थोडंसं मागच्या भागातलं - हर्षद आणि नाथा पैलवान एका हॉटेलात बसुन बोलत होते... तिथुन पुढे.....
नाथानं दिलेली ऑर्डर यायला दहा मिनिटं गेली, तो पर्यंत नाथा काही बोलला नाही, पुरी भाजी अन कुंदा आल्यावर त्यानं एका घासात गपकन कुंदा खाल्ला अन तसंच भरल्या तोंडानं अजुन एक कुंदा आणायची ऑर्डर दिली, वेटर गेल्यावर एक पुरी दोन घासात संपवुन नाथानं माझ्या डिशमधल्या दोन पु-या घेतल्या, वेटर कुंदा घेउन आल्यावर त्याला अजुन ८ पु-या आणायला सांगितल्या. मगाशी गडबडीत असणारा नाथा आता जरा शांत होता, त्यानं बोलायला सुरुवात केली ' मिरवणूकीच्या आधीच पकडला होता त्याला बे, आणि मारलाय पण असा म्हणे की एक वळ नाय अंगावर, दारु पाजुन उशी दाबली असंल तोंडावर' या सगळ्याशी हर्षदचा संबंध होता तो त्या एरियातल्या नगरसेवकामुळं, त्यांची महापलिकेतली कामं करताना त्याची गरज पडायची आणि त्यामुळं त्याची ही खास माणसं जरा ओळखीची होती. पण या असल्या भानगडीत एवढा सक्रिय सहभाग कधी घ्यायची वेळ आली नव्हती त्याच्यावर.' अण्णा म्हणाले की तुझ्याकडं आहेत बोरामणीची लमाणं कामाला म्हणुन तुला पकडालय, तु करायचंय एवढंच त्यातल्या एकाला माझ्याकडे दे पाठवुन, पुढं काय करायचंय ते मी करतो बरोबर. ' नाथा शेवटची पुरी तोडताना बोलत होता.
हर्षदच्या डो़ळ्यासमोर त्या बोरामणीच्या लेबर गँगचा लिडर अशोक आला, तो तेवढा डोक्यानं जरा चलाख होता आणि पोलिस स्टेशनच्या एक दोन चकरा पण मारुन झालेल्या होत्या त्याच्या. ' बरं, मी पाठवतो कुणाला तरी, कुठं पाठवु तेवढं बोला' हर्षद्नं त्याला होकार दिला.' पाठवतो काय, माझ्या बहिणीबरोबर पाट लावतो का काय त्याचा ?, आता घेउन चल मला त्याच्याकडं लगेच, ए बाय्प्रॉड्क्ट दोन फुल्ल चहा घे रे' आता नाथाला नाही म्हणणं शक्य नव्हतं, मगाशी पासुन मोबाईल सायलेंट करुन ठेवलेला हर्षदनं तो काढुन पाहिला, साहेबाचे १५ फोन येउन गेले होते, अजुन एक दोन त्या अशोकचेच होते, त्याला फोन करुन तरटी नाक्याला बोलावुन घेतलं अन दवाखान्यात गेलो आहे असा एसेमेस साहेबाला केला. अशोक यायला अजुन अर्धा तास लागणार होता, हॉटेल मधुन बाहेर येउन समोरच दोघंजण थांबले, तरटी नाक्यावरची* ऑफिसं आत्ता सुटली होती अन हिशोब चालु होते, ती गंमत पहात आणि आपल्या सभ्य मराठीत काही अतिशय उच्च्भ्रु शिव्यांची भर पाडुन घेत हर्षद उभा होता, पुन्हा एकदा मावा घेउन नाथा आला, पाठिमागुन थाप टाकत त्यानं विचारलः ' बसला होता का बे कधी बाहेरुन एसएससिला, का डायरेक्ट घरचाच फॉर्म भरला. ' हर्षद एकदम गडबडला, ' च्यायला काय पण बोलतो का बे ' नाथा आता मिस्किल हसत होता.
अशोकची फार वाट पहावी लागली नाही, ' नमस्कार साहेब' , आपली एम एटी बाजुला लावत अशोकनं हर्षदला नमस्कार केला, त्याच्या बाजुला कोण आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. मग पुन्हा ते तिघे हॉटेलात गेले, तिथं नाथानं अशोकला नाष्टा चारला अन काय करायचं आहे ते सांगितले, त्यातलं अशोकला एवढं समजलं की, काल जो बोरामणीच्या शिवारात मुडदा सापडला आहे तो, नक्की नाथा सांगतो आहे त्याचाच आहे का हे सिव्हिल हॉस्पिटलला जाउन पाहुन यायचं. मदन तालमीत आल्यावर काढलेला फोटो नाथाच्या खिशातच होता एकदा ती बॉडी मदनचीच आहे हे फिक्स झालं की मग पुढचा मार्ग निश्चितच होता नाथासाठी. आता बोरामणीच्या हवालदाराला नाहीतर चौकी जमादाराला कसं गटवायचं अन गुपचुप तिथुन सिव्हिलला येउन ती बॉडी बघायची हे अशोकनं त्याचं त्यानं पहायचं होतं, नाथानं तिथंच त्याला पाचशेची नोट काढुन दिली अन संध्याकाळ पर्यंत इथंच भेटायला सांगितलं. अशोकनं पाचशेची नोट परत केली, आणि नाथाला म्ह्णाला ' पहिलवान, ह्ये पैस नको, आज रातची काय तर सोय लावुन द्या इथं बाजुला, बास झालं' नाथाला जाम हसु आलं आणि राग पण ' **व्या, तुझा बाप असले धंदे करत असेल *ई*ल्या, हवं असले तर घे पैसे अन काम कर बे, नुसता माज करु नको एक काम सांगितलं तर' बोलताना नाथानं अंगातल्या नेहरु शर्टाच्या बाह्या मागं केल्यावर अशोकनं गुपचुप टेबलवरचे पैसे उचलले. याचा अर्थ अशोक आज दिवसभर कामावर येणार नव्हता.
नाथा तिथुन निघाला अन बाहेरच्या बसस्टॉप वरुन थेट तामलवाडीची बस पकडली, बाउंड्रीच्या हॉटेलवर दोघांना ठेवल्याचा निरोप आला होता त्याला, त्याच बसमध्ये तुळजापुरनाक्याला अजुन दोन जण चढले, सगळे बसले वेगवेग़ळे तरी जायचं मात्र एकाच ठिकाणी होतं, बस तामलवाडी बाउंड्रीला थांबली, तशी एकच जण खाली उतरला तिघांपैकी अन दोघं पुढच्या स्टॉपला उतरण्यासाठी पुढं गेले, उतरलेला होता तो परेश, सोलापुरच्या तालमींच्या विश्वात असलेला एक दुर्मिळ ब्राम्हण माणुस. राहायला नवी पेठेत म्हणजे तालमी पासुन हाकेच्या अंतरावर, वर घर अन खाली रेडिमेडचं दुकान आणि एक पानपट्टी चालवायला दिलेली, असा परेश म्हणजे अगदी शेवटचा उपाय म्हणुन खेळात उतरायचा, नाहीतर त्याचा यांच्याशी संबंध फक्त रात्री शारदा थेटरला*१ शेवटच्या शोला जाउन बसणं एवढाच होता. अर्थात दातेंच्या देवळात श्रावणीला जाणा-या त्याच्यासारख्याला दिवसा शारदा मध्ये जाणं शक्यच नव्हतं.
तर हा परेश, हॉटेल समोर उतरला, मातीत तोंडातला ऐवज थुंकुन आत गेला, हॉटेल म्हणजे काय एक मोठं खोपटंच होतं, मध्ये एक टेबल ठेवुन मागं किचन केलेलं अन पुढं सहा टेबलं अन बाजुला बाकडी. त्या चहा करायच्या टेबलच्या वर गुटख्याच्या माळा लटकवलेल्या, खाली टेबलवर स्टोव्ह वर चहा उकळत होता, परेश तिथंच गेला अन एका टेबलमागं बसला, दहा मिनिटात नाथा अन त्याचा साथीदार तिथं आले, एका टेबलवर बसुन ऑर्डर दिली ' ओ, मालक एक चिवडा द्या कांदा घालुन अन दोन चहा घ्या गरम'. हॉटेलचे मालक टेबला खाली वाकुन चिवडा शेव काढायला लागले तसं, मागच्या बाजुला जात परेश बोलला 'मालक, दोन नंबरला मागल्या बाजुला जावं का शेतात?' मालक हो नाही म्हणेपर्यंत परेश मागच्या बाजुला पोहोचला होता. त्या एकाच खोपटाला मागच्या बाजुला एक दरवाजा होता, तिथंच एक पाण्याचा एक ड्रम होता अन बाजुलाच एक डबडं होतं. परेशनं ते डबडं उचललं, ड्रमातुन पाणी घेतलं अन खोपटाच्या दारातुन वाकुन विचारलं ' दोन नंबरला कुणीकडं जावं मालक, त्ये तिकडं बाभळीकडं जावं का नको तिकडं.' आतुन काही आवाज तर आला नाही, दोन मिनिटं थांबुन पुन्हा एकदा परेश दारातुन आत जरा जास्तच आत वाकला, आत एक बाकडं होतं आणि बाजुला एका सतरंजीवर एक बाई झोपली होती, अजुन कुणी नव्हतं. खबर पक्की नव्हती, पण लगेच पुढं जाउन चालणार नव्हतं. ते डबडं घेउन तसाच पुढं बांधामागं गेला अन तिथं पाच मिनिटं थांबुन परत आला. नाथा अन त्याचा साथिदार अजुन चिवडा खात होते. दुस-या टेबलमागं बसुन परेशनं समोरचा ग्लास उचलला अन घाण असल्यासारखा तो झटकला. मागं रस्त्यावर एक एस्टि थांबली होती, नाथा उठुन पैसे द्यायला आला, त्याचा साथिदार खोपटाच्या बाहेर पडला, मागं मागं नाथा पण गेला. आता तिथं एकटा परेशच होता.
नाथाचा साथीदार कोंतम चौकात उतरला, नाथा एस्टी स्टँडपर्यंत बसुन होता. स्टँडवर उतरुन बाहेर न पडता नाथानं हैदराबादला जाणारी एशियाडमध्ये सगळ्यात शेवटचं सीट पकडलं, अन गाडी सुटेपर्यंत २-३ फोन करुन घेतले. अशोकचा मिस कॉल आल्यावर मात्र नाथा खाली उतरला, आणि सरळ समोरच्या सोलापुर इडली गृह मध्ये जाउन बसला, जेवणाची वेळ असल्यानं तिथं बरीच गर्दी होती, एका कोप-यातल्या तुटक्या टेबलवर बसुन त्यानं अशोकला फोन लावला, दोन तीन रिंग नंतर अशोकनं फोन उचलला. पाच मिनिटं बोलणं झालं आणि नाथा उठुन बाहेर आला. आता तो थोडासा निवांत दिसत होता. तामलवाडीचं काम हुकलं होतं तरी सिव्हिलचं काम पक्कं झालं होतं. नाथा आता घरी निघाला होता, अजुन लग्न न झालेली त्याची बायको घरी जेवायला वाट पाहात बसलेली असणार होती.
-----------------------------------
* - तरटी नाका - सोलापुरातली बराच जुना वेश्यावस्तीचा भाग, एस्टी स्टँडच्या जवळच आणि रस्त्यासमोरच्या बोळाबोळांच्या गुंतात्युन तालमींच्या भागाला जोडला जाणारा. - याला तरटी नाका का म्हणतात यावर एक वेगळा लेख होउ शकेल.
*१ - शारदा थियेटर - सोलापुरातलं 'ए' ग्रेडच्या फिल्म दाखवणारं थिएटर - सोलापुरातली एकाच रस्त्यावर असलेली ९ थिएटर हा सुद्धा एक वेगळा विषय आहे, पुढच्या सोलापुर ट्रिपनंतर यावर लिहिन.
चपला आणि सत्कार - भाग १ - http://misalpav.com/node/19342
चपला आणि सत्कार - भाग २ - http://misalpav.com/node/19352
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 10:47 am | स्पा
हम्म.. वेग पकडलाय आता
पुढे?
3 Nov 2011 - 10:53 am | प्रचेतस
मालक, बराच उशिर केलात हा भाङ टाकायला.
मागचे परत वाचून काढावे लागले.
हा भागही मस्तच. पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
3 Nov 2011 - 12:01 pm | किसन शिंदे
नेमकं काये हे? कशासाठी हा नाथा एवढा खटाटोप करतोय? कळ्ळं नाही.
' बसला होता का बे कधी बाहेरुन एसएससिला, का डायरेक्ट घरचाच फॉर्म भरला. '
हे बाकी भारीये राव. :D
3 Nov 2011 - 2:33 pm | वपाडाव
ये ढिल्ल्या गप्प वाच.... उगा ट्यंशन द्येउ नगं...
ज्याम भारी....फुडं काय झालं?
3 Nov 2011 - 12:49 pm | कच्ची कैरी
मला आधीचे २ भाग वाचावे लागतील तेव्हा याची लिंक लागेल्,वाचेल सवडीने.
3 Nov 2011 - 1:47 pm | पैसा
छान वेगवान भाग.
(उशीराबद्दल तुला माफ, कारणच तसं होतं.)
5 Nov 2011 - 11:39 am | ५० फक्त
आज पुढचा भाग टाकला आहे - http://misalpav.com/node/19642