येत्या १० तारखेला मॉस्कोच्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये आनंद विश्वनाथन वि. बोरिस गेलफंड असा सामना सुरु होत आहे. तेव्हा बुद्धीबळप्रेमींनो पुन्हा एकदा जगज्जेतेपदाच्या सामन्याचा सोहळा अनुभवण्याची तयारी करा.
आनंद तिसर्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे तर बोरिस त्याच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या इतका जवळ प्रथमच पोचलेला आहे. त्यामुळे बोरिस हा अतिशय उत्साहात आणि कमालीच्या तयारीनिशी स्पर्धेत उतरणार हे नक्की. त्यामानाने आनंदला तिसरे विजेतेपद मिळवणे ही गोष्ट किती चालना देऊ शकेल हा अनेक बुद्धीबळ तज्ञांच्या मते प्रश्न आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे दोन्ही खेळाडू वयाची चाळीशी पार केलेले आहेत म्हणजे विशीतल्या तरुण खेळाडूंचे पेव बघता 'म्हातारेच' म्हणायला हवेत. ते काहीही असो आपला पाठिंबा तर लाडक्या आनंदलाच आहे हे नक्की!
चला, दोन्ही खेळाडूंची ओळख करुन घेऊयात.
बोरिस गेलफंड -
जन्माने बेलोरशियन आणि नागरिकत्त्वाने इस्रायली असलेला बोरिस असामान्य प्रतिभावान खेळाडू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी रशियन जेतेपद आणि दोन वर्षांनी जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवणारा बोरिस १९९६ साली कँडिडेट मॅचेसमध्ये उपांत्य सामन्यात अनातोली कार्पोवकडून पराजित झाला. त्यानंतर पुन्हा एकदा २००७ मध्ये व्लादिमीर क्रामनिकने त्याला पराभूत करुन आनंदचा प्रतिस्पर्धी म्हणून नाव निश्चित केले. शेवटी २०११ च्या कँडिडेट्स स्पर्धेत बोरिसने आपल्या अतिशय चिवट खेळाने गाटा काम्स्की आणि अलेक्झांडर ग्रिश्चुकसारख्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना नमवून बाजी मारली. असा त्याचा २०१२ च्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आहे. खेळाच्या भाषेत ज्याला 'नर्व्ज ऑफ स्टील' म्हणतात तशा प्रकारचा कणखरपणा आणि अत्यंत चिवट मनोवृत्ती ही बोरिसची शक्तिस्थाने आहेत.
मागल्या आठवड्यातच त्याची एक मुलाखत झाली. त्यावेळी त्याला विचारले "सध्याच्या तरुण खेळाडूंच्या जमान्यात तू किंवा आनंदसारखे जुने खेळाडू टिकून राहण्याचे कारण तुला काय वाटते?"
बोरिसने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. तो म्हणतो "आम्ही जुन्या पद्धतीने बुद्धीबळ शिकलो. खेळाचा सखोल अभ्यास करण्याचे तंत्र हे स्वतः विचार करुन उत्तरे शोधण्यात आहे. सध्याच्या पिढीतल्या बहुतांश खेळाडूंचे पान संगणकाशिवाय हलत नाही. विशिष्ठ परिस्थितीत संगणक काय चाली करेल हे बघून त्यानुसार डावपेच आखण्याचे धोरण हे त्यांच्या बुद्धीबळाच्या मूलभूत व्यासंगावर परिणाम करते आहे असे मला वाटते. संगणकाचे फायदे जरुर आहेत परंतु त्यांचा वापर हा मर्यादित परिघातच करायला हवा अन्यथा तुम्ही तुमची विचारशक्ती मर्यादित करता."
बुद्धीबळाचे डावपेच नुसते माहीत असून उपयोग नाही तर प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणात अतिशय तणावाच्या स्थितीत, मनोधैर्य टिकवून चिवटपणाने खेळ करणे हे गरजेचे असते अन्यथा तुम्ही डाव आणि पर्यायाने सामना गमावता.
पांढर्या मोहोर्यानी खेळतांना डी४ ही बोरिसची आवडती खेळी आहे तर काळ्याने खेळताना तो नॅ़जडॉर्फ सिसिलियन, पेट्रॉफ बचाव, स्लाव बचाव आणी राजाचा भारतीय बचाव (किंग्ज इंडीयन डिफेन्स) यावर भर देतो. अत्यंत सशक्त पोझीशनल अवेअरनेस आणि कमितकमी चुका करण्याची प्रवृत्ती ही त्याची वैशिष्ठ्ये आहेत.
बोरिस हा वाद निर्माण करणारा खेळाडू नाहीये. पण तो अतिशय नाट्यपूर्ण चेहरे आणि हालचाली करतो. त्याच्या भावना त्याला सहजासहजी लपवता येत नाहीत. वानगीदाखल पहा ही मुद्रा!
आनंद त्याच्याबद्दल काय म्हणतो पहा. "बोरिस उच्च दर्जाचा खेळाडू आहे. मी आणि तो १९८९ पासून एकमेकांशी खेळतो आहोत. एकमेकांचा खेळ चांगलाच ओळखून असलो तरी यावेळी बोरिस काही वैशिष्ठ्यपूर्ण तयारीने येणार हे नक्की. बुद्धीबळ रसिकांसाठी एक उत्कंठापूर्ण सामना देण्यात आम्ही दोघेही यशस्वी होऊ अशी आशा आहे."
------------------------------
आनंद विश्वनाथन -
२००८ साली व्लादिमीर क्रामनिकला हरवून प्रथम आणि २०१० साली वॅसेलीन टोपालोवला धूळ चारुन द्वितीय जगज्जेतेपद कमावणारा आनंद आता तिसर्यांदा स्पर्धेत आहे ही बाबच आनंद देणारी आहे.
वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धीबळातला श्रीगणेशा आपल्या आईकडून गिरवणारा आनंद अत्यंत वेगाने खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ब्लिट्झ किड' म्हणूनच तो ओळखला जायचा. अजूनही जलदगती बुद्धीबळात त्याच्या तोडीला असलेले मोजकेच खेळाडू आहेत. २००३ - २००९ अशी ७ वर्षे तो जलदगती चँपियन होता.
अत्यंत वेगवान खेळ्या आणि उच्च दर्जाची टॅक्टिकल समज ही आनंदची शक्तिस्थाने आहेत. घोड्यांचा अतिशय कल्पक वापर हा देखील त्याच्या अनेक डावांचे वैशिष्ठ्य ठरलेला आहे.
शांत आणि निगर्वी असलेला आनंद देखील वादात पडत नाही. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे त्याची हेटाळणी करणे असले उद्योग तो कधीही करत नाही. संयमी असल्याने फारसा भावनांच्या आहारी जाताना दिसत नाही. चेहेर्यावरही चुकीच्या खेळीचा पश्चाताप तो सहजासहजी दिसू देत नाही. जगज्जेतेपदासारख्या सर्वोच्च स्पर्धातून तुमची ही वैशिष्ठ्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरतात. तो मुलाखतीही अतिशय प्रसन्न चेहेर्याने आणि स्पष्ट विचाराने देतो. त्याची उत्तरे सहजासहजी तुमच्या हाती काहीही वादग्रस्त लागू देत नाहीत.
बोरिसने केलेले आनंदचे कौतुक "आनंदची स्मरणशक्ती अफाट आहे. अत्यंत वेगाने विचार करुन खेळणे हे त्याचे बलस्थान आहे. आनंदशी खेळणे हे सोपे काम नाही पण मी त्याचे कच्चे दुवे शोधून काढेन आणि त्याचा फायदा उठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन."
-----------------------------
स्पर्धा कशी होणार आहे?
१० मे स्पर्धेचे उद्घाटन होईल.
११ व १२ मे डाव १ व २ मग एक विश्रांतीचा दिवस, पुन्हा दोन डाव मग एक विश्रांती अशा प्रकारे २४ मे पर्यंत पहिले १० डाव खेळले जातील.
त्यानंतर ११ वा आणि १२ वा डाव हे दोन्ही मधे एकेक दिवस ठेवून खेळले जातील.
१२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल.
फिडेच्या संकेतस्थळावर सामन्यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे. २८ पानी नियमावली देखील वाचून बघावी. किती गोष्टींचा विचार केला आहे हे बघून मजा वाटते!
मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता उद्घाटन सोहोळा आहे.
११ तारखेला पहिला डाव दुपारी ३ वाजता सुरु होईल. (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता. चुभूदेघे.)
स्पर्धेसाठी नायजेल शॉर्ट, यान टिम्मान, व्लादिमिर क्रामनिक, पीटर स्वीडलर, पीटर लेको असे ग्रँडमास्टर्स कॉमेंटरी करायला हजर असणार आहेत.
विजेत्याला १५ लाख डॉलर्स आणि उपविजेत्याला १० लाख डॉलर्स अशा घसघशीत रकमांची बक्षिसे आहेत!
पुढील संकेत स्थळांवर सामने थेट प्रक्षेपित केले जातील काही ठिकाणी फक्त पट आणि चाली बघायला मिळतील तर काही ठिकाणी पट आणि प्रत्यक्ष खेळाडू खेळताना बघायला मिळतील. रसिकांनी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घ्यावी. अजून इतरही संकेत स्थळे नक्कीच असतील त्यांचाही जालावर शोध घ्यावा.
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
http://www.anand-gelfand.com/
http://moscow2012.fide.com/en/
मला डावांचे विश्लेषण देणे कितपत शक्य होईल माहित नाही परंतु मी थोडेफार लिहिण्याचा जरून प्रयत्न करेन. निदान ज्या डावांचे निकाल लागले आहेत (अनिर्णीत नाहीत) अशांचे तरी विश्लेषण देईन असे म्हणतो.
तर अशा रीतीने या महा सोहळ्याला आता दोनच दिवस बाकी आहेत. चला आनंदाला शुभेच्छा देऊयात आणि महासोहळ्याची तयारी करू यात!
(आनंदी)चतुरंग
सर्व प्रकाशचित्रे आंजावरुन साभार.
प्रतिक्रिया
14 May 2012 - 5:14 pm | चतुरंग
अरे हो हो हो! आजचा सामना भलताच वेगाने सुरु झाला. सुरुवातीला मला चुकून दोघे ब्लिट्झ खेळायला लागले की काय असे वाटले! दोघेही वेगाने खेळत आहेत पण बोरिस केवळ पेटलाय! अवघ्या ९ मिनिटात १५ खेळ्या पूर्ण केल्यात. कधी नव्हे ते आनंद वेळाच्या बाबतीत मागे पडलाय. त्याच्या १५ खेळ्यांनी ३५ मिनिटे घेतलीत.
14 May 2012 - 5:26 pm | रमताराम
आनंदने (नेहमीप्रमाणे) विश्लेषकांचा तर्क धुडकावून वेगळीच खेळी केली. राजा खोलवर नेला नि घोड्याला मागे येण्याचा मार्ग निर्माण केला.
(च्यायचं हे गेलफंड काय आधीच आनंदचं डोक कंट्रोल करतंय की काय. प्रत्येक खेळी काही सेकंदात होते आहे.)
मस्त मूव. आनंदला कोंडीत घेतले. पुढे आलेले ई-४ चे प्यादे घेतले तर एक्स्चेंजमधे काळ्याचे दोन्ही हत्ती तर सक्रिय होतीलच वर उंटही थेट राजाकडे नजर रोखून बसेल. मस्त. आनंद बराच वेळ घेतोय.
14 May 2012 - 5:25 pm | चतुरंग
वर ररांनि म्हटल्याप्रमाणे आजचा डावही ग्रुन्फेल्डने सुरु झाला. दोघांनी विरुद्ध बाजूला किल्लेकोट करणे ही सर्वसाधारणपणे घनघोर युद्धाची नांदी असते. पहिल्या १५ खेळ्यानंतर आलेली ही एक अतिशय शार्प पोझीशन आहे. काळा आणि पांढरा दोघांनाही भरपूर वाव आहे.
पांढर्याचा सी३ मधला घोडा, वजीर आणि हत्ती केंद्रातल्या डी५ प्याद्याकरवी केंद्रात मोर्चे बांधणी करुन आहेत. ज्याला जागेचे आणि पोझीशनल अॅडवांटेज म्हणतात ते आनंदला आहे. त्याच्या बदल्यात त्याचा राजा थोडा असुरक्षित आहे आणि राजाकडच्या उंट, घोडा आणि हत्तीचा विकास थंडावलाय.
बोरिसची सर्व मोहरी अॅक्तीव आहेत. राजा मस्त गुबगुबीत जागा धरुन कोपर्यात आहे. काळा उंट मुख्य कर्णात बसलाय. मध्यात दोन्ही घोडी फुर्फुरत डि ५ प्याद्यावर निशाणा साधून आहेत.
बोरिस भलताच तयारीने आलेला आहे. आजचा डाव निकाली निघणार बाप्पा!!
14 May 2012 - 5:45 pm | चतुरंग
ई४ प्याद्याचे एफ३ प्याद्याने किंवा सी ३ घोड्याने मारणे दोन्ही पांढर्यासाठी घातक होते. तेव्हा आनंदने बीडी४ अशी सुरेख खेळी केली आहे. आत्ता पहिल्यांदाच बोरिस इतका विचारात पडालाय.
आनंडने त्याच्या मुख्य कर्णातल्या उंटासमोर आपला उंट घेतला. मधे घोडा आहे.
सी ६ मधला घोडा ए४ नेला. ऐला! बोरिसने आज हल्लाबोल ठरवलेला आहे हे नक्की.
14 May 2012 - 5:48 pm | चतुरंग
घोडा जी १ ई२ - आनंदने सी ३ मधल्या घोड्यासाठी दुसर्या घोड्याची कुमक मागवली. अत्यंत थंड डोक्याने खेळणे हे फार महत्त्वाचे आहे. पोझीशन इतकी स्फोटक आहे की एक चुकीची खेळी आणि डाव बघता बघता कोलम्डू शकतो कुठल्याही बाजूला!
जिस पल का इंतजार था वो घडी शायद आ रही है!! (भावना आवरायला रंगाला हिंदीचा आधार घ्यावा लागला! ;) )
14 May 2012 - 5:52 pm | रमताराम
दुर्दैवाने आनंदचा राजाचा उंट घोड्याने अडवल्याने नि हत्ती पारच दूर पडल्याने कुमक कमी पडणार त्याला. पण पोजिशनल अॅडवांटेजची स्थिती तयार करून तो यावर मात करतो का पहायचे.
14 May 2012 - 5:50 pm | रमताराम
बोरिसने सी-३ च्या घोड्यावर हल्ला करण्याने आनंदला राजाकडील घोडा बाहेर आणण्याची संधी मिळाली आहे. सारे लक्ष आता सी-४ च्या घोड्यावर नि ई-४ च्या प्याद्यावर. बोरिस हत्तीचा पाठिंबा आणून या प्याद्याच्या मदतीने आनंदच्या वजीराला शह देऊ शकतो. खाल्ले तरी पंचाईत, सोडले तरी अशी अवस्था होऊ शकते.
14 May 2012 - 5:58 pm | इस्पिक राजा
बोरीस त्याचा राजाच्या बाजूचा हत्ती का बाहेर काढत नाही आहे? त्या प्याद्यालाही सपोर्ट मिळेल
14 May 2012 - 5:59 pm | चतुरंग
आता गेल्फंड बहुदा वजीर ए ५ मधे आणायला बघणार. पांढर्याचे डी ५ मधले प्यादे हा कळीचा मुद्दा आहे. ते प्यादे जोवर टिकून आहे तोवर मध्यात वजीर आणि हत्तींची मुसंडी थोपवणे आनंदला शक्य आहे. काळ्याचे ई ५ मधले प्यादे हे पांढर्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. बोरिस डोके धरुन बसलाय. आठव, आठव खेळ्या!
डाव आता सखोल थिओरेटिकल वेरिएशन्स मध्ये गेलाय. अनेक खेळ्यांची पूर्वतयारी आणि तीव्र स्मरणशक्ती यांची परीक्षाच सुरु आहे. या पातळीला खेळाडू पुढल्या ७-८ खेळ्यांपर्यंतचा पट विज्युअलाईज करु शकतात!!
14 May 2012 - 6:05 pm | रमताराम
:)
14 May 2012 - 6:07 pm | मन१
पुढल्या सात आठ खेळ्या म्हणजे तब्बल काही शे, शेकडो पोझिशन्स झाल्या की तिच्यायला पटावर.
हे महात्मे इतकं बघू शकतात?!!!
चेसांधळा
14 May 2012 - 6:13 pm | चतुरंग
त्यांना त्यांचे ऑगस्ट १९९५ मधे वगैरे खेळलेले डाव आठवत असतात!!
अहो इतकंच कशाला माझा मावसभाऊ युनिवर्सिटी प्लेअर होता तो त्याचे २५-३० वर्षांपूर्वीचे डाव अजूनही खेळून दाखवू शकतो. इथे तर हे रात्रंदिवस उंटाची भाजी आणी घोड्याची भजी करुन खात असतात!!
14 May 2012 - 6:11 pm | ५० फक्त
या पातळीला खेळाडू पुढल्या ७-८ खेळ्यांपर्यंतचा पट विज्युअलाईज करु शकतात! ! - सलाम सलाम आणि सलाम.
14 May 2012 - 6:07 pm | चतुरंग
येस! आला वजीर पुढे. सी३ वरच्या घोड्याचा ताण वाढत चाललाय. डी ५ मधले प्यादे आता आनंद कसे वाचवणार?
त्याचा पांढरा उंट एफ १ मधे अडकलाय ही मोठी अडचण आहे आणि बोरिस त्याला तो उंट विकसित करु देणार नाही!
14 May 2012 - 6:18 pm | चतुरंग
येस! अपेक्षित खेळी आनंदने घोड्याने ई४ वरचे प्यादे खाल्ले. आता रणधुमाळी उडणार!!
14 May 2012 - 6:22 pm | रमताराम
आता खेळ्या अपेक्षित असल्या तरी क्रम काळजीपूर्वक निवडाला लागणार.
बोरिस बहुधा हत्तीने चेक देणारा घोडा मटकावेल.
14 May 2012 - 6:27 pm | चतुरंग
कारण मग हत्तीने काळा वजीर खाल्ल्यावर उंटाच्या तावडीत हत्ती आयताच ठेवल्यासारखे होऊन त्याची दुसरी खेळी उगाचच होणार.
14 May 2012 - 6:30 pm | चतुरंग
ती खेळीसुद्धा चालेल. कारण मग हत्ती मध्यात आणून डी ५ प्याद्यावर घालता येईल!
14 May 2012 - 6:33 pm | रमताराम
मी त्याच दृष्टीने विचार केला होता. आणि उंटांचं एक्स्चेंज टाळण्याकडे काळ्याचा कल हवा. कारण वजीर नि उंट दोनही गेले की आनंदवरचे प्रेशर खूपच कमी होईल.
येप्प. आमचा अंदाज बरोबर ठरला. हत्तीच आला आधी.
14 May 2012 - 6:24 pm | चतुरंग
वजिरावजिरी होणार परंतु तत्पूर्वी आनंदने एफ ५ वरचे प्यादे घेऊन राजाला शह दिलाय त्यामुळे आता पुढच्या खेळीला वजीर मारुन तो एक प्याद्याची बढत घेईल. त्याला त्याचा फायदा उठवता येईल का?
14 May 2012 - 6:31 pm | रमताराम
काळ्याचे मध्यपटातले सारे सैन्य धारातीर्थी पडलेले असेल. त्यामुळे उंट नि हत्तीला बूच बसल्याने आनंदची झालेली कोंडी फोडायला त्याला वाव मिळेल का?
14 May 2012 - 6:25 pm | इस्पिक राजा
आनंदने घोड्याने वजीराचा घास का नाही घेतला हे कळत नाही. कोणी समजावून सांगेल काय?
14 May 2012 - 6:42 pm | रमताराम
मधल्या पटावरचे काळ्याचे नियंत्रण पूर्ण उठवले पांढर्याने.
आता बी३ खेळून घोड्यावर प्रेशर आणून मधले प्यादे वाचवायचा प्रयत्न होऊ शकतो. यात घोडा मागे गेला तर हत्तीची फाईल बंद होऊ शकते नि काळा आणखी हतबल होईल. (अर्थात त्याला बी६ चा पर्याय आहे म्हणा)
14 May 2012 - 6:47 pm | रमताराम
बी२ चे प्यादे पुढे सरकत नाही तोवर आनंदचा घोडा हलू शकत नाही, नि जोवर तो हलत नाही तोवर उंट. कदाचित जी-४ चा पर्याय देखील तपासला जाऊ शकतो. उंट मोकळा होईल नि काळ्याच्या हत्तीला शह बसतो. पण उंट चुकीच्या बाजूला बाहेर पडतो यातून आणि एफ मधले प्यादेही धोक्यात येते. :(
14 May 2012 - 6:47 pm | बिपिन कार्यकर्ते
भन्नाट चालू आहे!
14 May 2012 - 6:49 pm | रमताराम
आनंदला वेळेचे प्रेशर पडणार असे दिसते.
14 May 2012 - 6:57 pm | रमताराम
चुकीचे वाचले. ४२ मिनिटे आहेत. अजून तरी रिस्क दिसत नाही.
14 May 2012 - 7:01 pm | चतुरंग
मस्त मूव. आनंदने डावाचा फोकस काळ्याच्या बाजूकडे ढकलला! उत्कृष्ट वेटिंग मूव.
14 May 2012 - 7:15 pm | रमताराम
आनंदला बी३ खेळावी लागेल. नाहीतर हत्ती नि घोडा दोन्ही ब्लॉक राहतील नि त्यामुळे मागचा उंटही. उजवीकडचा हत्ती तसाही झोपला असल्याने त्याच्याकडे फारशा खेळ्यांचे पर्याय रहात नाहीत. :(
पर्याय म्हणून राजा बी-१ ला आणून घोड्याला मोकळा करता येईल. आता उंटाचा धोका नसल्याने ही खेळीही चालेल.
14 May 2012 - 7:11 pm | इस्पिक राजा
ड्रॉ?
14 May 2012 - 7:23 pm | चतुरंग
आता टाईम प्रेशर बिल्ट होतंय १५ खेळ्यांना २५ मिनिटं!!!
14 May 2012 - 7:32 pm | रमताराम
बहुधा वेळेच्या प्रेशरखाली पुन्हा ड्रॉ होणार की काय. :(
14 May 2012 - 7:50 pm | रमताराम
डी-६ प्याद्यामुळे आनंदला थोडा अडवांटेज आहे असे दिसते. हत्ती समोर आणून काळ्याला उंट गमवायचा धोका निर्माण केला आनंदने. बघू या बोरिस काय तोड काढतो.
14 May 2012 - 7:51 pm | चतुरंग
डाव अत्यंत उत्कंठापूर्ण अवस्थेत आहे. आनंदच्या राजाला मेटिंग थ्रेट आहे आणि तो डी ६ मधल्या प्याद्याचा आणि डी४ मधल्या घोड्याचा आधार घेऊन हत्ती ई७ मधे नेण्याची धमकी देतोय! काय स्थिती आहे! बॅटल ऑफ नर्व्ज!!
14 May 2012 - 8:04 pm | रमताराम
आणखी दोन मोहरे पडले. दहा मिनिटे फक्त. व्हॉट अ गेम.
चेक तर पडला. प्यादे प्रमोट करण्याच्या स्थितीला नेणार का पाढरा. काळ्याने हत्ती समोर आणून त्याला ब्लॉक केले तर पांढर्याचा हत्ती पुढे जाऊन त्याला एक्स्चेंज भाग पाडेल? मग प्यादेही प्रमोट होईल!
14 May 2012 - 8:09 pm | रमताराम
पण मग ड्रॉ नक्की.
14 May 2012 - 8:09 pm | रमताराम
पण मग ड्रॉ नक्की.
आहा. पुन्हा मेटिंग थ्रेट. मझा आ रहा है.
14 May 2012 - 7:54 pm | चतुरंग
१० मूव्ज बाकी ४० व्हायला - बोरिस कडे २३ मिनिटे आहेत आणि आनंदकडे १३!!
14 May 2012 - 8:03 pm | चतुरंग
मेटिंग थ्रेट टाळली. आता सातव्या पट्टीत हत्ती नेऊन काळ्या राजाला चेक दिला!
14 May 2012 - 8:15 pm | चतुरंग
माताय! दोन हत्ती दुसर्या पट्टीत!! आनंद टाईमप्रेशर मध्ये!!
14 May 2012 - 8:16 pm | चतुरंग
त्याने प्यादे सातव्या पट्टीत टाकले!!
14 May 2012 - 8:17 pm | चतुरंग
डाव बरोबरीत सुटला!!!! काय मस्त डाव झाला पण!!
14 May 2012 - 9:29 pm | रमताराम
आनंदचे प्यादे प्रमोट होण्याच्या स्थितीत होते. वेळेत मार खाल्ला पठ्ठ्याने. :(
14 May 2012 - 8:29 pm | इस्पिक राजा
अखेरीस ड्रॉ. आनंदकडे एक चांगली चाल होती. त्याला संधीचा फायदा नाही उठवता आला.
15 May 2012 - 4:38 pm | चतुरंग
चौथा डाव सुरु झाल. आज बोरिस पांढर्याने खेळतोय.
पुन्हा एकदा स्लाव डिफेन्स. आजही चाली वेगाने होताहेत. दोघेही जबर तयारीने आले आहेत.
परंतु आजचे वेरिएशन कालच्या इतके आक्रमक समजले जात नाही. त्यामुळे अजूनही डावात काही मारामारी झालेली नाही.
मोहोर्यांचे विकसित होणे सुरु आहे.
15 May 2012 - 4:38 pm | रमताराम
पुन्हा स्लाव. पाच मिनिटात दहा खेळ्या, दोघांनीही कॅसल करून राजे सुरक्षित करून घेतले. म्हणजे दोघेही जोरदार हल्ले करण्याच्या मूडमधे आहेत.
15 May 2012 - 4:42 pm | चतुरंग
बराच कंफर्टेबल वाटतोय. घड्याळातही त्याची ५ मिनिटांची आघाडी आहे.
15 May 2012 - 4:46 pm | रमताराम
१५ व्या खेळीनंतर - वजीराचा अपवाद वगळता - दोघांच्या मोहरांची स्थिती अगदी सारखी आहे. :)
15 May 2012 - 4:49 pm | चतुरंग
समोरासमोर एकमेकाची खेळी कॉपी करुन खेळतात ना तसे वाटते आहे! ;)
15 May 2012 - 5:21 pm | चतुरंग
डी४ वरचे प्यादे घोड्याने मटकावून बोरिसची आत्तातरी एका प्याद्याची आघाडी आहे. आता डी ५ वरचे प्यादे सुरक्षित कसे ठेवावे हा त्याच्या समोरचा प्रश्न.
सी स्तंभात आनंदचा हत्ती. आता डी ५ वरचे प्यादे त्याने घेतले तर डी स्तंभात सगळी मोहोरी कवायतीला उभी असल्यासारखी असणार! :)
15 May 2012 - 5:27 pm | रमताराम
मारामारी होणार आता मध्यावर.
हत्ती एस्क्चेंज करायला भाग पाडून ई पट्टी ताब्यात घेण्याचा बोरिसचा प्रयत्न दिसतोय.
15 May 2012 - 5:51 pm | रमताराम
दुसर्या खेळीला बोरिस २५ मिनिटाहून अधिक वेळ घेतोय....
15 May 2012 - 6:04 pm | रमताराम
अब आयेगा मझा.
15 May 2012 - 6:06 pm | चतुरंग
झाली अपेक्षेप्रमाणे बी सी ५ करुन आनंदने डी पट्टीत वजीर हत्तीचे काँबीनेशन लावले.
आता पुन्हा स्थिती डायनामिक झाली आहे.
वेळेत आनंद चांगलाच पुढे आहे. त्याच्याकडे १ तास २७ मिनिटे आहेत आणि बोरिसकडे फक्त ५७ मिनिटे आणि अजून १७ खेळ्या बाकी आहेत ४० ला.
15 May 2012 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डाव कुठे जाईल. (बरोबरी होऊ नये) आत्ताच पाहतोय.
-दिलीप बिरुटे
15 May 2012 - 6:25 pm | रमताराम
उंट समोरासमोर आणून आनंदने आपली बाजू किंचित वरचढ करून घेतली असे दिसते.
15 May 2012 - 6:35 pm | चतुरंग
दाट शक्यता. एकदम समसमान स्थिती आहे. अजून दोनेक खेळ्यात चित्र आणखीन स्पष्ट होईल.
15 May 2012 - 6:44 pm | रमताराम
सारा डाव नुसताच तयारीवर खेळला गेला असे वाटते. काही आउट ऑफ द हॅट दिसले नाही. :( इथून पुढेही दिसण्याची शक्यताही कमीच.
15 May 2012 - 6:50 pm | चतुरंग
हा डाव तसा नीरसच झाला आत्तापर्यंत. काल काही फुलबाज्या तरी उडालेल्या दिसल्या.
दोघेही सावधपणे खेळताहेत. राजा मध्य डावात यायला बघतोय म्हणजे एंडगेम सुरु झाला!
15 May 2012 - 6:55 pm | रमताराम
दीर्घकाळ चालू शकतो. आठ खेळ्यांसाठी बोरिसकडे अर्धा तास आहे नि आनंदकडे एक तास. त्यामुळे वेळेची समस्या दोघांनाही नाही. हवा तेवढा वेळ घेऊ शकतात. थोड्या झटपट खेळ्या करून आणखी वेळेचे क्रेडिट घेऊ शकतात. कदाचित दोघे निकाल लावण्याच्या निर्धाराने खेळू शकतील.
15 May 2012 - 7:01 pm | चतुरंग
दोघांनी जिद्दीने एंडगेम मधे जावे आणि एक प्रदर्शनीय एंडगेम खेळून दाखवावा ही इच्छा! :)
15 May 2012 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>थोड्या झटपट खेळ्या करून आणखी वेळेचे क्रेडिट घेऊ शकतात. कदाचित दोघे निकाल लावण्याच्या निर्धाराने खेळू शकतील.
असंच व्हाव. बाय द वे, जिंकण्याच्या इर्षेने आणि आक्रमक का खेळत नाहीत.
आक्रमक खेळात निदान काही चुका तरी होतील.
गेल्या तीनही डावात मला बचावचंच धोरण दिसलंय.
असो, माझा घोडा तू घे. तुझा उंट मी घेतो. पुढे काही होऊ शकतं.
-दिलीप बिरुटे
15 May 2012 - 7:31 pm | रमताराम
एक बोअरिंग ड्रॉ.