सामना ६४ घरांच्या राजेपदाचा!!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
9 May 2012 - 3:05 am

येत्या १० तारखेला मॉस्कोच्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये आनंद विश्वनाथन वि. बोरिस गेलफंड असा सामना सुरु होत आहे. तेव्हा बुद्धीबळप्रेमींनो पुन्हा एकदा जगज्जेतेपदाच्या सामन्याचा सोहळा अनुभवण्याची तयारी करा.

आनंद तिसर्‍यांदा विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे तर बोरिस त्याच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या इतका जवळ प्रथमच पोचलेला आहे. त्यामुळे बोरिस हा अतिशय उत्साहात आणि कमालीच्या तयारीनिशी स्पर्धेत उतरणार हे नक्की. त्यामानाने आनंदला तिसरे विजेतेपद मिळवणे ही गोष्ट किती चालना देऊ शकेल हा अनेक बुद्धीबळ तज्ञांच्या मते प्रश्न आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे दोन्ही खेळाडू वयाची चाळीशी पार केलेले आहेत म्हणजे विशीतल्या तरुण खेळाडूंचे पेव बघता 'म्हातारेच' म्हणायला हवेत. ते काहीही असो आपला पाठिंबा तर लाडक्या आनंदलाच आहे हे नक्की!

चला, दोन्ही खेळाडूंची ओळख करुन घेऊयात.
बोरिस गेलफंड -

जन्माने बेलोरशियन आणि नागरिकत्त्वाने इस्रायली असलेला बोरिस असामान्य प्रतिभावान खेळाडू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी रशियन जेतेपद आणि दोन वर्षांनी जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवणारा बोरिस १९९६ साली कँडिडेट मॅचेसमध्ये उपांत्य सामन्यात अनातोली कार्पोवकडून पराजित झाला. त्यानंतर पुन्हा एकदा २००७ मध्ये व्लादिमीर क्रामनिकने त्याला पराभूत करुन आनंदचा प्रतिस्पर्धी म्हणून नाव निश्चित केले. शेवटी २०११ च्या कँडिडेट्स स्पर्धेत बोरिसने आपल्या अतिशय चिवट खेळाने गाटा काम्स्की आणि अलेक्झांडर ग्रिश्चुकसारख्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना नमवून बाजी मारली. असा त्याचा २०१२ च्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आहे. खेळाच्या भाषेत ज्याला 'नर्व्ज ऑफ स्टील' म्हणतात तशा प्रकारचा कणखरपणा आणि अत्यंत चिवट मनोवृत्ती ही बोरिसची शक्तिस्थाने आहेत.
मागल्या आठवड्यातच त्याची एक मुलाखत झाली. त्यावेळी त्याला विचारले "सध्याच्या तरुण खेळाडूंच्या जमान्यात तू किंवा आनंदसारखे जुने खेळाडू टिकून राहण्याचे कारण तुला काय वाटते?"
बोरिसने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. तो म्हणतो "आम्ही जुन्या पद्धतीने बुद्धीबळ शिकलो. खेळाचा सखोल अभ्यास करण्याचे तंत्र हे स्वतः विचार करुन उत्तरे शोधण्यात आहे. सध्याच्या पिढीतल्या बहुतांश खेळाडूंचे पान संगणकाशिवाय हलत नाही. विशिष्ठ परिस्थितीत संगणक काय चाली करेल हे बघून त्यानुसार डावपेच आखण्याचे धोरण हे त्यांच्या बुद्धीबळाच्या मूलभूत व्यासंगावर परिणाम करते आहे असे मला वाटते. संगणकाचे फायदे जरुर आहेत परंतु त्यांचा वापर हा मर्यादित परिघातच करायला हवा अन्यथा तुम्ही तुमची विचारशक्ती मर्यादित करता."
बुद्धीबळाचे डावपेच नुसते माहीत असून उपयोग नाही तर प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणात अतिशय तणावाच्या स्थितीत, मनोधैर्य टिकवून चिवटपणाने खेळ करणे हे गरजेचे असते अन्यथा तुम्ही डाव आणि पर्यायाने सामना गमावता.

पांढर्‍या मोहोर्‍यानी खेळतांना डी४ ही बोरिसची आवडती खेळी आहे तर काळ्याने खेळताना तो नॅ़जडॉर्फ सिसिलियन, पेट्रॉफ बचाव, स्लाव बचाव आणी राजाचा भारतीय बचाव (किंग्ज इंडीयन डिफेन्स) यावर भर देतो. अत्यंत सशक्त पोझीशनल अवेअरनेस आणि कमितकमी चुका करण्याची प्रवृत्ती ही त्याची वैशिष्ठ्ये आहेत.
बोरिस हा वाद निर्माण करणारा खेळाडू नाहीये. पण तो अतिशय नाट्यपूर्ण चेहरे आणि हालचाली करतो. त्याच्या भावना त्याला सहजासहजी लपवता येत नाहीत. वानगीदाखल पहा ही मुद्रा!

आनंद त्याच्याबद्दल काय म्हणतो पहा. "बोरिस उच्च दर्जाचा खेळाडू आहे. मी आणि तो १९८९ पासून एकमेकांशी खेळतो आहोत. एकमेकांचा खेळ चांगलाच ओळखून असलो तरी यावेळी बोरिस काही वैशिष्ठ्यपूर्ण तयारीने येणार हे नक्की. बुद्धीबळ रसिकांसाठी एक उत्कंठापूर्ण सामना देण्यात आम्ही दोघेही यशस्वी होऊ अशी आशा आहे."

------------------------------
आनंद विश्वनाथन -

२००८ साली व्लादिमीर क्रामनिकला हरवून प्रथम आणि २०१० साली वॅसेलीन टोपालोवला धूळ चारुन द्वितीय जगज्जेतेपद कमावणारा आनंद आता तिसर्‍यांदा स्पर्धेत आहे ही बाबच आनंद देणारी आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धीबळातला श्रीगणेशा आपल्या आईकडून गिरवणारा आनंद अत्यंत वेगाने खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ब्लिट्झ किड' म्हणूनच तो ओळखला जायचा. अजूनही जलदगती बुद्धीबळात त्याच्या तोडीला असलेले मोजकेच खेळाडू आहेत. २००३ - २००९ अशी ७ वर्षे तो जलदगती चँपियन होता.
अत्यंत वेगवान खेळ्या आणि उच्च दर्जाची टॅक्टिकल समज ही आनंदची शक्तिस्थाने आहेत. घोड्यांचा अतिशय कल्पक वापर हा देखील त्याच्या अनेक डावांचे वैशिष्ठ्य ठरलेला आहे.

शांत आणि निगर्वी असलेला आनंद देखील वादात पडत नाही. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे त्याची हेटाळणी करणे असले उद्योग तो कधीही करत नाही. संयमी असल्याने फारसा भावनांच्या आहारी जाताना दिसत नाही. चेहेर्‍यावरही चुकीच्या खेळीचा पश्चाताप तो सहजासहजी दिसू देत नाही. जगज्जेतेपदासारख्या सर्वोच्च स्पर्धातून तुमची ही वैशिष्ठ्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरतात. तो मुलाखतीही अतिशय प्रसन्न चेहेर्‍याने आणि स्पष्ट विचाराने देतो. त्याची उत्तरे सहजासहजी तुमच्या हाती काहीही वादग्रस्त लागू देत नाहीत.

बोरिसने केलेले आनंदचे कौतुक "आनंदची स्मरणशक्ती अफाट आहे. अत्यंत वेगाने विचार करुन खेळणे हे त्याचे बलस्थान आहे. आनंदशी खेळणे हे सोपे काम नाही पण मी त्याचे कच्चे दुवे शोधून काढेन आणि त्याचा फायदा उठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन."

-----------------------------

स्पर्धा कशी होणार आहे?

१० मे स्पर्धेचे उद्घाटन होईल.

११ व १२ मे डाव १ व २ मग एक विश्रांतीचा दिवस, पुन्हा दोन डाव मग एक विश्रांती अशा प्रकारे २४ मे पर्यंत पहिले १० डाव खेळले जातील.
त्यानंतर ११ वा आणि १२ वा डाव हे दोन्ही मधे एकेक दिवस ठेवून खेळले जातील.
१२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल.

फिडेच्या संकेतस्थळावर सामन्यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे. २८ पानी नियमावली देखील वाचून बघावी. किती गोष्टींचा विचार केला आहे हे बघून मजा वाटते!

मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता उद्घाटन सोहोळा आहे.
११ तारखेला पहिला डाव दुपारी ३ वाजता सुरु होईल. (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता. चुभूदेघे.)

स्पर्धेसाठी नायजेल शॉर्ट, यान टिम्मान, व्लादिमिर क्रामनिक, पीटर स्वीडलर, पीटर लेको असे ग्रँडमास्टर्स कॉमेंटरी करायला हजर असणार आहेत.

विजेत्याला १५ लाख डॉलर्स आणि उपविजेत्याला १० लाख डॉलर्स अशा घसघशीत रकमांची बक्षिसे आहेत!

पुढील संकेत स्थळांवर सामने थेट प्रक्षेपित केले जातील काही ठिकाणी फक्त पट आणि चाली बघायला मिळतील तर काही ठिकाणी पट आणि प्रत्यक्ष खेळाडू खेळताना बघायला मिळतील. रसिकांनी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घ्यावी. अजून इतरही संकेत स्थळे नक्कीच असतील त्यांचाही जालावर शोध घ्यावा.
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
http://www.anand-gelfand.com/
http://moscow2012.fide.com/en/

मला डावांचे विश्लेषण देणे कितपत शक्य होईल माहित नाही परंतु मी थोडेफार लिहिण्याचा जरून प्रयत्न करेन. निदान ज्या डावांचे निकाल लागले आहेत (अनिर्णीत नाहीत) अशांचे तरी विश्लेषण देईन असे म्हणतो.
तर अशा रीतीने या महा सोहळ्याला आता दोनच दिवस बाकी आहेत. चला आनंदाला शुभेच्छा देऊयात आणि महासोहळ्याची तयारी करू यात!

(आनंदी)चतुरंग

सर्व प्रकाशचित्रे आंजावरुन साभार.

क्रीडाशुभेच्छालेखमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

तुकाम्हणे's picture

9 May 2012 - 3:24 am | तुकाम्हणे

सुंदर ओळख. तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल.

अधाशासारखी आनंदची ओळख पहिल्यांदा वाचली.

याच्या शांतपणाचे कायम आश्चर्य वाटत आले आहे, इतर बुध्दीबळ पटूंच्या विक्षीप्तपणाचे किस्से ऐकल्यावर याचा शांतपणा आणि सोज्वळपणा जास्ती उठून दिसतो. (द्रवीड सारखा)

धन्यवाद. :-)

मस्त !
पु. ले. प्र.

(एक घर, अडीच घर, तिरकस, सरळ चालणारा) यकु ;-)

अँग्री बर्ड's picture

9 May 2012 - 9:36 am | अँग्री बर्ड

छान, तुमच्याच शब्दात आनंद बद्दल अजून माहिती वाचायला आवडले असते असे म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2012 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा. बोरीसची ओळख आणि त्याची भावमुद्रा आवडली.
बाकी, खेळाचं विश्लेषण तर वाचायला आवडेलच.
पण, वेळात-वेळ काढून सामन्याचं धावतं समालोचन केलं तर अजून मजा येईल.

-दिलीप बिरुटे
(वजीर)

प्रचेतस's picture

9 May 2012 - 10:37 am | प्रचेतस

मस्तच हो रंगाशेठ.
विश्लेषण वाचायला आवडेलच.

ऋषिकेश's picture

9 May 2012 - 11:05 am | ऋषिकेश

आता मेजवानीच!
धावत्या समालोचनाबद्दल प्रा.डाँ.शी सहमत.. धावते नाही जमले तर विस्तॄत पंचनामा येऊच दे!

स्वाती दिनेश's picture

10 May 2012 - 1:04 pm | स्वाती दिनेश

आता मेजवानीच!
धावत्या समालोचनाबद्दल प्रा.डाँ.शी सहमत.. धावते नाही जमले तर विस्तॄत पंचनामा येऊच दे!
ऋ सारखेच म्हणते,
स्वाती

खेडूत's picture

9 May 2012 - 11:18 am | खेडूत

फारच छान !
आनंद ला खूप शुभेच्छा!

पैसा's picture

9 May 2012 - 11:31 am | पैसा

नांदी चांगली झालीय. स्पर्धा रंगतदार होणारच. चतुरंग सामन्यांचं विश्लेषण करणार हे वाचून बरं वाटलं. पुढच्या लेखाची वाट पहाणार!

नंदन's picture

10 May 2012 - 12:42 am | नंदन

असेच म्हणतो. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

समजावून घ्यायला अतिशय आनंद होईल.

विषेशतः विजेत्याने आखलेल्या योजना, त्यांना प्रतिस्पर्ध्यानं दिलेलं उत्तर आणि अंतीम विजयी ठरणार्‍या योजनेचा निर्विवादपणा या तीन गोष्टींचं तुमच्याकडून सामन्याच्या दरम्यानचं समालोचन अत्यंत उत्कंठापूर्ण होईल, तरी जरूर लिहावे.

गणपा's picture

9 May 2012 - 12:55 pm | गणपा

वरील सर्वांशी सहमत.
बिगुल चांगला वाजवला आहे हो रंगाशेट.

दुरदर्शन वाहिनीवर थेट प्रक्षेपण दाखवणार आहेत का हो मालक? (असल्यास कुठल्या?)

पहाटवारा's picture

9 May 2012 - 3:11 pm | पहाटवारा

तुमच्या सामना - विश्लेषणाच्या लेखांच्या प्रतीक्षेत !
जरा वेळ काढाच ..

रमताराम's picture

9 May 2012 - 4:04 pm | रमताराम

रंगाकाकांचे विश्लेषण म्हणजे पर्वणी. धन्यवाद.

(सध्या रिकाम्यावेळेत भिंतीला तुंबड्या लावण्याऐवजी चतुरंग डावाशी सलगीत असलेला) रमताराम

स्मिता.'s picture

9 May 2012 - 4:25 pm | स्मिता.

स्पर्धेची आणी बोरीसची ओळख आवडली. पुढे जसजशी स्पर्धा रंगेल तसे सामन्यांचे विश्लेषण वाचायला आवडेल.

ताज्या वृत्तानुसार आनंद आणि बोरिस दोघांनी स्पर्धेच्या ठिकाणाची रीतसर पहाणी केली. या आधीच्या स्पर्धेवेळी २०१० मध्ये टोपालोव आणि आनंद यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन पहाणी केली होती कारण टोपालोवची इच्छा तशी होती.
यावेळी मात्र आनंद आणी बोरिस एकाचवेळी आले. पटासमोर एकत्र बसले देखील!
आनंद समवेत त्याची पत्नी आणि मॅनेजर अरुणा देखील आहे.
पुढील दुव्यांवरती प्रकाशचित्रे बघता येतील.
http://www.chessdom.com/anand-and-gelfand-meet-in-moscow-during-the-venu...

-रंगा

परिकथेतील राजकुमार's picture

10 May 2012 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

वाट बघतो आहे...

मृत्युन्जय's picture

10 May 2012 - 1:55 pm | मृत्युन्जय

आपल्या आनंदप्रमाणे गेलफंड देखील सभ्य माणूस दिसतो आहे. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव खासकरुन खुपच निरागस आहेत

चतुरंग's picture

10 May 2012 - 6:00 pm | चतुरंग

मॉस्कोची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा दीड तासाने मागे आहे त्यामुळे मॉस्कोत दुपारी ३ वाजता सुरु होणारे सामने भारतीय वेळेनुसार ४.३० वाजता असतील.
(वरती लेखात चुकून मी दीड तास वजा करुन दुपारी १.३० वाजता असे लिहिले आहे.)

चतुरंग's picture

10 May 2012 - 10:36 pm | चतुरंग

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरळित सुरु झाला. आनंद आणि बोरिस उद्घाटन सोहळ्याला शेजारी बसले होते याचं बर्‍याच जणांना आश्चर्य वाटलं असावं. हे बघा प्रकाशचित्र -

रशियन, भारतीय आणि इस्रायली राष्ट्रगीतं वाजली आणि दोघांनी चार शब्द बोलले.

त्यानंतर आनंदने "टॉस" जिंकला आणि उद्या होणार्‍या पहिल्या सामन्यात तो पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळेल हे निश्चित झाले!
ही चांगली सुरुवात झाली असे मानायला हरकत नाही.

अधिक प्रकाशचित्रे इथे बघता येतील.
http://photo.chessdom.com/index.php?cat=10038

-रंगा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2012 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असंच थोडं थोडं वृत्तांत सांगत राहा. विश्वनाथ आनंदने पांढर्‍या मोहर्‍या घेऊन पटावर खेळायला सुरुवात केल्यावर कोणती प्यादी सरकवली. आता बोरीस काय करेल असं सांगत गेला तर आम्हाला आणखी मजा येईल. मिपावर पडीक असलो तर पोच देईनच.

-दिलीप बिरुटे

गणपा's picture

14 May 2012 - 9:11 pm | गणपा

धन्स राराशेट.

चतुरंग's picture

11 May 2012 - 5:22 pm | चतुरंग

http://moscow2012.fide.com/en/

इथे विश्लेषणासह वीडिओ बघता येईल.

आनंदने डाव अपेक्षेप्रमाणे डी४ ने सुरु केला. या आधीच्या दोन्ही विश्वविजेतेपद स्पर्धात आनंदने हीच खेळी वापरली होती.
पहिल्या सहा खेळ्यांनंतर डाव ग्रुनफेल्ड ओपनिंग एक्सचेंज वेरिएशन मध्ये गेलाय.

बाराव्या खेळी अखेर पांढरा राजा किल्लेकोटात, हत्तीला बी स्तंभ मोकळा, पटाच्या मध्यात दोन प्याद्यांची बढत
तर कच्चे दुवे त्याची दोन प्यादी हँगिंग आहेत ए२ आणि सी३ वरची

बोरिससाठी काळा उंट मुख्य कर्णात बसलाय, वजिराची प्रगती झाली,
कच्चे दुवे अजून राजाचा किल्लेकोट नाही, सी स्तंभात डबल प्यादे.

रमताराम's picture

11 May 2012 - 5:30 pm | रमताराम

सी३ (डबल फोर्स होता, नि मधला पट कन्ट्रोल मधे येत होता) उचलण्याऐवजी ए२ का उचलले असावे? चेसडम वर याचे संभाव्य धोके दाखवले होते.
आता हत्ती बी२ ला गेला तर वजीराला परत फिरावे लागेल किंवा सी४ ला येऊन बसावे लागेल

चतुरंग's picture

11 May 2012 - 5:44 pm | चतुरंग

हे मुक्त प्यादे आहे म्हणून उचलले. आता काळ्याच्या ए पट्टीतल्या प्याद्याला मोकळा रस्ता आहे. शिवाय एका प्याद्याची बढत मिळाली आहे. पोझीशनल अ‍ॅडवांटेज विरुद्ध मटेरिअल अ‍ॅडवांटेज असा सामना आहे!

रमताराम's picture

11 May 2012 - 5:55 pm | रमताराम

सी३ ही तसेच मोकळे - अनसपोर्टेड - होते ना. शिवाय, वजीर मध्यभागी कन्ट्रोल घेऊन बसला असता. मागे डी५ लाही धोका निर्माण केला असता पांढर्‍याला. शिवाय मधल्या डबल झालेल्या प्याद्याला संरक्षण मिळाले असते. एकुण मध्यावर काळ्याची हुकमत बसली असती.

अपेक्षेनुसार वजीर ब्याक टू प्याविलियन.

चतुरंग's picture

11 May 2012 - 6:10 pm | चतुरंग

ही ओपन पोझिशन आहे. काळ्याकडे दोन उंट आणि पांढर्‍याकडे एकच आहे. ओपन पोझिशन मध्ये उंट जास्त प्रभावी असतात. सी प्यादे घेण्याने उंटांची मारामारी होऊन काळ्याचा मुख्य कर्णावरचा ताबा सुटत होता. त्यापेक्षा त्याने ए वरचे प्याद्दे मटकावणे सोपे समजले.

रमताराम's picture

11 May 2012 - 6:15 pm | रमताराम

म्हणजे पांढर्‍याचा प्रतिवाद बिशप-डी२ असा प्रतिहल्ला करण्याचा असावा (नि पुढे उंटांचे एक्श्चेंज) अशी शक्यता म्हणताय का तुम्ही? पटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2012 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रमताराम आणि चतुरंग एवढ्यावरुन कोणाची स्ट्राँग पोझिशन आहे, एवढे सांगा ना राव.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

11 May 2012 - 6:29 pm | रमताराम

अहो मी आपला हौशी प्रेक्षक आहे. मला ओपनिंग्स सुद्धा सांगता येणार नाहीत धड, पुढचे तर सोडूनच द्या. इथे या निमित्ताने रंगाकडून अ‍ॅनलिसिस समजून घेतोय.
हौशी माणसाच्या दृष्टीकोनातून काळा अंमळ वरचढ दिसतोय.

चतुरंग's picture

11 May 2012 - 6:42 pm | चतुरंग

दोघेही समसमान वाटताहेत. पांढर्‍याचे पोझीशनल अ‍ॅडवांटॅज काळ्याने जवळपास संपुष्टात आणले आहे. आणि काळ्याच्या मटेरिअल अ‍ॅडवांटेजचा त्याला फारसा उपयोग नाही असे दिसते.
डाव बहुदा बरोबरीकडे निघालाय. बघूयात काय होते.

रमताराम's picture

11 May 2012 - 7:42 pm | रमताराम

ड्रॉ. :(

चित्रा's picture

11 May 2012 - 7:29 pm | चित्रा

लेख आवडला.
क्रिकेटप्रमाणे धावते समालोचन करण्याची पद्धत आवडली.

पोस्ट मॅच अ‍ॅनालिसिस सुरु आहे. प्रश्नोत्तरे सुरु आहेत.
http://moscow2012.fide.com/en/

सोत्रि's picture

11 May 2012 - 11:40 pm | सोत्रि

रंगा आणि ररा,

जे काही समालोचन केलेत ते अगम्य असले तरीही मस्त वाटले :)

- (बुद्धीचे बळ कमी असलेला) सोकाजी

विकास's picture

12 May 2012 - 12:04 am | विकास

लेख आणि माहीती एकदम मस्त आहे. आता कोण जिंकते आहे ते बघण्याची उत्सुकता लागली आहे. :-)

प्रश्न आहेतः

१० वी चाल आनंद Rb1 ऐवजी a4 का खेळला नाही? आणि ड्रॉची मागणी कोण करू शकतं?

चतुरंग's picture

12 May 2012 - 9:18 am | चतुरंग

कदाचित पुढीलप्रमाणे खेळ्या होऊ शकतील
a4 - a6
Bxc6 - bxc6
dxc6 -Rb8! --- काळ्या हत्तीला बी स्तंभ मोकळा मिळाला आता पांढर्‍याचा हत्ती कोपर्‍यात अडकला.
0-0 - 0-0
त्यानंतर काळा Be6 करुन पुढे Rd1 असा दुसरा हत्ती डी स्तंभात बसवू शकतो. दोन हत्ती मोक्याच्या स्तंभात शिवाय पुढे आलेला वजीर आणि काळ्याचे दोन बलवान उंट या समोर पांढर्‍याचे सहाव्या घरातले एकाकी प्यादे कोपर्‍यात अडकलेला हत्ती आणि तितकासा प्रभावी नसलेला वजीर यांचा टिकाव लागणे अवघड होऊ शकते.
अजूनही काही विश्लेषण असू शकेल परंतु मला जेवढे समजले त्यावर आधारित लिहितो आहे.
--------------------------------
ड्रॉ ची मागणी दोन्हीपैकी कोणताही खेळाडू आपली खेळी झाली की घड्याळ थांबवण्याआधी करु शकतो. जर सामना अधिकार्‍याने डाव तपासण्याआधी प्रतिस्पर्ध्याने मागणी मान्य केली तर लगेच गेम ड्रॉ होते. एकदा दिलेली ड्रॉची ऑफर मागे घेता येत नाही. प्रतिस्पर्ध्याने ड्रॉ नाकारला तर खेळ पुढे चालू ठेवावा लागतो. अजूनही काही बारकावे आहेत परंतु सध्या इतकेच.

-रंगा

संजय क्षीरसागर's picture

12 May 2012 - 9:40 am | संजय क्षीरसागर

या सामन्यात तरी मला बोरिस जास्त कल्पक, अग्रेसिव आणि निश्चींत वाटला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पट मांडून ठेवलाय. डावाला सुरुवात करा...

-दिलीप बिरुटे

मा.संपादक मंडळ, या स्पर्धेची सांगता होइपर्यंत या सामन्यांबद्दल एक वेगळे सदर मुखपृष्ठावर करुन ठेवता येईल का ?

रमताराम's picture

12 May 2012 - 5:03 pm | रमताराम

रंगाकाका इथेच राहतात का? ;)

सुरवात स्लाव पद्धतीने झाली आहे. मध्य पटावर वर्चस्वाची लढाई केंद्रित झालेली दिसते....

हा आलोच. डाव आज बराच वेगाने पुढे सरकला त्यामुळे तो बघण्यात वेळ जातोय.
स्लाव डिफेन्स मधल्या मेरान वेरिअशन ने डाव पुढे सरकला.
पटाच्या मध्यात प्याद्यांची मारामारी करुन वर्चस्व स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत.
आज आनंद आणि बोरिस दोघेही आक्रमक वाटताहेत.

रमताराम's picture

12 May 2012 - 5:38 pm | रमताराम

या क्षणी (१४ व्या चालीत) आनंदने घोडा वजीराच्या पट्ट्यात आणल्याने बोरिसने उंट जी-५ ला बसवला की हा घोडा बूच मारल्याप्रमाणे बंद होतो (मागचा वजीर हलवेपर्यंत). आणि हे करतानाच पांढर्‍याचा वजीर समोरच्या प्याद्याला आधार देऊन मागचा घोडा पुढे जाण्यास मोकळा होतो. थोडक्यात इथे काळा एक मूव मागे पडतो असे वाटत नाही का? की हा पुढे जाऊ देण्याचा जाणीवपूर्वक घेतलेला पवित्रा असावा?

करायची असल्याने काळा नेहेमीच एक मूव मागे असतो. आणि ही डावाची खासियत आहे.

बरोबर आहे उंट जी५ मधे गेला तर घोड्याला बूच बसते. प्यादे एच ६ मधे येऊन काळा त्या उंटाला मागे ढकलू शकतो.
बोरिस गहन विचारात गढलेला आहे. मधूनच डोळे झाकून घेऊन त्याचा विचार सुरु आहे. आनंद उठून गेलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> बोरिस गहन विचारात गढलेला आहे. मधूनच डोळे झाकून घेऊन त्याचा विचार सुरु आहे. आनंद उठून गेलाय.

कुठं पाहताय. जरा लिंक द्याना...!

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

12 May 2012 - 5:52 pm | रमताराम

http://www.chessdom.com/anand-gelfand-live/ (फक्त पट नि मूव आहेत आणि अ‍ॅनलिसिस)
http://moscow2012.fide.com/en/ (लाइव वीडिओ)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> http://moscow2012.fide.com/en/ (लाइव वीडिओ)
काही तरी माझ्याच संगणकाचा तांत्रिक गुंता दिसतोय.
गेम २ आणि खाली कोपर्‍यात क्वॉलिटी एचडी.एसडी दिसतंय पण विडियो नाही दिसत. :(

जाने दो....! आता डाव रंगात आलाय.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

12 May 2012 - 6:13 pm | रमताराम

वापरत असाल तर फ्लॅशचा लोचा असू शकतो. दुसरा ब्राउजर वापरून पहा.

वजीरावजीरी झाली आहे. आता मधला पट मोकळा आहे. एनिबडीज गेम.

रमताराम's picture

12 May 2012 - 6:15 pm | रमताराम

करायची असल्याने काळा नेहेमीच एक मूव मागे असतो. आणि ही डावाची खासियत आहे.
ते तर झालंच हो. :) 'अजून एक' मूव म्हणायचे होते मला. असो. आता डाव पुढे गेला आहे.

डावाच्या सुरुवातीपासून पटावर काही मारामारी होऊन डाव मोकळा झालाय.
मटेरिअल समसमान असले तरी बोरिसची मोहरी जास्त विकसित आहेत.
हत्तीला सी स्तंभ मोकळा मिळालाय, दोन्ही उंट विकसित आहेत त्यातही पांढरा उंट मुख्य कर्णावर बसलाय.
आनंदचा एक हत्ती आणि एक उंट अजूनही मागच्या रांगेत बसून आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदने आता मुसंडी मारायला पाहिजे.
अर्थात मला म्हणायला काय लागतं म्हणा.
आणि किती वेळ घेतोय हा बोरीस.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

12 May 2012 - 5:47 pm | चतुरंग

एका गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवे आहे ते म्हणजे घड्याळ!
आतापर्यंतच्या आनंदच्या खेळी एकूण ११ मिनिटात झाल्या आहेत आणि बोरिसने ५५ मिनिटे खर्ची घातलेली आहेत.
पहिल्या ४० खेळ्या दोघांनाही प्रत्येकी २ तासात कराव्या लागतात.

रमताराम's picture

12 May 2012 - 5:57 pm | रमताराम

तीन-चार खेळ्या झटपट झाल्या. आता दोघांचे वजीर समोरासमोर आलेत. आनंद विचारात पडलाय. इस्टेट सारखीच असली तरी आनंदचे हत्ती अ‍ॅक्टिव नाहीत.

चतुरंग's picture

12 May 2012 - 5:58 pm | चतुरंग

दोन मुख्य खेळ्या होत्या त्यापैकी प्याद्यंची मारामारी आणि उंटांची मारामरी केली.
आता दोघांचे विरुद्ध रंगाचे उंट शिल्लक आहेत ही बाब फारशी चांगली नाही कारण अशा पोझीशनमधे बर्‍याचदा डाव बरोबरीत जाऊ शकतो! :(
आता आनंद काय खेळतो ते महत्त्वाचे आहे.

पोझीशन इंटरेस्टिंग आहे. आता बोरिसची थ्रेट उंट सी ५ अशी आहे! वजीर आणि हत्ती पिन करणे!!
घोड्याने उंट मारता येत नाही. वजिरा वजिरी केली तरच डाव पुढे जातो.
आनंदने उंट एफ ५ मधे आणलाय! बोरिसने वजिरावजिरी केली तर डाव बरोबरीकडे जाणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाही डाव बरोबरीतच जाणार काय ?

-दिलीप बिरुटे

वजिरावजिरी झालीच! आता हत्ती डी१ ही बहुदा पुढची खेळी असेल बोरिसची

चतुरंग's picture

12 May 2012 - 6:20 pm | चतुरंग

मध्ये आणला. अनपेक्षित खेळी आहे. बोरिसचा प्लॅन उंटाला हुसकवायचा असावा. आनंद बहुदा उंट जी ६ मधे ठेवून मुख्य कर्ण सोडणार नाही.

रमताराम's picture

12 May 2012 - 6:25 pm | रमताराम

पुढचा माझा तर्कः
२०, उंट एफ-४, घोडा ई-४ (कैच्याकै असावा. कदाचित हत्ती आधी हलतील. पण सध्या हाच असू द्या. ;) )

रमताराम's picture

12 May 2012 - 6:38 pm | रमताराम

शेवटी हत्तीच आणला मदतीला. घोड्याला ई-४ ऐवजी डी-४ (पुढे जाऊन हत्तीला बाळबोध पद्धतीने फोर्क मारता येईल. ) ही अधिक चांगली जागा असावी असा आनंदचा होरा दिसतोय.

चतुरंग's picture

12 May 2012 - 6:25 pm | चतुरंग

अंतिम टप्प्यात शिरलाय. आनंद आणि बोरिस दोघेही जबरद्स्त एंडगेम खेळाडू आहेत त्यामुळे डाव पुन्हा इंटरेस्टिंग टप्प्यावरती आलाय!
उंट कोठे जातो ते बघावे लागेल.

चतुरंग's picture

12 May 2012 - 6:30 pm | चतुरंग

इतका ताणाखाली वाटतोय. डावाच्या या टप्प्यावरती प्रत्येक खेळी आणि त्याचे डीप वेरिएशन्स महत्त्वाचे ठरतात.
बोरिस मागेपुढे हेल्पाटे घालून आनंदची अस्वस्थता वाढवत असावा, बॅटल ऑफ सायकॉलॉजी!!

रमताराम's picture

12 May 2012 - 6:32 pm | रमताराम

बोरिस मागेपुढे हेल्पाटे घालून आनंदची अस्वस्थता वाढवत असावा, बॅटल ऑफ सायकॉलॉजी!!
शक्य आहे. किंवा उलट सुद्धा असू शकेल. शारीरिक हालचाल हा मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्नही असू शकतो.

रमताराम's picture

12 May 2012 - 6:40 pm | रमताराम

इथे माझ्या मनावरचा ताण कसा कमी करायचा सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बोरीस जसा या कोप-यातून त्या कोपर्‍यात चकरा टाकतोय तसं करा.
बाय द वे, आनंदला म्हणावं तो कोपर्‍यातला हत्ती घे आता मैदानात.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

12 May 2012 - 6:58 pm | रमताराम

आला हत्ती समोर.

रमताराम's picture

12 May 2012 - 6:41 pm | रमताराम

२१ व्या चालीत पांढर्‍या उंटाने काळा घोड्याला जेरबंद केला की.

चतुरंग's picture

12 May 2012 - 6:54 pm | चतुरंग

हो आता अंतिम टप्प्यातली खणाखणी सुरु झाली एच ५ लगेच आर्डी१ बोरिस झटपट खेळतोय!
अर्थात बोरिसच्या घड्याळात १८ खेळ्या करायला फक्त अर्धा तास आहे आणि आनंदच्या १ तास!!

रमताराम's picture

12 May 2012 - 7:00 pm | रमताराम

त्याने बर्‍याच्य शक्यतांचा विचार आधीच करून ठेवला असावा. आनंदच्या खेळीनंतर त्याची खेळी लगेचच येते आहे, जणू त्याला अपेक्षित खेळीच खेळतोय आनंद.

पैसा's picture

12 May 2012 - 7:03 pm | पैसा

त्याच्याकडे वेळ कमी आहे. आणि आनंद प्यादी पुढे काढत त्याला जास्त विचार करायला भाग पाडतोय.

चतुरंग's picture

12 May 2012 - 7:03 pm | चतुरंग

सामन्याआधीच्या तयारीच्या वेळी कोणती वेरिएशन्स किती खोलवर अभ्यासली गेली आहेत त्यावरही हे ठरते!
दोघांनी प्यादी पुढे सरकवून राजे खेळात आणण्याचा चंग बांधलाय. अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर आलाय डाव.
निकाली व्हावा असे वाटते!

रमताराम's picture

12 May 2012 - 7:08 pm | रमताराम

आनंदने बोरिसला उंट हटवायला भाग पाडले. आता हत्ती समोरासमोर आहेत. एक्श्चेंजला पर्याय नाही असे दिसते. Draw seems more likely now.

रमताराम's picture

12 May 2012 - 7:12 pm | रमताराम

आनंदची अनपेक्षित खेळी. बोरिसला वेळेचे प्रेशर चांगलेच त्रास देणार. फक्त २३ मिनिटे नि १७ खेळ्या अजून बाकी. आनंद थेट खेळी न करता वेळेचे प्रेशर वाढवतोय असे वाटते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता हत्ती एकमेकांसमोर आणल्यानंतर जर एकमेकांचे हत्तीच घ्यायचे असतील
तर मला नाही वाटत डावाचा निकाल लागेल.

-दिलीप बिरुटे

बोरिसने हत्तींच्या टकरीसाठी आव्हान दिले. आनंदने राजा एच ७ मध्ये नेला. तुला करायची असेल तर कर मारामारी असा पवित्रा असावा. संभाव्य मारामारीतून राजाला शह येऊ नये ही खबरदारी घेतली.

बोरिसला काही फारशी आशा दिसत नसावी पुढे. डावाच्या अंतिम टप्प्यात घोड्याच्या अचूक हालचाली हुडकण्यात आनंद वाकबगार आहे हे बोरिस जाणून असणार!

आणि डाव बरोबरीत सुटला!!:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2012 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> डाव बरोबरीत सुटला !
रंगाशेठ, असेच डाव होणार असतील आणि तेही बरोबर सुटणार असतील तर कै मजा नै.
कोणीतरी जिंकाव. पुढल्यावेळेस अंतिम टप्प्यातल्याच खेळी बघेन.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

12 May 2012 - 7:19 pm | रमताराम

बरोबरी मान्य करण्यात आली आहे. :( आनंदने का मान्य केले जरा बुचकळ्यात पडलो आहे. सतरा मिनिटात सतरा खेळया करण्याचे आव्हान होते बोरिससमोर.

चतुरंग's picture

12 May 2012 - 7:29 pm | चतुरंग

काही निर्णय निघायची शक्यता या टप्प्याला कमी होत जाते. दोन्हीकडे समसमान आणि समोरासमोर प्यादी. दोन दोन हत्ती.
कोणाकडेही पाचव्या पट्टीपलीकडे सरकलेली पासपॉन्स नाहीत. अशावेळी कोणी काही चूक करण्याची शक्यता जवळज्वळ नगण्य असते आणि या पातळीच्या खेळात तर नक्कीच नाही. दोघेही बचावात्मक खेळत राहतात कारण हल्ला करण्याजोगे काही नसते. डावात खूप मोहरी शिल्लक असली आणि पोझीशन काँप्लिकेटेड असली तर काही टॅक्टिकल शक्यता उद्भवू शकतात. आनंदने बरोबरी मान्य केली ह्यात नवल नाही.

रमताराम's picture

12 May 2012 - 7:40 pm | रमताराम

पण वेळेचे गणित बसवणे जरा अवघड होते ना. की कदाचित पुढच्या खेळी यांत्रिकपणे होऊन आपोआपच बरोबरीची स्थिती निर्माण होईल हे दोघांना उघड दिसले म्हणून आधीच मान्य करून मोकळे झाले असावेत.

चतुरंग's picture

12 May 2012 - 8:37 pm | चतुरंग

राजाच्या/हत्तीच्या पुढे मागे मूव्ज केल्या जातात आणि ४० ची संख्या पूर्ण केली जाते.
नंतर विचाराला जास्ती वेळ मिळाला की पुन्हा सामना सुरु होतो. परंतु पोझीशन तशी असायला हवी.
आताच्या पोझीशनमध्ये काही राम नव्हता! :)

एकूण फारसा रंगतदार झाला नाही हा डाव.
मातीच्या कुस्तीत जसे पहिली काही मिनिटे खडाखडी होऊन एकमेकांचा अंदाज घेतला जातो तशा पद्धतीने हे दोन डाव झाले. पुढल्या डावाआधी एक दिवसाची सुट्टी आहे. सोमवारी ताजेतवाने होऊन दोघेही समोरासमोर येतील.
तो डाव निकाली होईल याची जाम शक्यता मला वाटते.

वार्ताहरपरिषदेसाठी दोघे गेलेत. बघूया काय प्रश्न विचारले जातात.

रमताराम's picture

12 May 2012 - 7:42 pm | रमताराम

ही जरा फ्रेंडली मॅच होती म्हणून. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 May 2012 - 8:14 pm | बिपिन कार्यकर्ते

नेहमीप्रमाणेच वाचताना मजा आली! मस्तच... आता नियमितपणे याबद्दल लेखन येऊ दे!

भडकमकर मास्तर's picture

13 May 2012 - 4:29 am | भडकमकर मास्तर

नायजेल शॉर्त इतका अडखळत अडखळत बोल्तो की हा लंडनच्या मराठी माध्यमातून इंग्रजी शिकलाय असे वाटावे...

जयंत कुलकर्णी's picture

13 May 2012 - 6:59 am | जयंत कुलकर्णी

धमाल आली. ! पण मुळ लेखात आमच्या आनंदचाही एक चांगला फोटो टाका बुवा.............

रमताराम's picture

14 May 2012 - 4:52 pm | रमताराम

पुन्हा ग्रुनफेल्ड. वेगाने चाली होताहेत. तिसर्‍याच खेळीत पहिला कॅप्चर नि सातव्या खेळीत काळ्याने (बोरिसने) कॅसल्-इन केले. आनंदने लाँग कॅसल मारून हत्ती सक्रिय केला आहे. सामना वेगवान होणार.