युध्दाचा कलाविष्कार

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
2 Apr 2010 - 8:57 pm

आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता?
ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची.... त्यांच्या मनात आजही भळभळणार्‍या जखमांची.....दुसर्‍या जागतिक महायुध्दात जर्मन आक्रमणांमुळे सामान्य माणसांच्या आयुष्यात झालेल्या उलथापालथीची ही कहाणी......

''युक्रेन हॅज गॉट टॅलन्ट'' प्रतियोगितेमध्ये पारितोषिक विजेत्या ठरलेल्या झेनिया सिमोनोव्हा ह्या अवघ्या चोवीस वर्षीय तरुण कलावतीने आपल्या कलाविष्काराच्या वेगवान, ताकदपूर्ण आणि रुध्द करणार्‍या आकृतीबंधांतून उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणले. असे काय वेगळे होते तिच्या कलाकृतीत?

वाळूच्या प्रकाशित केलेल्या टेबलवर वेगवेगळी चित्रे आपल्या चपळ व सु-नियंत्रित बोटांनी रेखून झेनिया सिमोनोव्हाने सर्व उपस्थितांना एका अशा दुनियेची सफर घडवून आणली ज्यातील दु:ख त्यातील प्रत्येकाने, त्याच्या आधीच्या पिढीने कधी ना कधी भोगलंय.... हे दु:ख आहे युध्दाचं....त्यात होरपळून निघणार्‍या सामान्य जीवांचं....त्यांच्या उध्वस्त स्वप्नांचं....त्यांच्या जखमी पंखांचं....त्यांच्या बेभान अश्रूंचं.... आणि कधीच न मिटणार्‍या हुंदक्यांचं.....

ह्या वालुकाचित्रांना मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवले गेले. त्या चित्रांनी सर्व प्रेक्षकवर्ग सुरुवातीला स्तब्ध झाला आणि मग ते अरण्यरुदन प्रत्येकाच्या नेत्रांतून व्यक्त होऊ लागले. तिच्या ह्या कलाविष्काराला सर्वोच्च बक्षीस मिळाले - तब्बल एक लाख तीस हजार डॉलर्सचे!

चित्रांची सुरुवात होते ती आल्हादकारक संगीतातून.... चांदण्या आकाशाखाली ''तो'' व ''ती'' एका रस्त्यावरच्या बाकड्यावर एकमेकांचे हात हातात घेऊन बसलेले असतात. पण मग त्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशात युध्दाची विमाने घोंगावू लागतात आणि सारे चित्रच पालटते... तो देखावा नाहीसा होतो. तिथे येते ती एक स्त्री, तिच्या चेहर्‍यावर वेदनांचे अश्रू आहेत, दु:खाची जखम अद्याप ताजी आहे..... देखाव्यात एक छोटेसे बाळ आकारास येते आणि स्त्रीच्या चेहर्‍यावर हास्य फुलते....निराशेत बहरणारी ही आशा....
पण पुन्हा युध्द पुकारले जाते..... सिमोनोव्हाच्या हालचाली आता अधिक वेगवान, आक्रमक झालेल्या असतात....आणि सोबतचे संगीतही छातीची धडधड वाढवणारे.....घायाळ करणारे...

युध्दाच्या त्या खाईतला आक्रोश, अनागोंदी दाखवण्यासाठी सिमोनोव्हा पुन्हा एकदा टेबलवर वाळू बेफामपणे पसरते आणि तिच्या कुशल बोटांमधून काळोख्या दिवसांचे, लोकांच्या वेदनांनी पिळवटलेल्या चेहर्‍यांचे सत्य साकारते. त्यातच एक तरुण स्त्री आकार घेते. तिच्या डोळ्यांत पुन्हा प्रतीक्षेचे, वेदनांचे कढ असतात आणि हातात पत्र. स्त्रीच्या डोळ्यांतील अश्रू आणि हातातील पत्र तसेच राहाते, बाकीचे चित्र बदलत जाते. पुढे सिमोनोव्हाच्या जलद फलकार्‍यांतून तीच स्त्री वृध्दा बनलेली दिसते. वाट पाहून पाहून तिचा चेहरा सुरकुत्यांचे आणि वेदनांचे जाळेच बनलेला....
त्याच चेहर्‍यातून सिमोनोव्हा एका अज्ञात शिपायाचे स्मारक चितारते.

आणि मग येते अंतिम दृश्य.... आई व मूल काचेच्या पल्याड असलेल्या, काचेतून आपल्या माणसांना जणू स्पर्शच करायच्या प्रयत्नांत असलेल्या पुरुषाचा निरोप घेतानाचे हे दृश्य.... पुरुषाची असहायता, स्त्रीचा त्याच्या दिशेने झेपावलेला हात आणि आपल्या वडीलांना काचेतूनही स्पर्श करण्यास उत्सुक ते लहान मूल....

चित्र व कथानक येथेच संपते.... टाळ्यांचा कडकडाट झालेला असतो. एका डोळ्यात हसू व एका डोळ्यात आंसू घेऊनच सर्व प्रेक्षक कलाकाराची वाहवा करत असतात!

युध्दासारख्या भीषण, संहारक घटनेला आपल्या कलेतून जिवंत करून त्याचे मानवी जीवनावर, मनावर होणारे सर्वदूर परिणाम आपल्या हातांच्या तेजस्वी फटक्यांतून, चपळ हालचालींतून सर्वांसमोर आणणार्‍या ह्या तरुणीचे मनापासून कौतुक!

युक्रेनमधील ह्या ग्रेट पॅट्रियॉटिक वॉर मध्ये दर चार माणसांमागे एक माणूस युध्दात आपले प्राण गमावून बसला. ४१ मिलियन्स लोकसंख्या असलेल्या ह्या देशातील ८ ते ११ मिलियन लोक युध्दात मृत्युमुखी पडले.

-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

कलामांडणीवावरइतिहाससमाजजीवनमानरेखाटनप्रकटनलेखमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Apr 2010 - 9:27 pm | शुचि

संगीत ऐकता आलं नाही पण जे काही पाहीलं ..... it humbled me. काय जादू आहे त्या मुलीच्या बोटांत. एक वेगळाच अनुभव.

अरुंधती ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. लेख खूप आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

मीनल's picture

2 Apr 2010 - 10:04 pm | मीनल

मला हे इ पत्रातून आले होते. छानच आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अनिल हटेला's picture

2 Apr 2010 - 10:08 pm | अनिल हटेला

कार्यक्रमाचा हा भाग आस्मादीकानी पाह्यला होता...
त्यावेळी फक्त त्या मुलीने साकारलेली कला पाह्यता आलेली..
आज आपण त्याबद्दल फारच मोलाची माहिती दिलीत..
धन्यवाद ...आपणास...:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

मुक्तसुनीत's picture

3 Apr 2010 - 9:52 am | मुक्तसुनीत

ही फिल्म पहाताना सुन्न झालो. काही क्षणानंतर तुमचा लेख वाचला आणि त्यातल्या वाक्यावाक्याशी अडखळलो. तुम्ही फार संयतपणे एकेक पैलू उलगडलेला आहे.

फिल्मबद्दल लगेच सांगता येणे कठीण आहे. काही गोष्टी संपूर्णपणे एकसमयावच्छेदेकरून ग्रहण करून पचवणे अशक्य असते. या परफॉर्मन्स मधली अजोड कलाकुसर, एकामागोमाग उभ्या केलेल्या प्रतिमा, त्यांच्यातले सौंदर्य आणि कारुण्य, त्याचा वेग आणि आवेग , ती कला सादर करणार्‍या कलावंताची ऊर्जा , त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम.... त्यातले नि:शब्द परंतु जळजळीत नाट्य... या सार्‍याच्या दरम्यान झरझर बदलत जाणारा प्रकाशाचा-वाळूचा तो खेळ. पाच-सात मिनिटात हे सगळे पचवणे मला जड गेले हे खुल्या दिलाने मान्य करतो. १९४५ च्या युद्धाचा, त्यातल्या मनुष्यहानीचा, दु:खाचा आपल्याला संदर्भ नाही तर ही अवस्था. ज्यांना तो संदर्भ आहे आणि ज्यांनी हा प्रकार अनुभवला त्यांचे काय झाले असेल ?

एका असामान्य अनुभवाबद्दलचे एक अतिशय उत्तम दर्जाचे पोस्ट. आभार नि अभिनंदन.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Apr 2010 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते

अंतर्बाह्य अनुभव... जड गेला...

बिपिन कार्यकर्ते

समंजस's picture

3 Apr 2010 - 1:01 pm | समंजस

ती चित्र कला, चित्रा मागची संकल्पना, चित्रकाराचं कौशल्य केवळ अप्रतिम!!!

डावखुरा's picture

3 Apr 2010 - 5:41 pm | डावखुरा

बर्‍याच वेळेला हा विडीओ पाहीलाय पण :) ..मतितार्थ आज कळला...
"राजे!"

परिकथेतील राजकुमार's picture

3 Apr 2010 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

आधी व्हिडिओ पाहिला आणी माग खालचे लेखन वाचायला सुरुवात केली. त्यामुळे जणु दोन वेळा हा थरारुन टाकणारा अनुभव घेता आला. एकदा चलचित्रातुन आणी एकदा शब्दातुन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अरुंधती's picture

3 Apr 2010 - 10:35 pm | अरुंधती

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

राघव's picture

4 Apr 2010 - 1:34 am | राघव

कितीतरी वेळ काय बोलावं त्ये सुचलंच नाय बगा.

धन्यवाद.
राघव

दिपक's picture

5 Apr 2010 - 3:22 pm | दिपक

निशब्द!

रेवती's picture

5 Apr 2010 - 6:18 pm | रेवती

मी काही व्हिडिओ बघितला नाही. लेखन वाचूनच कससं झालं

रेवती

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 6:45 pm | अरुंधती

रेवती, व्हिडियो म्यूट करून बघ (संगीतपण जीवघेणं वापरलंय!!!!), त्या मुलीच्या हस्तकौशल्यासाठी!! ज्या झपाट्याने, ऊर्जेने आणि लयबध्दतेने ती ही चित्रे रेखाटते.... शब्दशः निराकारातून बोटाच्या अल्पशा हालचालींनी आकार बनवते ते केवळ अप्रतिम! त्यासाठी बघ! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

केवळ अप्रतीम....अद्भुत....अवर्णनीय.....
अश्या प्रकारची अद्वितीय कलानिर्मिती जन्मात पहिल्यांदाच बघायला मिळाली....
काय कमाल आहे या मुलीची....काय कल्पनाशक्ती, काय कौशल्य....काय चपळपणे, झरझर फ़िरणारी तिची बोटे..... तिचे चित्रकलेतील असाधारण कौशल्य या अगदी वेगळ्या माध्यमातल्या प्रयोगातही क्षणोक्षणी प्रत्ययाला येते....
एकीकडे कलाकॄती जन्म घेत असताना बघण्याचा आनंद तर त्याबरोबरच त्यातून प्रकट होणारी, पिळवटून टाकणारी वेदना..
अश्याच अद्वितीय गोष्टी मिपावर टाकत रहाव्या, ही विनंती.
.....सुरुवातीला विमाने येतात, तेंव्हा काही निवेदन केलेले आहे, ते कोणत्या भाषेत आहे? त्याचा अर्थ काय? तसेच शेवटल्या गाण्याचा अर्थ काय आहे?

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 8:15 pm | अरुंधती

@चित्रगुप्त : गाण्याच्या यूट्यूब लिंकवर ही मिळालेली गाण्यासंबंधी कॉमेन्ट :

the song is called "morgenstemning" in Norwegian, or "Morning mood" in english, you will find it if you search youtube with either of the keywords.

The scene where the song" the cranes" by mark bernes is touchy

http://www.youtube.com/watch?v=h3-8GQDTLtY

निवेदन बहुधा नॉर्वेजियन/ युक्रेनियन भाषेत असावे.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/