जडण- घडण : 22

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
13 Jul 2015 - 4:20 pm

बाबांचं बोलणं ऐकून मस्त करमणूक झाली. आमच्या गप्पा-टप्पा, भेटी गाठी सुरूच होत्या आणि आई-बाबांच्या वर-संशोधनातही खंड पडला नाही. त्यांचा हेका बघून मी काही काळ नमतं घ्यायचं ठरवलं. आपला मुद्दा सोडायचा नाही, अगदीच त्यांना कमीपणा येईल, अशी परिस्थिती त्यांनीच निर्माण केली तरच मुलं बघायची आणि पूर्णपणे तटस्थ राहायचं असं ठरवलं. आता मागे वळून पाहताना नजरेसमोरून सरकतेय ती वेगवेगळ्या प्रसंगांची मालीका...
कधीतरी पुढच्या कुठल्यातरी भेटीत डोळ्यांवरचा गॉगल न काढताच त्याने बोलायला सुरूवात केलेली.. डोळे दिसू देत मला.. माझा किंचित चिडलेला स्वर.. डोळ्यांवर गॉगल लावून शक्यतो माझ्याशी बोलू नका. नजरेला नजर भिडवून न बोलणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत...
आणि हे सांगितल्यानंतरही कधी-कधी समोर असताना कुठेतरी हरवून जाणारी त्याची नजर... मग समोर आलेल्या त्याच्या कौटुंबिक समस्या.. कामाच्या ठिकाणचे ताण, घराबाबतची काहीशी अनिश्चितता... तू काही काळजी करू नकोस, असा दिलासा मला देताना स्वत:च काळजीत गुंतलेला तो...
कधीतरी पुढे काय... या विचाराने बोलता-बोलता मी अवचित शांत होऊन जायचे. तू बोल... भांडलीस तरी चालेल, पण शांत राहू नकोस...
या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा या विचाराने हतबल झालेली मी. खरं तर मी खूप खंबीर. दुर्दम्य आशावादी. इतरांचं दु:ख, अगदी सिनेमा, मालिकांमधल्या किंवा पुस्तकातल्या कोणाच्याही दु:खाने दुखावून रडणारी. स्वत:वरच्या संकटात मात्र प्रचंड ठाम राहून परिस्थितीला सामोरी जायचे. यावेळी मात्र हतबल झाले होते.
एकदा कधीतरी डोळे पाणावले. ते बघून अचानक अस्वस्थ होत तो म्हणाला.. तू.. रडू नकोस... कधीच... मग मला काहीच सुचत नाही.
ती कासावीशी मलाच इतकी नकोशी वाटली की त्यानंतर कधीच त्याच्यासमोर डोळ्यातून पाणी काढता आलं नाही. कितीही रडू आलं तरी ते बाहेर येणार नाही, याची खबरदारी घ्यायचे मी...
नाव, चेहराही न पाहता मनाविरूद्ध पाहिलेली मुलं, त्यामुळे होणारी चिडचिड, आई-बाबांच्या वागण्याने वाटणारं आश्चर्य मावळून सुरूवातीला चिडचिड, नंतर राग, नंतर सोशीकपणा आणि शेवटी आलेला हताशपणा... मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं, भाऊ लहान, त्याच्या शिक्षण करीयरमध्ये गुंतलेला. जवळची मित्रमंडळी, असं काही सांगता येईल, असं कुणीच नाही. माझ्या आयुष्याचा जोडीदार माझा बेस्ट फ्रेंड असेल, नाही तर मला बेस्ट फ्रेंडच नसेल.. असं काहीसं नकळत्या वयात कधितरी ठरवलेलं आणि त्यावर ठाम राहिलेली मी...
आमच्या लग्नाला माझ्या घरच्यांचा असणारा विरोध कायम होता. . हो. माझ्याच. त्याच्या घरी आमच्या बाबतीत विरोधाचं वातावरण अजिबातच नव्हतं. त्याच्या मोठ्या भावाच्या आणि माझ्या बाबांच्या समान ओळखीतून हे सगळं सुरू झालं होतं. त्याच्या बहिणीशी फोनवर बोलणं झालं होतं, त्यानेच आमचं बोलणं घडवून आणलं होतं, आई आजारी होत्या, त्यांना मला भेटायची इच्छा होती. थोडक्यात तिकडच्या कुटुंबाचा आक्षेप नव्हताच. इतर काही अडचणी होत्या. त्याच्या नोकरीतली अस्थिरता, घराचा प्रश्न. पण मला त्या अडचणी मान्य होत्या आणि त्यातून बाहेर पडेपर्यंत थांबायची आणि दोघांनी मिळून त्यातून बाहेर पडायचीही तयारी होती. पण या सगळ्यात मला त्रास किंवा मनस्ताप होईल, अशी धास्ती वाटायची त्याला. कसं होईल सगळं, हा एकच विचार त्याच्या डोक्यात. समोर येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायची माझी तयारी असूनही. त्यात आणखी आमच्या नात्यातली लपवाछपवी, ती सुद्धा माझ्या घरच्यांपासून, माझ्यासाठी त्रासदायक होती. समस्या दिसतेय ना. मग ती सोडवायची. फार काळ भिजत घोंगडं ठेवायचं नाही, हा माझा स्वभाव. तर नंतरच्या काळात मला किती तडजोडी कराव्या लागतील, किती त्रास सोसावा लागेल या विचारानेच धास्तावून माझ्या आई-वडिलांना पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटून आमच्या नात्याविषयी त्यांची खात्री पटवून देणं टाळणारा तो. होईल सगळं ठीक, असा त्याचा आशावाद तर सगळं ठिक व्हायला आपणही प्रयत्न केले पाहिजेत, असा माझा आग्रह. त्यातून कधीतरी होणारी चिडचिड...
मुलं बघायचं सत्रं सुरू होतं. पत्रिका, शिक्षण, निर्व्यसनी असणं याबरोबरच मुलाच्या स्वत:च्या घराबाबत आई आग्रही होती. या सगळ्या अटी पूर्ण करणारा एक मुलगा आई-बाबांना पसंत पडला आणि पुढची बोलणी करण्यासाठी त्या मुलाकडची मंडळी घरी यायचा दिवस ठरला. माझे काका- काकी, आत्या आणि आणखी कोणी जवळचे नातेवाईक येणार, हे सुद्धा ठरलं. मी वरवर शांत. आतून धुमसणारी.
आई-बाबांनी कल्पना दिली. माझं मत विचारलं. का विचारताय मला... मी माझं मत बदललेलं नाही. तुम्हाला माझं मत पटत नाही. तुम्हाला योग्य वाटतंय तेच करणार ना... मग मला नका विचारू... त्यावर त्यांनी माझं मन वळवण्यासाठी केलेले प्रयत्न... हा आयुष्यभराचा प्रश्न आहे... आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करणार ना... आम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात...आता तुला पटणार नाही पण नंतर सगळं मार्गी लागलं की आम्ही योग्य तेच केलं हे पटेल तुला...
काय सांगावं यांना... लग्नाची बोलणी करताहेत. मी त्या मुलाकडे पाहिलंही नाही. मला त्याचं नाव, शिक्षण, नोकरी -व्यवसाय, घरातले काहीच माहिती नाही. माहिती करून घ्यायची इच्छाही नाही. कोणत्या शब्दात माझं म्हणणं कळेल यांना... माझ्या डोक्यात विचारांची आवर्तनं...
मध्ये एक दिवस होता... दुसऱ्या दिवशी आमची भेट. मी प्रचंड बिथरलेली. तो काहीसा अस्वस्थ पण शांतही. तुमच्या अडचणी मला कळतात. आपण लग्नाची घाई नको करूयात. पण आणखी एकदा घरच्यांना येऊन भेटा. तुम्हाला जे वाटतं ते त्यांना ठामपणे सांगा. लग्नासाठी नंतर कितीही काळ थांबावं लागलं तरी चालेल. फक्त आपल्याबद्दल त्यांना खात्री पटू द्या. विश्वास वाटू द्या...
आत्ता तुझ्या घरच्यांना देता येतील, अशी ठाम उत्तरं माझ्याकडे नाहीत. खरंच नाहीत. पण तू खरंच काळजी करू नकोस. काही होत नाही. तू शांतपणे घरी जा.
मला हा ताण सहन होईना. मी शांत बसून राहिले. ऑफीसच्या वेळेनंतर भेटलो आम्ही, त्यामुळे आता रात्र होऊ लागली होती.
तू शांतपणे घरी जा. काही होत नाही. माझी समजूत घालायचा त्याचा आणखी एक निष्फळ प्रयत्न. मी हटवादीपणे तिथेच बसून राहिलेली. बस येत-जात होत्या. त्याने मला घरापर्यंत सोडायचा प्रश्नच नव्हता आणि त्या दिवशी तर नाहीच नाही. माझ्या घरापर्यंत जाणाऱ्या शेवटच्या बसची वेळ जवळ येत होती. त्याचं समजावणं कायम आणि मी शांतपणे तिथेच बसून राहिलेली. तुम्ही जा. मला नाही जायचं कुठेही, अशी निर्वाणीची भाषा.
शेवटची बस येताना दिसली. मला पुन्हा एकदा समजावून, मी हलत नाही हे बघून त्याने चटकन पुढे होत बस थांबवली. चौघात शोभा नको, या विचाराने मी निमूटपणे उठले आणि त्याच्याकडे न बघता बसमध्ये जाऊन बसले. तितक्याच तत्परतेने बाईक काढून शक्यतोवर त्याने माझ्या बससोबत प्रवास केला आणि आम्ही आपापल्या घरी पोहोचलो.
दुसरा दिवस उजाडला. मी वरकरणी शांत. दुपारनंतर आधी आमचे नातेवाईक आणि नंतर तिकडची मंडळी आलेली. सगळीकडे आनंदाचं वातावरण. बोलणी सुरू झाली. ओळखी निघाल्या. गप्पा रंगत चाललेल्या. माझ्या काकांनी सहज त्या मुलाची पत्रिका मागितली आणि एक नजर टाकली. काही पाहून ते चमकले आणि त्यांनी आईला आत यायला सांगितलं.
वहिनी, याच्या पत्रिकेत सौम्य मंगळ दिसतोय. तुम्ही बघीतली होती ना पत्रिका. लक्षात नाही का आलं... आबाला पाठव आत. आबा म्हणजे माझे बाबा. त्या दोन्ही भावांचं काही बोलणं झालं. सर्वांचं चहा-पाणी उरकलं आणि काका बोलू लागले.
मला मुलाच्या पत्रिकेत सौम्य मंगळ दिसतो. तुम्ही बोलला नाहीत ते...
हो का असेल. आम्हाला काही कल्पना नाही. पत्रिकाही आम्ही अलिकडेच काढली. आपल्या वेळी कुठे बघितल्या जायच्या पत्रिका... नाही का हो...
पण आम्हाला पत्रिका जुळल्याशिवाय पुढे नाही जायचं. आम्ही पुन्हा आमच्या गुरूजींशी बोलतो आणि सकारात्मक वाटलं तर कळवतो... काकांनी विषय संपवला.
काहीशा नाराजीनंतर पुन्हा एकदा नमस्कार-चमत्कार आणि ती मंडळी गेली. आमचे नातेवाईकही हळू-हळू निघून गेले. कोणी मला वेगळं काही सांगायच्या भानगडीत पडलं नाही. मी मात्र चेहरा शांत ठेवत, त्या न बघितलेल्या सौम्य मंगळाचे आभार मानत सुटकेचा नि:श्वास सोडला... संकट तात्पुरतं टळलं होतं. पण किती दिवस...
क्रमश:
जडण घडण - 1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 ,14 , 15 , 16, 17 , 18 , 19 , 20 , 21

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

उमा @ मिपा's picture

13 Jul 2015 - 5:20 pm | उमा @ मिपा

खरंच त्या सौम्य मंगळाचे आणि तो ज्यांच्या नजरेने टिपला त्या काकांचेही आभार!
आधीच्या सर्व भागांप्रमाणेच हाही भाग छान लिहिलाय.

वाचतोय. छान लिहिताय.

माधुरी विनायक's picture

22 Jul 2015 - 2:27 pm | माधुरी विनायक

उमा@मिपा, स्वॅप्स आणि सर्व वाचकांचे आभार.

माधुरीजी पुढच्या भाग लवकर टाका ना प्लीज..

माधुरी विनायक's picture

22 Jul 2015 - 4:23 pm | माधुरी विनायक

वरची प्रतिक्रिया देण्यापूर्वीच पुढचा भाग अपलोड केलाय.

पिशी अबोली's picture

22 Jul 2015 - 4:47 pm | पिशी अबोली

सगळे भाग आवडले. अतिशय ओघवतं आणि मनापासून लिहिलेलं लिखाण वाचून खूप छान वाटलं. :)

माधुरी विनायक's picture

6 Aug 2015 - 12:11 pm | माधुरी विनायक

धन्यवाद पिशी अबोली.

पुढचा भाग कधी येणार माधुरी ताई?

मराठी कथालेखक's picture

13 May 2016 - 1:13 pm | मराठी कथालेखक

धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.. यापुर्वी कधी लक्ष गेलं नव्हतं
मला रामदास यांच्या शिंपीणिचं घरटं कथेची शैली आठवली.