दिवाकरांच्या नाट्यछटा

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 11:01 pm

रामराम मंडळी!
शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं .

मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

दिवाकरांच्या नाट्यछटा हे एकपात्री नाट्यप्रसंग असून अन्य पात्रांचा संबंध येतो ते मुख्य पात्राशी होणाऱ्या संवादातून. अन्य पात्राच्या प्रश्न किंवा एखाद्या वाक्याची पुनरुक्ती करून संवादाची उणीव भरून काढलेली दिसते. इंग्रजीतल्या मोनोलॉग या प्रकाराचा प्रयोग त्यांना त्यांच्या प्रचंड इंग्रजी वाचनाच्या व्यासंगामुळे करावासा वाटला असे जालावरील संदर्भांवरून दिसते. त्यांचे सहकारी वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी याला 'नाट्यछटा' असे नांव सुचवले. व्यक्तिश: हे मोनोलॉग प्रकरण त्यातल्या जुन्या अवजड इंग्रजी भाषेमुळे मला काही भावले नाही. मात्र मराठी नाट्यछटा थेट पोहोचतात- कदाचित शाळेत बालभारतीमध्ये वाचल्याने असेल.

अन्य साहित्यप्रकारांसारखेच नाट्यछटेमध्ये तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब दिसते.म्हणजे तत्कालीन बोली भाषेची, प्रथांची जवळून ओळख होते. गेल्या दोन शतकांतल्या प्रथा, अंधश्रद्धा, माणसांमधली नाती, छोट्याशाच प्रसंगातले रंजक नाट्य आणि नर्मविनोद यांचं छान मिश्रण या सगळ्या कथांमध्ये आहे. काही कथा करुण रसात आहेत आणि अस्वस्थ करतात. अनेक कथांमधली माणसे, त्यांची प्रवृत्ती वेगळ्या संदर्भात आजही तशाच दिसतात.

नाट्यछटा वाचताना एकप्रकारे नाट्यरूपात प्रसंग डोळ्यापुढे रहातो. कुठेही तत्वज्ञ असल्याचा आव न आणता दिवाकरांनी किती साधेपणाने मार्मिक भाष्य केलेले दिसते!

या नाट्यछटा वाचताना सहजच मन बालपणात गेलं .
मी बहुधा आठवीत असताना '' बाळ, या नारळाला धक्का लावू नकोस बरे!'' ही सुंदर नाट्यछटा आम्हाला अभ्यासाला होती. या नाट्यछटेने आमचे लक्ष्य वेधून घेतले होते ते त्यातली भाषा आणि चमत्कृतीपूर्ण संवाद यांमुळे. त्याच वर्षी मराठीच्या शिक्षकांनी प्रत्येकाला तीन दीर्घ उतारे पाठ करायला सांगितले. त्याकाळी पाठांतरावर फारच भर असे. मग मी हा आवडलेला छोटासा धडा पाठांतराला निवडला आणि तो कायमचा लक्षात राहिला. वर्गात म्हणून दाखवताना तो साभिनय म्हटल्यामुळे मिळालेली शाब्बासकी आजही आठवते ! आणखी अशा छान नाट्यछटा वाचाव्याशा वाटत.

त्याकाळी पाठाच्या सुरुवातीला लेखकाचा अल्प परिचय, इतर पुस्तके आणि तो पाठ कोणत्या पुस्तकातून घेतला आहे अशी माहिती दिलेली असे.त्यावरून दिवाकरांच्या नाट्यछटा एकत्र असलेल्या पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झाली . सगळे धडे असणारी मूळ पुस्तके कुठे मिळतील? शोध सुरु झाला. पण वाचावेसे वाटले तरी खेड्यात अशी पुस्तके कुठून वाचायला मिळणार? गावात वाचनालय नव्हते आणि शाळेच्या वाचनालयात आम्हा मुलांना प्रवेशच नसे!

एकदा १५ ऑगस्टला भाषणात हेडमास्तरांनी नेहमीप्रमाणे शाळेशी संबंधित समग्र आकडेवारी वाचून दाखवली. त्यानुसार शाळेच्या ग्रंथालयात पाच हजार पुस्तके असल्याचे समजले. त्याच आठवड्यात त्यांना भेटलो. विचारलं, ''पाच हजार पुस्तकं आहेत तर आम्हांला का वाचायला देत नाहीत?'' ते रागीट होते- पण मुद्दा दमदार असल्याने थेट भिडलो होतो. त्यांच्याकडून असं कळलं की पुस्तकं आम्हाला द्यायला त्यांची वैयक्तिक हरकत नव्हती, पण शाळेला ग्रंथपालच नसल्याने पुस्तके पडून आहेत. पुस्तकांची नोंद कोण ठेवणार? हरवली तर कोण बघणार? वगैरे..
मी माझ्या तुकडीची जबाबदारी घेऊन माझ्या वर्गापुरते ग्रंथालय चालवून दाखवतो असं सांगितल्यावरून त्यांनी ग्रंथालय वापरायला परवानगी दिली.

एक रजिस्टर घेऊन मी पुस्तक वाटप सुरु केले आणि सहा महिने वर्गापुरते हे ग्रंथालय चालविले देखील. माझ्यासाठी तर खजिनाच उघडला. खजिन्याचा राखणदार असल्यानं मला दोनतीन पुस्तके एका वेळी घरी नेता येऊ लागली. अनेक उत्तम पुस्तकांचा परिचय झाला. धडे ज्यातून आले त्या मूळ पुस्तकांचा शोध सुरु झाला. त्यातच ''दिवाकरांच्या नाट्यछटा'' हे पुस्तकदेखील मिळाले ! यात सर्व नाट्यछटा एकत्र मिळाल्या, पुनःपुन्हा वाचल्या. पण त्या वयात त्यातल्या काही काही समजल्याही नाहीत.

हल्लीच्या अभ्यासक्रमात हा प्रकार आहे का नाही माहीत नाही- असेलही.
बालभारतीच्या अभ्यास मंडळावरील सदस्य अभ्यासक्रम ठरवत असतात. सगळे साहित्य प्रकार समाविष्ट करणे कुणालाच शक्य होणार नाही. तरीही हे वेगळे प्रयोग टिकले पाहिजेत असं वाटतं. त्याकाळी डॉ. चित्रा नाईक यांचा भाषा अभ्यासक्रमावर ठसा होता. संस्कारक्षम साहित्य पाठ्यपुस्तकात ठेवण्याचा त्यांचा आग्रह होता.

त्याकाळी पुस्तकांमधे १९००-१९७० या दरम्यानच्या साहित्यकृतींवर भर होता. मुख्यतः स्वातंत्र्यलढा, १९६२ आणि १९६५ युद्धातल्या शौर्यकथा, देवलांचे नाट्यप्रवेश, चिं वि जोशींचे विनोदी लेख , संतवांग्मय, नेहरू- गांधी व अन्य सामाजिक असे काहीसे विषय असत. पण खेळ, शास्त्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जवळजवळ नव्हत्याच.

१९९० नंतर झालेल्या राजकीय आणि सामाजिक बदलांमुळे शालेय अभ्यासक्रमाच्या आखणीत लेखक निवडीच्या प्राथमिकता बदलत गेल्या. शास्त्रज्ञ, खेळ , समाज आणि कलाविषयक लेखनाला अधिक जागा मिळाली. दलितांना आपल्या आरक्षणापलीकडील सामाजिक हक्काची जाणीव झाल्यानंतर त्या समाजातील नवलेखक उदयाला आले. त्यांना पाठ्यपुस्तकांत स्थान मिळाले, त्यामुळे एकूणच भाषेच्या पुस्तकांचा आराखडा बदलला.

सरकारी धोरणानुसार सर्व जाती - धर्मांचे आणि पंथांचे प्रतिनिधित्व पाठ्यपुस्तकात असावे, विविध विषयांचा समतोल असावा, अश्या गोष्टी जास्त महत्वाच्या झाल्या. त्यामुळे ओढूनताणून आणलेली विविधता आली . मला ही पुस्तके सरकारी ग्याझेटासारखी भासतात . कदाचित नव्या, बदलत्या सामाजिक आव्हानांसाठी मुलांची मानसिकता तयार व्हावी हा उद्देश असेल - मी काही शिक्षणतज्ञ नव्हे. पण बालभारती खूपच बदलले हे खरे.

१९६५ नंतरच्या मधल्या तीन दशकांत नव्याने निर्माण झालेल्या साहित्याचा समावेश होणे आवश्यक होतेच. त्यामुळे ऐंशीच्या दशकातले कित्येक जुने पाठ- धडे/ कविता बदलले गेले आणि त्यामुळे मधली एक पिढी जुन्या काही गोष्टींना मुकली असे वाटते.

या घटनाक्रमाकडे पहाताना काही चुकीचे झाले असे वाटत नाही.
आता इन्टरनेटवरून पुस्तके विकत घेणं सोपं झाल्यानं, जुनं वाचायचा एक मार्ग तरी मिळाला. तरीही काय वाचावे हे माहीत हवेच ना? शाळेत थोडीशी झलक पाहिली असेल तरच ते अजून मिळवून वाचण्याचं आकर्षण वाटेल असं माझं मत आहे. मात्र अवांतर वाचू पहाणाऱ्या नव्या पिढीला राहून गेलेले वाचनखाद्य मिळाले की बस्स. तर ते असो !

नाट्यछटाकार दिवाकर यांचं पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे असं होतं. (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य् : १ ऑक्टोबर, १९३१) त्यांनी प्रथम मराठीत नाट्यछटा आणल्या. ते पुण्यात शिक्षक होते, आणि रविकिरण मंडळाचे सदस्यही होते. अजून थोडंसं आयुष्य मिळालं असतं तर दिवाकरांची अपूर्ण नाटकं प्रकाशित झाली असती. बेचाळीस हे काही जाण्याचं वय नव्हे. पण त्याकाळी साथींच्या रोगामुळे अनेकजण अल्पायुषी ठरत. अखेरच्या कांही वर्षांत प्रकृती अस्वस्थ्याबरोबरच त्यांना दिसणे कमी झाले , हळूहळू बंद झाले. त्यातून आलेली उद्विग्नता त्यांच्या लेखनातही प्रतिबिंबित झालेली दिसते.
अवघ्या ४२ वर्षांच्या आयुष्यात दोन-तीनदा नोकरी बदलण्याची वेळ आणि प्रतिकूल काळ असूनही ५१ नाट्यछटा, नाटकाची रुपांतरे, छोटी नाटके व अनेक लेख ही सुंदर निर्मिती त्यांनी करून ठेवलीय. भारतात लेखकाच्या निधनानंतर साठ वर्षांनी त्यांचं साहित्य प्रताधिकारमुक्त होतं. आता प्रताधिकारमुक्त असल्याने या सर्व ५१ नाट्यछटा जालावर मोफत उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्यावरच समाधान न मानता हा लेखनप्रकार नव्या 'समर्थ' लेखकांनी काळानुसार हाताळून जिवंत ठेवला पाहिजे.

दिवाकरांच्या नाट्यछटा या साहित्यप्रकारावर पूर्वी एकदा उपक्रमावर संजोपराव यांनी थोडक्यात परीक्षण लिहीले होते. पण त्यापलीकडे नाट्यछटेविषयी फारशी चर्चा झालेली दिसत नाही. तोच लेख वाचल्यावर नाट्यछटेविषयी अजून कांही सांगायची गरज पडू नये. त्या लेखाचा दुवा इथेच खाली देत आहे.

उद्या १ ऑक्टोबरला दिवाकरांची ८४ वी पुण्यतिथी आहे.
त्यानिमित्य त्यांच्या उत्तम नाट्यछटांचा आस्वाद घेऊया आणि त्यांना अभिवादन करूया!

संदर्भ :
दिवाकरांच्या सर्व नाट्यछटा एकत्र
उपक्रमवरील संजोपराव यांचा लेख

इतिहासवाङ्मयकथाभाषासाहित्यिकसमाजप्रकटनविचारआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

वा! दिवाकरांच्या नाट्यछटा फार आवडतात. मागे मीही त्या धर्तीवर एक-दोन नाट्यछटा लिहून पहाव्यात असा विचार केला होता. पण कार्यबाहुल्यामुळे जमले नाही. कॅप्टन यांच्या मिपावर नवनवीन प्रकारचे साहित्य यावे अशा आवाहनाच्या धाग्यावर अशाच नाट्यछटा, एकांकिकांच्या संहिता, नाट्यप्रवेश इत्यादी प्रकारचे साहित्य यावे असे वाटले होते.

कुणी एखादी नाट्यछटा इथे लिहू शकल्यास वाचायला आवडतील.

छान लेख
लिंकासाठी विशेष धन्यवाद
निवांत वाचतो

दिवाकर कुलकर्णी's picture

30 Sep 2015 - 11:44 pm | दिवाकर कुलकर्णी

त्यांचं नांव घ्यायचं म्हणजे(स्वत:च्या नांवाला अजून टोपण न बसन्ल्यामुलं ) स्व:चं नांव घ्यानं लागतं,
ते असो, त्यांची " पंत मेले राव चढले! " ही एक नाट्य छटा शालेत अभ्यासाला होती,खरतर, पुढं
मराठी वांग् मयाला(या पेक्शा शुध्द मी नाही लिहू शकत) तो एक वाक्प्रचार बहाल झाला,
५० -६० वर्षापूर्वी मुलांचं स्टेजवर(शालेच्या)पाऊल पडायच ते नाट्छटेच्या रूपानं,आणि त्यतला
हलकेफुलकेपणा आणिअभिजैतपणा दोन्ही एकावेलेस यायचा असेल तर दिवाकराना पर्याय
नव्हता,
तुम्ही चांगला धागा काढला आहे,आजच्या तरुणाईला सुद्धा हे अद्न्यातच असणार
आम्हाला मात्र तुम्ही इयत्ता ७वी ८ वीत नेलं खरं !

मला पण हा प्रकार आवडतो, मराठीच्या पुस्तका वरुन आठवले
आठवणीतल्या कविता नावाची चार
पुस्तके आहेत त्यात आपल्याला असलेल्या जुन्या
कविता आहेत.

लय भारी आयड्या. प्रयत्न करून बघतो.

लय भारी आयड्या. प्रयत्न करून बघतो.

शाळेमध्ये असताना एका शालेय नटाची - अभिनयाच्या प्रचंड शौकापायी एकेका इयत्तेत दोन-तीन वर्षे काढणाऱ्या - नाट्यछटा मराठी बालभारतीमध्ये होती. बोलावणं आल्याशिवाय नाही असं मला वाटतं तिचं नाव होतं. स्नेहसंमेलनामध्ये वर्गातली अभिनयपटू मुलं त्यांच्या नाट्यछटा सादर करत असत. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्यांच्यानंतर हा वा‌ङमयप्रकार कुणी हाताळला कसा नाही? त्यामुळे या लेखाचं औचित्य अजूनच वाढतं. दुव्यांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

चांदणे संदीप's picture

1 Oct 2015 - 8:09 am | चांदणे संदीप

धन्यवाद बोका-ए-आजम! :)
तुम्ही नाव घेतल "बोलावणं आल्याशिवाय नाही" आणि मला लहानपणी तो धडा पुस्तकात वाचल्याचे आठवले!
कसला आवडला होता तो मला त्यावेळी आणि अजून लक्षात आहे! म्हणजे माझ्या एक वर्ष पुढे असणा-यांच्या अभ्यासक्रमात होता तो धडा आणि नेमका माझ्यापासूनच अभ्यासक्रम बदलला!

असो, आता कळालच आहे नाट्यछटांबद्दल तर त्या नक्कीच अधाशासारख्या वाचल्या जातील! आणि कदाचित लिहिण्याचाही प्रयत्न केला जाईल! ;)

धन्यवाद खेडूत, नाट्यछटांची एवढी माहिती दिल्याबद्दल.

यमन's picture

1 Oct 2015 - 8:17 am | यमन

आठवतंय बोका शेठ …
सहज साधी भाषा , नाट्य कला ,मुद्राभिनय दाखवायला मुबलक संधी ही वैशिष्ठ्ये ह्या नाट्यछटांची …
वेगळ्या विषयाला चालना दिल्या बद्दल धागाकर्त्याला धन्स .
मिपाकर सं मं …. होऊ दे एक स्पर्धा दणक्यात .

नाखु's picture

1 Oct 2015 - 9:48 am | नाखु

आठवणार्या "बाळ या नारळाला धक्का लावू नको रे"

आणि "शिव्या कुणी देऊ नये"

नव्या स्पर्धेला शुभेच्छा.

आस्वादक नाखु

बोलावणं आल्याशिवाय नाही, अजून लक्षात आहे.

बोलावणं आल्याशिवाय नाही, अजून लक्षात आहे.

खरंच सुंदर आहेत या नाट्यछटा. अजूनही फ्रेश !

पैसा's picture

1 Oct 2015 - 11:52 am | पैसा

आता या नाट्यछटा अभ्यासात नाहीत? अवघड आहे. काही ठराविक वाङ्मय प्रकारच मुलांना माहीत व्हावेत असा प्रकार आहे बहुतेक. पाठ करायला या नाट्यछटा खूप सोप्या वाटायच्या. छान आठवण करून दिलीत!

मित्रहो's picture

1 Oct 2015 - 1:04 pm | मित्रहो

बोलवण आल्याशिवाय नाही अजूनही लक्षात आहे. नाट्यछटा हा वाङमय प्रकार नंतर फारसा आला नाही. कदाचित हलके फुलके विनोद म्हणजे साहित्य नाही असे काही जड डोक्यांना वाटले असेल.
चला आता स्पर्धा येऊ द्या.

खेडूत यांनी दिलेल्या दुव्यावरुन नाट्यछटा वाचल्या.काहीकाही - उदाहरणार्थ ' पंत मेले आणि राव चढले ', ' तेवढंच ज्ञानप्रकाशात ' - या फार सुरेख आणि भेदक भाष्य
करणा-या नाट्यछटा आहेत. त्या वाचल्यावर कळतं की दिवाकर हे काळाच्या पुढे असणारे साहित्यकार होते. फक्त संवादांमधून व्यक्ती आणि स्वभाव उभं करणं आणि तेही नाट्यमयतेशी तडजोड न करता - हे अचाट काम आहे. त्यांना प्रेरणा मोनोलाॅग्जवरुन मिळाली असेल पण नाट्यछटा हा स्वयंभू आणिे संपूर्णपण मराठी वाङ्मयप्रकार आहे. इतर कुठल्या भारतीय भाषेतही असं आढळत नाही.

मित्रहो's picture

2 Oct 2015 - 11:45 pm | मित्रहो

हा वाङ्मयप्रकार हलकाफुलका आहे असे मी म्हणत नाही. मुळात साहीत्यातला कुठलाही प्रकार हलकाफुलका असतो यावर माझा विश्वास नाही.

फक्त संवादांमधून व्यक्ती आणि स्वभाव उभं करणं आणि तेही नाट्यमयतेशी तडजोड न करता - हे अचाट काम आहे.

पूर्णपणे सहमत
पंत मेले आणि राव चढले हे पूर्णतःच गंभीर आहे. एक क्रूर हास्य आहे कुणाच्या मरणामुळे कुणाला फायदा. परंतु इतर काही नाट्यछटामधे सुद्धा समाजातील विरोधाभास छान पकडलाय. जसे वर्डसवर्थच्या कवितेचे, त्यातल्या फुलपाखराचे कौतुक करायचे पण त्या कवितेच्या पुस्तकात आलेला ढेकूण मात्र क्रूरपणे मारायचे.
कमी लांबी, आणि बघायला येणारा प्रेक्षकवर्ग यामुळे हा हलकाफुलका प्रकार असावा असे मत काहीेचे झाले असवे. मला वाटते सुरवातीला लघुकथेला पण विरोध झाला होता. हे करनारे जड डोक्याचे असतात ज्यांना नवीन स्वीकारायची हिम्मत नसते.
मी पण नंतर काही नाट्याछटा वाचल्या. फार विचारपूर्वक लिहिल्या आहेत. हा प्रकार जर परत जीवंत करायचा असेल तर आजच्या काळाला धरुन, चांगल्या कलाकारांमार्फत त्या नाट्याछटा परत रंगभूमीवर आणायला हव्या. दीड ते दोन तासाचा एक सुंदर आणि अफलातून कार्यक्रम होउ शकतो.

सिरुसेरि's picture

1 Oct 2015 - 1:43 pm | सिरुसेरि

बोलावणं आल्याशिवाय नाही लक्षात आहे. त्याच पानावर , नाट्यछटेला अनुरुप असे एका फुरंगटुन , फुशारुन बसलेल्या मुलाचे अर्कचित्रही मस्त होते . त्या अज्ञात चित्रकाराने ते चित्र खुप कुशलतेने काढले होते.

बोका-ए-आझम's picture

1 Oct 2015 - 11:27 pm | बोका-ए-आझम

बहुतेक राम वाईरकर होतं. भा.रा. भागवतांच्या फास्टर फेणेला चित्ररुप देणारे ते हेच.

खेडूत's picture

2 Oct 2015 - 7:01 pm | खेडूत

हो! राम वाईरकरच..किशोर मासिकात पण तेच चित्रे काढत असत.

सिरुसेरि's picture

2 Oct 2015 - 10:13 pm | सिरुसेरि

धन्यवाद. दिवाकरांच्या नाट्यछटा सारखीच भा.रा. भागवतांनी लिहिलेली "बोला बोला मुंछासेन" आणी "गप्प बसा मुंछासेन" हि अनुवादित पुस्तके आठवली . एका बढाईखोर फ्रेंच दर्यावर्दी सरदाराने आपल्या जगप्रवासाचे आणी पराक्रमांचे केलेले वर्णन त्यामध्ये आहे .

बॅटमॅन's picture

1 Oct 2015 - 2:16 pm | बॅटमॅन

अनेक धन्यवाद. आजवर "दिवाकरांच्या नाट्यछटा" असे नुसतेच ऐकून होतो. हे दिवाकर कोण आणि नाट्यछटा म्हण्जे काय, हे माहितीच नव्हते ते आज कळाले, अनेक धन्यवाद!!!!!

बाकी ते 'राव मेले आणि पंत चढले' ही फ्रेजही प्रथम त्यांनीच वापरली की त्यांच्यापासून पुढे फेमस झाली?

बोका-ए-आझम's picture

1 Oct 2015 - 2:39 pm | बोका-ए-आझम

ते पेशवाईबद्दल उपहासाने वापरलं जाणारं वाक्य आहे असं ऐकलं आहे. छत्रपती म्हणजे राव आणि पेशवे म्हणजे पंत.

बॅटमॅन's picture

1 Oct 2015 - 2:41 pm | बॅटमॅन

धन्यवाद! मेबी एखाद्या बखरीतले किंवा पत्रातले वाक्य असावे ते, बघितले पाहिजे.

बोका-ए-आझम's picture

1 Oct 2015 - 11:14 pm | बोका-ए-आझम

जबरदस्त भेदक आहे. वाचून बघा.

शिव कन्या's picture

1 Oct 2015 - 10:10 pm | शिव कन्या

सुंदर लेख! हे परत हाताळायला पाहिजे.मिपावर यासाठी खास व्यासपीठ मिळावे!

पिशी अबोली's picture

1 Oct 2015 - 10:26 pm | पिशी अबोली

सुंदर लेख.'पंत मेले राव चढले' शाळेत होती. पण एवढी माहिती कधीच नाही मिळाली.
आता तुम्ही इतकं छान मांडल्यावर जाणवलं खरंच की इतर कुणीही हा प्रकार हाताळला नाही. मोनोलॉग म्हणजे 'ड्रामेटिक मोनोलॉग' म्हणताय का? ब्राऊनिंगची एक होती कविता त्या प्रकारातली अभ्यासाला. त्यावरून प्रेरित झाल्या का? इंटरेस्टिंग आहे.

दिवाकर कुलकर्णी's picture

1 Oct 2015 - 10:44 pm | दिवाकर कुलकर्णी

चिगी वर्षाची झाली नांही तोच, ! अशी पण बहुधा नाट्यछटा होती.

राही's picture

2 Oct 2015 - 4:11 pm | राही

'चिंगी महिन्याची झाली नाही तोच' आठवते. त्यात चिंगीच्या लग्नापर्यम्तची मनोराज्ये तिची आई करते असे काहीसे होते.
'राव गेले पंत चढले' हे मूळ शीर्षक कोणाचे ते माहीत नाही. पण दिवाकरांच्या या नावाच्या नाट्यछटेत एकाच कचेरीतल्या दोघांच्या घरी एकाच वेळी एकाच कारणाने कसे सुखदु:खाचे प्रसंग घडतात ते दाखवले होते. वरच्या जागी असलेल्या रावांचे निधन होते म्हणून त्यांच्या घरी दु:ख तर त्यांच्या जागी पंतांना बढती मिळाली म्हणून ते पेढे वाटताहेत असा प्रसंग होता.
अशी नाट्याची छटा असेल तरच मोनोलॉग वाचनीय ठरतील, नाही तर ते नुसतेच स्वगत किंवा प्रकट स्वगत होईल म्हणून नाट्यछटा हे नाव अगदी समर्पक आहे.

आदूबाळ's picture

2 Oct 2015 - 4:32 pm | आदूबाळ

हम्म. त्या "राव गेले..." मध्ये रावांचा माधुकरी मागणारा थोरला मुलगा पंतांच्या घरी माधुकरी मागायला येतो, आणि पेढे खाऊन पोट भरलेले असल्याने पंतांचं कुटुंब त्याला ताजा स्वयंपाक माधुकरी म्हणून वाढतात असा शेवट केला असता तर अधिक भेदक झालं असतं.

चतुरंग's picture

2 Oct 2015 - 4:58 pm | चतुरंग

'पंत गेले, राव चढले' असे आहे.
दिवाकरांना फक्त सूचकता ठेवायची आहे आणि ती मला जास्त महत्त्वाची वाटते. पंत आणि राव हे एकाच हाफिसातले आहेत हा फक्त घटनेचा एक पौलू झाला. जगात कुठेही कोणाचेही भले होत असताना दुसरीकडे कुठेतरी कोणाचे बुरे झालेले असू शकते आणि या जगरहाटीबद्दल तुमच्या मनात एक माणूस म्हणून संवेदनशीलता असावी इतकीच बाब त्यातून अधोरेखित करायची आहे.
सूचकतेतून जी भेदकता साधता येते ती पंतांचा मुलगा रावांकडे माधुकरी मागयला गेला वगैरे बटबटीतपणातून साधली नसती असे माझे मत.

आदूबाळ's picture

2 Oct 2015 - 11:14 pm | आदूबाळ

ओह् उलटं झालं काय!

दिवाकरांना सूचकता ठेवायची आहे हे मान्यच आहे.

पण..

आपलं सुख हे कोणाच्यातरी दु:खातून / कोणालातरी दु:ख पोचवून निर्माण झालं आहे याचा विचार माणूस करत बसला तर जगणं हराम होईल हो! उदा० दूध प्यायला मिळालं म्हणून आपण खूश होतो की एका वासराच्या तोंडचा घास आपण पळवला म्हणून अस्वस्थ होतो? गावरान चिकन खाऊन ढेकर देतो की दोन पिल्लं अनाथ झाली म्हणून दु:ख करतो? जीवो जीवस्य... हा जगरहाटीचा नियमच ना?

हे सामान्य झालं. वाचक म्हणेल "सो व्हॉट? पंतांच्या मृत्यूला राव कारणीभूत नव्हते ना? मग आनंद व्यक्त करण्यात काय गैर आहे?"

याऊलट जेव्हा सुख करणार्‍यासमोर त्या घटनेची दु:खद बाजू येईल, तेव्हा त्या पात्रांची प्रतिक्रिया काय असेल, ते कसे वागतील, यावर वाचनीयता / नाट्यमयता / लालित्य अवलंबून आहे.

(असं आपलं माझं मत.)

चतुरंग's picture

2 Oct 2015 - 5:05 pm | चतुरंग

दिवाकरांच्या नाट्यछटा अभ्यासात होत्या. 'बाळ, त्या नारळाला हात लावू नकोस बरे!' ही मराठीच्या पाठ्यपुस्तकात वाचलेली आठवते आहे.
अगदी थोडक्या शब्दात आशयघन आणि तत्कालिक परिस्थितीशी, समाजजीवनाशी संबंधित असे विचार यातून मांडणे आणि तेही उपदेशाचे डोस न पाजता केवळ संवादांच्या माध्यमातून, हे कमालीच्या कौशल्याचे काम आहे.
संवेदनशील व्यक्ती बर्‍याचदा अल्पायु ठरतात तसेच दिवाकरही ठरावेत हे आपले दुर्भाग्य!

माहितगार's picture

2 Oct 2015 - 6:15 pm | माहितगार

काथ्याकुटासाठी एखाद वेगळा धागा काढावयाचा मागेपासून विचार आहे, या धाग्याची वाचनखूण साठवून ठेवली आहे. रविकिरण मंडळातील माधव ज्युलीयन सुधारणावादी गटातले होते आणि दिवाकरांचा सॉफ्ट कॉर्नर कर्मठांना असावा असे त्यांची एक नाट्यछटावाचून वाटते, त्याच काळात श्रीधरपंत टिळक सुधारणावादाच्या बाजूने इरेला पडले होते हा रविकिरण मंडळातला परस्पर विरोधी वैचारीक गाडा कसा ढकलला जात होता याची कुणास माहिती आहे का ?

खेडूत's picture

2 Oct 2015 - 7:05 pm | खेडूत

सर्वांचे आभार .
कांही प्रतिसादांवरून असं दिसतंय की वर दिलेला नाट्यछटांचा दुवा त्यांनी पाहिला नसावा.
सर्व नाट्यछटां उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी.

तीन वेगवेगळ्या नाट्यछटा वेगळ्या सदस्यांना अभ्यासाला होत्या म्हणजे किमान पन्नास वर्षे हा ट्रेंड असावा आणि हल्ली नाट्यछटा अभ्यासक्रमात नाहीत असं दिसतंय. माझ्या वेळेला असलेली 'बाळ या नारळाला ' ही जुनी अकरावीची 'एस. एस. सी.' संपून दहावीला 'एस एस सी' झाली (१९७६) त्या काळी बदलली बदलली असावी.
त्यावरूनच बोकाशेठ, दमामि , संदीप , यमन नव्वदच्या दशकात तर कुलकर्णी साहेब व अन्य काही सदस्य १९७५ पूर्वी 'एस एस सी' झाले असावेत असं वाटतंय.

बालभारतीच्या संस्थळावर पीडीएफ डाऊनलोडवा म्हणतात पण दुवा चलात नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तके पहाता येत नाहीयेत. सध्या मुलांना मराठी माध्यमात पाठवले जात नसल्याने कळायला मार्ग नाही! असो.

अतिअवांतर :
माझे आजोबा दिवाकरांना ज्युनियर. दोघेही नु म वि मध्ये एकाच काळात इंग्रजीचेच शिक्षक होते.
दोघेही वयाच्या ४२ च्या वर्षी गेले. आजोबांना पाहिले नाही पण त्यांचे सहकारी म्हणून दिवाकर यांच्याबद्दल विशेष आपलेपणा वाटतो !

दिवाकर कुलकर्णी's picture

2 Oct 2015 - 7:36 pm | दिवाकर कुलकर्णी

फारच चागली माहिती दिलीत.

जव्हेरगंज's picture

2 Oct 2015 - 10:42 pm | जव्हेरगंज

वैभव मांगलेच्या आवाजात काही वाचल्या. जबरदस्त,,!!!!!!
शिवि कोणा देऊं नये ! :-D:-D:-D:-D:-D:-D

सुंदर लेख. नाट्यछटा आवडल्या. दुव्यासाठी अनेक धन्यवाद. खजिनाचं आहे हा.