आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही? पण बाजारात मिळणा-या सगळ्याच पदार्थाबाबत आपल्याला पुरेशी माहिती असतेच, असं नाही होऊ शकत.
शिवाय आता अन्नप्रक्रिया उद्योगाने व त्यासंदर्भातील संशोधन व तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केलीय, की नित्य नवीन नवीन चवीचे, आकारा-प्रकाराचे पदार्थ, छान छान रंगीबेरंगी वेस्टनामधून आपल्याला जणू बोलावीत असतात. या, या, मला घ्या, खाऊन तरी बघा, असा आग्रह करीत असतात.
म्हणूनच, आपण नक्की काय खातोय, याची माहिती कशी करून घ्यावी. याचा गृहपाठ करायला हवाच. मुंबई ग्राहक पंचायतीचा शिक्षण विभाग त्यासाठी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर काय असावे, ते कसे वाचून समजून घ्यावे, यासाठी सर्व वयोगटांसाठी प्रबोधनपर शिबिरे आयोजित करीत असतो. तरीही एक प्रश्न उरतो तो म्हणजे काही पदार्थ असतात. त्यावरचे वेष्टन वाचून समजून घेऊन मग खरेदी करायची हे शक्यच नाही. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम.
उन्हाळा वाढत जातो. तशी आईस्क्रीम, कुल्फी आणि थंडगार पन्हे, सरबत यांची मागणी वाढत जाते. टेट्रॉपॅकमधली लस्सीसुद्धा पटकन प्यायली नाही तर ‘गरम’ होईल. म्हणून आपण ती बनवणा-या कंपनीचे नाव, किंमत काही न बघता, तिच्यात स्ट्रॉ खूपसून ती तोंडाला लावतो. अशा परिस्थितीत आईस्क्रीमचे वेष्टन वाचून ते समजून घेऊन मग खाण्याची कल्पना तरी शक्य आहे का? अहो, ते वितळून जाईल ना!
चॉकोबार असेल तर वरचा चॉकलेटचा थर वेडावाकडा होऊन निसटेल, कोनात घेतलं असले तर ओघळून बाहेरच सांडेल, शिवाय आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम, त्यात काय वेगळे असणार? अगदी बरोबर त्यात वेगळे असतात ते स्वाद. जसे की चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, ब्लॅक करंट इ. इ. अगदी नुसती ही नावे लिहितानासुद्धा माझ्याच तोंडाला पाणी सुटते.
मग प्रत्यक्ष विकत घेऊन खाताना ते ग्राहक पंचायतीने शिकवलेले मुद्दे कसे बरे आठवणार? पण तरीही आरोग्याबाबत जागरूक असणा-या आमच्या सदराच्या ग्राहक, वाचकांना हे माहीत हवे की ‘आईस्क्रीम’सारखी दिसणारी, भासणारी पण ‘आईस्क्रीम’च्या व्याख्येत न बसणारी उत्पादनेसुद्धा मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या वेष्टनावर किंवा जाहिरातीतसुद्धा कधीही ‘आईस्क्रीम’ असा शब्द नसतो. पण सामान्य ग्राहकाला ती ‘आईस्क्रीम’च वाटतात. त्या प्रकाराला म्हणतात ‘फ्रोझन डेझर्ट’.
त्यामध्ये पण बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट असे प्रकार असतात. पण आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते. त्यात वनस्पतीजन्य ‘फॅट’/तेल/ हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य फॅट असते.
आता हे तेल बाजारात उपलब्ध असणारे पाम, शेंगदाणा, कनोला इ. कोणतेही एक (अगर अनेकही) असते. ते नक्की कोणते हे वेष्टनावर सांगणे बंधनकारक नाही. शिवाय त्यात मिल्क सॉलिड्स असतात, जे आईस्क्रीममध्येही असतात. मात्र प्रोटीन दुग्धजन्यच असेल असे नाही. काही फ्रोझन डेझर्टवर ‘सोया प्रोटीन’ असे ‘घटकपदार्थाच्या’ यादीत आढळून आले आहे.
यासाठी या दोन समान भासणा-या व दिसणा-या उत्पादनांमधला फरक आपण समजून घेऊन मग ते खरेदी करावे, फ्रोझन डेझर्टला जे/गे लाटोज असेही नाव आहे, ते स्टॉल्सवर ‘कोन’मधून मिळते. मात्र तिथेही आईस्क्रीम असा शब्द नसतो. शिवाय आईस्क्रीमबाबत आपणाकडे ठोस प्रमाणीकरण (standardisation of product) आहे. म्हणजे कसे की, त्यात कमीत कमी १० टक्के मिल्क क्रीम (स्निग्धता) हवे व चांगल्या आईस्क्रीममध्ये क्रीम १२ टक्के हवे. साखर १५ टक्के त्यानंतर मग दुग्धजन्य घनपदार्थ (एसएनएफ) फळे, स्वाद इ. पण मुळात क्रीम व साखरेचे प्रमाण ठरलेले आहे.
तसेच त्यात ‘शुगर फ्री’सदृश रसायने नसली पाहिजेत. पाहा बरे, आईस्क्रीममधले क्रीम आणि साखरेचे प्रमाण हे एखाद्या क्रीम कुकीपेक्षा खूप कमी आहे. सॉफ्टीमध्ये तर केवळ ६ टक्केपर्यंत फॅट असावी आणि साखर १२ ते १५ टक्के. यावरून कळेल की मर्यादेत खाल्ले तर आईस्क्रीम/ सॉफ्टी आपल्याला खूप सारी साखर किंवा फॅट देत नाहीत.
मात्र डेझर्टबाबत असे निश्चित प्रमाण आढळत नाही. शिवाय त्यातील फॅट, प्रोटीन इ. सर्वाना सोसतील असे नाही. त्यामुळे जर कधी खास करून बालके/ वृद्धांना एखादे फ्रोझन डेझर्ट खाऊन त्रास झाला, तर त्याबाबत जागरूक राहायला हवे. शिवाय ‘हायड्रोजनेटेड् फॅट’ ही आरोग्यासाठी उपकारक समजली जात नाहीत. त्यामुळेच तिचे नियमित सेवन, कदाचित आपल्या नकळत होत असेल, तर त्याचीही काळजी आपणच घेतली पाहिजे.
जे खवय्ये आपली रसना परजून असतात. त्यांना जिभेवर ठेवलेला थंडगार तुकडा आईस्क्रीमचा की फ्रोजन डेझर्टचा हे कळू शकते. ज्याला ‘माऊथफील’ असे म्हणतात, तो या दोन पदार्थाचा वेगळा असतो आणि हो, कुल्फीचा त्याहून वेगळा. ‘कुल्फी’ म्हणजे एकदम ‘जड’ बरे का! ती विकली जाते वजनावर, तर आधीचे दोन भिडू मापाने. म्हणजे मि.ली.च्या प्रमाणात. कारण आईस्क्रीमच्या प्रकारानुसार त्यात ७० ते ९५ टक्के हवा असू शकते. सॉफ्टीत ३० ते ५० टक्के. त्यामुळे ते तोंडात बोचत नाही.
सर्वसामान्य ग्राहकांनाही हे तपशील माहीत असायला हवेत. जेणेकरून आपण जे खातोय ते ‘तेच’ आहे हे समजेल. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या आरोग्याशी या सा-या गोष्टी थेट जोडलेल्या आहेत, म्हणून त्या जाणून घ्यायलाच हव्यात.
- वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
25 Apr 2016 - 8:07 am | mahayog
फ्रोझन डेझर्ट चे बाजारातील काही उदाहरणे किंवा ब्रँड्स सांगितले तर बरे होईल.
25 Apr 2016 - 1:46 pm | पुणे मुंग्रापं
अशी काही उदाहरणे देता येणार नाहीत, पण आपण लेबल रिडींग (वेष्टन वाचन) ची सवय ठेवलीत तर अशा बऱ्याचशा गोष्टी खरेदीवेळी लक्षात येतात.
25 Apr 2016 - 8:19 am | mugdhagode
छान
25 Apr 2016 - 8:36 am | नमकिन
डालडा तत्सम पदार्थ घालतात म्हणे, खरंय का?
इतकं मोघम का बरे लिहिले? चिरफाड केली असती तर सामान्य जनता चे काही ध्यानात आले असते.
25 Apr 2016 - 8:46 am | गवि
या वाक्यात "असते" असं पाहिजे. किंवा पुढच्या वाक्यात बदल हवा.
लेख आवडला. कारण "डालडा आईस्क्रीम" आणि इतर कायच्याकाय शब्द वापरुन निव्वळ घृणाच उत्पन्न करायला काढलेल्या अजेंडायुक्त फॉरवर्डसपेक्षा योग्य माहिती समोर ठेवली आहे हे आवडलं.
सर्व फ्रोजन डेझर्टसमधे हायड्रोजनेटेट व्हेजिटेबल ऑईलच असतं असं नाही. आणि कोलेस्टेरॉलबाबत त्या शुद्द दूधवाल्या डेयरी फॅट्सच घातक असतात (व्हेजिटेबल ऑईलमधे सॅच्युरेटेड फॅट्स नसल्याने फ्रोझन डेझर्ट हा बेटर चॉईस आहे) हेही नोंदवलं पाहिजे.
25 Apr 2016 - 1:52 pm | पुणे मुंग्रापं
आधीचा परिच्छेद वाचलात तर नसते का हवे ते लक्षात येईल.
याविषयावर मुबई ग्राहक पंचायतीच्याच कार्यकर्त्यांचं मंथन सुरु आहे. अन्न तंत्रज्ञ (फुड टेक्नॉलॉजिस्ट), प्रत्यक्ष या कंपन्या, या विषयातील विशेष तज्ञ यांना संपर्क करुन नक्की यात कोणते प्रमाणीकृत घटक असावेत/नसावेत याबद्दल योग्य माहिती घेण्याचे काम सुरु आहे. पण अशी माहिती खात्रीशिर असल्याशिवाय प्रसिध्द करता येत नाही. तो पर्यंत वेष्टन वाचून आपण आपली काळजी घेतलेली बरी.
25 Apr 2016 - 2:07 pm | गवि
तुम्हाला योग्य तेच म्हणायचंय पण वाक्यरचना कन्फ्युजिंग झालीय ही वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याचा उद्देश होता. बाकी कशा शब्दरचनेत मांडायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहेच.
25 Apr 2016 - 3:20 pm | बाळ सप्रे
आईस्क्रीम म्हणवून घेण्याची मूळ अट म्हणजे (त्यात दुग्धजन्य क्रीम असावे आणि नेमके हेच ) केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते..
असे वाचावे..
25 Apr 2016 - 3:08 pm | सस्नेह
या वाक्यावरून आईस्क्रीममध्ये नक्की काय असते/नसते याचा गोंधळ होत आहे. कृपया स्पष्ट करा.
25 Apr 2016 - 8:53 am | क्रेझी
हम्मा माहिती अर्धवट वाटत आहे शक्य असल्यास स्वसंपादित करून सविस्तर देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.
मध्यंतरी व्हॉट्स-अप ला एक पोस्ट फिरत होती त्यामधे 'व्हेजिटेबल ऑईल' असं लिहीलेली आईस्क्रीम्स खाऊ नका त्यात डालडा असते असं वाचण्यात आलं आणि नंतर काहि दिवसांनी 'अमूल' ह्या कंपनीने कोणतीतरी ह्या बाबतीतली केस जिंकली आणि त्यांनी बनविलेलीच आईस्क्रीम्स खा त्यात 'व्हेजिटेबल ऑईल' नाही अशी पण पोस्ट वाचली. ह्यामधे कितपत तथ्य आहे हे कसं कळू शकेल?
आणि काहि ठिकाणी जसं की, 'नॅचरल्स', 'राजमंदीर (कोल्हापूरवाले - लाल पेरू आईस्क्रीमवाले)' अशा ठिकाणी जे मिळतं त्यामधे काय पदार्थ असतात हे कसं कळू शकेल?
25 Apr 2016 - 9:07 am | असंका
आईस्क्रिम च्या जितक्या पाककृती वाचल्यात , तितक्या सगळ्यात आईस्क्रिम मऊ होण्यासाठी फॅट कंटेंट वाढवणे आणि हवा मिसळणे या दोन गोष्टींना महत्व दिले आहे. आपण म्हणता तसंच- त्यामुळे ते तोंडात बोचत नाही. ही आवश्यक स्टेप आहे, आणि ती गाळली, तर अपेक्षित परीणामांपेक्षा एक वेगळा परीणाम मिळेल असं वाटतं.
25 Apr 2016 - 9:12 am | जयन्त बा शिम्पि
बापरे ! !हे असले काही असू शकते ? माहीत नव्हते . आता घरीच आईस्क्रीम बनवून खाणार .
25 Apr 2016 - 9:29 am | असंका
का? नक्की काय प्रॉब्लेम दिसलाय आपल्याला की बाजारच्या आईसक्रिम किंवा फ्रोझन डेझर्ट मध्ये की ते खाताच येणार नाहीत?
मला काही असा प्रॉब्लेम दिसला नाही कारण हायड्रोजनेटेड ऑइल तर आमचे आई वडील पण वापरतच होते. ते तुप नाही हे माहित असून. तसंच हे आईस्क्रिम नसेल, पण आईसक्रिमसारखंच लागतं तर आहे ? आईस्क्रिम तर तसंही कुणी ताकदीसाठी किंवा आरोग्यासाठी खात नाही. मग मजा तीच येत असेल, तर फ्रोझन डेझर्ट खाण्यात काय प्रॉब्लेम आहे?
किमतीचा प्रश्न असेल ( - म्हणजे कमी किमतीच्या घटक पदार्थांमुळे फसवणुक झाल्यासारखं वाटत असेल,) तर गोष्ट वेगळी.
25 Apr 2016 - 9:38 am | चौकटराजा
आमचा लहानपणी आइसफ्रूट नावाची क्यान्डी असे त्याचा फ्रूटशी काही सम्बंध नसे. निव्वळ रंगीत पाणी व साखर. कधी कधी थोडेसे दूध. आजही मला आइइसक्रीम पेक्षा तेच आवडते. त्यात कसे येणार कोलेस्टरॉल वगैरे?
25 Apr 2016 - 3:12 pm | सस्नेह
आईस्क्रीम/फ्रोझन डेझर्ट प्रकृतीला हानिकारक आहे का हे कसे ठरवायचे ?
त्यात कोणते कंटेंट असले म्हंजे ते हानिकारक होते ?
25 Apr 2016 - 5:55 pm | निशांत_खाडे
या गोष्टीला ऑफीशीयली काय म्हणतात माहित नाही, आम्ही पेप्सी म्हणायचो
21 May 2016 - 11:04 am | नमकिन
हे म्हणायचो
21 May 2016 - 9:46 pm | हुप्प्या
पॉप्सिकल नावाने हा पदार्थ अमेरिकेत विकला जातो. एका कंपनीने आपल्या उत्पादनाला दिलेले विशेष ते नाम आहे. रसना वा कॅडबरी सारखे. त्याचा सोपा अपभ्रंश पेप्सिकोला असा बनला आहे.
21 May 2016 - 11:47 am | टवाळ कार्टा
नुकतेच पुण्याहून मुंबैला येताना शिवनेरी त्यांच्या नेहमिच्या जागी थांबली...तिथे नॅचरल्स्च्या दुकानातून न वितळणारे आईस्क्रिम घेतेले (खरे आईस्क्रिम समजून)....५० रुपये एका स्कूपाचे गेले ते वेगळेच पण धड आईस्क्रिमसुध्धा न मिळाल्याने चिडचिड झाली
21 May 2016 - 12:01 pm | सुबोध खरे
फ्रोझन डेझर्ट’आणि ‘आईस्क्रीम’
या लेखात काही शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केले आहेत.
22 May 2016 - 9:18 am | उगा काहितरीच
अमूल, दिनशॉज, वाडीलाल इत्यादी नामांकीत ब्रॕंड बद्दल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्टबद्दल सरळ सरळ माहिती दिली तर आभारी राहील.
22 May 2016 - 9:46 am | कानडाऊ योगेशु
आतापावेतो एकावर एक फ्री असणारे ब्रँडेड आईसक्रिम घेताना काही पाहत नव्हतो. ह्या ताईंचा आधीचा लेख वाचला होता तेव्हा सहज कंटेट वर नजर टाकली आणि अपेक्षेप्रमाणे फ्रोझन डेझर्टच होते. ह्या निमित्ताने डोळे उघडले गेले असे म्हणणार नाही पण एक दृष्टी मिळाली. कि उगाच फ्री आहे ब्रँडेड आहे म्हणुन घेत राहा अशा प्रकाराकडे पाहायची.
धन्यवाद लेख माहीतीपूर्ण आहे.
22 May 2016 - 12:56 pm | गामा पैलवान
mahayog,
क्वालिटी वॉल्स दोन्ही प्रकारचे जिन्नस विकतात : http://www.kwalitywalls.in/frozen-dessert-icecream-faqs.php
लेखक म्हणतात तसे वेष्टन पाहणे जरुरीचे आहे असे वाटते.
आ.न.,
-गा.पै.