त्यानंरचे दिवस मात्र काहीसे अस्वस्थ करणारे होते. झालं काय, तर मी गिफ्ट नाकारल्याचं विद्यार्थ्यांकडून पालकांना आणि अर्थात माझ्या सहशिक्षिकांनाही समजलं. काही पालक हटवादीपणे दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर स्वत:च गिफ्ट घेऊन आले. पण मला ते पटणार नव्हतंच. त्या भेटी मी अर्थात स्वीकारल्या नाहीत. माझ्यापुरता तो विषय संपला, पण माझ्या सहशिक्षिकांनी मात्र त्यावरून मला टोमणे मारायला सुरूवात केली. खरं तर त्या सगळ्या माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या, वयानेही आणि सेवाज्येष्ठतेनेही. मी काही त्यांना प्रत्युत्तर द्यायच्या भानगडीत पडले नाही. कालांतराने ते ही मागे पडलं.
विद्यार्थ्यांशी उत्तम नाळ जुळली होती. वर्षभर मनापासून काम केलं मी तिथे. विद्यार्थी आणि पालक खुश होते. निकालही चांगला होता. पण माझं विद्यार्थ्यांशी संवाद साधणं जिथे मुख्याध्यापकांनाच पसंत नव्हतं, तिथे इतर सहशिक्षिकांचं काय? वर्ष संपलं. नेमणूक वर्षभरासाठी. शेवटच्या दिवशी फादरनी बोलावून घेतलं. पुढच्या वर्षी काम करण्याबद्दल विचारलं आणि शाळा सुरू होण्यापूर्वी एकदा भेटून जा, पुढच्या वर्षी काम कायम करता येईल, अर्थात पुन्हा एका वर्षासाठी नेमणूक, हे सुद्धा स्पष्ट केलं. मी हसून होकार देत आणि त्या वर्षीचं अनुभव प्रमाणपत्र घेत तिथून बाहेर पडले. जून महिन्यात शाळेतून भेटायला बोलावणारा फोन आला खरा, पण मला नाही जावंसं वाटलं. एक तर पुन्हा त्याच वातावरणात काम करायला मी फारशी उत्सूक नव्हते आणि दरवर्षी नव्याने रूजू करून घेणं, अर्थात अखंड सेवाकालही मोजला गेला नसता.
आकाशवाणी आणि कॉपी रायटिंग पुन्हा सुरू झालेलं. याच सुमाराला आकाशवाणीच्याच धर्तीवर आणखी एका सरकारी प्रसारमाध्यमासाठी काम करता येऊ शकेल, अशी शक्यता वाटू लागली. अर्थात वृत्त विभागातच, दर महिन्यात काही दिवस काम करता येणार होतं. हा अनुभव घ्यायला आवडलं असतं, त्यामुळे तिथे मोर्चा वळवला. पहिल्या महिन्यात भाषांतराचं काम केलं. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम तर हे दृकश्राव्य माध्यम. माझ्याकडे पत्रकारितेचं प्रमाणपत्रं नव्हतं, पण आकाशवाणीतला साधारण दोन वर्षं कामाचा अनुभव होता, त्यामुळे भाषांतर सरावाचं होतं. कामाचा पहिला महिना संपताना पुढच्या महिन्याचा तक्ता लागायचा. त्याप्रमाणे मी पुढच्या महिन्यातले माझे कामाचे दिवस बघायला गेले. पण तक्त्यामध्ये माझं नावच नव्हतं. अरेच्चा.. एक सुद्धा ड्यूटी नाही? मी थोडी खट्टू झाले. पहिल्या महिन्यात काम करताना काही चुकलं का, असा प्रश्नही पडला. मग संपादकांना भेटले. खरंच काही चुकलं असल्यास ते समजून घ्यायचं होतं. पण ते माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मला सोबत घेऊन वृत्त कक्षात आले आणि म्हणाले, मी स्वत: तुला तारखा दिल्यात. तुला का नाही दिसल्या? चुकीचा तक्ता पाहिलास का तू... मी गडबडले. संपादक एका तक्त्यासमोर उभे राहिले आणि काही तारखांसमोर बोट ठेवून तिथे लिहिलेलं माझं नाव त्यांनी दाखवलं. चक्रावून मी पुन्हा पाहिलं, तर तो तक्ता वार्ताहरांचा होता. आता मात्र मला धक्का बसला. मी त्यांना म्हटलं, सर मला भाषांतराचं काम येतं. प्रत्यक्ष रिपोर्टिंग नाही केलं मी अजून... सर मात्र शांतच. मला म्हणाले, ते काही कठिण नसतं. जमेल तुला. मग त्यांनी जवळच्या रिपोर्टरला हाक मारून बोलावलं. आता कुठे जाणार, ते विचारलं आणि मला सोबत न्यायला सांगितलं. मी खरं तर गोंधळून गेले होते. मला प्रत्यक्ष फिल्डवर काम नव्हतं करायचं. मी पुन्हा सरांना सांगायचा प्रयत्न केला... सर, माझं जर्नालिझम नाही झालेलं, मला खरंच अनुभव नाही हो. भाषांतराच्या कमी तारखा मिळाल्या तरी चालेल, पण रिपोर्टिंग... माझं बोलणं तोडत ते म्हणाले, तुझं काम बघीतलं मी या महिन्यात. तुला नक्की जमेल रिपोर्टिंग. आणि आत्ता आपल्याला गरजही आहे. तू महिनाभर हे काम करून तर बघ, मग आपण बोलू... ते निघूनही गेले. मला काहीच सुचेना. मिनिटभर शांत बसले तिथेच. मग कार्यक्रमाला जात असलेल्या रिपोर्टरसोबत बोलले. ती खूपच मनमिळावू होती. माझं सरांसोबत झालेलं बोलणं तिनेही ऐकलं होतं. तिनेही धीर दिला. जमेल गं तुला, खरंच कठिण नाही त्यात काही, असं म्हणाली आणि आम्ही सोबतच बाहेर पडलो.
अनोळखी लोकांमध्ये मिसळायला मी तेव्हा फारशी उत्सुक नसायचे. हे सरकारी माध्यम, जबाबदारीचं काम... त्यात आपण पत्रकारितेचं रीतसर शिक्षण घेतलेलं नाही, आपलं काही चुकलं तर... हे दडपण मनात होतंच. पहिला महिना सरावण्यातच गेला आणि हे नवं कामसुद्धा कालांतराने आवडू लागलं. मग हेच काम करायचं तर अनुभवाला शिक्षणाची जोड द्यायला हवी, असं वाटू लागलं आणि मी पत्रकारितेच्या दूरस्थ अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. वर्षभराचा तो अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्णही केला आणि आकाशवाणीच्या बरोबरीने हे कामसुद्धा नियमितपणे सुरू झालं. अर्थात महिन्यातले काही दिवस आकाशवाणी, काही दिवस हे दुसरं दृकश्राव्य सरकारी प्रसारमाध्यम (हा सुद्धा वृत्तकक्षच) आणि शिल्लक दिवसांमध्ये आवडेल ते वाचायचं, आवश्यकतेनुसार कॉपी रायटिंग असं बरंच काही सुरू झालं. दरम्यानच्या काळात दिवाळीनंतर त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षकांचा फोन आला. फादरच्या समोर बसूनच तुझ्याशी बोलतेय, असं त्या म्हणाल्या . तो कॉलसुद्धा फादरच्या सांगण्यावरूनच केला होता त्यांनी. माझ्या हाताखालून इयत्ता चौथीमधून पाचवीमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचा सहामाहीचा मराठी आणि हिंदी विषयाचा निकाल उत्तम लागला होता आणि मी पुन्हा येऊ शकते का, हे विचारण्यासाठी हा कॉल केला होता. मी विद्यार्थ्यांचा निकाल ऐकून मनापासून आनंदले, पण पुन्हा तिथे जायचं म्हणजे... काम माझं आवडतं असलं तरी अनावश्यक गोष्टींमुळे होणारा मनस्ताप टाळता येण्यासारखा नव्हता. क्षणभर विचार करून, मला जमणार असेल तर आठवडाभरात कळवते, असं सांगितलं त्यांना. अर्थात मी त्यांना पुन्हा कॉल केला नाही आणि त्या गोष्टीला तिथेच पूर्णविराम मिळाला.
एरवी नियमीत दिनक्रम सुरू होता आणि एक दिवस वर्तमानपत्रातली एक जाहिरात वाचनात आली. भाषांतराचं काम होतं. मराठीमधून हिंदीमध्ये. मी तिथे जाऊन आले. त्यांनी पानभर मजकूर अनुवादित करून घेतला, तो त्यांना आवडला आणि साधारण चारशे पानाच्या त्या ग्रंथाच्या अनुवादाचं काम सुरू झालं. विषय होता, कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती. माझा ज्योतिषावर विश्वास आहे का, असेल तर किती, ज्योतिष हे शास्त्र आहे असं मला वाटतं का... अशा प्रश्नांच्या वादात मला पडायचं नाही. त्या वेळी मला नवं काही करून बघायला मनापासून आवडत होतं, सुदैवाने संधी समोरून येत होत्या आणि मला त्या कामाचा अनुभव घ्यायचा होता.
माझं हिंदी बरं असावं. मिळणारा मोबदला भरपूर नसला तरी भाषांतरातलं कौशल्य वाढवण्यासाठी खूप वाव होता. त्या निमित्ताने माझं हिंदी- मराठी-इंग्रजी शब्दकोषांबरोबर हिंदी साहित्य वाचनही वाढलं होतं. त्या कामातही मी मनापासून रमून गेले. साधारण दोन वर्षं या पुस्तकाचं काम सुरू होतं. पुण्यात अगदी थाटामाटात पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि माझ्या आई-बाबांच्या उपस्थितीत माझा सत्कारही झाला. हे पुस्तक हिंदी भाषेत असल्यामुळे देशभरातल्या कृष्णमूर्ती ज्योतिष अभ्यासकांपर्यंत पोहोचलं. प्रकाशनाला साधारण बारा वर्षं उलटून गेलीत पण अजूनही पुस्तकाबद्दल किंवा त्या पद्धतीबद्दल विचारण्यासाठी माहेरी फोन येत असतात. (लेखकाने माझ्या नावाबरोबर घरचा फोन नंबरही छापलाय पुस्तकात.) मी स्वत: अभ्यासक नाही, केवळ अनुवाद केलाय हे सांगितल्यानंतरही, " पण अख्खं पुस्तक तुम्ही अनुवादित केलंय, थोडंतरी कळत असेलच ना, तेवढं तरी सांगा..." म्हणणारे महाभागही भेटतात. अशांना मूळ लेखकाचा संपर्क क्रमांक द्यायचे मी आणि त्यांच्याशी बोलायचा सल्ला द्यायचे...
व्यावसायिक आघाडीवर हे सर्व सुरू असताना वैयक्तिक आघाडीवर कांदेपोहे कार्यक्रम सुरू झाले होते. सुरूवातीची तीन-चार स्थळं बघेपर्यंत माझा उत्साह टिकला. सुरूवातीला हे बघण्याचे कार्यक्रम शक्यतो एखाद्या स्टेशनजवळ, चांगल्याशा हॉटेलमध्ये व्हायचे. क्वचित कधीतरी घरी. पण अशा पद्धतीने आपला आयुष्याचा साथीदार कसा काय ठरणार याबद्दल मला काळजी वाटत नसली तरी उत्सुकता मात्र नक्कीच होती. कधी इकडून होकार, तिकडून नकार तरकधी तिकडून होकार, इकडून नकार... मी या प्रकाराला लवकरच कंटाळले. माझ्याच आई-बाबांचं एक वेगळं रूप मला बघायला मिळत होतं. अर्थात जबाबदार पालक म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीसाठी ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या, त्या अवाजवी नव्हत्या. मुलगा आपल्यातला हवा, दिसायला अनुरूप, किमान पदवीधर, स्वत:चं घर आणि चांगली नोकरी, एकत्र कुटुंब असल्यास उत्तम... आणि हो.. त्यात ती पत्रिका जुळण्याची अटसुद्धा होतीच, बरं का... आधी म्हटलं तसं, सुरूवातीच्या तीन-चार स्थळांमध्येच माझा उत्साह संपला आणि चिडचिड होऊ लागली. याचा परिणाम नकळत माझ्या कामावर होऊ लागला आणि एरवी शांत असणारी मी किरकोळ गोष्टींवरून वैतागू लागले. मग मी विचार केला आणि आई- बाबांशी बोलले. मला लग्नाची घाई नाही. करायचंच नाही असंही नाही. तुम्ही काय ती स्थळं बघा, मी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार नाही. पहिल्यांदा भेटायला समोरून वरात यायला नको. मोजकी दोन किंवा तीन माणसं असली तर बरं. आता तीन अंक अशुभ म्हणून चौघं, असलं गणित करू नका. आपण तीन, ते तीन असे सहा होऊ. तेव्हा त्यापेक्षा जास्त माणसं नकोतंच. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची पसंती झाली की मला सांगा. तुम्ही निवडलेल्या मुलात मी खोड काढणार नाही. तुम्ही ठरवाल ते मला मान्य असेल, पण या विषयावरून आपली कोणाचीही चिडचिड आणि त्रागा नको...
सुदैवाने आई-बाबांना ते पटलं. मग हळू-हळू आणखी काही अटी वाढवल्या. फक्त पंधरा मिनिटांसाठी तासाभराचा प्रवास नको. शक्यतो घरीच भेटलं तर चालेल का, मला पसंतीबद्दल सारखे प्रश्न विचारायचे नाहीत वगैरे...वगैरे... माझ्या वयाच्या आजूबाजूच्या परिचित मुला-मुलींची आणि त्यांच्या घरातल्यांचीही या बाबतीतली फरपट मी बघत होते. बरेचदा आपल्या नेमक्या अपेक्षा काय, हेच बहुतेकांना ठाऊक नसायचं. अनेक लग्नाळू मुलं-मुली कंटाळून जायचे आणि तो ताण अगदी रोजचं जगणंही नासवून टाकायचा... वर्षानुवर्षं एकमेकांसोबत काढणाऱ्या भोवतालच्या अनेक जोडप्यांचे विसंवादी सूर बघीतल्यानंतर लग्न या बंधनाबद्दल आश्चर्य वाटू लागलं होतं. एका घरात एकत्र लहानाची मोठी झालेली भावंडं जिथे किरकोळ गोष्टींवरून एकमेकांचा गळा धरतात, तिथे पूर्णपणे अनोळखी व्यक्तीबरोबर अख्खं आयुष्य काढायचं असल्यास काय काय तपासून घ्यावं लागेल, असा प्रश्न मनात यायचा... शेवटी जे समोर येईल ते मान्य करून घेऊ, असं ठरवलेलं...
एकदा तर मजाच झाली. नियोजित वर आणि त्याचे आई-बाबा समोर बसलेले. सुरूवातीचं किरकोळ बोलणं सुरू होतं. मला या प्रकारात फारसा रस नव्हताच, पण मुलाच्या नजरेत थोडे गोंधळल्याचे भाव दिसले. काय झालं, अशा आशयाने मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, तर तो कुजबुजत म्हणाला, अगं, आपण भेटलोय आआधी असेच बहुतेक... आमचा तो त्रोटक संवाद आमच्या दोघांच्याही पालकांनी ऐकलाच. सगळ्यांचेच चेहरे कसनुसे... हो ना.. तरी मला वाटलंच... आमच्या मातोश्री... अरे, असं कसं झालं, त्याच्या मातोश्री... आम्ही दोघं मात्र एकमेकांकडे बघत मस्तपैकी हसत सुटलो... मग नाईलाजास्तव आमचे आई-बाबाही हसू लागले...
क्रमश:
जडण-घडण -
1 , 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 18
प्रतिक्रिया
9 Feb 2015 - 6:19 pm | खेडूत
:)
नेहमीप्रमाणेच हाही भाग आवडला !
9 Feb 2015 - 10:36 pm | बहुगुणी
पुढील भागाची प्रतीक्षा.
9 Feb 2015 - 6:23 pm | प्रियाजी
पण तुमचे विचार खुप पटले. लेख आवड्तातच. पण पुढे काय ? प्रतिक्षेत.
9 Feb 2015 - 11:05 pm | एस
:-)
मस्त!!
9 Feb 2015 - 11:53 pm | आनन्दिता
शेवटचा किस्सा !! :)
10 Feb 2015 - 6:56 am | मुक्त विहारि
आवडला...
10 Feb 2015 - 12:44 pm | नाखु
हे कुठल्या वर्षाबद्दल आहे माहीती नाही पण आजही यात तसूभरही बदल झाला नाही हे सत्य आहे.आणि घरच्यांच्या अपेक्षा याच आपल्या असं समजणारे/री असंख्य, चिमिचांगाच्या सत्यवाचनाशी पवित्र दानपोहोचेपर्यत होलपटत राह्तात.
10 Feb 2015 - 12:52 pm | सविता००१
भारी आहे.
तुमचं लिखाण नेहमीच आवडतं.तसंच याही वेळी. :)
12 Feb 2015 - 10:32 am | पैसा
खूप छान लिहिताय!
12 Feb 2015 - 11:10 am | स्नेहल महेश
पुढील भागाची प्रतीक्षा.
शेवटचा किस्सा !! Smile
12 Feb 2015 - 4:03 pm | इशा१२३
छान लिहिले आहे.पु.भा.प्र.
21 Feb 2015 - 5:38 pm | माधुरी विनायक
खेडूत, बहुगुणी, प्रियाजी, स्वॅप्स, आनन्दिता, मुक्त विहारी, नाद खुळा, सविता001, पैसा, स्नेहल महेश, इशा १२३ आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार.
नाद खुळा यांस - खरं आहे. साधारण १० वर्षांपुर्वीचा अनुभव आहे हा... आणि हो, पुढच्या १० वर्षानंतर तरी या परिस्थितीत बदल व्हावा, अशी अपेक्षा आहे :-)