जडण-घडण...2

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
20 Jun 2014 - 2:53 pm

शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं...
शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली?
थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे. घरातून निघताना प्रवासाचा त्रास होऊ नये, म्हणून गोळी घेतलेली असायची. मनात असंख्य विचार. शाळेला नुकतीच सुट्टी लागलेली, तिथल्या आठवणी, गावी जायची ओढ, तिथल्या मागच्या वर्षीच्या आठवणी, सुट्टीत सगळ्या भावंडांनी एकत्र येऊन करायची मज्जा असलं सगळं मनात घोळत असायचं. गाढ झोप लागायची. पुन्हा झोपेत तेच सगळं. त्यामुळे झोपुन उठलो की चक्क सुट्टी संपवून आपण मुंबईच्या घरी परततोय असं वाटू लागायचं, मॅडसारखं.
डोक्यात गोंधळ, आठवणींची सरमिसळ आणि अचानक आजुबाजुची हिरवी गर्द झाडी बघुन "अच्छा. आता आपण गावी पोहोचतोय. सुट्टी संपली नाही, आत्ता सुरू होतेय." असा विचार येऊन खुदकन हसूच यायचं. ताई, लहान भाऊ, आई-बाबा अजून गाढ झोपेत दिसायचे आणि मी मात्र हट्टाने मागून घेतलेल्या खिडकीतल्या सीटवर बसून बाहेरची चाहूल घेत रमून जायचे.
गावच्या घराला दोन दरवाजे. मागचा आणि पुढचा. आजी एकटी राहायची गावी. तिला करमायचंच नाही मुंबईत. सगळी वाडी तिला 'गे आई' म्हणून हाक मारायची. आजी पेज बनवून आमची वाट बघत असायची. बहुतेकदा खळ्यात (अंगणात) बसलेली. आई-बाबा सामान घेऊन घरी पोहोचेपर्यंत आम्ही आजीची नजर चुकवून मागच्या दाराने घरात शिरायचो, आजीची गंमत करायला. तिला मात्र बरोबर चाहूल लागायची आमची. आधी रागवायचीच ती, 'किती वेळा सांगितलं तुम्हाला, असं मागच्या दारातून येऊ नये घरात...' मग प्रेमाने जवळ घ्यायची, चेहऱ्यावरून हात फिरवायची आणि आधी परीक्षेचा निकाल विचारायची. मनाप्रमाणे उत्तरं मिळाली, की खुशीत हसायची.
एका वर्षी माझा एक आत्तेभाऊ पहिल्यांदाच गावी आला होता. चालत येताना तो मध्ये कुठेतरी थांबला आणि बरोबरचे बाकी सगळे घरी आले. थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाने आजीला हाक मारली.
गे आई, नातू इलो काय गे?
होय रे, खंय रवलो, तुका दिसलो काय?
अगे, तो गुरूच्या ढोरांका पारले ची बिस्कीटा खावंक घालता...
इतकं सांगून तो हसत-हसत निघून गेला. आमचे ते बंधुराज गुरू आजोबांच्या गोठ्यात गाईच्या तान्हुल्या वासराला पारलेची बिस्कीटं खाऊ घालण्यात रमले होते तर... मग आम्हा मुलांची गोठ्यात वरात... त्याला परत आणायला... असलं ते सगळं...
गावी गेलं, आंघोळ, पेज आणि पेजेसोबत शेजारच्या आजीने दिलेली भाजी अशी मस्त न्याहारी झाली की आम्ही मुलं सुटायचो. ती पेज आणि भाजी. चुलीवर शिजवलेली पेज आणि परसातली ताजी, भरपूर ओलं खोबरं पेरलेली गरमागरम भाजी. खास जुन्या घाटणीच्या वाडग्यासारख्या मोठ्या भांड्यातून पेज आणि भाजी ठेवण्यासाठी भेंडीच्या झाडाची ताजी पानं. ती पानं स्वच्छ धुवून, त्यावर भाजी वाढून घ्यायची. या काळपट हिरव्या पानांची पिपिणी सुद्धा मस्त वाजते, बरं का. तर, पेज-भाजी खावून संपली की आपलं भांडं आपण विसळून टाकायचं, भेंडीचं पान गायरीत आणि सगळ्यात शेवटी उठेल त्यानं जमिनीवरून शेणाचा गोळा फिरवायचा. त्याची रवानगी सुद्धा गायरीत आणि मग आमची भटकंती सुरू...

पहिला भाग इथे वाचता येईल
http://www.misalpav.com/node/28093

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jun 2014 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

असे म्हणायची फॅशन आहे मिपावर *lol*

आता सवडीने वाचतो

एस's picture

20 Jun 2014 - 3:36 pm | एस

पुभाप्र

रेवती's picture

20 Jun 2014 - 5:05 pm | रेवती

छान लिहिलय.

मुक्त विहारि's picture

20 Jun 2014 - 5:29 pm | मुक्त विहारि

पुभाप्र...

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2014 - 7:06 pm | स्वाती दिनेश

वाचून छान वाटले,
पुभाप्र,
(स्मरणरंजनात दंग)स्वाती

भाते's picture

20 Jun 2014 - 10:41 pm | भाते

छान लिहिलंय. पुभाप्र...

माधुरी विनायक's picture

23 Jun 2014 - 11:54 am | माधुरी विनायक

मनापासून धन्यवाद. आठवतंय तसं लिहितेय.

अनिता ठाकूर's picture

23 Jun 2014 - 12:12 pm | अनिता ठाकूर

*i-m_so_happy*

कुसुमावती's picture

25 Jun 2014 - 5:52 pm | कुसुमावती

लेख जमलाय. बाकी मॅडसारखं वाचुन लंपनची आठवण आली.

पैसा's picture

27 Jun 2014 - 7:27 pm | पैसा

आवडलंच!