दुष्काळवाडा भाग ८ इन्फ्रास्ट्रक्चरच्या कचाट्यात शेती

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 3:53 pm

इन्फ्रास्ट्रक्चरच्या कचाट्यात शेती
शेती
मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची. कंत्राटीकरणाच्या जमान्यात या महत्वाच्या बाबी शुल्लक ठरवल्या जात असल्यानेच दुष्काळाची भिषणता अधिकाधिक गडद होत आहे.

२०१३-१४ च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेती इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. कोरडवाहू मिशन अंतर्गत एकात्म शेती विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन २०१३-१४ साठी १४५ कोटींची तरतूद करण्यात आली. कोरडवाहू सुधारित बियाण्यांची लागवड आणि उपलब्धतेपासून शेतीत यांत्रिकीरणाचा विस्तार अशा चांगल्या चांगल्या गोष्टr कोरडवाहू अभियानात आहेत. शेतीपूरक उद्योगधंदे, प्रक्रिया उद्योग, मोठी व मध्यम धरणे याची सध्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गरज नाही. गरज आहे ती त्यांच्या प्रत्यक्ष शेतात इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहण्याची.

१० मिलीमिटर पाऊस पडला तर एका एकरात किमान दोन लाख लिटर पाणी मिळते. एका एकरात हा पाऊस अडवला आणि १० मिलीमिटरचे चार पाच फटकारे पूर्ण मोसमात पडले तरी कापसाचे १५० दिवसांचे पीक सहज हाती येते. पावसाचे आणि पाण्याचे हे गणित मराठवाड्यात साधायचे असेल तर सर्व प्रथम शेताची बांधबंदिस्ती करणे गरजेचे आहे. जागीच पाणी मुरवण्याची कामे तीन दशकांपासून पाणलोट विकासाच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न होतोय अपवाद वगळता पाणलोटात पाण्याएवजी त्याचा निधीच जिरवला गेला आणि मराठवाडा तसाच कोरडा राहीला. पाणी अडवणे, बांध बंदिस्ती, बांधावर वृक्षलागवड, पाण्याचा योग्य निचरा या गोष्टr शेतीतल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्याच महत्वाच्या बाबीकडे शेतकरी लक्ष देतो ना शासन.

दुष्काळात फक्त पाण्याविषयी चर्चा होते. नापिक होत चाललेल्या जमिनी हाही एक कोन दुष्काळाला आहे. मराठवाड्याच्या शेतीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ३ दशांशपर्यंत कमी झाले. दर वर्षाला उत्पन्नात होणारी घट याचे प्रमुख कारण असूनही त्याकडे कृषी विभागाचे दूर्लक्ष होते. जमिनीची ही मृत्यूघंटा कोणी एकलीच नाही. पाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक तुषार, ठिबकची यंत्रणा सरकारी अनास्थेची बळी ठरल्याने ऐपत असलेले शेतकरीही याकडे वळत नाहीत. जलपूनर्भरणासाठीच्या योजना कागदावरच जिरतात.

पाझर तलाव, नाला बांध, माती बांधांच्या देखभालीकडे दूर्लक्ष झाल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली. गाळाने भरलेल्या या साठवण साठ्यातून पाणी झिरपणे बंद झाल्याने शेत विहीरी, विंधन विहीरी आटल्या. सिंचन विभागात पाणी वितरणाची देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा आहे तशी व्यवस्था पाणलोट यंत्रणेत नाही. दरवर्षी गाळ काढण्याच्या योजना कागदावरच राहतात. देखभाल दुरुस्तीची योजना पाणलोट यंत्रणेत झाल्यास दुष्काळात त्याचा फायदा निश्चित होईल. भूजल उपसून संपवताना त्याचे पूनर्भरण करणे आवश्यक आहे हे शेतकरीही विसरला आणि त्यासाठी काम करणारी यंत्रणाही. यात यंत्रणेपेक्षा लोकसहभाग महत्वाचा आहे. गावागावातील आपआपसातील भांडणे दूर सारुन एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे गावात पडलेला पाऊस मोजणारी यंत्रणाच गावागावात नाही. राज्यात फक्त ५४ हवामन केंद्रे आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी हवामान केंद्रांची संख्या २०५९ करण्याची घोषणा केली. मुळात ऑक्टोबर पर्यंत पडलेल्या प्रत्येक थेंबाचा हिशेब गावांमध्येच ठेवला गेला पाहिजे त्यानंतरच रब्बीचे नियोजन व्हायला हवे.

शेतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे यांत्रिकीकरण. मागील दशकात मजूरांची कमतरता ही मोठी समस्या शेतकऱ्यासमोर उभी टाकली. पेरणी, स्पेअर, कोळपणी, नांगरणी करण्यासाठी आवश्यक असलेली छोटी यंत्रे गावपातळीवर उपलब्ध हवीत. शेतकरी गटांना अशा यंत्रांची बँक देता येऊ शकते.पीक कर्जाचा प्रश्न कायमस्वरुपी ठाण मांडून बसला आहे. मे, जून मध्ये पीक कर्ज मिळाल्यास शेतकरी बांधबधिस्तीपासून अनेक कामे करु शकतो. तथापी कर्ज मिळते ते सप्टेंबर मध्ये. शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम करणे पायाभूत सुविधांमधला सर्वात महत्वाचा भाग बनला आहे.

सुविधांच्या जाळ्याची चर्चा होते त्यावेळी फक्त शहरी भाग किंवा उद्योगांचा विचार केला जातो. तथापी जेथे ५० टक्के जनता ज्या शेतीव्यवसायावर अवलंबून आहे त्याचा विचार होताना दिसतच नाही.सरकारकडून रस्ते, दूरसंचार, वीज क्षेत्रात गुंतवणूक सुरु आहे. ही गुंतवणूक शेतीसाठी उपयुक्त असली तरी तिचा फोकस शेती क्षेत्रावर नाही. शेतीसाठीही सुविधा जाळे उभारण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर फंड गरजेचा आहे. या फंडातून बांधबदिस्तीपासून ते प्रक्रिया उद्योग आणि बाजार व्यवस्थेपपर्यंत सर्व काही उभे राहयला हवे. हे काम केवळ डेमो पुरते उभे राहणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

छान लेख. बरेच मुद्दे चर्चिले आहेत. तक्ते, आलेख, आकृत्या, उपग्रहप्रतिमा इत्यादींचाही समावेश केल्यास हा विषय समजाऊन घेणे अजून सोपे होईल.

अभ्या..'s picture

7 Sep 2015 - 4:21 pm | अभ्या..

डोंट माईंड प्रज्ञाताई.
आपला आणि कोरडवाहू मिशनचा काही संबंध आहे का? म्हणजे हि लेखमाला कोरडवाहू मिशनसंदर्भात काही रोल बजावतेय का?

pradnya deshpande's picture

9 Sep 2015 - 2:33 pm | pradnya deshpande

कोरडवाहू मिशन आणि माझा काहीही संबंध नाही. परंतु हे मिशन मराठवाड्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. या कडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. सध्याच्या परीस्थित कोरडवाहू मिशनचे काम अधिक प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मात्र राज्य कार्यालयातील जागाहि भरल्या जात नाहीत हि बाब खेदाची आहे. मराठवड्यावर असा अन्याय किती दिवस सहन करायचा. कोणीतरी या बाबतीत लिहणे आवश्यक आहे असे मला वाटते.