ती उजव्या हाताला वळाली आणि थोडे पुढे येताच जसजसा मेन रोडवरील लाईटचा प्रकाश अंधुक होऊ लागला तसे गडद होत जाणाऱ्या अंधाराने आणि थंडीने तिला आज अमावस्या असल्याची जाणीव झाली आणि तिची पावले आता झपझप पडू लागली.
काळ्याकुट्ट अंधारातून कुडकुडत चालताना आपल्या मागून कोणीतरी येत आहे असा तिला भास झाला पण मागे वळून पहायचे तिने टाळले.आपले दोन्ही हात आपल्याच शरीराशी घट्ट पकडत ती थंडीची तिव्रता कमी करायचा प्रयत्न करू लागली तिला जिथे जायचे होते त्या ठिकाणाचे अंतर जसजसे कमी होऊ लागले तसे तिला आपल्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असे वाटू लागले नव्हे आता कोणाची तरी चाहूल तिला लागली आणि आता तिचा जीव भीतीने खालीवर होऊ लागला.
त्या थंडीत मिट्ट अंधारात चालताना तिला आता समोर थोडासा प्रकाश दिसू लागला तेंव्हा तिने आपल्या चालण्याची गती वाढवली कि आपल्या मागे जी कोणीतरी असल्याची चाहूल लागली त्यामुळे तिची पावले आता जवळजवळ पळत असल्यासारखी पडू लागली हेच तिला समजेनासे झाले पण समोरचा उजेड जवळ येताना पाहून जो मानसिक आधार तिला आला होता तो शब्दांच्या पलीकडे होता.
तिच्या वाढणाऱ्या गतीबरोबर मनातील विचारांनी सुद्धा आपली गती वाढवली आणि नकळत तिच्या डोळ्यात अश्रू आले ते गालावर ओघळताच थंडीमुळे तिला त्यांची जाणीव झाली.एका हाताने तिने ते पुसले आता मागे जाणवणारी कोणाचीतरी चाहूल विसरून तिने जवळ आलेल्या आपल्या त्या ठिकाणाच्या आत प्रवेश केला आणि तेथिल निशब्ध शांतता तिला नक्कीच जाणवली पण आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण पोहोचलो याची जाणीव होताच तिला खुप सुरक्षित वाटू लागले.
समोर असलेल्या शेकोटी भोवती बसून आता तिने थंडीला पळवले पण मनात मात्र दिवसभर घडलेल्या घटना मात्र ती नाही पळवू शकली आणि एक एक करत त्या समोर आल्या तसे तिला त्या झालेल्या प्रत्येक सूचक इशारा आणि अंगाप्रत्यंगाला झालेल्या स्पर्शाच्या जाणिवेने आपण दिवसभर किती असुरक्षित होतो याची तीव्रतेने आठवण झाली तसे एवढ्या मोठ्या शेकोटीसमोर असूनही तिचे अंग थरथरले.
शेकोटी जवळ बसून आता तिला बराच वेळ झाला होता आणि आता आपल्याला तहान लागल्याची जाणीव झाल्याने पाणी पिण्यासाठी तिने नजरेनेच जवळपास काही आहे का? हे पाहायला सुरुवात केली तसे तिला काही दारूच्या रिकाम्या बाटल्या,इकडे तिकडे पडलेले मुरमुरे काही फुटकी मडकी हार आणि फुले दिसली तसे तिला आज कितीतरी दिवसांनी मनापासून हसू आले.
स्मशानात हो स्मशानात ह्याच वस्तू तर असतात आता समोर जळत असलेली चिता खूप अंधार झाल्याने कोणीही नातेवाईक न थांबल्याने एकटीच जळत होती आणि तिच्याच उष्णतेने ती थंडीशी सामना करत होती.
स्मशानात भुते,अतृप्त आत्मे असतात का? कोणी पाहिलेत आणि जरी असले तरी त्यांना स्वतःचे शरीर नसल्याने ते कमीतकमी अंगाला स्पर्श तर करणार नाहीत डोळे नसल्याने आपल्या शरीराकडे त्या वखवखलेल्या नजरेने पाहणार तर नाहीत हे तिला पक्के माहित होते.
थोडक्यात जिवंत माणसांपेक्षा इथली स्मशानातील भुते नक्कीच सभ्य आहेत असे तिचे मत झाले आणि का होणार नाही एवढा वेळ झाला एकटी तरुण स्त्री जवळ असून अजूनही एकाही भुताने आपले अस्तित्व दाखवले नव्हते.
समोरच्या चितेतील त्या अज्ञात व्यक्तीशी तिचे कोणतेही नाते नव्हते तरी जळतानाही ती सुद्धा आपल्या सारखीच एकटी आहे हे तिच्या मनात येताच अगदी शेवटचा निरोप सुद्धा माणसाला नव्हे त्या आत्म्याला मिळाला नाही असे तिचा मनात आले आणि परत दिवासभरातल्या घटना आठवल्या आणि नाते,मैत्री,आत्मा या पेक्षा एक उपभोगायची वस्तू असणे हिच तुमची ओळख तीच तुमची किंमत असते हेच एका स्त्रीच्या नशिबी असते असे तिला वाटले.
समोरची जळणारी चिता आणि आपण किती समान आहोत ना दोन्हींचा उपयोग संपला कि नंतर त्यांचे काय झाले याच्याशी कोणाला काहीही घेणेदेणे नसते.
आता एकच विचार तिच्या मनात आला कि ....
अतृप्त नेमके कोण असते?
अतृप्त ईच्छा जिवंत माणसांमध्ये असतात?
कि ....
शरीर,मन भावना नसलेली अशरीरी आत्मे अतृप्त असतात?
प्रतिक्रिया
29 Mar 2016 - 2:53 pm | शित्रेउमेश
मी पहिला...
अगदी मस्त कथा...
29 Mar 2016 - 3:25 pm | चांदणे संदीप
मी दुसरा...
अगदी मस्त कथा म्हणण्यासारखे काय वाटले नाही...
Sandy
29 Mar 2016 - 4:24 pm | मराठी कथालेखक
जसं काही स्त्रीला 'ती' इच्छा नसतेच !!
29 Mar 2016 - 5:52 pm | असंका
गोष्ट चांगली सांगितलीत ...
आवडली..
धन्यवाद!!
29 Mar 2016 - 5:53 pm | किचेन
स्त्री सरसकट सगळ्या पुरूषांकडे वखवखलेल्या नजरेने बघत नसते.
29 Mar 2016 - 7:07 pm | मराठी कथालेखक
पुरुषही सरसकट सगळ्या स्त्रियांकडे अशा नजरेने बघत नसतो.. तशीच सुंदर आणि आकर्षक वाटली तर बघतो :)
विनोदाचा भाग सोडला तरी "पुरुष स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू मानतो" असा पुरुषांवर आरोप होत असेल किंवा स्त्री करत असेल तर "स्त्री पण पुरुषाला फक्त लंपट समजते" असा आरोप स्त्रीवर होवू शकतो.
मुळात असं काही असतं तर स्त्रीपुरुषांत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक सुंदर नातेसंबंध निर्माण झाले नसते (अगदी बहीण भाऊ पासून, मित्र मैत्रिण, सहकारी ई).
-------
माझा नवीन धागा
30 Mar 2016 - 3:49 pm | किचेन
जर तसं असत तर हा धागा निघालाच नसता अस वाटत नाही का तुम्हारा?
30 Mar 2016 - 4:21 pm | मराठी कथालेखक
काही प्रमाणात असे पुरुष असतात , ते मी नाकारत नाहीच. पण सरसकटीकरण होवू नये इतकच
29 Mar 2016 - 5:57 pm | किचेन
आवडली!खूप कमी शब्दात खूप काही सांगून गेलात.
29 Mar 2016 - 6:48 pm | एस
कथा आवडली.
30 Mar 2016 - 9:07 am | हकु
छान!
30 Mar 2016 - 1:07 pm | पैसा
कथा आवडली. वेगळ्या विषयावर वेगळ्या वातावरणातली कथा.
30 Mar 2016 - 1:43 pm | भाऊंचे भाऊ
तरल भावावस्थेचा सुरेख मागोवा.
30 Mar 2016 - 4:39 pm | निशांत_खाडे
ठठो.. :-D