हे चित्र प्रत्येक भागावर असेल........
अजंठा :
‘त्या काळ्याकुळकुळीत कातळावर पडलेली उन्हं हळुहळु लालसर होऊ लागली आणि त्या अर्धवर्तुळाकार घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या घळीच्या दुसऱ्या टोकाला सुर्यबिंब मावळू लागले. त्या सुर्याच्या रेंगाळणाऱ्या किरणांनी प्रथम बुद्धाच्या चरणकमलांचे दर्शन घेतले. थोड्यावेळ बुद्धाच्या शांत स्मितहास्य असणाऱ्या चेहऱ्यावर रेंगाळत त्याने बुद्धाला दुसऱ्या दिवशी परत येण्याचे वचन दिले व तो नाहीसा झाला. त्या संधिप्रकाशात आता हिरवी दाट झाडी अजुनच गडद भासू लागली. पडणाऱ्या पाण्याच्या आवाजात पक्षांनी आपला आवाज मिसळला व त्या घळीत गंभीर शांतता व त्याचा भंग करणाऱ्या आवाजाची एकच जुगलबंदी उडाली. पण ज्याप्रमाणे जुगलबंदीचा त्रास होत नाही त्याचप्रमाणे त्याचाही त्रास होत नव्हता. काळोख पसरणार त्याच्या आधी एकच क्षण तेथे तेलाचे दिवे पेटले आणि वातावरण उजळून निघाले. त्या उजेडात चंद्राचा प्रकाश मिसळला व त्यात अनेक भिक्खू इकडे तिकडे लगबग करु लागलेले दिसू लागले. त्या काळ्याकुट्ट अंधारात त्या दिव्यांच्या प्रकाशातील सावल्यांचा खेळ अतिशय रम्य वाटत होता. वातावरण अत्यंत पवित्र व भारावून टाकणारे. चंद्राचा प्रकाश दरीतील पाण्याला स्पर्ष करण्याचा प्रयत्न करीत असतानाच गंभीर आवाजात बुद्धाची वंदना सुरु झाली. पिवळे, केशरी, लालसर रंगाचे कपडे परिधान केलेले बौद्ध भिक्खू त्या विस्तिर्ण चैत्यात स्थानापन्न झाले. त्याच वेळी जवळपसच्या गावातील गावकरी त्यांनी आणलेल्या वस्तूंची भेट सादर करु लागले. राजाने नेमलेले अधिकारी ते जमा करुन त्याची नोंद करु लागले....’
महापरिनिर्वाण.....
"आनंदा, माझ्यानंतर तुम्ही म्हणाल की आमचा गुरु आता राहीला नाही. आता आम्हाला कोण ज्ञान देणार. पण लक्षात ठेवा, मी जे आत्तापर्यंत शिकविले आहे तेच तुमचा गुरु आहे. त्याबद्दल कोणाला काही शंका असल्यास आत्ताच विचारुन घ्या म्हणजे मी असताना विचारले नाही अशी खंत तुमच्या मनात रहायला नको" - गौतमबुद्ध मरण्याआधी.
(सर्व लेणी खर्या अर्थाने बघत जेव्हा आपण या लेण्यात येतो व या थोर माणसाचे, बुद्धाचे निर्वाणशिल्प बघतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.)
हे वर्णन काही ह्युएनत्संगने केलेले नाही. अजंठा त्या काळात कसे दिसत असेल याचा मी केलेला कल्पनाविलास आहे. जेव्हा आपण अजंठाला भेट देतो तेव्हा त्याकाळी म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात तेथे कसे दिसत असेल हा विचार आपल्याला एक क्षणभरही सोडत नाही. अर्थात तेथील सगळी लेणी काही ख्रिस्तपूर्व काळात खोदलेली नाहीत पण आपण आता ते सर्व पुढे बघणारच आहोत. या लेखमालिकेत (किती भाग ते आत्तातरी माहीत नाही) अजंठाबद्दल जमेल तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. तसेच या कलाकारांनी जी चित्रे रेखाटली आहेत त्यामागच्या जातक कथां/त्यांची कला, ही चित्रे कशी रेखाटली गेली, त्यामागे त्यांना काय तयारी करावी लागली इत्यादी गोष्टींचीही माहिती घेऊ. त्याआधी ज्या राजांनी अजंठाला मदत केली किंवा ज्यांच्या मदती शिवाय ही लेणी आत्ता ज्या स्वरुपात आहेत तशी जन्मालाच येऊ शकली नसती त्या राजघराण्यांबद्दल थोडी माहीती घेऊ.......अर्थात मी काढलेली छायाचित्रेही सोबत असतीलच. आपल्याला ती आवडतील अशी आशा आहे........
सातवाहनांच्या अधोगतीनंतर दक्षिणेत जे राजे उदयास आले त्यात वाकाटकांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. २५० साली विंध्यशक्ती नावाच्या राजाने या साम्राज्याचा पाया घातला. एका शिलालेखात त्याला द्विज असे म्हटले असल्यामुळे सातवाहनांनंतर हे दुसरे ब्राह्मण घराणे व साम्राज्य उदयास आले असे म्हणतात. अनेक शिलालेखांवर यांचे गोत्र ‘विष्णूवृद्ध’ म्हणून कोरलेले आढळते. वाकाटकांचे साम्राज्य बऱ्यापैकी पसरले होते. उत्तरेला त्यांच्या साम्राज्याच्या सीमा माळवा व गुजरातला भिडल्या होत्या तर दक्षिणेला तुंगभद्रेला. पश्चिमेला अरेबियन महासागर तर पूर्वेला बंगालचा उपसागर. ते स्वत: अत्यंत सुसंस्कृत व काव्य शास्त्र व विनोद यांची चांगली जाण असणारे होते. त्यांचे हे गुण त्यांच्या सर्व पिढ्यात उतरले होते. असे उदाहरण विरळाच. वाकाटकांनी संस्कृत व प्राकृत भाषेला राजाश्रय दिला व स्वत: त्यात अनेक काव्ये व सुभाषिते रचली. त्यांनी दिलेल्या राजाश्रयातून वैधर्भी व वाच्छोमी (वत्सगुल्म शाखा) या पोटभाषा तयार झाल्या ज्याचा वापर करण्याचा मोह कालिदासालाही आवरता आला नाही. या राजांनी रचलेल्या गाथांचे कौतुक बाण, द्ंडिन, कुंटक व हेमचंद्र सारख्या कवींनीही केले आहे. हे सगळे कवी भाट नव्हते हे लक्षात घेता त्याचे महत्व कळेल. त्यांनी व त्यांच्या अमात्यांनी बांधलेली अनेक देवळे काळाच्या उदरात लोप पावली असतील पण अजंठावरुन त्यांनी काय बांधले असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत वाकाटकांसारखे सम्राट झाले नाहीत हे आता बऱ्याच जणांना मान्य झाले आहे. पुराणातही विंध्यशक्तीचा उल्लेख दिसतो पण दुर्दैवाने काही तज्ञांनी त्याचा उल्लेख यवन किंवा परकीय असा केल्यामुळे वाकाटकांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले ते १८६२ पर्यंत. त्यानंतर मात्र काही ताम्रपट सापडल्यामुळे वाकाटक राजे खऱ्या स्वरुपात जगासमोर आले. त्या सर्व संशोधनात आपण आत्ता जायला नको. गुप्त घराण्यातील महाराजाधिराज चंद्रगुप्त-२ याची मुलगी त्याने वाकाटकांच्या रुद्रसेनाला दिली होती यावरुन वाकाटकांची सत्ता किती प्रबळ झाली असेल याची कल्पना आपण करु शकतो. कुशाणांशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी कर्मठ हिंदुत्व स्वीकारले ज्याचाच परिपाक म्हणून कर्मठ हिंदू धर्म पसरला असेही काही तज्ञ म्हणतात. आता आपण सर्वसाधारणपणे मान्य असलेली वाकाटकांची वंशावळ पाहू (नेहमीप्रमाणे बंगाली इतिहासतज्ञांनी वेगळी वंशावळ मांडली आहे पण महामहोपाध्याय श्री. मिराशींच्या संशोधनापुढे त्याला फार महत्व देण्याचे मला कारण वाटत नाही.)
वाकाटकांच्या मुख्य शाखेची वंशावळ-
विंध्यशक्तीने २५० साली राज्याची स्थापना केली. त्याने साधारणत: वीस वर्षे राज्य केले. त्यानंतर २७० साली गादीवर आला प्रवरसेन. त्यानंतर वाकाटकांच्या दोन शाखा झाल्या (हे बऱ्याच काळ माहीत नव्हते). एकाला आपण मुख्य शाखा म्हणू तर दुसरी वत्सगुल्म शाखा म्हणून ओळखली जाते. वत्सगुल्म म्हणजे खुरटी झाडे किंवा झुडपांचा प्रदेश. कदाचित मुख्य शाखेसमोर स्वत:ला झुडुप समजण्याचा त्यांचा मोठेपणा असेल पण तीही शाखा मुख्य शाखेइतकीच कर्तबगार होती. खाली वाकाटकांची वंशावळ दिली आहे. (याचा दुसरा अर्थही पुढे दिलेला आहे)
प्रारंभी काही इतिहासतज्ञांच्या मते वाकाटकांचे स्थान हे उत्तरेकडे होते पण आता संशोधनांती ते दक्षिणेत होते हे मान्य झाले आहे. मग कुठे होते ते? ताम्रपटाचा उपयोग स्थान ठरविण्यास फारसा होत नाही कारण ते प्रवास करु शकतात. अर्थात दगडांवर कोरलेले शिलालेख मात्र या कारणासाठी बरेच उपयोगी पडतात. अशाच अनेक शिलालेखांचा उपयोग करुन असे अनुमान काढता येते की वाकाटकांची राजधानी आंध्र व विदर्भात असावी. काही लोकांनी नाणेशास्त्र वापरुन वेगळे मत मांडण्याचा प्रयत्न केला पण वाकाटकांनी स्वत:ची नाणी कधीच पाडली नाहीत असे वाटते. ते गुप्तांचीच नाणी वापरात आणत.
सातवाहनांचा शेवटचा राजा पुलुमावी होता असा उल्लेख आपल्या पुराणात आहे. त्याचे राज्य उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तुंगभद्रा या मेधे पसरले होते असे म्हणतात. त्याच्या नंतर ते साम्राज्य लयास जाऊन अनेक राजे उदयास आले. उदा. श्रीपार्वती, आंध्र, अभीर, गर्दभिल्ल, शक, यवन, तुषार, मुरुंद, हून इ.इ... आश्चर्य म्हणजे पुराणातील या यादीत वाकाटकांचे नाव नाही. पुराणात विंध्यशक्तीचे नाव आहे पण दुसऱ्या घराण्यात. वाकाटकांचा खरा उदय त्याच्या मुलापासून झाल्यामुळे कदाचित असे झाले असावे. अजंठाच्या शिलालेखात विंध्यशक्तीचे मोठे गुणगान गाईले आहे. त्यात त्याने मोठमोठ्या लढाया मारल्या, त्याच्याकडे मोठे घोडदळ होते ज्याच्या सहाय्याने त्याने अनेक राजांचा निर्णायक पराभव केला असा उल्लेख आढळतो. त्याचा मुलगा प्रवरसेन मात्र अत्यंत बलाढ्य झाला. त्याने त्याच्या हयातीत सात अश्र्वमेध यज्ञ केले. त्याने अनेक बिरुदे धारण केली होती. वैदीक धर्माचा खंदा पुरस्कर्ता असूनसुद्धा त्याने बौद्ध धर्मासाठी बरेच दानधर्म केल्याचे आढळते. त्याने उत्तरेकडे असलेल्या शैव नागा राजांशी नातेसंबंध जोडले. हे राजे बहुदा विधर्भावर राज्य करत होते. कदाचित अजंठामधे असलेल्या नागाराजाची चित्रे हेच सुचवित असावीत. या प्रवरसेनाचा पंतप्रधान होता देव नावाचा एक ब्राह्मण. अजंठाजवळील घटोत्कच गुहेत असलेल्या शिलालेखात याचा स्पष्ट उल्लेख आहे. याचा राजावर व प्रजेवर फार प्रभाव होता. हा स्वत: कर्मठ हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता परंतु अजंठाची मदत याच्या काळातही चालूच होती. हे पंतप्रधानपद देवाच्या घराण्यात पुढे अनेक वर्षे वंशपरंपरेने चालू होते.
प्रवरसेनाचा मुलगा त्याच्या आधीच स्वर्गवासी झाल्यामुळे त्याचा नातू रुद्रसेन-१ याने ३३० साली राज्यारोहण केले. अनेक शिलालेखात याचा उल्लेख भावनागाच्या मुलीचा मुलगा असा केला गेला आहे. यावरुन नागराजा महाराजा भारशिव याचा त्याच्या नातवाला भरभक्कम पाठिंबा होता हे कळते. रुद्रसेन हा महाभैरवाचा भक्त होता. आपल्याला माहितच आहे की महाभैरव हा दक्षाचा नाश करण्यासाठीचा शिवाचा अवतार आहे. हा रुद्रसेन बहुदा समुद्रगुप्तचा समकालीन असावा. वैशालीच्या लिच्छवी घराण्याच्या मदतीने समुद्रगुप्ताने उत्तरेकडील अनेक नागराजांचा उच्छेद केला त्यात कदाचित रुद्रसेनाचा आजोबा भावनागही होता. त्याने या युद्धात नागराजांची मदत केली का नाहे हे ज्ञात नाही पण या युद्धांमधे त्याचा एक आधार गेला हे खरे. समुद्रगुप्तांच्या सैन्याने उत्तरेचे राजे मांडलिक केल्यावर त्याने आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. कोसलच्या महेंद्र राजाचा पाडाव केल्यावर त्याचा दक्षिणेकडे जायचा मार्ग मोकळा झाला. हा बहुदा वाकाटकांचा मांडलिक असावा. कारण त्याचा पराभव झाल्यावर वाकाटकांच्या अनेक मांडलिकांनी त्यांचे बंधन झुगारुन दिले व ते समुद्रगुप्ताला सामील झाले. या सगळ्या धामधुमीत रुद्रसेनाने आपले स्वातंत्र्य टिकवले पण त्याचे तुकडे पडले. समुद्रगुप्तानेही वाकाटकांच्या मांडलिकांचा पाडाव करताना आलेल्या अनुभवातून धडा घेऊन बहुदा रुद्रसेनाशी युद्ध टाळले असावे. अर्थात समुद्रगुप्ताला उत्तरेकडील आक्रमकांना तोंड देण्यासाठी दक्षिणेकडे शांतता हवी असणारच. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर समुद्रगुप्त व रुद्रसेन यांचा संघर्ष झाला नसावा.
रुद्रसेनानंतर त्याचा मुलगा पृथ्वीसेन-१ ३५० साली गादीवर आला. याची किर्ती त्याच्या गुणांनी पसरली. तो सत्यवचनी, अत्यंत प्रामाणिक, दानशूर, संयमी असा राजा होता. त्याच्या या गुणांमुळे त्याची तुलना पांडवांच्या युधिष्टीराबरोबर होत असे. उत्तरेला गुप्तांनी आक्रमक धोरण स्वीकारले असताना याने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी शांततेचे धोरण स्वीकारले. या धोरणामुळे त्याच्याकडे संपत्तीचा अखंड ओघ सुरु झाला. पृथ्वीसेनाने त्यामानाने बरीच वर्षे राज्य केले. शेवटच्या काळात म्हणजे साधारणत: ३९५ साली उत्तरेचा अनभिषिक्त राजा झाल्यावर चंद्रगुप्त-२ याने माळवा व सौराष्ट्राच्या शक क्षत्रपांकडे लक्ष वळविले. या लढायांना तात्कालिक कारणे काय घडली हे ज्ञात नाही परंतु बहुदा माळवा, गुजरात व सौराष्ट्राची सुपीक जमीन याला कारणीभूत असावी. या बलाढ्य क्षत्रपांचा पाडाव करण्यासाठी समुद्रगुप्ताला वाकाटकांची मदत घ्यावी लागली यातच सगळे आले. अर्थात पृथ्वीसेन व समुद्रगुप्ताच्या सैन्यापुढे क्षत्रपांचा निभाव न लागल्यामुळे ते या काळात इतिहासाच्या पानावरुन नाहीसे झाले. याच लढायांनंतर समुद्रगुप्ताने आपली दुसरी राजधानी उज्जैन येथे स्थापन केली. याच सुमारास वाकाटकांशी असलेले संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून त्याने आपली मुलगी प्रभावतीगुप्त वाकाटकच्या पृथ्वीसेन याच्या मुलाला म्हणजे रुद्रसेन्-२ याला दिली.
पृथ्वीसेन त्याच्या वडिलांसारखाच शैवधर्मीय होता. त्याच्या काळात वाकाटकांची राजधानी रामटेकजवळ (नागपूरजवळ) हलली. या राजधानीजवळच गुघुसगड व भिवगड नावाचे किल्ले असल्यामुळे तो निर्णय घेण्यात आला असावा.
पृथ्वीसेननंतर त्याचा मुलगा रुद्रसेन-२ हा गादीवर आला. हाच चंद्रगुप्त-२-विक्रमादित्य याचा जावई होता. त्याच्या पूर्वजांशी बंडखोरी करुन याने विष्णूची पूजा आरंभिली. कदाचित ते त्याच्या आईमुळे झाले असावे कारण तिचे वडील विष्णूचे भक्त होते. विष्णूच्याच एका अवतारावर म्हणजे श्री रामावर तिची कमालीची भक्ती होती हे तिच्या रामगिरी (हल्लीचे रामटेक) येथे सापडलेल्या दानपत्रावरुन समजते. रुद्रसेन-२ ४०५ साली मेल्यावर त्याच्यामागे त्याची दोन मुले दिवाकरसेन व दामोदरसेन यांनी पाठोपाठ राज्य सांभाळले. दिवाकरसेन जेव्हा गादीवर बसला तेव्हा तो वयाने लहान होता पण त्याच्या आईने त्याला गादीवर बसवून स्वत: राज्याचा कारभार हाकला. या कामात तिला तिच्या वडिलांचे मार्गदर्शन झाले असणार यात शंकाच नाही. चंद्रगुप्ताने तिच्या मदतीस आपले काही मंत्री पाठविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच होता श्रेष्ठकवी कालिदास. विदर्भात असतानाच त्याने मेघदूतातील रचले असे मानण्यास जागा आहे. त्याच्या रघुवंशात अठराव्या सर्गात जे लहान राजकुमाराचे वर्णन आहे ते दिवाकरसेनाचे आहे असेही मानले जाते. दुर्दैवाने दिवाकरसेन अल्पायुषी होता. त्यानंतर लगेचच त्याचा भाऊ दामोदरसेन गादीवर आला. साल होते ४२०. त्याने गादीवर आल्याआल्या आपल्याच एका कर्तबगार पूर्वजाचे नाव धारण केले ‘प्रवरसेन’. याने साधारणत: ३० वर्षे राज्य केले, म्हणजे ४५० पर्यंत. त्याने त्याच्या राज्यकारभाराच्या ११व्या वर्षी एक नवीन शहर स्थापन केले. त्याचे नाव त्याने स्वत:वरुन प्रवरपूर ठेवले. हे बहुदा हल्लीचे पवनार असावे. हे अभुतपूर्व यश आपल्याला शंभूमुळे मिळाले असा त्याचा विश्वास असल्यामुळे तो शंकराचा भक्त झाला. हाही दानशूर व प्राक्रमी होता. कालिदास व त्यासारख्या साहित्यकारांच्या संपर्कात आल्यामुळे त्यालाही साहित्यात रुची व गती होती. हालाने जी गाथा संकलित केली त्यात त्याच्या काही गाथा आहेत. शैव असतानाही त्याने रामाचे गुणगान गाणारे ‘सेतुबंध’ रचले. त्याच्या नवीन राजधानीत त्याने रामाचे एक भव्य मंदीर बांधले. पवनार येथे याचे उत्खनन केले पाहिजे.
या प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन गादीवर आला. याने कुंतलदेशाच्या राजकन्येशी राजकीय विवाह केला. हे राजे दक्षिण महाराष्ट्रावर राज्य करीत होते. ( आत्ताचे सातारा, कोल्हापूर् व सोलापूर.) याने मात्र बापाचे धोरण सोडून आक्रमक धोरण स्वीकारले व माळव्यावर स्वारी केली कारण आता गुप्तांचे साम्राज्य क्षीण होत चालले होते व माळव्याचे क्षत्रप त्यांच्या हाताबाहेर चालले होते. या नरेन्द्रसेनाने साधारणत: २० वर्षे राज्य केले. नरेन्द्रसेनाच्या कारकिर्दीच्या शेवटी नल घराण्याच्या भावदत्तवर्मन नावाच्या राजाने वाकटकांवर आक्रमण केले व बराचसा मुलुख जिंकून घेतला. भावदत्तवर्मनच्या वडिलांचा म्हणजे वराहराजाचा नरेन्द्रसेनने जो दारुण पराभव केला होता त्याचा त्याच्या मुलाने वचपा काढला असे म्हणायला हरकत नाही. वाकाटकांचे साम्राज्य अशा दोलायमान स्थितीत असताताना नरेन्द्रसेनाच्या मुलाने म्हणजे पृथ्वीसेन याने परत एकदा शर्थीचे प्रयत्न करुन आपल्या घराण्याला उर्जित अवस्था आणली. याच काळात त्याने आपली राजधानी भंडारा जिल्ह्यात आमगावजवळ पद्मपूर येथे हलविली. याने परत एकदा आक्रमक धोरण स्वीकारुन गेलेला प्रदेश परत मिळवला. ही रजधानी परत एकदा विदर्भात हलली का नाही याबाबत एकवाक्यता नाही परंतु ज्या अर्थी भवभुतीचा एक पुर्वज गोपाल याने पद्मपुरात आश्रय घेतला या घटनेवरुन या पद्मपूरचे महत्व बऱ्याच काळ टिकून होते हे खरे. पृथिसेन-२ हा विष्णूभक्त होता हे आपल्याला माहीत आहे कारण त्याचे वर्णन परम-भागवत असेही करण्यात आलेले आहे. वाकाटकांच्या मुख्य शाखेचा हा शेवटचा ज्ञात सम्राट. यानंतर वाकाटकांच्या गादीवर कोणी बसले की नाही किंवा बसले असले तर त्या राजांची कर्तबगारी काय होती हे सध्यातरी ज्ञात नाही. बहुदा वाकाटकांच्या दुसऱ्या शाखेने म्हणजे वत्सगुल्म (वाशीम) वाकाटकांच्या हरिसेनाने त्यांच्या राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली असावी.
साल होते इ.स्. ४९०............
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
हा भाग महामहोपाध्याय मिराशी यांच्या लेखावर बेतला आहे. अर्थात इतरही माहिती गोळा केलेली आहे. इतिहास ही घडून गेलेली गोष्ट असल्यामुळे शेवटी कोणाच्यातरी लेखनावर अवलंबून रहावे लागते कारण ही कादंबरी नाही.
नुसतीच छायाचित्रे टाकण्याऐवजी थोडी फार माहिती व शेवटी विचार मांडावेत या दृष्टीने हा लेख लिहिला आहे. याचे श्रेय सर्वस्वी ज्या महान ज्ञानी पुरुषांनी यावर मुलभूत काम केलेले आहे, ज्यांनी ही लेणी करुन घेतली ते वाकाटक व ज्यांनी ती प्रत्यक्ष खोदली व रंगविली आहेत त्यांना आहे.
प्रतिक्रिया
23 Feb 2014 - 12:16 am | खटपट्या
सरप्रथम सरांना धन्यवाद,
एक चांगली लेख मालिका वाचायला मिळणार
23 Feb 2014 - 1:18 am | हाडक्या
अतिशय सुंदर सुरुवात सर..!!
पुढच्या भागांची वाट पाहतोय.. :)
23 Feb 2014 - 1:29 am | लॉरी टांगटूंगकर
लवकरच पुढचे भाग यावेत. बाकी मी जयंतकाकांचा पूर्वीपासूनच मोठ्ठा पंखा आहे.
23 Feb 2014 - 1:36 am | आत्मशून्य
फक्त एव्हड्यानेच शहारा आला अंगावर. सुरेख.
23 Feb 2014 - 1:39 am | आत्मशून्य
इतिहासाचा तास सुरु आहे.
23 Feb 2014 - 5:35 am | कंजूस
अरेरे ,मीपण असेच म्हटतो .
आत्मशुन्यशी पूर्ण सहमत .
नाही जमले .
विकिपिडीआ छाप लेखन नको असे माझेही मत आहे .
मागच्या वर्षीच यावर लेख
माला येऊन गेली आहे ती
साठवली आहे .
आता "किती भाग माहीत नाही "छाप टेस्ट क्रिकेट नको .T 20 करा नाहीतर
अगोदर अधोरेखित केलेल्या
परिच्छेदासारखे नाटयमय
येऊ द्या .काका तुमच्या छोटा पुतण्याशी बैटबॉल
खेळता आहात असे करा .
कृपया प्रतिसाद हलकेच घ्या .
23 Feb 2014 - 6:42 am | प्रचेतस
सुरेख सुरुवात.
23 Feb 2014 - 7:03 am | मुक्त विहारि
अतिशय सुंदर लेख...
लेखमाला उत्तमच होणार, ह्यात शंका नाही..
23 Feb 2014 - 9:11 am | अजया
पु. ले. प्र.
23 Feb 2014 - 12:08 pm | अनुप ढेरे
मस्तं
23 Feb 2014 - 1:30 pm | सुहास झेले
मस्त ... :)
पुढचा भाग लवकर येऊ द्यात :)
23 Feb 2014 - 1:31 pm | पाषाणभेद
इतिहास, चित्रे, माहिती, त्यात काकांचे लेख
फारच छान!
23 Feb 2014 - 3:12 pm | पैसा
सुरुवातीचे कथा-प्रसंग, नंतरचा इतिहास आणि जोडीला अप्रतिम छायाचित्रे. लेखाचा प्रवास अतिशय आवडला. पुढच्या भागाबद्दल वाट आताच बघायला सुरुवात केली आहे. वाकाटकांच्या फार माहित नसलेल्या इतिहासाबद्दल धन्यवाद!
23 Feb 2014 - 3:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
23 Feb 2014 - 8:06 pm | मधुरा देशपांडे
यापूर्वीच्या लेखमालांप्रमाणेच अजून एक उत्तम लेखमाला वाचायला मिळणार. पुभाप्र.
23 Feb 2014 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरुवात ! पुभाप्र.
23 Feb 2014 - 10:22 pm | विनोद१८
धन्यवाद.....!!! एका नवीन लेखमालिकेबद्दल.
नेह्मीप्रमाणेच उत्कन्ठावर्धक.
विनोद१८
24 Feb 2014 - 11:24 am | सौंदाळा
मस्त.
पुभाप्र
24 Feb 2014 - 11:33 am | तुषार काळभोर
कृपया पिकासा/फ्लिकर वरून शेअर करता येतील का?
24 Feb 2014 - 2:59 pm | कवितानागेश
वाचतेय.. :)
28 Feb 2014 - 7:51 pm | अनिरुद्ध प
अतिशय छान सुरुवात्,पु भा प्र
2 Mar 2014 - 10:02 am | विवेकपटाईत
माहिती वाढविणारा सुंदर लेख