आम्हां घरी धन.....(३)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
4 Sep 2013 - 4:02 pm

आम्हा घरी धन...

आम्हां घरी धन ...(२)

----------------

धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.

चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.

लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.

संस्कृतीवाङ्मयभाषासाहित्यिकप्रकटनविचारआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.

पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

फुलली असेल तुझ्या परी,
बागेंतली बकुलावली;
वाळूंत निर्झर-बासरी;
किति गोड ऊब महीतलीं !

येतील हीं उडुनी तिथे,
इवलीं सुकोमल पाखरें,
पानांत जीं निजलीं इथे.
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

पुसतों सुहास, स्मरूनिया
तुज आसवे, जरि लागलें
एकेक पान गळाव्या
शिशिरर्तुच्या पुनरागमें.

__ बा.सी. मर्ढेकर

--------------
(प्रताधिकारमुक्त)

मोदक's picture

15 Jun 2017 - 2:15 pm | मोदक

धागा वर काढत आहे. :)

"आयुष्यात माणसाला सगळ्या गोष्टी मिळतात फक्त ते मिळण्याची वेळ चुकलेली असते!"

-दुनियादारी

"आंम्हा घरी धन" चा पहिला धागा गोनिदांच्या लेखणीने नटलेल्या अप्रतिम उतार्‍याने सुरू केला होता.
अनेकदा पारायणे करूनसुद्धा आवडीच्या पुस्तकात अचानक एखादा नवीन विचार गवसतो तसाच हा एक उतारा सापडला. सुरूवातीला निसर्गाचे वर्णन आणि सध्याच्या परिस्थितीला एकदम चपखल लागू होईल असा शेवट.

*******************************************

गार वार्‍याचा झोत वाढला होता. सारं आकाश पाहता पाहता कुंदावून गेलं होतं. एक वीज कडाडत धरित्रीवर उतरली. सार्‍यांचे डोळे दिपून गेले आणि पूर्वेकडून पावसाचा पडदा पुढं सरकू लागला. लक्षदल पावलांचा आवाज यावा तसा आवाज करीत पाऊस पुढं येत होता. विजा कडाडत होत्या. समोरचा मुलूख दृष्टीआड करीत पाऊस पुढं सरकत होता. हळू हळू सारी माळवदं त्या पावसाच्या पडद्याआड दिसेनाशी झाली. टपोर्‍या थेंबांच्या तिरकस सरी सज्जाकोठीच्या तीन कमानीतून प्रवेश करू लागल्या. राजे त्या पावसाच्या सरींत भिजत होते. पण त्यांना पावसाचं भान नव्हतं. मंत्रमुग्ध होऊन ते पाहत होते.

बाजी धीर करून म्हणाले,
"राजे! आपण भिजाल..."
राजे हसले. म्हणाले,
"त्यासाठी तर आंम्ही इथं उभे आहोत"

तीन कमानीतून पावसाच्या सरी येत होत्या. सेवकांनी सदरेची बिछायत केंव्हाच हलवली होती.
पाऊस कोसळत होता. त्या पावसात राजेच नव्हे, तर सारेच भिजत होते. गार वारे वाहत होते.
हळू हळू पाऊस कमी झाला. पाऊस थांबला तेंव्हा पश्चिमेकडून उमटलेल्या पिवळ्या किरणात सारी धरित्री नहात होती. पूर्वेला काळ्या ढगांवर भलंमोठं इंद्रधनुष्य उमटलं होतं.

नखशिखांत भिजलेल्या राजांनी आपल्या मानेवर रूळणार्‍या केसांवरून हात फिरवला आणि ते बाजींना म्हणाले,

"केवढं विशाल रूप हे! बाजी, संकटं येतात ना, ती या वळीव पावसासारखीच असतात. काळेकभिन्न ढग उठतात. वारा सुद्धा त्यांच्या भितीनं दबून जातो. विजा लखलखू लागतात. कडाडतात. सारा आसमंत आपल्या आवाजाने भारून टाकतात. टपोर्‍या जलधारांच्या मार्‍याखाली सारी धरित्री भिजून जाते... आणि पाऊस थांबतो, तेंव्हा तृप्त झालेला सुगंध सर्वत्र दरवळतो. पिवळ्या किरणात हळदीच्या नवरीसारखी धरित्री नटून जाते. आकाशाकडे पहावं, तर सप्तरंगांची, इंद्रधनुष्याची कमान भाग्योदयाची वाट दाखवत असते. नांही, बाजी! संकट हे वरदान आहे. ती परिक्षा असते. जी माणसं त्या संकटांना सामोरी जातात, त्यांचं यश सदैव वाढत जातं."

--पावनखिंड, रणजित देसाई.

अतिशय सुंदर धागे.. मला माहीतच नव्हते.. 2013 ला कदाचीत नव्हतो मिपा वर... का आठवत नाही माहीत नाही पण आता सर्व वाचणार..

या तिन्ही धाग्यांच्या वाखु साठवल्याचं आज सार्थक झालं !
मोदकास धन्यू.

सस्नेह's picture

11 May 2020 - 2:39 pm | सस्नेह

राधा गौळण करिते मंथन
अविरत हरीचे मनात चिंतन

सुवर्ण चंपक यौवनकांती
हिदोलत ती मागे पुढती
उजव्या डाव्या झुलत्या हाती
कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण

नाद मुरलीचा पडता कानी
बावरली ती गोकुळ हरिणी
छुमछुम छंदी घुंगुर चरणी
गुण गोविंदी गेली रंगून

राधेविण ते मंथन चाले
नवल बघाया नवनीत आले
ध्यान तियेचे उघडी डोळे
दृष्टीपुढती देवकीनंदन

पी. सावळाराम

जव्हेरगंज's picture

12 May 2020 - 3:21 pm | जव्हेरगंज

बरेच दिवस ही कविता शोधत होतो. आज अचानक योगायोगाने सापडली.. प्रचंड आवडलेली कविता.. याच कवितेमुळे मराठीची गोडी लागली. मी लिहीलेली काहूर कथा याच कवितेला आठवून आठवून लिहीली होती

सरावन महिना आला कि,
-रविचंद्र हडसनकर 

सरावन महिना आला कि, असाच जीव भंडावून जाते.
आपली माय मंजे केळीचा गाभा
घरात डझनभर केळीची फनी गोधड्यावर आडवी तिडवी घोरत पडते...
आभाळ सांडल्यावाणी सांडू लागलं की
आपली झोपडी पुळु पुळु लडू लागते...

तितक्यात माय वरडते,
आरं बाब्या... झोपु नको... तिकडं चुलीवर भगोन ठेव
तरी झोपडी लडु लागते. टप.. टप..

पुन्हा माय वरडते-
आरं बाब्या उतरंडीजवळ परात ठेव
तरी झोपडी लडू लागते टप.. टप.. टप..

मंग माय एकदम आडर सोडते-
जात्याजवळ थाळ्या ठेव,
भानोसाजवळ डेचकी ठेव,
उखळाजवळ तांब्या ठेव,
आड्याखाली बट्टू ठेव,
धारनाच्या कोंट्यात पव्हऱ्या ठेव
दिव्याच्या देवळीकड काथवट ठेव,
येथं तेथं घरातली सम्दे बासनं सरतात
तरिय झोपडी लडूच लागते टप... टप... टप...

मंग मायच्या तोंडून इस्तो पडतो...
येथं पोटाचीच राख व्हयना झाली. त्यात गरीबानं काहानं इकत घेवावं पाचट, पल्हाया, मुडे अन व्हरका

मग मायचा राग जरा सेंदळ व्हते
तवरोक मला एक जोरदार डुलकी लागते
सपनात मी पोटभर जेवल्या सपन पडते
तितक्यात एक ठोक जोरात पडते
अन झोपडी आपली मह्या अंगावरच लडू लागते.
आन म्या डोळं उघडताच,
पोटभर जेवल्याचं सपन मात्र गाभडून जाते....

सरावन महिना आला कि, असाच जीव भंडावून जाते.