अजंठा ...........भाग-१
अजंठा ...........भाग-२
अजंठा ...........भाग-३
रंगवलेले छत.......
कसे रंगविले असेल हे....? कॅमेरा हलला आहे.....
लेणे क्रमांक १७
हे लेणे उपेन्द्रगुप्ताने बांधले असे म्हणतात. कोण होता हा उपेन्द्रगुप्त ? वाकाटकांचा हा एक स्थानिक मांडलिक राजा होता व जरी हिंदू होता तरी बौद्ध धर्माचा पाठिराखा होता. ४६२ मधे जेव्हा अश्मकांनी वाकाटकांच्या राज्यावर आक्रमण केले तेव्हा याने अजंठातील सर्व बांधकामे थांबविण्याचा आदेश काढला. त्याला अपवाद होता त्याचे स्वत:चे १७ क्रमांकाचा विहार व सम्राट हरिसेनाचे लेणे क्रमांक १ जे आपण शेवटी पहाणार आहोत. ४७५ साली अश्मकांनी या ठिकाणी परत बांधकाम चालू केले व कारागीर परतू लागले. ज्या उपेन्द्रगुप्ताने या पृथ्वीवर असंख्य विहार व चैत्य बांधण्याची मनिषा बाळगली होती त्याचे पुढे काय झाले हे ज्ञात नाही. इतिहासकारांचे असे म्हणणे पडले की याने हे विहार निर्माण करण्या ऐवजी जरा आपल्या सैन्यावर खर्च केला असता तर त्याचे राज्य वाचले असते. ४७७ साली सम्राट हरिसेनाचा अचानक मृत्यु झाल्यावर तर या लेण्यांना कोणी वाली उरला नाही यालाही एका लेण्याचा अपवाद होता तो म्हणजे अश्मकांच्या राजाने भद्रदत्ताबरोबर (भद्रदत्त हा या बुद्धविहारांचा प्रमुख महंत होता) बांधायला घेतलेले लेणे क्रमांक २६ जे आपण या नंतर बघणार आहोत.
गौतम बुद्धाने साक्षात्कार झाल्यावर काही वर्षांनी त्याच्या गतआयुष्यातील घटना सांगायला सुरवात केली. या घटना त्याने अशा रचल्या होत्या की त्यातून सामान्य जनतेला काही बोध घेता येईल व त्यातून धर्माचरणास प्रोत्साहन मिळेल. त्या काळात त्याच्या शिष्यांमधे ब्राह्मणांचा भरणा असल्यामुळे, अशा कथांना तोटाच नव्हता व पुनर्जन्मावर सगळ्यांचाच गाढ विश्र्वास होता. (बौद्धधर्मातील ब्राह्मण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो.) या ज्या कथा आहेत त्यांना जातक कथा असे संबोधतात. अर्थात आपल्याला हे माहिती असेलच. लेण्यांमधे बऱ्याच जातक कथांना चित्रस्वरुपात साकार करण्यात चित्रकारांना यश आलेले आहे. त्यातील काही आपण बघणार आहोत. या विहाराचे अजून एक महत्व म्हणजे याच विहारापासून हिनयान पंथाचा कर्मठपणा झुगारुन ही चित्रे रंगविण्यात आली.
बर्गेसने रेखाटलेले लेणे क्रमांक १७ चे चित्र. (Plan) खाली बघा......
१६, १७ व १९ क्रमांकाची लेण्यांपासून प्राचीनकाळी नदीवर जाण्यास रस्ता असावा असा श्री. स्पिन्क्स यांचे म्हणणे आहे. हे एक अभ्यासू गृहस्त आहेत त्यामुळे त्यांचे हे मत ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
कुठुन सुरुवात करावी हे कळत नव्हते पण आत शिरल्याशिरल्या आपण जर डावीकडे वळलो तर आपल्याला हत्तींचे एक चित्र रंगविलेले आढळेल. खाली आपण ते पाहू शकाल. हे आहे शडदंत जातक. ही कथा काय आहे ते आपण थोडक्यात पाहू. जी जी चित्रे आपण पाहू शकतो त्या कथेबद्दलच आपण वाचणार आहोत कारण ज्या चित्रांचे आकलन नीट हो़ऊ शकत नाही त्याच्या नुसत्या कथा ऐकण्यासाठी एक वेगळा ‘जातक कथा’ असा धागा काढायला हरकत नाही व त्यासाठी बौद्ध धर्माचे अभ्यासकच पाहिजेत.
शडदंत जातक:
जेठवनात विश्रांतीसाठी थांबलेले असताना भगवान् बुद्धाने एका नवागत धर्मात नुकताच प्रवेश केलेल्या एका स्त्रीला ही कथा कथन केली.
श्रावस्ती नगरीतील एका चांगल्या व सुस्थितितील घरंदाज घरात जन्म घेतलेल्या ही स्त्री मर्त्य जीवनातील फोलपणा लक्षात येऊन संन्यास घेण्यास उद्युक्त झाली होती. आपल्या इतर बहिणींसमवेत ती बोधीसत्वाच्या प्रवचनास हजर झाली. त्या अत्यंत तेज:पुंज अशा बोधिसत्वाला पाहताच क्षणी तिच्या मनात विचार आला की मागील जन्मात मी या माणसाची पत्नी असते तर किती बरे झाले असते ! त्याच क्षणी तिच्या मनात तिच्या मागील जन्माच्या आठवणी जाग्या झाल्या. ‘शडदंत नावाच्या हत्तीच्या काळात मी या माणसाची राणी होते’ ती आठवण येताच ती अत्यानंदाने उभी राहिली व त्या आठवणींनी ती हसू लागली. ‘पण मी यांची लाडकी राणी होते का नावडती ?’ जरा आठवणीत डोकावले असता तिच्या लक्षात आले की नावडती असल्यामुळे तिच्या मनात शडदंताबद्दल एक अढी राहिली होती. शडदंत हा महाकाय हत्ती एका हत्तींच्या कळपाचा राजा होता. त्याला सहा सोंडा होत्या. आत्यंतिक असुयेपोटी तिने त्या जन्मात एका सोनुत्रा नावाच्या एका शिकाऱ्याला शडद्ंताची विषारी बाणाच्या सहाय्याने हत्या करण्याची सुपारी दिली. तो शिकारी त्या हत्तीचे सुळे राणीकडे पुरावा म्हणून घेऊन आल्यावर तिला अत्यंत दु:ख झाले होते. हे सगळे आठवतांना तिच्या भावना उचंबळून आल्यामुळे ती अचानक ओक्साबोक्षी रडू लागली. आत्ता काही क्षणापूर्वी हसणारी ही स्त्री अशी रडताना बघून तेथे उपस्थीत असलेल्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते बघून बुद्धाच्या चेहऱ्याचर हसू उमटले. उपस्थितांनी त्या स्मिताचे कारण विचारल्यावर भगवान म्हणाले, ‘या भगिनीने गतजन्मी माझ्यावर जो अन्याय केला आहे तो आठवून आता तिला रडू फुटले आहे’ असे म्हणून बुद्धाने ती गतजन्माची कहाणी सांगण्यास सुरुवात केली ज्यात तो स्वत: शडदंत राजा होता.
ती गोष्ट खालीलप्रमाणे आहे –
कोणा एके काळी दैवी शक्तीने आकाशातून संचार करणारा एक ८००० हत्तींचा कळप, हिमालयात शडदंत नावाच्या तलावाकाठी निवास करत असे. याच काळात बोधिसत्वाने या कळपाच्या प्रमुखाच्या पोटी जन्म घेतला. हा हत्ती आकाराने अवाढव्य होता. या तलावातील मध्यभागी जे पाणे होते त्यात कुठल्याही प्रकारचे शेवाळे वा वनस्पती उगवलेली नव्हती व ते पाणे एखाद्या स्फटिकाप्रमाणे चमकत असे. या पाण्याभोवती असंख्य कमळे उगवली होती व त्याबाहेर सालवृक्षांची रेलचेल होती. एक दिवस हत्तींच्या राजाने एका सालवृक्षाच्या बुंध्यावर आपले अंग घासले तेव्हा मोठा बाका प्रसंग उद्भवला. या प्रसंगातून पुढे एवढे रामायण घडेल याची कल्पना कोणालाच नव्हती. या हत्तीला दोन राण्या होत्या एकीचे नाव होते कुलसुभद्रा व दुसरीचे होते महासुभद्रा. याच वेळी नेमके वारे वाहत होते व कुलसुभद्रा वाऱ्याच्या दिशेला उभी होती तर महासुभद्रा दुसऱ्या बाजूला. वाऱ्यामुळे कुलसुभद्राच्या अंगावर झाडावरील मुंगळे व वाळलेली पाने पडली तर महासुभद्राच्या अंगावर झाडाचा मोहोर व फुले पडली. हे बघताच कुलसुभद्रेच्या मनात विचित्र विचार येऊ लागले, ‘मी नावडती आहे म्हणून तर राजाने माझ्या अंगावर वाळलेल्या पानांचा वर्षाव केला व ती आवडती आहे म्हणून फुलांचा. काय करावे ते सुचत नाही’ हा विचार सारखा करुन तिच्या मनात राजाबद्दल सुक्ष्म द्वेष निर्माण झाला. अशा चारपाच घटना घडल्यावर तिचा योगायोगावरचा विश्र्वास उडाला व तिने एक दिवस राजा ५०० प्रत्येकबुद्धाची प्रार्थना करत असताना तिनेही प्रार्थना केली, ‘माझ्या मृत्युनंतर माझा जन्म मद्रदेशाच्या राणीची कन्या म्हणून जन्माला येऊ दे. तारुण्यात मी बनारस राजाची सुंदर, पट्टराणी होईन. एकदा का मी त्याच्या मनात भरले की मी मला पाहिजे ते करु शकेन. मी राजाकडून वचन मागेन की त्याने शिकारी पाठवून विषारी बाणांनी या हत्तीची हत्या करावी. पुरावा म्हणून सप्त रंगाची उधळण कराणारे त्याचे हस्तीदंत त्याने कापून माझ्या समोर सादर करावे.’
ही प्रार्थना करुन तिने अन्नत्याग केला. थोड्याच काळाने तिचा मृत्युही झाला. तिचा मद्रदेशाच्या राणीच्या पोटी झाला व तिचे नाव सुभद्रा ठेवण्यात आले. वयात आल्यावर तिच्या सौंदर्याची किर्ती बनारसच्या राजापर्यंत गेली. अर्थातच त्याच्याशी तिचे लग्नही झाले. थोड्याच काळात सगळे स्थिरस्थावर झाल्यावर ति मनाशी म्हणाली, आता मी त्या हत्तीचे सुळे माझ्यासमोर हजर करण्याची आज्ञा देऊ शकेन. आजारी पडण्याचे सोंग आणत तिने राजाला आपल्या शयनगृहात बोलाविले. आल्या आल्या राजाने ‘सुभद्रा’ कुठे आहे असे विचारले. ती आजारी आहे हे कळताच त्याने तिच्याशयनगृहात जाऊन तिची चौकशी केली. राणीने उत्तर दिले मला रात्रभर झोप नाही. माझी इच्छा पूर्ण होणे या जन्मी तरी शक्य होईल असे वाटत नाही. हे ऐकल्यावर राजाने त्याची काळजी करु नये व तिची फक्त इच्छा सांगावी अशी विनंती केली. यावर तिने राजाला सांगितले, माझी इच्छा राहुदे तुर्तास बाजूला पण तुम्ही आपल्या राज्यातील सगळ्या शिकाऱ्यांना दवंडी पिटून येथे ताबडतोब बोलावून घ्या. त्या सर्वांच्या समोरच मी माझी इच्छा सांगेन. अर्थातच राजाने याला मान्यता दिली. दवंडीनुसार काशीराज्यातील सर्व शिकारी राजवाड्याच्या पटांगणात जमा झाले. सज्जात येत राजाने राणीला बोलाविले. राणीने त्या सर्व शिकाऱ्यांना मग तिच्या स्वप्नात एक सहा दंत असलेला हत्ती कसा आला व तिला त्या हस्तीदंतांची कशी अभिलाषा निर्माण झाली हे सांगितले. ‘ते जर मिळाले नाहीत तर माझा मृत्यु अटळ आहे’.
शिकाऱ्यांमधे ते ऐकून गडबड उडाली. त्या समुदायावर नजर टाकताना राणीने एका शिकाऱ्याला हेरले. त्याची पावले रुंद होती व पोटऱ्या टरारुन फुगल्या होत्या, खांदे रुंद व हात राकट दिसत होते. त्याने दाढी वाढवलेली होती तर त्याचे दात पिवळे पडलेले दिसत होते. त्याचा चेहरा जखमांच्या व्रणांनी सुरकुतलेला होता असा हा विद्रुप माणूस चांगला शिकारी असणार असे राणीने जाणले व त्याला बोलावून घेतले.
राजाची परवानगी घेऊन ती त्याला घेऊन त्या महालाच्या सर्वात वरच्या सज्जावर गेली. गतजन्मीची कहाणी सांगून तिने त्या सहा सुळे असणाऱ्या हत्तीचे वर्णन केले व तो कुठे सापडेल हेही सांगितले. ते ऐकल्यावर त्या शिकाऱ्याची पाचावर धारण बसली व तो म्हणाला, ‘हे महाराणी सर्व सुखे आपल्या समोर हात जोडून उभी असताना आपण मला का संकटात टाकत आहात? ते ऐकल्यावर राणीने तिने केलेल्या प्रत्येकबुद्धाच्या प्रार्थनेबद्दल सांगितले व न घाबरता शिकारीवर जाण्यास प्रवृत्त केले. त्या शिकाऱ्याचे नाव होते सोनुत्तरा.
या शिकाऱ्याने राणीने दिलेली शिधा व इतर हत्यारे घेऊन प्रस्थान ठेवले. इप्सित ठिकाणी पोहोचल्यावर त्याने त्या हत्तीसाठी सापळा तयार केला व स्वत: त्या खड्ड्यात विषारी बाण घेऊन तयार राहिला. हत्ती त्यात पडल्यावर हत्तेने त्याला विचारले, ‘ का बाबा मला जखमी केले तू ? तुझी गरज होती म्हणून का दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरुन ?’ शिकाऱ्याने सर्व हकिकत सांगितल्यावर हत्तीने स्वेच्छेने आपले दंत कापून त्याच्या स्वाधीन केले. थोड्याच वेळात त्याचा मृत्यु झाला. इकडे शिकारी ते हस्तीदंत घेऊन राणी कडे परतला.. आगमनाची वर्दी घेऊन तो राणीच्या महालात पोहोचला. पोहोचल्या पोहोचल्या बरोबर राणीने ते हस्तीदंत बघून पहिला प्रश्र्न केला, ‘याचा अर्थ तो हत्ती आता मरण पावला आहे असा होतो का ?’ शिकाऱ्याने तो हत्ती मेला आहे अशी खात्री देताच सुभद्राच्या ह्रदयात एक कळ उठली व त्याचे परिवर्तन तीव्र दु:खात झाले. त्या दु:खाच्या लाटेत तिचे मन हेलकावे खाऊ लागले. या सगळ्याची तीव्रता एवढी होती की ती आजारी पडली व त्याच दिवशी तिचा मृत्यु झाला.
चित्रात शडदंताचे हत्ती दाखविले आहेत व डावीकडे महालात राणी ते हस्तीदंत बघून बेशूद्ध पडते हे दाखविले आहे. अजंठाभर जातकांवर चित्रे रेखाटली आहेत. पूर्वी म्हणजे जेव्हा हा प्रदेश निजामाच्या राज्यात होती तेव्हा त्याची एवढी पडझड झालेली नव्हती. ब्रिटिशांनी व येथील हावरट, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या चित्रांची पार वाट लावली त्याचे एक उदाहरण वर आलेलेच आहे. ती चित्रे किती चांगली दिसत होती याचे उदाहरण म्हणून एका राजकन्येचे रंगविलेले चित्र पहा.
असो. जी चित्रे स्पष्ट दिसत आहेत व ज्यात जातक कथा कळून येतात त्याच कथा थोडक्यात लिहिण्याचा मानस आहे.
या अनुषंगाने या चित्रे रेखाटण्याच्या पद्धतीबद्दल थोडे लिहिले पाहिजे. अजंठामधे जे प्रसंग रंगविलेले आहेत ते एकापाठोपाठ एक किंवा दोन प्रसंगाची सरमिसळ करुन काढलेली आहेत. त्याला कसलीही किनार नाही (फ्रेम) त्यामुळे ही चित्रे ओळखण्यास कठीण असतील पण त्यात एक ओघवतेपणा आहेत. उदाहरणार्थ (केवळ उदाहरण) समजा राजा विचार करताना दाखवलेला असेल तर लगेच त्याच्या खाली किंवा वरच तो विरक्त होऊन त्याच्या राजधानीतूम बाहेर पडताना दाखविले जाते. आता हे एकदम कळण्यास अवघड आहे. पण एकदा हे समजले की मग ही चित्रे समजू लागतात व त्यातील सलगपणा तुटत नाही.
बुद्धाने ही कथा का सांगितली असेल याचे अनुमान सहज काढता येण्यासारखे आहे पण आपण त्यात शिरायला नको. ते मी वाचकांवर सोडतो.
हे सगळे बघत असताना माझा इतका गोंधळ उडाला आहे की काही ठिकाणी मी चुकीची चित्रे टाकली असण्याची शक्यता आहे. त्यासाठी मित्रहो तुम्हाला मला माफ करावे लागेल.......
समुद्रगुप्ताला परकीय आक्रमणामुळे हे बांधकाम संपविण्याची घाई झाली होती हे आपल्याला तेथे इतरत्र आढळणारे खांबावरील भारवाहकांचे शिल्प आढळत नाही या वरुन सहज कळते. तरीपण या विहारातील खांब अप्रतीम रंगवलेले आहेत. यात मी काही खांबांचे छायाचित्र देत आहे व त्याचा क्लोजअपही देत आहे. लांबून नक्षिकाम दिसणारे प्रत्यक्षात काय आहे ते आपणास यावरुन कळते......
पुढच्या भागात याच विहाराचा अधिक भाग................
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
13 Mar 2014 - 7:11 pm | प्रचेतस
निव्वळ अप्रतिम. _/\_
13 Mar 2014 - 7:17 pm | अनुप ढेरे
कमाल !
धन्यवाद!
13 Mar 2014 - 7:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
13 Mar 2014 - 10:37 pm | खटपट्या
छान माहीती !!!
14 Mar 2014 - 10:05 am | अनुप ढेरे
पुन्हा वाचला. खूप आवडला. त्या गोष्टीचा संदर्भ नाही लागला.
14 Mar 2014 - 12:14 pm | जयंत कुलकर्णी
ते जे हत्तीचे चित्र दिसते आहे त्याची ती गोष्ट आहे. मला जास्त रेझोल्युशनची चित्रे टाकता येते नाहीत त्यामुळे ती तितकिशी स्पष्ट दिसत नाहीत हे खरे...............
14 Mar 2014 - 1:29 pm | अनुप ढेरे
हे कळालं नाही.
14 Mar 2014 - 10:35 am | इरसाल
अतिशय सुरेख. लेखही आणी चित्रेही.
14 Mar 2014 - 10:53 am | सुहास झेले
सहीच... आता पुढे? :)
14 Mar 2014 - 11:00 am | जयंत कुलकर्णी
आता पुढे काय..................:-)
21 Mar 2014 - 8:58 pm | पैसा
काय सुंदर आहेत ही चित्रं आणि कथा! मस्तच!!
21 Mar 2014 - 10:37 pm | अजया
राजकन्या फारच आवडली ! आणि कथेनुसार चित्रही.