दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
1 Sep 2015 - 6:07 pm

भाग १, भाग २, भाग ३

सैरभैर हात
या हाताना काम हवे

एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले. उत्सुकतेपोटी गावाबाहेर जाणारे कोण असा प्रश्न केला तेव्हा त्यांनी काय मॅडम गावात राहून तरी काय करणार, ना शेती ना वाडी. शेतमजूर म्हणून काम करायचे. आता तर तेही नाही. शहरात काम मिळवण्यासाठी गावेच्या गावे बाहेर पडत आहेत अशी कहाणी त्यांनी एकवली. दुष्काळी भागात फिरताना ओसाड पडलेल्या गावांनी जेवढे लक्ष वेधले होते तेव्हढेच लक्ष औरंगाबादमधील कामगार नाक्यांवर वाढलेल्या गर्दीनेही वेधले होते. त्या गर्दीला एकच चेहरा होता तो म्हणजे दुःखाचा. केवळ शेतमजूरच नाही तर शेतमालकही या गर्दीचा हिस्सा बनून राहीले होते. बरेच जण तर ऊसतोड कामगार होते. शहरात काही बिगारी काम मिळेल या आशेने कामगार नाक्यावर दिवस न दिवस काढत होते.

हंगामाच्या काळात राजा असणारा शेतमजूर आणि आता रोजंदारीच्या शोधात दाहीदिशा हिंडणारा शेतमजूर हा विरोधाभास ठळकपणे प्रत्येक गावात जाणवत होता. पाऊस पाणी चांगले असते तर शेतकऱ्यांना मजूरांच्या मागे धावण्याची ही वेळ असती. आता मात्र शेतमजूर हा शेती व्यवस्थेचा कणा मोडून पडला आहे. त्याकडे मात्र कोणी लक्ष देण्यास तयार नाही. गावा गावांची कृषीव्यवस्था चालवणारे हे मजूर दुष्काळाच्या फटकाऱ्यात पार शहरात फेकले जात आहेत तेथेही त्यांना काम मिळेल याची खात्री नाही. दुसरीकडे रोजगार हमीच्या कामाला मजूर मिळत नाही अशी सरकारी यंत्रणेची हाकाटी सुरुच असते. ज्या राज्याने या देशाला रोजगार हमीचा वस्तूपाठ घालून दिला त्याच राज्यात गावेच्या गावे बसून राहतात पण रोजगार हमीच्या कामावर जात नाहीत. यंत्रणेचे हे अपयशही ठळकपणे डोळ्यात भरते.

लातूर, उस्मानाबाद या दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यामध्ये अनुक्रमे दोन आणि पाच हजार मजूर रोजगार हमीच्या कामावर आहेत. फक्त बीड जिल्ह्यात हा आकडा १२ हजाराच्यावर गेला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या जिल्ह्यात साडेचार लाख मजूर ऊसतोडीचे काम करतात.त्यातील दीड लाखापेक्षा जास्त मजूरांनी कामासाठी जिल्हा सोडला. यावर्षी गाळप हंगाम अडचणीत सापडला असल्याने साखर कारखान्यांनीही हात आखडता घेतल्याने मुकादमांनी ऊसतोड कामगारांमध्ये कपात केली. या कामगारांना दुसरे कुठेलेच कुशल काम येत नसल्याने त्यांची गर्दी रोजगार हमीच्या कामावर झाली. उस्मानाबाद मध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक कामे प्रलंबित असताना चक्क दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेण्याच्या सुचना बैठक घेऊन दिल्या. आत्ता कुठे येथे जॉब कार्ड तयार करण्यास सुरुवात होणार आहे.

गावाजवळ हक्काचा रोजगार उपलब्ध नसल्याने गावेच्या गावे कामाच्या शोधात बाहेर पडली आहेत. औरंगाबादला रेल्वेची चांगली सोय असल्याने सकाळी नऊच्या आत येणाऱ्या पॅसेंजर गाड्या जणू मजूर गाड्याच झाल्या आहेत. अगदी परभणी, जालना पासून ते मनमाड, वैजापूर मधूनही शेकडो शेतमजूर, कामगार रोजगाराच्या शोधात रेल्वेने औरंगाबादला येतात. येथील सिडको, उस्मानपूरा ़हडको, वाळूज, हर्सूल टी पॉईट या कामगार चौकांमध्ये गर्दी दुप्पट झाली आहे. औरंगाबाद शहरात किमान बारा हजाराच्यावर असंघटीत कामगार असल्याचे सांगितले जाते. गवंडी काम आणि इतर छोटी मोेठी शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांमध्ये आता शेतमजूरांची भर पडून त्यांची संख्या कितीतरी वाढत आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांना काहीना काही मदत सरकारकडून मिळते. परंतू शेत मजूरांसाठी कुठलीही ठोस योजना नाही. मागेल त्याला काम अशा आकर्षक घोषणा होतात खऱ्या पण कामासाठी समोर आलेल्या हातांना अनेक किचकट नियमांना सामोरे जावे लागते. हमीच्या कामावर जाण्यासाठी मजूरांना जॉबकार्डसाठी पुन्हा पुन्हा नोंदणी करावी लागते.जॉबकार्डची नोंद झाल्यानंतर मोजमाप पुस्तिकेत नोंद, त्याचा अहवाल जाणे नंतर खात्यावर रक्कम जमा होणे यात कितीतरी महिने निघून जातात. त्यात पुन्हा कुशल कामासाठी ४० टक्के तर अकुशल कामासाठी ६० टक्के निधी राखीव आहे. अकुशलचा निधी तीनचार महिन्यात तरी मिळतो पण कुशल कामगारांना हक्काचे पैसे मिळणयााठीही वर्षभर वाट पहावी लागते. त्यामुळे हमीच्या कामाकडे मजूर फिरकतच नाही. किचकट नियम व अटींमुळे ही योजना महाराष्ट्रात असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.

दरम्यान राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यामध्ये अन्न सुरक्षा जाहीर केली. दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपयाने तांदूळ असे पाच किलो धान्य रेशनवर शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले. त्यात शेतमजूरांनाही सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या या हातांना काम नाही पण खायला तरी मिळेल एवढाच काय तो दिलासा.

क्रमशः

दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरु द्या प्याला

मांडणीविचार

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

1 Sep 2015 - 6:37 pm | संजय पाटिल

सरकारी नियम शिथील केले तर या योजने कडे मजुर वळतील, पण मग भ्रष्टाचार वाढेल. अन्न सुरक्षा योजना जहीर केली, पण ती अजुन कागदावरच आहे. तीची अंमलबजावणी होई पर्यंत पुढ्चा पावसाळा आला नाही म्हण्जे मिळवली.

जेपी's picture

1 Sep 2015 - 6:38 pm | जेपी

वाचतोय.

अवांतर- दुष्काळवाडा ही लेखमालिका संपली का ?

तुम्ही म्हणताय तर परिस्थिती असेलच तितकी वाईट! पण एका नातेवाईकांचा अनुभव मात्र गेली चार ते पाच वर्षे सातत्याने वाईट असाच आहे. त्यांचे औरंगाबादेत ३५ वर्षे जुने व्यवसाय आहेत. कामावर मनुष्य टिकत नाही ही तक्रार आहे. ड्रायव्हरपासून ते मजुरापर्यंत कोणताही मनुष्य कामावर नियमीत येत नाही. दुसरीकडे पैसे जास्त मिळतात म्हणून जातात असे म्हणावे तर उगीच पाच पन्नास रुपये जास्त असतात पण काम दोनच दिवसांचे असते. मग पुन्हा हात पसरून यायचे. तोपर्यंत यांनी दुसरा मनुष्य नोकरीवर ठेवलेला असतो. आपल्याला दारोदार भटकत रहायचे आहे की मिळेल ती नोकरी जास्तीतजास्त दिवस करायची आहे हा विचार ते करत नाहीत. पुण्यात गेल्यावर आम्ही जी कार रेंट केली होती तो ड्रायव्हरही मराठवाड्यातील होता. आमच्या या नातेवाईकांनी त्याच्याशी चौकशी करून त्याला औरंगाबादेत ड्रायव्हर म्हणून नोकरी देऊ केली. तिथेही तो टिकला नाही. पुन्हा महिनाभराने हजर! हा प्रसंग मात्र माझ्या डोळ्यासमोर झाला होता.
याशिवाय असे अगदी अल्पशिक्षित नाही पण बरे शिकलेले लोक जेंव्हा पुण्यात नोकरीसाठी येतात तेंव्हा माझ्या मामांच्या व्यवसायात त्यांना काम दिले जाते. बरेचदा हे मराठवाडा, विदर्भातून आलेले ऐकले आहेत. तेथेही हाच प्रकार. यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळून जरा काम करेपर्यंत मनुष्य सोडून जातो. पुन्हा महिना दोन महिन्यांनी हजर की आता कामावर घ्या! थोडे जास्त पैसे मिळतायत म्हणून आधीचे काम सोडतात व पुण्यातील महागाई परवडत नाही म्हणतात. वाईट याचे वाटते की दुसरीकडे दोन चार दिवसच काम असते पण मिळणारे दोनेकशे रुपये यांना किती मोलाचे वाटत असतील की विचारशक्ती त्यापुढे काम करीत नाही. इतकी वाईट परिस्थिती!

pradnya deshpande's picture

1 Sep 2015 - 8:38 pm | pradnya deshpande

Dushkalwada yach maliketil ha leakh aahe.

साहित्य संपादकांशी संपर्क साधून शीर्षकात योग्य तो बदल करून घ्या.

सानिकास्वप्निल's picture

1 Sep 2015 - 11:10 pm | सानिकास्वप्निल

सगळे भाग वाचून काढले.
महत्वाच्या विषयावरची माहितीपूर्ण लेखमालिका.

बीड जिल्ह्यातल्या दीड लाख लोकांनी कामाच्या शोधात जिल्हा सोडला. औरंगाबादेत सर्व जिल्ह्यांतून आलेल्या असंघटित कामगारांची संख्या बारा हजार आहे. बाकीचे लोक कुठे जातात? पुण्या-मुंबईत?

पुण्या-मुंबई ला नाही जात सगळे, वाई महाबळेश्वरला पण आहेत मराठवाड्यातील भरपूर मजूर .

pradnya deshpande's picture

2 Sep 2015 - 11:44 am | pradnya deshpande

रेवती आपण म्हणता तेही खरे आहे. अशा लोकांचे प्रमाण कमी असले तरी वृत्तीकडे दुर्लक्ष करता येत नाही. परिस्थितीचे चटके बसल्याशिवाय जाणीव होत नाही हेही महत्वाचे.
मराठवाड्यातून स्थलांतर मोठ्या प्रमाणावर सुरु झाले त्याला आता किमान दहा वर्षं होतील. मुंबई पुण्या बरोबरच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश प्रदेशात सीमेकडील जिल्यातील लोक कामाच्या शोधात जातात. त्यात उसतोड मजुरांचह संख्या जास्त आहे.

स्थलांतर कामासाठी होत राहतात.मराठवाडा याला अपवाद नाही.