आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा. तीची सांगायची पद्धतही छान होती. खूप छान कविता करायची आणि तिला नवनव्या गोष्टी शिकायची आवडही होती. त्यामुळे तिचं सोबत नसणं सुरूवातीला खूप त्रासदायक वाटलं.
दिवस असेच चालले होते आणि एके दिवशी माझ्या पहिल्या ऑफीस जॉबमध्ये सहकारी असणाऱ्या हिंदी लेखकाशी फोनवर बोलणं झालं. इंग्रजी शुभेच्छापत्रांच्या क्षेत्रात नावाजलेल्या एका कंपनीला आता मराठी आणि हिंदी क्षेत्रात पदार्पण करायचं होतं. हिंदीसाठी तो निवडला गेला होता आणि मराठीसाठी त्याने माझ्या नावाची जोरदार शिफारस केली होती. आधीचा माझा अनुभव लक्षात घेत पगाराबाबतही त्याने परस्पर बोलून घेतलं होतं. महिना 8000 रूपये. तेव्हा इतर क्षेत्रात मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत ही रक्कम खूपच चांगली होती. वर्ष होतं 2003. घरापासून तिथवर थेट बस होती, तासाभराच्या अंतरावर ऑफीस होतं. पण मी आकाशवाणीत रूळत होते.
मी त्या कंपनीमध्ये किमान एकदा तरी भेटून यावं, असा आग्रह त्या हिंदी लेखकाने केला. त्याने माझी खरंच जोरदार वाखाणणी केली होती. मला त्याचा शब्द मोडवेना. एकदा भेटून बघते, असं मी म्हटलं आणि फोन ठेवला. पाचव्या मिनिटाला त्याचा पुन्हा फोन. तू कल क्या कर रही है, अगर रेडियो में नही है, तो कल सुबह 11 बजे आकर मिल ले. अच्छी कंपनी है, मै 1 तारीख से काम शुरू करूंगा. हम साथ ही जॉईन कर लेंगे... मी त्याला थांबवत म्हटलं, अरे भाई, पहले मै एक बार मिल लेती हूं, फीर बात करेंगे. मै कल जा पाऊंगी, आप मुझे पता बता दिजीए और उनसे भी बात कर लिजिए... त्यावर त्याचं उत्तर, तू पता लिख ले, मै उन्हीके साथ बैठा हू. कल आकर मिल लेना जरूर...
मला पुढे काही बोलायची संधी न देता त्याने फोन ठेवलासुद्धा. बरं. भेटून पाहू, असा विचार केला. आतापर्यंत केलेल्या कामाचे नमुने घेतले आणि दुसऱ्या दिवशी कंपनीत जाऊन पोहोचले.
आता त्या जागेला कंपनी म्हणायचं, ऑफीस म्हणायचं की प्रेस, ते ठरवता येईना. एकमेकांना जोडलेले बैठे सात-आठ गाळे होते. आतून वातानुकुलीत. बाहेर प्रेसचा पसारा. बाजुला गोडाऊन. आतल्या भागात दोन गाळ्यांमध्ये बसणारी डिझायनींग टीम. बहुतेक सगळं काम संगणकावर. आधीच्या ऑफीसमध्ये हाताने आर्टवर्क, कॅलीग्राफी करणारे कलाकार पाहिले होते. इथे त्यातलं काहीच दिसत नव्हतं. मालक पंजाबी होते. उत्साही गृहस्थ. मी तिथे रूजू होणार, असं गृहित धरून त्यांनी तो कार्यालयाचा परिसर सोबत फिरून दाखवला, तिथल्या लोकांची ओळख करून दिली, चहा-पाणी विचारलं आणि मी कधीपासून येऊ शकेन, ते विचारलं. माझ्यासाठी हा धक्काच होता. त्यांनी माझं काम पाहिलं सुद्धा नव्हतं. कामाबद्दल काहीच बोलणं झालं नाही. मी त्यांना स्पष्टच विचारलं. त्यावर ते म्हणाले, देखिये मॅडम, हम हफ्ते में ६ दिन काम करते है, सभी त्योहारों की छुट्टीयां होती है. हम आपको जो सॅलरी देंगे, उसके अलावा और कोई फॅसीलीटीज नही दे पाएंगे. हम किसी को नही देते. आपने अंदर जिन लोगो को देखा, मुलाकात की, वे पिछले दस-बारह सालो से मेरे साथ काम कर रहे है. समय-समय पर उनकी सॅलरी भी बढी, लेकीन उसके अलावा कुछ नही. आप जरूरत पडे तब छुट्टीया ले सकते हो, उसकी सॅलरी काटी नही जाएगी, लेकीन आप अपनी जिम्मेदारी समझकर छुट्टी ले, इतनी उम्मीद हम करते है... अब आप बताइये... कुछ पुछना हो, तो पुछ लिजीये...
माणूस स्पष्टवक्ता वाटला. मी आतापर्यंत केलेल्या आणि सध्या करत असलेल्या कामाची माहिती दिली. आकाशवाणीबाबत सांगितलं आणि महिन्यातून किमान सहा दिवस मी आकाशवाणीत जाणार, हे स्पष्ट केलं. मला आकाशवाणीतलं काम थांबवायचं नाही, हे ठामपणे त्यांना सांगितलं. साधारण महिनाभर इथे काम करते, मग तुम्हाला आणि मला, दोघांनाही ठरवता येईल. त्यानंतरही मी येणार असेन, तर आकाशवाणीच्या कामामुळे इथल्या कामात दिरंगाई होणार नाही, असा शब्दही दिला.
त्यांनी अगदी मिनिटभर विचार केला, मग म्हणाले, आप आ जाओ मॅडम. हम जल्द से जल्द काम शुरू करना चाहते है. आप बेशक रेडियो जाइए, हमे कोई प्रॉब्लेम नही. अंग्रेजी में हमारा अच्छा नाम है.. हिंदी मराठी से हमे बडी उम्मीदें है. अब मराठी में हमारा नाम बरकरार रखने की जीम्मेदारी आप पर रहेगी. आप को मराठी के काम के हिसाब से कुछ और सुझाव देना हो, तो बताइये...
किमान दोन चांगले अनुभवी आर्टीस्ट आणि एखादा कॅलीग्राफर हिंदी मराठीसाठी आवश्यक आहेत, असं मी सुचवलं. त्यावर शुभेच्छापत्रांवर काम करणारे एक अनुभवी गृहस्थ, डिझायनिंगमधला अनुभव असणारे दोन कलाकार आणि एक कॅलीग्राफर मुलगी लवकरच रूजू होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठी हिंदीमध्ये त्यांना मनापासून काम करायचंय आणि मुख्य म्हणजे नाव मिळवायचंय, हे माझ्या लक्षात आलं. एकदा घरच्या मंडळींशी बोलून मग तुम्हाला कळवते, असं त्यांना सांगितलं आणि मी घरी परतले.
घरात सगळ्यांचा विचार घेतला आणि तिथे रूजू व्हायचं ठरलं. आकाशवाणीतही कल्पना दिली आणि पुढच्या महिन्यात तिथे रूजूही झाले. आमच्यासाठी एक संपूर्ण गाळा मोकळा करून तिथे आमची सोय केली होती. सोय कसली, बडदास्तच होती. साधारण आठवडाभरात आमची टीम एकत्र आली आणि कामाला जोमाने सुरूवात झाली. पहिल्या महिन्यातलं काम मनासारखं झालं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. साधारण १५ शुभेच्छापत्रांच्या पहिल्या लॉटच्या री-प्रिंटच्या ऑर्डर्स आल्या आणि आम्ही सगळेच सुखावलो.
मनापासून काम करता येत होतं. मार्केटमध्ये मराठीसाठी फुलंच हवीत, हा जुना विचार आम्ही बाजुला ठेवला. कधी म्हणी, कधी सुभाषितं, कधी रोजच्या बोलण्यातली विनोदी संबोधनं तर कधी गमतीदार चित्रं अशा अनेक वैविध्यपूर्ण संकल्पनांचा वापर आम्ही केला. विषय निश्चित करायचे, त्यानुसार मजकूर लिहायचा, मग त्यात मला काय अपेक्षित आहे, ते मी सांगायचं. कलाकार, कॅलीग्राफरसोबत चर्चा आणि मग सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारणारी शुभेच्छापत्रं. खरंच. खूप मनापासून काम केलं मी तिथे. कधीतरी संगणकावर काम करणाऱ्या मुलांना आकर्षित करणाऱ्या इमेजेस दिसायच्या. मग त्या मला दाखवायचे, त्यातून कधीतरी गमतीदार मजकूर साकारायचा, असंही खूपदा व्हायचं. एकंदरच मार्केटमध्ये फिरून आल्यानंतर मालकांकडून ऐकू येणारे प्रतिसाद, इथे नेमकं कोण काम करतंय, हे जाणून घेण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनीने आमच्याकडे माणसं पाठवणं, आम्ही ताकास तूर लागू न देणं, प्रत्यक्ष शुभेच्छापत्रांच्या दुकानांमध्ये फिरून आपल्या शुभेच्छापत्रांचं घोळक्याने होणारं वाचन आणि खरेदी पाहणं, स्वत:ची ओळख प्रकट न करता करता ते सारं अनुभवणं मस्त होतं.
http://www.misalpav.com/node/28069 हा अनुभव तिथलाच, बरं का...
आता बाजारात कंपनीला मराठी शुभेच्छापत्रांच्या विश्वात स्वतंत्र ओळख मिळाली होती. पुढचा लॉट कधी येणार, याची चौकशी केली जात होती. शुभेच्छापत्रं, विशेषत: मराठी शुभेच्छापत्रं जमवण्याचा छंद अनेकांना लागला होता आणि गंमत म्हणजे यात मराठी मुला-मुलींबरोबर गुजराथी, दाक्षिणात्य तरूणाईसुद्धा आघाडीवर होती...
वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यातला आनंद मिळत होता. हिंदीचं कामही चांगलं चाललं होतं. एकदा इंग्रजी भाषेतली अश्लीलतेकडे झुकणारी काही शुभेच्छापत्रं त्या मालकांनी आमच्या हिंदी महाशयांकडे दिली. असं काही हिंदीत करता येईल का, असं त्यांना विचारलं आणि दोन दिवसांनी तशा आशयाच्या काही हिंदी कॉपीजवर काम सुरू असल्याचं दिसलं. ती शुभेच्छापत्रं तयारही झाली आणि बाजारात खपलीसुद्धा. मग एकदा ते हिंदी महाशय माझ्याकडे आले. सहज बोलता बोलता विषय निघाल्यासारखं दाखवत त्यांनी मला विचारलं, अरे, हिंदी के नए कार्ड देखे की नही... अच्छे चल रहे है मार्केट में... बोलता-बोलता तीन-चार हिंदी कार्डस् त्यांनी माझ्या हातात ठेवली. मी वाचण्यासाठी कार्डस् हातात घेतली खरी, पण पहिल्याच कार्डवर एखाद्या तरूण मुलीला, खरं तर तिच्या शरीराच्या वळणांना उद्देशून लिहिलेला तो हिणकस मजकूर वाचून मी अस्वस्थ झाले... तितक्यात कुठूनतरी मालकही आत आले. माझ्या हातात ती कार्ड पाहून आश्चर्य वाटल्याचं दाखवत ते म्हणाले, अरे मॅडम, आपने देखे नही के नही ये कार्ड अब तक... बडे अच्छे चल रहे है मार्केट में... मै तो सोच रहा था की क्या ऐसे कार्ड मराठी में... वैसे आप को मुझसे बेहतर पता होगा... है ना... काहीसे नजर चुकवत त्या हिंदी महाशयांकडे बघत त्यांनी विचारलं...
मी खूपच अस्वस्थ झाले होते. काहीशी वैतागूनच म्हणाले, नही, मुझे ये कार्ड अच्छे नही लगे... मराठी मे ये चलेंगे या नही या कैसे चलेंगे, ये मै नही बता सकती...
हिंदी महाशय तरीही मालकांची री ओढत पुढे म्हणाले, अरे हमे कमर्शियली सोचना चाहिये.. इसमे बुरा माननेवाली क्या बात है... जो मार्केट की डिमांड है, उसके हिसाब से लिखना कोई गलत तो नही...
मला जाणवलं की हा विषय मुद्दाम अशा पद्धतीने माझ्यासमोर काढला गेलाय... प्रत्येक वेळी काही नवं देण्याच्या उत्साहात आता मराठीतही असा मजकूर देता येईल... माझं त्याबद्दलचं मत किंवा अनुकुलता चाचपडून पाहण्याचा हा प्रयत्न होता तर... अच्छा... मी ठाम स्वरात म्हणाले, शायद आप ठीक कह रहे है, शायद ऐसे कार्ड मराठी में चल भी जाएंगे और चाहू तो मै लिख भी पाऊंगी... लेकीन...
अब लेकीन वाली क्या बात है, मै तो जानता हूं की तू लिख पाएगी... हिंदी महाशयांनी मालकांकडे पाहत पुन्हा उत्साहात बोलायला सुरूवात केली. मी त्यांना हातानेच थांबवत म्हटलं, मैने कहा की चाहू तो मै लिख भी पाऊंगी... लेकीन मुझे नही लिखना...
पर क्यू... प्रॉब्लेम क्या है...
मी म्हटलं, आपके सवालो का जवाब सिर्फ एक बार दुंगी, उसके बाद मुझे इस बारे में कोई बात नही करनी, आप मुझे दुबारा पुछेंगे भी नही... अगर चाहो तो आप किसी और से लिखवा लिजिए, लेकीन मुझे ऐसा कुछ नही लिखना... मग त्या दोघांकडे ठामपणे आळीपाळीने बघत मी म्हटलं, मै ऐसा कुछ भी नही लिखना चाहती, जो मेरे मां-पापा, भाई-बहन या दोस्त पढे और मै उनके सामने, ये मैने लिखा है, ये बात मान नही पाऊ या मुझे अपनी लिखी हुई बात को अपनाने में शर्म महसूस हो...
आमचं बोलणं साहजीकच आसपासचे सगळे सहकारी ऐकत होते. माझं बोलून संपलं आणि मी माझ्या कामाकडे वळले... हिंदी महाशय आणि मालक एकमेकांकडे पाहत एकमेकांसोबत बाहेर निघून गेले आणि सगळेच शांतपणे न बोलता कामाला लागले.
त्या दिवशी काम संपवून मी बाहेर पडल्यानंतर हिंदी महाशय मागोमाग बाहेर पडले. मला थांबवत, इकडचं-तिकडचं बोलत हळूच म्हणाले, तुझे गुस्सा आ गया क्या... मुझे नही पुछना चाहिए था शायद... लेकीन ***जी (अर्थात मालक) मुझे दो-तीन बार पुछ चुके... कोई और तुझसे इस बारे में नही पुछ पाता, तो मैने हिम्मत कर ली... चल छोड, तू वो सब भूल जा... मी ठीक आहे म्हटलं, विषय वाढवला नाही, पण रूखरूख मात्र लागून राहिली....
क्रमश:
जडण-घडण 1 , 2 ,3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13
प्रतिक्रिया
20 Nov 2014 - 10:33 pm | सस्नेह
सुबक वाचनीय वृत्तांत.
अगदी तन्मयतेने लिहिलंय..
20 Nov 2014 - 11:04 pm | एस
अतिशय कसदार लेखन. विशेषतः शेवट करण्याचे तंत्र फारच आवडले.
21 Nov 2014 - 2:54 am | मुक्त विहारि
मनांतून उत्रलेले लिखाण..
21 Nov 2014 - 3:20 am | बहुगुणी
हे २००३ च्या आसपासचं वर्णन आहे म्हणजे अजून दशकभर शिल्लक आहे तुमच्या अनुभवांचं, सर्वच वाचायला आवडेल, लिहा आणखी.
21 Nov 2014 - 3:23 am | मधुरा देशपांडे
आवडले. छान लिहिलंय.
21 Nov 2014 - 6:17 am | खटपट्या
खूप छान, जे मनाला नाही पटत त्याला नाही बोलण्याची हींमत दाखवलीत !! सर्वांना असं नाही जमत.
21 Nov 2014 - 10:59 am | समीरसूर
खरंच खूप छान, रेखीव, आणि उत्कंठावर्धक लेखन! अर्थात आपली अनुभवाची क्षेत्रेदेखील तशीच अगदी वेगळी आणि नाविन्यपूर्ण. त्याबद्दल आपले खरंच कौतुक केले पाहिजे.
कुठल्याही प्रकारचे स्फोटक द्रव्य न वापरता केलेले उत्कृष्ट लिखाण! :-) लवकर टाका पुढले भाग.
21 Nov 2014 - 5:59 pm | माधुरी विनायक
धन्यवाद मंडळी... स्नेहांकिता, स्वॅप्स, मुक्त विहारी, बहुगुणी, मधुरा, खटपट्या, समीरसूर आणि सर्व वाचकांचे आभार. हे लिखाण करताना आजवर झालेला प्रवास पुन्हा अनुभवणं खूप छान आहे आणि जडण-घडणीच्या या प्रवासात तुम्हा सर्वांची साथही तितकीच मोलाची...आवडती...
21 Nov 2014 - 6:02 pm | माधुरी विनायक
पहाटवारा यांनी पूर्वीच्या भागांच्या दुव्यांना अंकबद्ध करण्याची सूचना केली होती. ती या भागात अंमलात आणणं जमलं बुवा... त्या मार्गदर्शनाबद्दलही आभार...
21 Nov 2014 - 6:32 pm | स्वाती दिनेश
हा भागही आवडला, तुमचे अनुभवलेखन आवडत आहे.
स्वाती
27 Nov 2014 - 6:54 am | स्पंदना
अतिशय भावलं मनाला शेवटच वाक्य.
9 Dec 2014 - 4:04 pm | माधुरी विनायक
धन्यवाद स्वाती दिनेश, अपर्णा अक्षय...