दुसरे महायुद्ध भाग - १
व्हाईटनुसार पोलंडविरुद्ध युद्धव्युहात एकूण ६० जर्मन सैन्याच्या डिव्हिजन्स उतरवण्यात आल्या होत्या. त्यात ५ पॅंझर रणगाड्यांच्या डिव्हिजन्स ज्यात एका डिव्हिजनमधे ३०० रणगाडे होते, ४ लाइट डिव्हजन्स ज्यामधे काही जुनी घोडदळे आणि छोटे रणगाडे होते. यांच्या सोबतीला ४ डिव्हिजन्स मोटर/लॉरीमधून जलद हालचाली करू शकणारे असे पायदळही होते. ३६०० लढाऊ विमाने व आख्खे नौदलही या कामाला लावण्यात आले. याच्या विरूद्ध पोलंडकडे सगळे मिळून ३० डिव्हजन पायदळ, ११ कॅव्हलरीच्या ब्रिगेडस, ३०० छोटे रणगाडे, ११५४ तोफा आणि ४०० युद्धात भाग घेऊ शकतील अशी विमाने असे सैन्यदल होते. यांच्याबरोबर ४ युद्धनौका आणि ५ पाणबुड्याही जोडल्या तर सगळे मिळून १० लाखसैनिकही होत नव्हते. जर्मन सेनानी बॉक याच्या साडेसहा लाख आणि जवळजवळ जनरल रुनस्टेडच्या नऊ लाख सैनिकांबरोबर या सैन्याची गाठ पडली तेव्हा काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी.
१ सप्टेंबरची पहाट फटफटली आणि तासाला ३५० कि.मी. उडणार्या हेंकेल-११ बाँबफेकी विमानांनी २००० किलो प्रत्येकी बाँब घेऊन पोलंडवर हल्ला चढवला.
हेंकेल
डॉर्नियर
जुंकर-८७
सोबत होती डॉर्नियर आणि जुंकर्स JU-87. या विमान हल्ल्याचे लक्ष होते पोलंडमधील रस्ते, रेल्वेचे जाळे, दारूगोळा जेथे साठवला होता ती केंद्रे, पेट्रोलचे साठे इ. वॉर्सावर जे राजधानीचे शहर आहे त्यावर पोलंडच्या नागरिकांची प्रतिकाराची इच्छा नष्ट करण्यासाठी तुफान बाँबवर्षाव करण्यात आला. हा हल्ला करायला स्टूका वापरण्यात आली. या विमानांवर मोठे कर्णकर्कश्य आवाज करणारे भोंगे बसवण्यात आले होते, हे जेव्हा बाँब वर्षावासाठी खाली सूर मारत तेव्हा येणार्या आवाजाने नागरिकांचा भीतीने थरकाप उडत असे. पोलंडचे बहुतेक विमानदल जमिनीवरच गारद झाले. त्यांना उडायला वेळच मिळाला नाही. आकाशावर थोड्याच वेळात जर्मन विमानदल म्हणजे लुफ्तवाफेची अनिर्बंध सत्ता प्रस्थापीत झाली. जर्मनांच्या मेसरश्मिट विमानांपुढे, जी तासाला ४७० कि.मी या वेगाने उडू शकत होती, त्यांच्या पुढे कितीही शूर वैमानिक असले तरीही पोलंड्च्या जुनाट विमानांचा टिकाव लागणे कठीण नाही अशक्यच होते.
मेसरश्मिट
जमिनीवर ज्या थोड्याफार
ठिकाणी विमानविरोधी तोफांची ठाणी होती ती एवढ्या विमानांशी सामना करायला पुरेशी नव्हतीच.
ही जी जर्मानांची सेना होती त्यातील आर्मी ग्रूप नॉर्थचा प्रमुख होता जनरल हाईन्झ गुडेरियन ज्याने नवीन युद्धतंत्राचा “ब्लिट्झ्क्रीग” चा पाया घातला.
दक्षिण ग्रूपच्या विस्कळीत (रणगाडे वेगवेगळ्या तुकड्यांमधे विभागले गेले होते) फौजांच्या तुलनेत गुडेरियनच्या एकजिनसी दलाच्या एकत्रीत हालचालींनी कमालीचे यश मिळवले व त्याचे हे दल इतर फौजांपेक्षा खूपच लवकर वॉर्सावर धडकले. जर्मनांच्या या आक्रमणामुळे पोलंडच्या जनतेत घबराट उडाली आणि त्यांनी अधिक सुरक्षित जागी जाण्यासाठी आपली घरे सोडली. ही सगळी जनता रस्त्यांवर आल्यामुळे पोलंडच्या सैन्याला हालचाली करण्यावर मर्यादा येऊ लागल्या. ब्लिट्झ्क्रीग अंतर्गत या रस्त्यावर विमानातून जेव्हा मशिनगनचा मारा करण्यात आला तेव्हा पोलंडभर गोंधळाचे वातावरण पसरले. कोणाचा पायपोस कोणात राहिला नाही.
जर्मनीच्या पूर्व सीमेवर हल्ला होण्याच्या भीतीने हिटलरला पोलंड लवकरात लवकर काबीज करायचे होते. आणि ते तो लगेचच करतील अशी त्याला शंका होती. परंतू त्या रविवारी ११ वाजेपर्यंत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारले नव्हते. फ्रान्सने तर सहा तासांनी ते पुकारले. याला कारण होते जर्मानांची हवाई ताकद. हे दोनीही देश त्यांच्या शहरांच्या विध्वंसाला घाबरत होते. पोलंडला लवकरच कळून चुकले की सिगफ्रीड तटबंदीवर लगेचच आक्रमण करायचा या दोनही देशांचा विचार नाही. यावेळी खरे तर फ्रान्सचे ८५ डिव्हिजन सैन्य जर्मन सैन्याच्या समोर उभे होते. अर्थात या दोन्ही देशांनी पश्चिमेकडून हल्ला केला असता तरी पोलंडला वाचवता आले असते की नाही याची शंकाच आहे कारण ब्रिटीशांच्या हवाईदलाची विमाने फ्रान्समधील आघाडीवरील विमानतळांवर पोहोचायला ९ सप्टेंबर उजाडला.
दुर्दैवाने पूर्वेकडे हे युद्ध छेडत असताना हिटलरच्या मनात ही जी पश्चिमेकडून हल्ला होण्याची भीती होती त्याचा फायदा ब्रिटन आणि फ्रान्स यांना करून घेता आला नाही किंवा त्यांना त्यावेळेस त्याचे महत्व कळाले नाही म्हणा. १९४६ साली न्युरेंबर्गमधे तुरुंगात असताना जनरल कायटेल याने लिहिलेल्या एका पत्रात याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. “ फ्युररच्या मनात ही भीती होती की बेल्जियम एखाद्या गुप्त तहानुसार फ्रान्सला त्याचे चिलखती दल बेल्जियममधून जर्मनीच्या औद्योगिक प्रांत रुहर्वर आक्रमणाला परवानगी देईल. दुसरी भीती होती ती हॉलंड आणि ब्रिटन यांच्यातील अशाच एखाद्या गूप्त कराराची. अशा एखाद्या तहानुसार दोन्ही देशांच्या नौदलांमार्फत हॉलंडमधे ब्रिटीश सैन्य उतरवले जाऊ शकत होते. याच सैन्याने मग जर्मनीवर उत्तरेकडून हल्ला चढवला असता.” हे असे झाले असते तर दुसरे महायुद्ध केव्हाच संपले असते, पण असे व्हायचे नव्हते. अर्थात त्या काळात हिटलरला असली काळजी करायची खरे तर काही कारण नव्हते कारण हॉलंड आणि बेल्जियम हे दोन्ही देश तटस्थ होते आणि ब्रिटन आणि फ्रान्स हेही देश बोटचेपे धोरणच स्विकारत होते आणि असले धाडस करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळीच पंतप्रधान चेंबरलेन यांनी नाझी पक्षाचे प्रथमपासून विरोधी असणारे विस्टन चर्चील यांना नौदलाचे मंत्री म्हणून मंत्रीमंडळात सामील केले. तेवढेच काय ते धैर्य त्यांनी दाखवले. चर्चील यांनी नौदलाच्या विमानांना जर्मनीच्या विल्हेमसहेवन नावाच्या एका बंदरावर हल्ला चढवण्याचा आदेश दिला आणि जर्मनीवर लाखो जर्मन भाषेतील पत्रके टाकण्यात आली. या पत्रकात जर्मन नागरीकांना युद्धपिपासू हिटलरची सत्ता उलटवून टाकायचे आवाहन केले होते. अर्थात पोलंडवरच्या विजयाच्या शिल्पकाराबाबतीत कुठलाही जर्मन नागरीक असा विचार करेल याची शक्यता नव्हतीच.
गुडेरियन
जर्मन प्रसिद्धी माध्यमे जी डॉ. जोसेफ गोबेल्सच्या ताब्यात होती त्यांनी हे अगोदरच पसरवले होते की पोलंडमधील जर्मन लोकसंख्या ही जर्मानांच्या आक्रमणाच्या बाजूने आहे. यामुळे त्या भागात पोलीश आणि जर्मन समाजांमधे कमालीचा तणाव उत्पन्न झाला. या बातम्यांमुळे पोलंडमधील ७००० जर्मन वंशाच्या लोकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांची कत्तल करण्यात आली. ही युक्ती नंतर जर्मनांनी व रशियनांनी अनेक वेळा वापरली आणि युद्ध छेडण्यासाठी त्याचा वापर करून घेतला. या वेळी मात्र पोलंडमधील जनतेने जर्मनवंशाचे लोक हे देशद्रोही आहेत असे समजून त्यांचा काटा काढला. पुढे हेच फार मोठ्या प्रमाणावार होणार होते, पण ते शुद्धवंश हाच जगायला लायक आहे या गंडापायी.
५ सप्टेंबर पर्यंत पोलीश कॅरिडॉर हा पोलंडपासून तोडण्यात आला. उत्तरेला ८ सप्टेंबरला पोलीश पमोझ सेनेला वेढा घालण्यात आला ( ही एक सेना त्या विभागाच्या संरक्षणासाठी उभी केले गेली होती) १७ सप्टेंबरला जनरल वाल्थर फॉन राईशनाऊच्या १०व्या सेनेनी आणि जनरल ब्लास्कोविट्झच्या ८व्या सेनेनी क्राकोव्ह आणि उछ येथील पोलीश सैन्याला वेढले आणि त्याचा नाश चालवला. पोलंडच्या सरकारने देश सोडून पळ काढला आणि त्यांनी रोमानियामधे आश्रय घेतला अर्थात नंतर हिटलरच्या दबावाखाली त्यांना तो देश नंतर सोडायला सांगण्यात आले.
अखेरीस ६ स्प्टेंबरला फ्रान्सने जर्मनीवर लुटुपूटूचे का होईना पण आक्रमण केले. पोलंडच्या नागरिकांना धीर देण्यासाठी फ्रान्सच्या सेनापतीने, जनरल मॉरीस गॅमलीन याने आपले सैन्य सारलॅंडमधे घुसवले आणि त्या १५ मैलाच्या परिसरातील काही जर्मनांनी सोडून दिलेली गावे काबीज केली. जर्मन सैन्याने तातडीने माघार घेत सिगफ्रीड रेषेच्या अलिकडे मोर्चेबांधणी केली आणि ते शांतपणे वाट पहात बसले. फ्रान्सचे सैन्य अजून त्यांच्या जागा घेत असल्यामुळे जर्मनांनी काही हालचाल केली नाही. पाच दिवसांनी फ्रान्सचे सैन्य जागेवर परतले आणि त्यांनी फक्त टेहळणीसाठी मोहिमा आखाव्यात असे आदेश देण्यात आले. याला कोणी आक्रमण म्हणत असेल तर म्हणोत बापडे पण हे एक सत्य आहे की हिटलरने त्याच्या पूर्वे सीमेवरचा एकही सैनिक हलवला नाही ना फ्रान्सच्या सिमेवर पाठवला.
सिगफ्रिड संरक्षण व्यवस्था.
८ सप्टेंबरला राईशनाऊची १०वी आर्मी वॉर्साच्या शिवेवर पोहोचले पण पोलंडच्या सैन्याच्या तिखट प्रतिकारामुळे त्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. आश्चर्य म्हणजे हिटलरच्या इतक्या वर्षांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून पोलंडच्या सैन्याने जमिनीवर मजबूत संरक्षण व्यवस्था उभी केली नव्हती. त्यांची सारी भिस्त शत्रूवर फेरआक्रमण करण्यावर होती. हे सगळे आता बदलले. आता वॉर्साच्या सगळ्या रस्त्यांवर अडथळे उभे करण्यात आले. मोठमोठे रणगाडे अडवणारे खंदक खोदायचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले. टर्पेंटाईन भरलेली पिंपे पेटवण्यासाठी सगळीकडे तयार ठेवण्यात आली. हिटलरला २१ सप्टेंबरला अमेरिकेच्या काँग्रेसची बैठक होण्याआधी वॉर्सावर कब्जा मिळवायचा होता पण त्याच्या दुर्दैवाने तसे व्हायचे नव्हते.
९ स्प्टेंबरला मार्शल गोअरींग मोठ्या गर्वाने म्हटला होता की पोलंडचे सैन्य जर्मन सैन्याच्या मगरमिठीतून कधीच सुटू शकणार नाही पण ९ सप्टेंबर पर्यंत जर्मन सैन्याने एखाद्या युद्धव्युहनितीच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे युद्ध केले होते आणि पोलंडही जुनाट पद्धतीने या आक्रमणाला सामोरे गेले होते. पण या दिवशी रात्री पोझनानमधील पोलंडच्या सैन्याचा सेनापती बदलला आणि सगळे बदलले. जनरल टादेउश याने ती जबाबदारी स्विकारली आणि त्याने बूरा नदी पार करून जर्मनसैन्याच्या बगलेत कुटनो येथे जोरदार हल्ला चढवला. तीन दिवस चाललेल्या या घनघोर युद्धात एका संपूर्ण जर्मन डिव्हिजनला सळो का पळो करून सोडले. शेवटी जेव्हा १०-आर्मीचे पॅन्झर वॉर्सावरून मागे आले तेव्हा हे पोलंडचे सैन्य मागे हटले. त्या काळातील जर्मन व इटालीयन वृत्तपत्रांनी पोलंडच्या सैन्याची टर उडवताना पोलंडचे सैन्य तलवारी आणि भाले घेऊन जर्मन सैन्यावर चालून गेले असे छापले होते पण त्यात काहीही तथ्य नव्हते. उलट जनरल मेलेनथिन यांनी म्हटलेले जास्त संयुक्तिक वाटते. ते म्हणाले “ पोलंडचे सैनिक शक्य असेल तेथे, शक्य असेल त्या शस्त्राने अत्यंत शौर्याने लढले पण आधुनिक शस्त्रास्त्रे आणि योग्य प्रशिक्षण या अभावी ते काही करू शकले नाहीत”. या उलट जर्मन सैनिकांना खूपच उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळाले होते. काही पायदळाच्या तुकड्या अशा होत्या की त्यातील सैनिक रणगाडा, तोफखान्यातही काम करू शकत होते तर जवळ जवळ सगळेच JCOs- आपल्याकडचे सुभेदार, सुभेदार मेजर सारखे.. हे वेळ पडल्यास अधिकारी म्हणून काम करू शकत होते. अर्थात जर्मन हे आक्रमक होते, युद्ध ते सुरू करणार होते त्यामुळे त्यांनी ही तयारी करणे स्वाभाविक होते.
१९४४ साली गार्डस रेजिमेंटचा एक ऑफिसर मायकेल हॉवर्ड जो पुढे नाणावलेला इतिहासकार झाला, तो एका अभ्यासक्रमाला गेला होता. जर्मन सैन्याची रचना, त्यांचे पोषाख, त्यांची शौर्यपदके, त्यांची युद्धनिती, शस्त्रे या सगळ्याचा त्याला अभ्यास करायचा होता. दुर्दैवाने जर्मन सेना एवढी उत्कृष्ठ का? याचे उत्तर शोधायचे त्या अभ्यासक्रमात नव्हते. याचे उत्तर इतिहासात शोधायला लागेल. प्रशियामधे जी सरदार घराणी होती त्यांनाच फौजेमधे अधिकार्यांची जागा मिळायची. या सरदारांना जंकर्स म्हणत. यांनी हळू हळू मध्यम वर्गातील हुशार तरूणांनाही सेनेत अधिकार्यांच्या जागा दिल्या ज्या पूर्वी फक्त राजघराण्यातील युवकांसाठीच राखीव होत्या. व्होल्टायरने म्हटले “बर्याच राज्यात सेना असते पण प्रशियाच्या सेनेत एक राज्य आहे”. त्याच्याच काळातील एक फ्रेंच विचारवंत, क्रांतीकारक, कवी, लेखक मिआबू याने ही याला दुजोरा देताना म्हटले “युद्ध हा प्रशीयाचा राष्ट्रीय उद्योग आहे”. गणवेष धारण करणार्या माणसाला समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. १८२३ साली हे जे राष्ट्राचे पुनर्जिवन झाले त्याने समाजात एक शिस्त निर्माण झाली जी १९१८ साली झालेल्या पराभवातही विसरली गेली नाही. हिंडेनबर्ग जरी एक पराभूत सेनानी होता तरी लोकांनी त्याला परत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलेच. जर्मनीची गेल्या ७५ वर्षात शेजारी राष्ट्रांवर आक्रमण करायची ही पाचवी वेळ होती त्यामुळे युद्धतयारीत ते केव्हाही सरस होते. ब्लिट्झक्रिगमधे तिनही दलाची सुसुत्रता अत्यंत महत्वाची होती आणि ती मिळवल्यामुळे जर्मनीला जे विजय मिळाले त्याची बरोबरी करायला दोस्त राष्ट्रांना अर्धे युद्ध जावे लागले..................
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
22 Feb 2012 - 11:16 am | Pain
उत्तम!
22 Feb 2012 - 11:19 am | धमाल मुलगा
आज लवकर मिपावर आलो त्याचं चिज झालं.
जयंतरावांच्या लेखाची मेजवानी मिळाली. :)
असो. ही केवळ पोच. आता निवांत वाचत बसतो.
22 Feb 2012 - 11:20 am | पक पक पक
भारीच ,जर्मनी अन हिट्लर खर तर दुसर्या महायुद्धाचे जनकच्.पण तरी हिट्लर ग्रेट होताच.
22 Feb 2012 - 5:08 pm | मोदक
ह्याच चालीवर कसाब ही ग्रेट आहे असे म्हणावे का ? ;-)
("पण तरी" या दोन शब्दांवरून योग्य तो अर्थ घेतला आहे - काळजी नसावी.)
22 Feb 2012 - 11:31 am | रणजित चितळे
एकदम मस्त. हे लेख जतन करण्या जोगे होत आहेत. वाचत आहे.
22 Feb 2012 - 12:16 pm | अन्या दातार
वाचतोय.
22 Feb 2012 - 12:46 pm | प्रचेतस
जयंतरावांचे लिखाण म्हणजे सुंदर लेखांची मेजवानीच.
22 Feb 2012 - 5:31 pm | अस्वस्थामा
मस्त लेख जयंतराव..
पण काही शंका आहेत... पोलंड च्या युद्धापूर्वीचे जर्मनी- रशियाशी करार, इंग्लंड-फ्रांस-रशिया-पोलंड यांचा नाझीविरोधी फसलेला करार या आणि इतर बाबी या प्रथम आक्रमणाच्या अनुषंगाने अपेक्षित होत्या... पुढे येणार असतील तर क्षमस्व पण युद्ध पार्श्वभूमी म्हणून आधी त्याबद्दल विवेचन जास्त योग्य ठरले असते असे वाटते (अर्थात हे व्यक्तिगत मत.. )...
याचप्रमाणे इंग्लंडची भूमिकाही विस्ताराने वाचायला आवडेल.. चेम्बर्लीन ला भित्रा, बोटचेपा पंतप्रधान म्हणून सरसकट उल्लेखणे पटत नाही.. आणि 'चर्चिलला नाविक मंत्री करणे एवढेच धैर्याचे काम त्याने केले' असे म्हणणे ही तितकेसे बरोबर नाही वाटत.. (अवांतर: चर्चिलच्या यापूर्वीचे आणि या पदावरचे ही काम काही असामान्य युद्ध नेतृत्व म्हणून कोणी ओळखत नाही.. तथा त्याच्या सामान्य सैनिकांच्या जीवावरच्या अतिधाडसी कधी तर अतिरम्य मोहिमा ज्या बहुतेक वेळा अयशस्वी झाल्यात त्या तश्या प्रसिद्ध आहेत.. )
जर्मनीच्या बाजूची बरीच रोचक आणि सविस्तर माहिती मात्र मिळाली.. धन्यवाद..
याबद्दल आणखी वाचायला नक्की आवडेल.. मग कितीही मोठी होऊ द्या ही मालिका..
प्रतीक्षेत...
22 Feb 2012 - 7:03 pm | जयंत कुलकर्णी
////अर्थात त्या काळात हिटलरला असली काळजी करायची खरे तर काही कारण नव्हते कारण हॉलंड आणि बेल्जियम हे दोन्ही देश तटस्थ होते आणि ब्रिटन आणि फ्रान्स हेही देश बोटचेपे धोरणच स्विकारत होते आणि असले धाडस करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळीच पंतप्रधान चेंबरलेन यांनी नाझी पक्षाचे प्रथमपासून विरोधी असणारे विस्टन चर्चील यांना नौदलाचे मंत्री म्हणून मंत्रीमंडळात सामील केले. तेवढेच काय ते धैर्य त्यांनी दाख////
आपण जर त्या काळातील वातावरणाचा आभ्यास केला असेल तर मी जे लिहिले आहे ते चूक नाही हे आपल्या लक्षात येईल. पण त्यासाठी तुम्हाला आडवळणाची अनेक पुस्तके वाचायला लागतील. अर्थात आपण ती वाचाल याची मला खात्री आहे. तॉई वाचल्यावर कदाचित मी म्हणतो ते आपल्याला पटावे.....
23 Feb 2012 - 4:03 pm | अस्वस्थामा
आपण लिहिलेले चूक म्हणण्याचा माझा हेतू नक्कीच नाही.. परंतु बऱ्याच पुस्तकांनी अथवा इतिहासकारांनी जी चेम्बरलेनची (आणि पर्यायाने चर्चिलचीदेखील ) प्रतिमा रंगवली आहे.. ती मात्र बरोबर वाटत नाही.. जसे आपण म्हणालात कि त्याकाळातील वातावरणाचा आज अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.. आणि ते खरेच आहे... पण त्याचबरोबर त्यावेळेस त्यांच्या जागी जर आपण ठेवून पाहू लागलो तरी असे जाणवेल कि कोणालाच भविष्याचा अंदाज नव्हता..
चेम्बरलेन हा फक्त प्रातिनिधिक होता.. पहिल्या महायुद्धाच्याच नव्हे तर आधीच्या ५० वर्षांच्या पार्श्वभूमीवर याचा विचार करावयास हवा.. इंग्लंड फार काळापासून जर्मनीच्या बाबतीत सहानुभूती बाळगून होता..(दोन्ही राजघराण्याचे संबंध कारणीभूत असतील की नाही हे मात्र अनिश्चित ..) आणि फ्रांसला मित्र म्हणवून घेणं इंग्लंडसाठी तितकीशी नैसर्गिक गोष्ट नव्हतीच..पहिल्या महायुद्धानंतरच्या तहसंदर्भातली इंग्लंडची भूमिका याबाबतीत हेच दर्शवते..
चेम्बरलेन चूक किंवा बरोबर किंवा बोटचेपा वृत्तीचा असे म्हणणे फारच सरधोपट आहे असे वाटते .. चर्चिलच्या एकंदरीत स्वभावास फक्त हिटलर तोड आहे.. परंतु युद्धनेतृत्व म्हणून हिटलर अथवा रूझवेल्ट कित्येक पतीने उजवा ठरतो.. एक मुत्सद्दी म्हणून चर्चिलचे कर्तुत्व आहेच.. परंतु शांतताप्रिय परंतु धोरणी चेम्बरलेन म्हणून वाईट ठरवता येणार नाही असे वाटते.. त्याने त्याच्यापरीने युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला.. कोणीही शहाणा माणूस जे करेल ते सर्व त्याने केले.. परंतु एका बाजूला हिटलरसारखा युद्धखोर असल्यावर काय होणार..
असो, रशिया आता १७ तारखेस नाट्यप्रवेश करेल .. ते वाचण्यास उत्सुक आहे..
माझा फार काही अभ्यास नाही (खरेतर काहीही अभ्यास नाही म्हणणे योग्य ठरेल..) .. थोडीफार पुस्तके वाचलीत.. (आडवळणाची म्हणजे काय नाय समजले.. इतिहासाबद्दलची बहुतेक सगळी पुस्तके सारखीच वाटतात.. इंटरेस्टिंग !!) पण जे काही वाचले आहे, ते जशेच्या तसे स्वीकारणे पटत नाही.. प्रश्न विचारतो..शंका मांडतो (अभ्यास नसला तरीही प्रश्न विचारण्यास हरकत नसावी असं वाटतं... ).. जर काही शंका नाही आवडली तर मनावर नका घेऊ..
आपण अजून काही वाचन, नाव अथवा संदर्भासह सूचित केले तर आवडेल वाचायला..
24 Feb 2012 - 4:50 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
मी आपण लिहिलेले काहीही मनावर घेतलेले नाही. आपण सर्वजण वाचत आहात म्हणून मी लिहितो हे कसे विसरेन ? आपल्या शंका आवडायचा न आवडायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास इतिहासाचे विश्लेषण करण्याइतका माझाही अभ्यास नाही. नशिबाने सध्या वेळ आहे तो वाचनात/लिहिण्यात घालवायला मिळतो हे नशीब. बाकी काही नाही........
कोणीतरी मला चर्चीलवर लिहिण्यास सांगितले होतेच. त्याचा कच्चा आराखडा तयार केला आहे व केव्हातरी त्यावर एक लेख मालिका लिहायचा मानस आहेच. बघूया कसे जमते ते....
22 Feb 2012 - 10:35 pm | मन१
भाग अत्युत्तम पण....
अस्वस्थमा ह्यांनी उल्लेख केलेल्या गोष्टेंचा काही पराम्र्श घेतला असतात तर भाग अजून खुलला असता.
विशेषतः पोलंडमध्ये युद्ध सुरु झाल्यावर "आम्ही आलोच मदतीला" असे म्हणत रशियन सैन्याने उलट अलगद पोचंडचा काही भाग घशात कसा घातला व नंतर नाझीएंशी हातमिळवणी कशी केली ह्याचे वर्णन रंजक ठरले असते.
चेंबरलेन काही धडाडीचा माणूस वगैरे होता असे मलाही वाटात नाही.
आणि दोस्त सैन्याने पोलंडवरील हल्ल्या दरम्यान(ब्लिट्झ क्रिग दरम्यान) जी संथ हालचाल केली, त्याला एकच शब्द वापरतात :_
सिट्झ क्रिग!!
23 Feb 2012 - 8:52 am | जयंत कुलकर्णी
अहो मनराव, रशियाने आक्रमण केल्यावरच ते लिहिले पाहिजे ना.....आपण कुठल्या तारखेपर्यंत आलो आहे ते तरी बघा राव..
धीर धरी...धीर धरी....
23 Feb 2012 - 4:17 pm | गवि
दर्जेदार लेख.. दुर्मिळ माहिती मिळते आहे...
अनेक धन्यवाद...
23 Feb 2012 - 10:48 pm | पैसा
युद्धाच्या कथा वाचताना एकदम रंगून जायला होतं आणि सगळा कंटाळा पळून जातो! लेखातली चित्रं/फोटो सुद्धा मस्त वाटले.