "त्या" कार ज्यात आरोपीचे साथीदार असल्याचे तिने पाहिल्याचे तिने तक्रारीत सांगितले होते ते कुठे होते? अशा प्रकारचे प्रश्न सुरु झाले. हळूहळू बाईंची उत्तरे विस्कळित आणि विसंगत होऊ लागली. अगदी उंच टाचांचे बुट असले तरी त्या मोठ्या ट्रकच्या एका बाजूला उभे राहून पलिकडचे तुला दिसूच कसे शकले असे विचारले असता बाईंनी आठवत नाही असे सांगितले. आठवत नाही हे उत्तर नंतर इतक्या वेळा दिले की त्याकरता त्याचे एक लघुरूप करून ते मी लिहून घेऊ लागलो. (झोप येऊ नये म्हणून मी शक्यतो सगळे बोलणे लिहून घ्यायचा प्रयत्न करत होतो. बाकी ज्युररही थोडेफार लिहित असत.)
"पोलिस माझ्याकरता काम करतात हे आरोपीचे म्हणणे तुला खरे का वाटले? अमेरिकेत असे होते का? "
"मी घाबरले होते"
"पळून जायचा प्रयत्न का नाही केलास?"
"त्याचे लोक माझ्या मागे होते"
मग ती व्हिडियो टेप दाखवली गेली.
त्यात ती बाई आरोपीच्या जवळ जाताना दिसली. नंतर वाकून सलाम करताना दिसली . तिला विचारले "हे तू काय करत होतीस?".
"मी आरोपीला समजावायचा प्रयत्न करत होते की त्याची काहीतरी गफलत होते आहे. बहुधा तो मला दुसरीच कुणीतरी बाई समजला असावा."
हे स्पष्टीकरण मला तरी पटले नाही.
"इतक्या रात्री एक तरुण स्त्री ह्या माणसाच्या मागे का गेलीस ? आपल्यावर काही अतिप्रसंग होईल अशी शंका आली नाही का? तुझ्याकडे सेलफोन होता त्यावरून फोन का नाही केलास? "
"मी घाबरले होते. त्याने मला ठार मारायची धमकी दिली होती. अनेक वेळा."
नंतर तिच्या मारहाणीचा, अत्याचाराचा विषय आला. इथेही बर्याच विसंगती होत्या. बाईंनी असा दावा केला की आरोपीने धमकावून त्यांना सर्व कपडे उतरवायला लावले. थोडे आधी माझे कपडे आरोपीने ओरबाडून काढले असा दावा केला होता. आता कुठला खरा? उत्तर: मला आठवत नाही.
तिच्या नाकाला मोठी जखम झाली होती, नाक मोडलेच होते. आता हे कुठे घडले? एका वेळी असे म्हटले की ट्रकमधे झाले. नंतर असे म्हटले की तिने पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा रस्त्यात आरोपीने तिला नाकावर ठोसा लगावला.
तसे असते तर रस्त्यावर रक्त सापडायला हवे होते. या आधी साक्ष देणार्या पोलिसाने असे सांगितले की त्याला रस्त्यात रक्त आढळले नाही. (पोलिसांकडे खास उपकरण असते ज्याच्या झोतातअत्यंत अल्प रक्ताचा अंशही उजळून दिसतो) ही विसंगती दाखवताच मला आठवत नाही असे नेहमीचे उत्तर दिले.
तुला आरोपीने किती वेळा मारले, किती वेळ मारहाण चालू होती ह्याचेही नीट उत्तर देता आले नाही. दहा वेळा, वीस वेळा, तीस वेळा? १० मिनिटे? अर्धा तास? एक तास? दीड तास? असे पर्याय देऊनही तिला नीट सांगता आले नाही.
बारमधे किती बियर प्यायली होतीस ह्या प्रश्नाचेही उत्तर नीट नाही. "मी ७:३० पासून मध्यरात्रीपर्यंत वेगवेगळ्या गटात वावरत होते. माझा बियर पिण्याचा वेग कमी आहे. ४ ते १० बाटल्या प्यायला असतील" असे काहीसे उत्तर दिले. म्हणजे नशा अती झाल्यामुळे आरोपी तिला धमकावू शकला म्हणावे तर तसे नक्की म्हणता आले नसते. शिवाय त्या टेपमधे तिच्या हालचाली शुद्धीवर असणार्या व्यक्तीसारख्या वाटत होत्या. शरीरावरील नियंत्रण सुटत आहे असे वाटत नव्हते.
"आरोपीने सोडून देताच पोलिसांना फोन करायचे धैर्य कुठून आले? तेव्हा भीती कुठे गेली?"
समाधानकारक उत्तर नाही.
आणीबाणीचा नंबर फिरवन्याआधी अर्धा एक तास आधी तिने voicemail बघितल्याची नोंद तिच्या फोनवर होती. वकिलाने ती फोन कंपनीकडून मिळवली होती . त्याविषयी विचारताच "माझा फोन नंबर बदलला आहे. तुम्ही सांगताय माझा पूर्वीचा फोन आहे की नाही ते आठवत नाही" असे उडवाउडवीचे उत्तर तिने दिले.
नंतर वकिलाने बाईचे फेसबुकचे पान (प्रिंटआउट) पुरावा म्हणून सादर केले. त्यावर लुई व्हेटॉन वगैरे महागड्या पर्सचे फोटो होते. फास्ट फूडच्या दुकानात काम करणार्या व्यक्तीला इतके महागडे कसे परवडते ह्याचे उत्तर तिला देता आले नाही. वकिलाने केसच्या तपासाकरता एका खाजगी कंपनीच्या डिटेक्टिव्हची मदत घेतली होती. ती डिटेक्टिव्ह बाई विचारपूस करायला पीडित स्त्रीकडे गेली होती. तेव्हा तिचे घर इतके चांगले, महागडे कसे असे तिने विचारले असता माझे मित्र माझी काळजी घेतात असे फुशारकीवजा उत्तर पीडित महिलेने दिले होते. मात्र कोर्टात त्याची आठवण करून देतात तिने साफ कानावर हात ठेवले. "त्या" टेपमधे तिची कार दिसली ती नवी कोरी, बर्यापैकी महाग (२० हजार डॉलर्सच्या आसपास) होती. "ती कशी विकत घेऊ शकलीस?" त्याविषयीही नीट माहिती दिली नाही.
पोलिसांनी जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा ह्या महिलेने तक्रार करताना अनेक विधाने केली होती जी ह्या साक्षीतील विधानाशी विसंगत होती पण त्याविषयी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.
ही उलटतपासणी लांबत गेली तशी मला माहित नाही, मला आठवत नाही ही उत्तरे जास्तीत जास्त ऐकू येऊ लागली.
एकंदरीत बाईच्या दाव्यात अनेक कच्चे दुवे होते ते उघड झाले.
मग पुन्हा सरकारी वकीलबाई उठल्या. त्यांनी असे सांगायचा प्रयत्न केला की असे अत्याचार झालेली व्यक्ती आपोआप त्या आठवणी विसरायचा प्रयत्न करते त्यामुळे तिच्या तपशिलात विसंगती आहेत. पण तिच्यावर अत्याचार झालेले आहेत. तिचा गळा दाबला गेला होता. त्यानेही स्मृतीवर परिणाम होऊ शकतो. वगैरे.
मग पुन्हा आरोपीचा वकील. त्याने असे म्हटले की काही बाबतीत अगदी बारीक तपशील केले जातात काही बाबतीत स्मृतिभ्रंश हे कसे? कारण मुळातच हे दावे खोटे आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगताना गफलत होते आहे.
मला वाटते जवळजवळ दोन दिवस ही साक्ष चालली होती. पण तरी नक्की काय घडले ह्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह होते.
सरकारी वकिलाने ह्या महिलेशी बोलून तिची साक्ष व्यवस्थित होईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला नसावा. नंतर नंतर मला अशीही शंका येऊ लागली की ह्या बांधकाम व्यावसायिक असणार्या आरोपीने त्या महिलेला पैसे देऊन आपली साक्ष विस्कळित करायला सांगितले असेल. अर्थात ह्याला कुठला पुरावा नव्हता पण अत्याचार झालेली महिला इतके असंबद्ध का बोलली ह्याचे काहीही कारण विचार करुनही सापडले नाही.
ह्या कोर्टाच्या दाराशी काही दिवस लोक मोर्चा उभा करत होते. घोषणा देत होते. फलक झळकवत होते. पुढे असे कळले की हे लोक सरकारी वकिलांविरुद्ध आंदोलन करत आहेत. कारण काय? ९०% केस सरकारी वकील हरतात. त्यांचे शुल्क सरकार देते त्यामुळे जास्त चांगले काम करावे अशी प्रेरणा त्यांना नसते. जमेल तितकी केस लढायची. उलट आरोपीचे वकिल भरपूर पैसे घेतात. केस जिंकली तर पुढची केस मिळणे सोपे जाते कारण मग एक यशस्वी वकिल अशी प्रतिमा बनते. त्यामुळे हा सामना बर्याचदा एकतर्फी होतो. आमच्याही केसमधे सरकारी बाजू थोडी लंगडी वाटत होती.
क्रमशः
प्रतिक्रिया
15 Apr 2016 - 11:29 am | जेपी
वाचतोय..
वेगळ्या प्रकारची लेखमाला..
पुभाप्र..
15 Apr 2016 - 12:02 pm | ब़जरबट्टू
सर्व भाग वाचत आहे.. मस्त लेखमाला.. नविन जगाची ओळख होतेय.
15 Apr 2016 - 12:09 pm | बोका-ए-आझम
प्रत्यक्ष अनुभवाला तोड नाही. खरोखर छान लिहिले आहे. पुभाप्र!
15 Apr 2016 - 4:37 pm | तर्राट जोकर
अगदी हेच म्हणतो.
15 Apr 2016 - 12:24 pm | एस
वाचतोय!
15 Apr 2016 - 12:33 pm | रघुपती.राज
लिहित रहा
15 Apr 2016 - 12:37 pm | उगा काहितरीच
वाचतोय ...पुभाप्र ... ते फेसबुक वगैरे चेक करणे म्हणजे भारी प्रकरण !
15 Apr 2016 - 12:45 pm | विवेक ठाकूर
पैशाच्या बाबतीत फिसकटलं की राजीखुशीनं चाललेल्या कामात बलात्काराचा आरोप होतो, हा सर्वमान्य निष्कर्ष आहे !
15 Apr 2016 - 1:05 pm | विवेक ठाकूर
आरोपीच्या वकीलानी भारी फिल्डींग लावलीये हे नक्की !
15 Apr 2016 - 4:04 pm | अजया
वाचतेय.
15 Apr 2016 - 4:17 pm | सस्नेह
हाही भाग रोचक !
15 Apr 2016 - 7:47 pm | बोका-ए-आझम
हे पटले नाही. आपल्याकडे शक्य आहे पण अमेरिकेत प्रमुख सरकारी वकील किंवा डिस्ट्रिक्ट अॅटर्नी हे निवडणुकीने ठरतात. पुष्कळ लोकांसाठी ती राजकारणात पुढे जाण्याची शिडी आहे. अशा वेळी ते असा निष्काळजीपणा करत असतील असं वाटत नाही. अर्थात अपवाद असतीलच.
15 Apr 2016 - 8:34 pm | शेंडेनक्षत्र
ज्यांना राजकारणात उतरायचे आहे त्यांच्या करता यशस्वी सरकारी वकिल म्हणून ख्याती असणे फायद्याचे असते हे अगदी खरे. पण सगळे सरकारी वकिल अशी महत्त्वाकांक्षा बाळगून नसतात. प्रत्येक काउंटीचे कोर्ट, मोठ्या शहराचे कोर्ट इथले वकिल इतके उत्साही नसतात. निदान आमच्या कोर्टाबाहेर जमलेले लोक तरी असे समजत होते की सरकारी वकिल मनापासून केस लढत नाहीत.
15 Apr 2016 - 8:07 pm | पैसा
अगदी वेगळाच अनुभव!
15 Apr 2016 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान लिहिताय. पुभाप्र.
15 Apr 2016 - 9:32 pm | आनंदयात्री
>> वकील फार खोलात जाताच सरकारी वकीलाने ह्या प्रश्नांचा केसशी संबंध नसल्याचा आक्षेप नोंदवला आणि मग वकीलसाहेबांना आपला ओघ आवरता घ्यावा लागला.
ऑब्जेक्शन माय लॉर्ड!! असा कडक डाय्लॉग मारला का? सिरिज मध्ये एकदा तरी हे ऑब्जेक्शन मिलार्ड येईल अशी आशा ठेउनहोतोच, आजच्या भागात आले.
16 Apr 2016 - 12:42 am | शेंडेनक्षत्र
"ऑब्जेक्षन युवर ऑनर, इर्रिलेवंट" असे काही तरी म्हणून आपला आक्षेप नोंदवला जात असे. कित्येकदा तसे झाल्यावर जज दोन्ही वकिलांशी सल्लामसलत करायला जवळ बोलावत असे आणि त्यांची कुजबुज चालत असे. ही कुजबूज काय आहे याबद्दल आम्हाला काही कळत नसे. ती कानावर पडली तरी दुर्लक्ष करण्याच्या सूचना होत्या.
हे आक्षेप प्रकरण प्रत्यक्षात अगदीच सपक होते. सिनेमात जी नाट्यमयता असते ती नव्हती. कित्येकदा त्याने ज्यूररचा रसभंगच झाला ! सरकारी वकीलानेच बरेचसे आक्षेप घेतले. ७०% न्यायाधीशाने मान्य केले.
माय लॉर्ड हे ब्रिटिश परंपरेतले असावे. इथे युअर ऑनर म्हटले जात होते. जज वकिलांशी बोलताना कौन्सेलर असे संबोधत असे.
कुठला पुरावा वगैरे साक्षीदाराला जवळून दाखवायचा असेल तर वकीलाने जजची परवानगी घेऊन तसे करणे अपेक्षित असे. "युअर ऑनर, मे आय एप्रोच द विटनेस?" असे विचारले जात असे. काही वेळा आरोपीचा वकील ते करायला विसरला पण जजने त्याकडे दुर्लक्ष केले.
16 Apr 2016 - 1:27 am | आनंदयात्री
बरोबर, युअर ऑनर.
तुमची ही लेखमाला आल्यामुळे द गुड वाईफ ही मालिका बर्याच दिवसांपासून पहाण्याच्या यादीत होती, ती सुरुवात केली. तुम्ही म्हणताय ते वातावरण त्यामुळे कल्पिता आले.
15 Apr 2016 - 9:38 pm | श्रीरंग_जोशी
हा भागही जोरदार झाला आहे. पुभाप्र.
17 Apr 2016 - 11:43 pm | palambar
एखादा फोटो टाकता येईल का? आणखि अंदाज येईल. अगदि डिटेल लेख.