नमस्कार मंडळी. आमच्या त्रिकोणी कुटुंबाचा चौकोन करणाऱ्या चौथ्या सदस्याचं अर्थात दुसऱ्या कन्येचं आगमन झालं, बरं का... सारं काही आलबेल.
अल्पविरामानंतर पुनश्च हरी ओम म्हणतेय. पण अल्पविराम थोडा लांबल्यामुळे फारसं एकटाकी लिहिता येत नाही, असं जाणवतंय. बघू, कसं जमतंय ते...
---------------------------------------------------------------------
जडण- घडण : 21
दोन तीन दिवसानंतर त्या मुलाने पुन्हा कॉल केला. अगदी सहज संवाद सुरू झाला आणि त्यानंतर वरचेवर बोलणं सुरू झालं. आधी एकमेकांच्या घरच्यांबद्दल, शिक्षण, नोकरीबद्दल गप्पा. नंतर आवडी-निवडी, वेगवेगळ्या विषयांवरचे विचार, नाटकं, चित्रपट, गाणी असे वेगवेगळे विषय बोलण्यात येत गेले. मग एकमेकांच्या स्वभावाबद्दल, दिसण्याबद्दल, असण्याबद्दलचं बोलणं, कधीतरी थट्टा मस्करी. आमच्याही नकळत एक निखळ नातं जुळू लागलं. गप्पा मैत्रीपूर्ण असल्या तरी ओळख भावी आयुष्याचा जोडीदार निवडण्याच्या निमित्ताने झाली होती. साधारण आठ-दहा दिवस गप्पा झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटीचा विषय निघाला. पण आई-बाबा तर गावी गेले होते. आमचं बोलणं होत असल्याचं त्यांच्या कानावर घातलं होतं, पण ते परत येण्यापूर्वी प्रत्यक्ष भेटणं मला पटत नव्हतं. माझं हे म्हणणं त्यानेही मान्य केलं आणि त्यामुळे आमची प्रत्यक्ष भेट जरा लांबणीवरच पडली. पण त्या काही दिवसांत गप्पा भरपूर झाल्या, आपण एकमेकांना आवडतोय, हे उलगडत गेलं आणि भेटायची असोशी वाटली तरी प्रत्यक्ष न भेटता अशाच गप्पा मारणंही आवडत गेलं.
साधारण पंधरा दिवसांनंतर आई-बाबा गावाहून परतले. निवांत झाले. मग मी त्या दोघांशी बोलले. पत्रिका पाहूनच लग्न ठरवण्याबद्दल आई-बाबा आग्रही होते. त्यानुसार माझ्या राशी-नक्षत्राशी जुळणाऱ्या राशी नक्षत्रांची यादीच त्यांनी तयार केली होती, हे मला तेव्हा समजलं. अच्छा.. तर मोहिमेत छाननी प्रक्रिया सोपी करण्यासाठी ही यादी. मला गंमतच वाटली. आई-बाबांनी कुरीयरमधून मिळालेल्या पत्रिकेची शहानिशा केली आणि आमच्या पत्रिका जुळत नाहीत, असं सांगितलं. अरे... आता काय... आई-बाबा गावाहून परतल्यानंतर प्रत्यक्ष भेटायचं असं आमचं ठरलेलं. आणि आता कळतंय की पत्रिका जुळत नाहीत. पण पत्रिका जुळत नाहीत म्हणून भेटायचं नाही? शक्यच नव्हतं. आमचं फोनवर बोलणं झालं आणि थोडंसं हसत, थोडंसं गंभीरपणे आमच्या पत्रिका जुळत नसल्याचं मी त्याच्या कानावर घातलं. तर त्याचा प्रश्न... बरं... कधी भेटतोय आपण मग... रविवारी का...
एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचं, हे आम्हाला दोघांनाही पक्कं ठाऊक होतं. त्या एक-दोन दिवसात आई-बाबांनी आणखी दोन मुलांच्या घरच्यांशी बोलून घेतलं होतं. रविवारी दुपारनंतर त्या दोघांना भेटायचंय, असं मला आई-बाबांनी सांगितलं. आता मात्र मला राहवेना. मी त्या दोघांनाही समोर बसवलं. म्हटलं, गेले काही दिवस मी या मुलाशी बोलतेय. आम्ही एकमेकांशी बरंच बोललोय, वेगवेगळ्या विषयांवर बोललोय आणि छान होतंय बोलणं आमचं. आम्हाला प्रत्यक्ष भेटू द्यात. मला आणखी मुलं बघावी, असं नाही वाटत आता. किमान आम्हाला प्रत्यक्ष भेटू द्यात. तुम्ही बोला दोघं आणि ठरवा काय ते. आई-बाबा एकमेकांशी बोलले. रविवारी सकाळी आम्ही दोघांनी भेटावं आणि संध्याकाळी मी आई- बाबांसोबत त्या दोन मुलांनाही भेटावं, असं ठरलं.
सध्या वाद नको, असं म्हणून मी होकार दिला आणि पुढच्या रविवारी आम्ही पहिल्यांदा भेटलो. अनोळखी व्यक्तीला पहिल्यांदा भेटताना वाटणारा नवखेपणा आमच्यात अजिबातच नव्हता. सवयीच्या मित्राशी काल अर्धवट राहिलेलं बोलणं पुढे सुरू राहावं, तितक्या सहज आम्ही बोलत होतो. बोलता-बोलता बराच वेळ निघून गेला. चला, मी निघते आता, म्हणत मी उठले तर समोरून प्रश्न.. एवढाच वेळ काढून आलीस का. दुपारनंतर आणखी दोन मुलं बघायची मोहिम आहे, हे त्याला सांगितलं आणि परतायला उठले.
मग, भेटणार आहेस का दोघांनाही...
आता यापुढे माझ्या वरसंशोधनाला आणि त्याच्या वधूसंशोधनाला पूर्णविराम, यावर आमचं एकमत झालं. आम्ही आपापल्या घरी परतलो. त्याच दिवशी दुपारनंतर इतर दोन मुलांनाही भेटून झालं, पण ते अगदी तटस्थपणे. मी तटस्थ असले तरी आई-बाबा नव्हते ना. त्यांनी संध्याकाळी पाहिलेल्या दोन मुलांबद्दल मला विचारलं. जणु काही सकाळी मी आणखी एकाला भेटलेय, तेसुद्धा स्वत: पुढाकार घेऊन, हे त्यांच्या गावीच नाही. संध्याकाळी पाहिलेल्या दोन्ही मुलांबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आणि सकाळी ज्याला भेटले, त्यानंतर मला लग्नासाठी आणखी मुलं बघायची नाहीत, हे मी ठामपणे पुन्हा एकदा सांगितलं. त्यांची प्रतिक्रिया फारच अनपेक्षित.
त्या मुलाची आणि तुझी पत्रिका जुळत नाही. तुला आधीच सांगितलं. एकदा भेटायचंय म्हणालीस, मग भेटा म्हटलं. त्याबाबतीत पुढे नाही जाता येणार.
मी हतबुद्ध. म्हटलं, आजवर इतकी मुलं पाहिली. निवड पूर्णपणे तुमच्यावर सोपवली. पण आता मला या सगळ्याचा खरंच कंटाळा येऊ लागलाय. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आम्ही दोघं गेले काही दिवस बोलतोय, एकमेकांना आवडतोय, हे कळू लागलंय. हा मुलगा, बाबा, तुमच्याच ओळखीतला. म्हणजे घर, कुटुंब, गाव आणि बाकीच्या गोष्टी नीट असल्याशिवाय तुम्ही पत्रिका मागवली नाही. आणि आता फक्त पत्रिका जुळत नाही म्हणून तुमचा नकार...
आई-बाबांना माझी अशी प्रतिक्रिया अनपेक्षित असावी. खरं तर या बाबतीत मी इतक्या ठामपणे बोलतेय, याचं त्यांना आश्चर्यही वाटलं. पण ते त्यांच्या मतावर ठाम होते.
अशा बाबतीत माझे आईबाबांशी वाद होऊ शकतील, असं मला कधीच वाटलं नव्हतं, त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलेलं. पण त्याच वेळी मी माझ्या मुद्द्यावर ठाम. एक विचित्र ताण वाटू लागला. आई-बाबांशी या बाबतीत आजवर इतकं तपशीलवार मोकळेपणाने बोलणं झालं नव्हतं, त्यामुळे मला आणखी आग्रही बोलायला संकोच वाटला. तो विषय तिथेच थांबवून मी उठलेच.
आणखी काही दिवस मध्ये गेले. घरात नेहमीसारखं बोलणंही सुरू झालं. माझं आणि त्याचं बोलणंही सुरू राहिलं. फक्त एक झालं. आमचं बोलणं सुरू आहे, हे मी घरात सांगितलं नाही. ते आवर्जून सांगावं तर त्यातून पुन्हा विषय भलतीकडे जायचा अशी धास्ती असावी.
आम्हा दोघांना एकमेकांकडे पसंतीची कबुली द्यावी लागली नाही. जसं काही ते आम्हाला आपसूकंच कळलं होतं. जवळ-जवळ रोज बोलणं होत होतं. फार क्वचित भेटणं. अगदी माझ्या कामाच्या ठिकाणाच्या जवळपास तो असेल, तर तेव्हा भेट व्हायची.
घरात हा विषय पुन्हा निघणं अपरिहार्य होतं. काही दिवसानंतर मातोश्रींनी आणखी काही फोटो दाखवले आणि त्या मुलांची माहिती द्यायला सुरूवात केली. मी तिला थांबवलं. आधीचंच पुन्हा एकदा सांगितलं. पुन्हा एकदा तिच्याकडून आधीचंच सगळं ऐकलं आणि वैतागलेच.
आतापर्यंत मला कोणत्याही बाबतीत पूर्ण विचारांती माझे निर्णय घेऊ देणारे, माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत असणारे आई-बाबा या बाबतीत इतके ताठरपणे का वागताहेत, हे कळेनासं झालं होतं. ते दोघं न जुळणाऱ्या पत्रिकांचा मुद्दा घेऊन बसले होते, तर आम्ही दोघं एकमेकांना पसंत असताना फक्त या एका कारणासाठी नकार देणं मला पटत नव्हतं. आम्ही सगळेच आपापल्या मुद्द्यांवर ठाम होतो. शेवटी मी म्हटलं, मला आणखी काही बोलायचं नाही. यापुढे आणखी मुलं बघायची नाहीत. तुम्हाला बघायची असतील, तर तुमची मर्जी. मला मात्र त्यात घेऊ नका. यापुढे मी मुलं बघायला तुमच्या सोबत नसेन, एवढं नक्की.
मी निर्वाणीचा सूर लावला, तेव्हा कदाचित आई-बाबांना माझ्या बोलण्यातलं गांभिर्य जाणवलं असावं. कृष्णमूर्ती ज्योतिषावर आधारीत पुस्तकाचा अनुवाद मी तेव्हा करत होते. मूळ लेखकांशी तोवर उत्तम परिचय झाला होता. त्यांना एकदा पत्रिका दाखवावी का, असं सुचवलं. दोन दिवसांत त्यांच्याकडे पत्रिका नेल्याही. पण त्यांनी सुद्धा पत्रिका जुळत नसल्याचं सांगितलं. दुसरीकडे आम्ही मात्र मनाने एकमेकांना इतकं स्वीकारलं होतं की आमचं लग्न होणार याची खात्रीच होती.
मी माझ्या मतावर ठाम होते. आई-बाबांनी किमान एकदा त्याला भेटावं, असा आग्रह मी धरला. आमच्या घरीच ती भेटही झाली. सुरूवातीची ओळख आणि जुजबी बोलणं झालं. नंतर काही कारण काढून आईने मला आत बोलावलं आणि बाबा एकटेच त्याच्याशी बोलले. काही वेळाने तो जायला निघाला. आमची नजरभेट झाली, तर त्याच्या डोळ्यात अगम्य भाव होते. नंतर बोलू, असं नजरेनेच सांगत तो निघाला.
तो कसा वाटला, हे आई-बाबांना विचारलं. त्यावर त्यांचं उत्तर, मुलगा चांगला आहे, पण पत्रिका जुळत नाही ना... नेमकं काय बोलणं झालं यांच्यात.. मी काहीशी अस्वस्थ झाले. स्वत:हून बाबांशी त्याबद्दल विचारावं, असं नाही वाटलं. दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. त्याच्याकडून जे समजलं, ते ऐकल्यावर हसावं की रडावं, हे कळेना...
बाबा त्याच्याशी खूप शांतपणे बोलले होते. त्याची पूर्ण माहिती विचारून घेतल्यानंतर आमच्या पत्रिका जुळत नाहीत हे पुन्हा एकदा त्याला सांगितलं होतं आणि कहर म्हणजे...
आम्हीही मुलं बघतोच आहोत. मुलीही आहेत बघण्यात. तुम्हाला साजेशी मुलगी परिचयात आली, तर तुम्हाला नक्की सांगू. तुमच्या नजरेतही एखादा अनुरूप मुलगा असेल, तर तुम्ही आम्हाला सुचवा... असं बाबांनी अगदी गंभीरपणे, मनापासून, आवर्जून सांगितलं होतं...
क्रमश:
जडण-घडण - 1, 2 , 3 , 4 , 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 16 , 17 , 18 , 19 , 20
प्रतिक्रिया
3 Jul 2015 - 3:50 pm | कपिलमुनी
बर्याच गॅपमुळे जुने लेख पुन्हा चाळावे लागणार . पुलेशु
3 Jul 2015 - 4:40 pm | एस
लगेच उघडून वाचला. तेव्हाची परिस्थिती आणि मनःस्थिती संयत, पण परिणामकारकपणे रंगवली आहे.
आणि अर्थातच अभिनंदन!
3 Jul 2015 - 7:07 pm | असंका
ह्म्म्म्म... मोठा सुस्कारा....
आणि इतक्या तटस्थपणे आणि मोकळेपणे लेख लिहू शकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
धन्यवाद!
3 Jul 2015 - 7:19 pm | सविता००१
सुंदर लिहिता फार.
पुभाप्र
3 Jul 2015 - 7:22 pm | मुक्त विहारि
स्वतःच्या गतकाला बद्दल इतक्या तटस्थपणे बघणे फार कमी लोकांना जमते.
3 Jul 2015 - 8:30 pm | अजया
अभिनंदन आधी!
नेहमीप्रमाणेच गुंतवलंत वाचण्यात!पुभाप्र.
3 Jul 2015 - 10:51 pm | राघवेंद्र
पुढील भाग लवकर टाका. हा भाग आवडला.
7 Jul 2015 - 3:15 am | रातराणी
अभिनंदन!
पूर्ण मालिका वाचली. छान लिहिताय.
8 Jul 2015 - 3:07 pm | उमा @ मिपा
कोणताही आविर्भाव न ठेवता अतिशय प्रांजळपणे ओघवत्या भाषेत केलेलं लिखाण.
एकविसावा भाग वाचला आणि हे लिखाण अजूनपर्यंत कसं वाचनात आलं नाही, याची खंत वाटली. पण लगेचच एक ते एकवीस भाग सलग वाचले, ती क्रमशः ची उत्सुकता टळली याचा खूप आनंद झाला. मस्त रंगून गेले वाचताना.
तुमची जडण-घडण खूप छान आहे आणि तुम्ही ती अप्रतिम पद्धतीने पोहोचवताय आमच्यापर्यंत.
दुसऱ्या कन्येच्या आगमनाबद्दल आणि सर्व काही आलबेल असल्याबद्दल अभिनंदन!
पुभाप्र.
8 Jul 2015 - 3:21 pm | नाखु
लेखाचा आवेग आणि तटस्थता छान तोलली आहे.
8 Jul 2015 - 4:07 pm | कपिलमुनी
हा डायलॉग कहर आहे हो :)
9 Jul 2015 - 11:49 pm | एस
आणि याचे उत्तर कोणी असे दिले असते -
"हो, आहे ना! हा काय तुमच्यासमोरच उभा आहे."
9 Jul 2015 - 1:15 pm | असंका
पुढचा भाग जरा लवकर येउ द्या अशी विनंती....
9 Jul 2015 - 1:25 pm | खेडूत
अभिनंदन!
पुभाप्र.....
9 Jul 2015 - 4:56 pm | अभिजीत अवलिया
वेलकम बॅक माधुरीजी. हाही भाग जबरदस्त. पुढील भाग पटापट टाकावेत ही विनंती.
9 Jul 2015 - 11:40 pm | मयुरा गुप्ते
माधुरी, तुमचे व तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन!
हा ही भाग छान झालाय.
--मयुरा.
13 Jul 2015 - 4:04 pm | माधुरी विनायक
धन्यवाद मंडळी... कपिलमुनी, स्वॅप्स, कंफ्युज्ड अकौंटंट, सविता001, मुक्त विहारी, अजया, राघव ८२, रातराणी, उमा @ मिपा, नाद खुळा, खेडूत, अभिजीत अवलिया, मयुरा गुप्ते आणि सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार. लिखाणाचा वेग कायम ठेवायचा प्रयत्न कायम राहिल.
14 Jul 2015 - 2:56 pm | क्रेझी
घरामधे आलेल्या छोटूल्या परीबद्दल हार्दिक अभिनंदन :)
आज एका दमात सगळे भाग वाचून काढले तुमचं आयुष्य खूप रंगतदार आहे, खुप मजा येत आहे वाचायला, पुढचे भाग शक्य तितक्या लवकर टाका :)
22 Jul 2015 - 2:25 pm | माधुरी विनायक
धन्यवाद क्रेझी...