जडण-घडण 20

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
5 Mar 2015 - 3:04 pm

बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. या बाबतीत माझ्या आई-बाबांच्या बरोबरीने इतर नातेवाईकांचा उत्साह बघून मला मौज वाटत होती. मी या बाबतीत तटस्थ राहायचं ठरवलं होतं, त्यामुळे नव्या कामाकडे लक्ष केंद्रित करता येत होतं. नव्या माध्यमात मी रूळू लागले होते.

आमच्या संचालक बंगाली बाई, भरपूर उत्साही आणि प्रयोगशील. सतत नाविन्याच्या शोधात. त्यांचं मराठी बोलणं, हा आणखी एक गमतीचा भाग. त्यांच्या बोलण्यात केवळ नपुंसक लिंगाच्या अनुषंगाने उल्लेख यायचे. ते कामत, ते कागद, ते पंखा, ते टिव्ही, ते मधुरा आणि ते स्टोरी. असं बरंच काही. त्याचबरोबर नव्याने ऐकलेले शब्द वाट्टेल तिथे वापरून बघायची हौसही दांडगी. एकदा मजाच झाली. कुठूनतरी चावट हा शब्द त्यांच्या ऐकण्यात आला आणि तो अख्खा दिवस संदर्भ तपासून न बघता त्या सतत तो शब्द वापरत होत्या. मी त्यांच्या समोर बसले असतानाच त्यांनी ऑपरेटर मुलीला बोलावून घेतलं. म्हणाल्या ते (एका प्रतिनिधीचं आडनाव) --- बघ. चावट... फोनच उचलत नाही माझा. त्याला फोन लावून दे लगेच... मोठ्या मुश्कीलीने हसू दाबत ती केबीनबाहेर पडणार तोच तिला हाक मारून प्यूनला आत पाठवायला सांगितलं. तो आत आला, तर फॅक्स मशीनकडे हात दाखवत त्याला म्हणाल्या, तो मशीन बघ, चावट... बंद पडलाय सकाळपासून... त्याला काय झालाय बघ... प्यूनलाही हसू आवरेना... कधी नव्हे ते मॅडमनी ते ऐवजी तो असा उल्लेख केला होता (नंपुंसक लिंगाऐवजी पुल्लींगाचा वापर केला होता, तो सुद्धा चुकीच्या ठिकाणी)... आता या लिंगवाचक उल्लेखाला हसावं की चावट या शब्दाला हे ठरवणं कठीणंच होतं म्हणा...

अशा अनेक गमती-जमती व्हायच्या, आम्ही मस्त हसायचो सुद्धा. पण त्या मॅडमसुद्धा ते सगळं मजेत घ्यायच्या. कामाच्या बाबतीत मात्र चोख. वर्तमानपत्रांमधून, आमच्या इतर अधिकृत स्रोतांकडून राज्यभरातल्या महत्वाच्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असायचं. सरकारी बातम्या, असा छाप असला तरी या कामात खरंच रमून जाता येत होतं. वार्तांकनाला सुरूवात केल्यानंतर त्यांनी वेळोवेळी बोलावून घेतलं, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या, मुंबईबाहेरही वार्तांकनाला पाठवलं. प्रयत्न केला तर कोणतंही काम जमू शकेल, हा आत्मविश्वास रूजवण्यात त्यांनी मोठाच हातभार लावला. सहकारी सुद्धा उत्तम होते. वार्ताहर आणि भाषांतरकारांबरोबर जुन्या जाणत्या, आजही नावाजल्या जाणाऱ्या वृत्तनिवेदकांचं काम जवळून पाहता आलं.

व्यावसायिकतेचे आदर्श म्हणता येतील, अशी यातली अनेक मंडळी नकळत खूप काही शिकवून गेली. तंत्रज्ञांसोबत काम करताना स्वत: वार्तांकन केलेली स्टोरी आपणच शब्दबद्ध करून ती आपल्याच आवाजात रेकॉर्ड करून घ्यायची, त्याला साजेशी दृश्य लावायच्या सूचना द्यायच्या, आवश्यक तिथे साजेसं संगीत वापरायचं अशा असंख्य तांत्रिक बाबी शिकता आल्या. अशा प्रकारच्या स्टोरीज तयार करताना एक मिनिट किती मोठं असतं, हे सुद्धा जाणवलं. ( तीन सेकंदाचं एक दृश्य असा साधारण नियम) या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे इथे मुद्रित माध्यमांप्रमाणे किंवा 24 तास वृत्तवाहिन्यांप्रमाणे बिट्स ठरलेले नव्हते/नाहीत. त्यामुळे वार्तांकन करणाऱ्या प्रत्येकाला राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान विषयक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव घेता यायचे. मला स्वत:ला अनेक महत्वाच्या राजकीय, सामाजिक विषयांच्या बरोबरीने रिझर्व्ह बँकेचं कामकाज, बॉम्बे हायसारख्या सागरी तळांवरून तेल काढण्याबरोबर त्यावर होणाऱ्या प्रक्रिया आणि संबंधित बाबी, तटरक्षक दलाच्या नौकांचं जलावतरण, मान्यवरांच्या प्रत्यक्ष मुलाखती असे अनुभव विश्व समृद्ध करणारे अगणित अनुभव घेता आले.

आमच्या रात्रीच्या बातमीपत्रात त्या-त्या दिवसाच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीची मुलाखत हा एक अविभाज्य घटक. क्वचित कधीतरी दोन पाहुणेही असायचे. माझ्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये एकदा संपादकांनी बोलावलं आणि म्हणाले, आज अतुल कुलकर्णी पाहुणा आहे. तो पोहोचलाय गेटवर. आपला कोऑर्डिनेटर स्टोरीत अडकलाय. तर पाहुण्यांचं स्वागत करून त्यांना वर घेऊन ये बघू... मी बरं म्हटलं आणि निघाले. वृत्त कक्षाचं दार उघडतेय तोच समोरून येणाऱ्या उंच माणसाशी होणारी धडक थोडक्यासाठी हुकली. मी गोंधळून त्याच्या उंचीकडे पाहतेय, तो समोर अतुल कुलकर्णी.
मी अतुल कुलकर्णी. साडेनऊच्या बातम्यांमध्ये पाहुणा आलोय...
अं. हो... मी तुम्हालाच न्यायला येत होते गेटवर...
न्यायला काय यायचं.. ठीक आहे...
या ना सर, असं म्हणत मी त्याला संचालकांच्या कक्षात बसवलं आणि जुजबी बोलून संपादकांना पाहुणा आल्याचं कळवून टाकलं.
एका ज्येष्ठ पाहुण्याचा अनुभव तर कधीच विसरता न येणारा. या वेळी मी स्वत:च कोऑर्डिनेटर होते. पाहुणे वयाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ होते. स्वभावाने मिश्कील. विषयाच्या अनुषंगाने मुलाखतीच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना मी काढलेले मुद्दे आवडले आणि त्यात आणखी दोन मुद्द्यांची त्यांनी भरही घातली. मुलाखत छान रंगली आणि ती संपल्यानंतर त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत मी त्यांना गाडीपर्यंत पोहोचवायला सोबत गेले. लिफ्टमधल्या आमच्या शेवटच्या त्रोटक संभाषणात मी त्यांना मुलाखत छान झाल्याचं आवर्जून सांगितलं, तर हसत, कौतुकाचा स्वीकार करत म्हणाले, मुलाखत छान झाली असेलच गं... पण तुम्हाला तुमच्या सगळ्याच पाहुण्यांना असं सांगावं लागत असेल ना... आणि खो-खो हसू लागले. नाही हो सर... असं म्हणत मी ही त्यांच्या हसण्यात नकळत सामील झाले.

असे एक ना अनेक अनुभव. मात्र या क्षेत्रात माझं येणं ठरवून झालेलं नव्हतं, त्यामुळे काही बाबींपासून मी कटाक्षाने दूर राहिले होते. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कॅमेऱ्यासमोर येणं. मला माझ्या चेहऱ्याला ओळख नको होती, त्यामुळे वरीष्ठांनी सुचवूनसुद्धा मी स्वत: केलेल्या वार्तांकनातही कॅमेऱ्याला सामोरी गेले नाही. माझं राहणीमान बऱ्यापैकी साधं होतं. मग सोबतच्या काही सहकाऱ्यांनी, विशेषत: दोन वृत्तनिवेदकांनी हळू हळू माझं बौद्धिक घ्यायला सुरूवात केली. त्यातल्या एक तर पक्क्या पुणेकर. (पुणेकर हा उल्लेख कौतुकाने आहे, बरं का... खूप प्रोत्साहन मिळालं त्यांच्याकडून) माधुरी, हुषार माणसाने छान दिसू नये किंवा स्वत:च्या दिसण्याबाबत बेफिकीर असावं, हे काही चांगलं नाही. तुझं वाचन चांगलं आहे, आवाका आणि समजही उत्तम आहे. मग थोडी छान राहत जा ना. आम्ही सुचवतो, तसं थोडंफार बदलून पाहा. जेवढा वेळ वाचनालयात आवर्जून जाऊन पुस्तकं बदलतेस, त्यातला थोडा वेळ स्वत:च्या दिसण्याकडे दे बघू... मी बरेचदा ते गंभीरपणे ऐकायचे किंवा हसण्यावारीही न्यायचे. पण त्यांनी चिकाटी सोडली नाही.

फार पूर्वी सांगितल्याप्रमाणे माझं भावी आयुष्याबद्दलचं मत स्पष्ट होतं. मला प्रेमा-बिमात पडायचं नव्हतं, त्यातून उद्भवणारी रडारड, ताण-तणाव, घरच्यांची आणि इतरांची संभाव्य फरपट यातलं काहीच नको होतं. त्यामुळे या फंदात पडू नये, यासाठी मी जाणीवपूर्वक माझी वेगळी प्रतिमा (अर्थात टिपिकल ताईसदृश) जपली होती. चारचौघींसारखं आपणही छान दिसावं, अशी वयाला साजेशी भावना असायची मनात. पण तरीही दिसण्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्षच करायचे किंवा व्हायचं. सुदैवाने माझी सर्व मित्रमंडळी मला ओळखून होती, त्यामुळे त्या-त्या मंडळींमध्ये वावरताना मी निर्धास्त, माझ्या वयाची असायचे. एरवी मात्र माझ्याशी जेमतेम तोंडओळख असणारी मंडळीही मला एकलकोंडी, घुमी, चक्क घमेंडखोरसुद्धा समजायची. असले समज स्वत:हून दूर करायच्या फंदात मी कधी पडले नाही. मित्रमंडळी कायमच भरपूर होती, अजून आहेत. बहुतेकांना विश्वासाने मन मोकळं करता येतं माझ्याकडे. मैत्री या नात्याच्या मी स्वत:च प्रेमात आहे, त्यामुळे तो विश्वास मी सुद्धा मनापासून जपते. फक्त एक अदृश्य चौकट होतीच माझ्याभोवती. ती ओलांडायचा प्रयत्न होतोय, अशी शंका जरी आली, तरी अस्वस्थ व्हायचे मी. चक्क गायब व्हायचे अशा वेळी.
दोन प्रसारमाध्यमं, पुस्तकाच्या अनुवादाचं काम आणि अधून मधून शुभेच्छापत्र लेखन. या सगळ्याला मनाजोगतं वाचन आणि प्रसंगी होणारे बघण्या-दाखवण्याचे आटोपशीर कार्यक्रम. मजेत चाललं होतं सगळं. आई-बाबा अस्वस्थ वाटायचे कधीतरी. पण मी निर्णय त्यांच्यावर सोपवल्यामुळे त्यांचं माझ्यासाठी स्थळं बघणं आणखी काटेकोर झालं होतं.

आमचं गाव कोकणात आणि बाबा भावंडांमध्ये थोरले. त्यामुळे गावी फेऱ्या होत असायच्या. घरी मी आणि धाकटा भाऊ. मार्च महिन्याचा शेवट असेल. आई-बाबा असेच गावी जायला निघालेले. मी हातात बॅग घेऊन त्यांच्यासोबत रिक्षापर्यंत निघाले होते. आमचं घर पहिल्या मजल्यावर. खाली उतरलो तर वॉचमनने एक कुरीयरचा लिफाफा आईच्या हाती दिला. एव्हाना वेगवेगळ्या व्यावसायिक कारणांमुळे माझाही पत्रव्यवहार सुरू झाला होता. मला वाटलं, कदाचित माझ्यासाठी असेल. आईला विचारलंही, कोणाचं पत्र ? तर ती म्हणाली, तुझं नाही. बरं म्हटलं, आई-बाबांना रिक्षात बसवलं आणि घरी परतले. पाच एक मिनिटं झाली असतील मला घरी येऊन आणि फोन वाजू लागला. हॅलो म्हणणारा आवाज अनोळखी वाटला. पलीकडे कोणी मुलगा होता. ----चं घर का? तुम्ही पत्रिका पाठवायला सांगितलं होतं. मी कुरीयर केलंय. मिळाली का? एक क्षणभर थांबले मी. मला संगती लागेना. मग आठवलं, आत्ताच आईच्या हातातलं कुरीयर. अच्छा. मी होकार देत म्हटलं, बहुतेक तुमचं कुरीयर आलंय पण आई-बाबा आत्ता गावी निघालेत. ते जाता-जाताच कुरीयर आलं, ते बहुतेक तुमचंच असावं. पण ते दोघं साधारण पंधरा दिवसांनी येतील. तेव्हा त्यानंतरच कॉल केलात तर बरं... बोलणं संपवून मी फोन ठेवायच्या तयारीत तर पलीकडून पुन्हा हॅलो...हॅलो...
खरं तर असे फोन कॉलसुद्धा मी नाही घ्यायचे. पण आता पर्यायच नव्हता ना... प्रत्युत्तर द्यावंच लागलं. हं, बोला...
पत्रिका माझीच आहे. अं... तुमच्यासाठीच का...
हो...
तुमच्या आईशी बोलणं झालंय माझं. पण आई-बाबाना परतायला अवकाश आहे ना अजून. आपण तोवर बोलू शकतो का... तुमची हरकत नसेल तर...
माझी चलबिचल सुरू. हे काय नवीन... आई-बाबांनाच बोलू देत आल्यावर. पण फोनवर जुजबी बोलायला काय हरकत आहे... मग म्हटलं, हो, बोलू ना...
तर पलीकडून मोबाइल नंबरची मागणी. एक क्षणभर विचार केला मी. पण पलिकडचा आवाज आश्वासक वाटत होता. मी माझा नंबर दिला तसा पलीकडून त्यानेही त्याचा नंबर दिला. मी कुरीयर पोहोचलं का, हे विचारायलाच कॉल केला होता. आत्ता जरा गडबडीत आहे. नंतर बोलूच...
अच्छा.. म्हणत मी ही फोन ठेवून दिला...
क्रमश:
जडण घडण - 1 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 18 , 19

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

5 Mar 2015 - 3:55 pm | एस

वाचिंग, वाचिंग. हा भाग थोडासा उशिराने आला. पण चांगला आहे.

पुभाप्र. :-)

सविता००१'s picture

5 Mar 2015 - 4:49 pm | सविता००१

छान लिहिता हो तुम्ही. भराभर येउद्या

रुपी's picture

6 Mar 2015 - 1:26 am | रुपी

वरील प्रतिक्रियांशी सहमत... भराभर येउ द्या!

हाही भाग नेहमीप्रमाणे आवडला.
मराठी व्रुत्तवाहीनीच्या संचालीका बंगाली? हे फक्त सरकारी खात्यांमधे होउ शकते...मला त्यांच्या क्षमतेबद्द्ल काहीच म्हणायचे नाही आहे पण जर मराठी व्रुत्तवाहीनीचे संचालक जर मराठी असतील तर जास्त चांगल्याप्रकारे काम करु शकतील... असो.

बहुगुणी's picture

6 Mar 2015 - 5:33 am | बहुगुणी

हा भागही वाचल्याची पोच. पण पुढच्या भागाची (विशेषतः आता कथन आणखी इंटरेस्टिंग वळणावर आलंय असं वाटतंय म्हणून) प्रतीक्षा :-)

अजया's picture

6 Mar 2015 - 8:24 am | अजया

पुढला भाग लवकर टाका.

नाखु's picture

6 Mar 2015 - 11:24 am | नाखु

सर्व अभिप्राय व विनंतीस सहमत.

स्नेहल महेश's picture

7 Mar 2015 - 12:24 pm | स्नेहल महेश

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

माधुरी विनायक's picture

16 Mar 2015 - 1:04 pm | माधुरी विनायक

स्वॅप्स, सविता ००१, रूपी, खटपट्या, बहुगुणी, अजया, नाद खुळा, स्नेहल महेश आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.
खटपट्या यांस - बंगाली, आसामी,गुजराती, गोयकांर आणि महाराष्ट्रीय वरीष्ठांसोबत आतापर्यंत काम करता आलं. यातले बहुतेक अधिकारी उत्तम समज आणि आपापल्या कामात उत्तम वकूब बाळगून आहेत.
मंडळी, लेखनाची गती खरंच मंदावली आहे आणि आता एक अल्प विरामही घेतेय. आमच्या त्रिकोणी कुंटुंबाचा चौकोन करणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची नांदी झालीय. त्यामुळे सध्या हा अल्पविराम घ्यावाच लागतोय. पण लेखन पुढे सुरू ठेवायची ओढही कायम आहे. लवकरच भेटू...

एस's picture

16 Mar 2015 - 3:00 pm | एस

अभिनंदन! :-)