अजंठा ...........भाग-१
अजंठा ...........भाग-२
अजंठा ...........भाग-३
अजंठा ...........भाग-४
मागील भागात पाहिलेल्या शडदंत जातकानंतर अत्यंत पडझड झालेले महाकपिजातकाची चित्रमाला बघण्यास मिळते. हे चित्र नीट दिसत नसल्यामुळे याची गोष्ट थोडक्यात सांगतो. समजा आपणास हे दिसले तर, किंवा आंतरजालावर याची चित्रे मिळाली तर आपल्याला ती सहजपणे कळतील.
महाकपीजातक: या कथेमधे बोधिवत्साचा जन्म एका माकडाच्या टोळीचा प्रमुख म्हणून झालेला असतो. या राजाला एक माणूस जंगलात अर्धमेल्या अवस्थेत सापडतो. हा माकडांचा राजा त्याला वाचवतो. त्यावेळी झालेल्या श्रमामुळे त्याला झोप येऊ लागते. त्या माणसाला जागे राहण्यास सांगून हा माकड डुलकी काढतो. त्याचे वेळे त्या माणसाच्या मनात त्या माकडाला दगडाने ठार करुन त्याचे मास खाण्याची इच्छा होते. तेवढ्यात तो माकड जागा होतो व उंच फांदीवर जाऊन बसतो. व धरणीकंप होऊन तो पापी माणूस त्यात नाहिसा होतो. या कथेचे अनेक भाग आहेत. चित्रात माकड त्या माणसाला गर्गेतून बाहेर काढताना दाखविले आहे व त्याच्या पुढच्या चित्रात ते दैवी माकड जनसमुहाला ऊपदेश करताना दाखविले आहे. या सारख्या अनेक जातक कथांचा व ह्युएनत्संगच्या भारत यात्रेच्या कहाणीचा उपयोग करुन एका चिनी लेखकाने एक मस्त कथा रचली. त्याबद्दल जाताजाता थोडेसे.....
‘जर्नी टू वेस्ट’ (इंग्रजी नाव) ही गोष्ट चीनमधील किआंग्सू प्रांतातल्या हुआई गावच्या वू चेंगने लिहिली. त्याचा काळ कुठला होता हे ठामपणे सांगता येत नाही, पण साधारणत: १५०५ ते १५८० च्या दरम्यान हा होऊन गेला असावा. म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या अगोदर....तो त्या काळातील एक बऱ्यापैकी प्रसिध्द कवी आणि लेखक होता. मींग राजदरबाराच्या बखरीत त्याचा आणि त्याच्या काही काव्याचा उल्लेख सापडतो.
वू चेंग.....
व माझ्या नवीन पुस्तकाचे मुखपृष्ठ. अजून प्रकाशित व्हायचे आहे....
या महाकाव्याचा किंवा महाकादंबरीचा विषय ह्युएनसंगाची भारतातील यात्रा हा आहे. तो ७व्या शतकात होऊन गेला. त्याच्या हिंदुस्थानातील प्रवासाविषयी त्यावेळेच्या इतिहासकारांनी भरपूर लिहून ठेवलेले आढळते. हा प्रवास त्याने हिंदुस्थानातील बौध्द धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी केला होता. दहाव्या शतकापर्यंत ह्युएनत्संगच्या हिंदुस्थानच्या यात्रेसंबधित अनेक दंतकथा प्रचलित झाल्या. तेराव्या शतकात या दंतकथांवर चीनी रंगभूमीवर अनेक नाटके येऊन गेली. मला वाटते, अजूनही चीनच्या सांस्कृतिक इतिहासात ही कथा आणि यावरची नाटके यांचा सहभाग लक्षणीय आहे. या सगळ्यामुळे वू चेंगला ही कथा लिहिण्यावेळी भरपूर साहित्य उपलब्ध होते.
या गोष्टीला अर्थाचे अनेक पापुद्रे आहेत. एक एक उलगडला की त्याच्या खालचा आपल्याला त्याच्या अर्थासाठी खुणावत असतो. तसेच ही गोष्ट करमणुकीसाठी, प्रवासवर्णानासाठी, कल्पनारम्यता, तत्वज्ञान यासाठीही वाचली जाऊ शकते. मुख्य गोष्टीमधे माकड आणि त्याचे पालक ह्युएनत्संग, सँडी आणि वराहाला ज्या एक्क्याऐंशी संकटातून जावे लागले त्याचे वर्णन आहे.
या पुस्तकाचे (इंग्रजी) मी मराठीत भाषांतर केले आहे व त्याचे काही भाग येथे टाकलेही होते. असो. परत अजंठ्याकडे वळू.
महाकपिजातकाची चित्रे बघून उजव्या हाताला वळले की दुसऱ्या खोलीच्या दरवाजाच्या उजवीकडे हंसजातकाची चित्रे चितारली आहेत. ती आता फारच खराब झाली आहेत. अर्थात त्यातील एक मला टिपता आले आहे. ते व ग्रिफिथने १९५० सालच्या आसपास काढलेली दोन अशी छायाचित्रे खाली दिली आहेत. या काळात साठ वर्षात चित्रे कशी खराब झाली आहेत हे बघता आपण सर्वांनी ती आत्ताच बघून घेतलेली बरी. आता हंस जातक थोडक्यात काय आहे हे बघू.
चित्रात राजासमोर हंस बसलेले दाखविलेले आहेत व दुसऱ्यात फासेपारधी हंसाला पकडताना दाखविलेला आहे.
मी आत्ता काढलेले छायाचित्र.....
ग्रिफिथची चायाचित्रे...१९५०
एकदा वेळूबनात तथागतबुद्धाने त्यांचा आवडता शिष्य आनंदाने भौतिक जीवनाचा कसा त्याग केला याची कहाणी कथन केली....
बुद्धावर मारेकरी घातल्यावरसुद्धा बुद्धाला काही होईना हे बघून देवदत्ताच्या मनात आले की जो माणूस विचार करु शकतो त्याला हे काम जमणे शक्य नाही हे काम एखाद्या प्राण्याच्या हातूनच होईल. त्याच्या कडे एक नलगिरी नावाचा हत्ती होता. या हत्तीला दररोज दारू पाजण्यात येई. त्याच हत्तीला दुप्पट दारू पाजून बुद्धावर सोडण्याचा डाव आखला गेला. अर्थात जेव्हा हा हत्ती बुद्धासमोर आल तेव्हा आनंद बुद्धासमोर उभा राहिला व म्हणाला, ‘हत्ती प्रथम माझा प्राण घेईल व मगच तुमच्यावर हल्ला करेल’ बुद्धाने त्याची बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तो हटला नाही. शेवटी बुद्धाने आपली शक्ती वापरुन त्याला दूर लोटले. अर्थातच जेव्हा हत्ती बुद्धासमोर आला तेव्हा तो बुद्धासमोर नम्रपणे उभा राहिला. हा चमत्कार बघणाऱ्या अगणित भिक्खूंमधे आनंदाच्या या धाडसाबद्दल चर्चा सुरु झाली. ती ऐकताच बुद्ध म्हणाले. आनंदाने हे धाडस काही पहिल्यांदाच दाखविलेले नाही. मागच्या जन्मातही त्याने माझी अशीच साथ केली होती म्हणून त्यांनी जी हकिकत सांगितली ती म्हणजे हंसजातक....
सुकुलनावाच्या राज्यात सुकुल नावाचा राजा राज्य क्रत असतानाची ही गोष्ट. या राज्याच्या सिमेवर चित्रकुटपर्वताच्या पायथ्याशी एक सुंदर सरोवर होते. या सरोवराच्या काठी हंसाचा ९६००० हंसांचा एक मोठा कळप रहात असे. त्यांच्या राजाचे नाव होते धृतराष्ट्र. त्याच्या सरदाराचे नाव होते सुमुख. एकदा हंसांनी बातमी आणली की सुकलराज्याच्या जवळ चरण्यासाठी भरपूर अन्न उपलब्द्ध असून तेथे गेल्यास अन्नाची चांगली सोय होऊ शकते. राजाने सर्वांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की मनुष्याच्या एवढे जवळ जाणे फारच धोकादायक आहे. हा एक असा प्राणी आहे की तो केव्हांही कसाही विचार करु शकतो व वागू शकतो. दुर्दैवाने सगळ्यांच्या आग्रहाला बळी पडून तो कळप तेथे चरण्यास जातो. तेथे एका फासेपारध्याने अगोदरच जाळे लावलेले असते त्यात हा हंसांचा राजा सापडतो. जेव्हा तो फासेपारधी तेथे येतो तेव्हा त्याला दिसते की एका हंसाचे पाय जाळ्यात अडकले आहेत पण दुसरा त्याच्यासमवेत शांतपणे बसून आहे. हे बघून तो फासेपारधी त्या हंसाला तेथून निघून जाण्याची विनंती करतो परंतू तो त्याच्या राजाशिवाय जाण्यास नकार देतो......शेवटी तो फासेपारध्याला पश्चत्ताप होतो व तो त्या दोघांनाही सोडण्याची तयारी दाखवतो. ते बघून सुमुख त्याच्या राजाला म्हणतो, ‘ या माणसाने आपल्याला सोडून देण्याची तयारी दाखविली आहे तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी करणे भाग आहे. आपण त्याला आपल्याला राजाकडे घेऊन जाण्याची विनंती करु व त्याला राजाकडून पुष्कळ धनदौलत मिळवून देऊ म्हणजे तो परत पक्षी पकडणार नाही.......राजाकडे गेल्यावर ती हकिकत ऐकून्राजा त्याहंसाना बसण्यास मानाची जागा देऊन त्यांच्याकडून धर्माचे ज्ञान ऐकतो....इ.इ...
हा जो हंसाचा राजा आहे तो मीच व सुमुख म्हणजे मागच्या जन्मातील आनंद आहे....
अजंठामधे ज्या जातक कथा रंगविलेल्या आहेत त्यातून आपल्याला त्या काळातील समाज समजण्यास मदत होते. म्हणजे जरी चित्रकारांनी बुद्धाच्या काळातील जातककथा रंगविलेल्या असल्या तरी त्यात जी पात्रे दाखवलेली आहेत ती त्यांच्या काळातील. घरे दाखवलेली आहेत ती त्यांच्या काळातील..... त्यात त्यांनी जरा कल्पनाशक्तीला ताण देऊन वेगळी रुपे दाखवली असतीलही पण त्यालाही मर्यादा आहेत त्यामुळे या चित्रात त्या काळाचे प्रतिबिंब स्पष्टपणे पडले आहे आहे असे म्हणता येते. आता हेच बघाना...
घर व माणसे.....एका मिरवणूकीत.
मिरवणूक.
चित्रात चितारलेले महाल, घरे व बाजारपेठेतील दुकाने ही लाकडात बांधलेली दिसतात. म्हणूनच जेव्हा दगडात विहार खोदण्याची पद्धत सुरु झाली तेव्हा त्यातही लाकूड वापरले आहे असे वाटावे म्हणून छताचे वर्तूळाकार वासे खोदण्यात आले असावेत. उदा. कार्ल्याची लेणी. खांबही लाकडाचे वाटावेत असे रंगविलेले आहेत. कालिदासाने मेघदुतात वर्णन केल्याप्रमाणे यातील घरे दिसतात. बर्याच चित्रात मांडव घातलेले दिसतात व काही ठिकाणी ओसरीवर उतरते छतही दिसते. दुकाने साधारणत: आयातकृती होती असे दिसते. दुकांनांवर सध्या घालतात त्या पद्धतीची कापडाची ऑनिगही दिसतात. काही ठिकाणी गरीबांच्या झोपड्याही रंगविलेल्य दिसतात. एका चित्रात चुलीवर स्वयंपाक करताना एक स्त्री दाखवली आहे त्यामुळे त्या काळात चुलींचा वापर करत असावेत व त्या बऱ्याच कॉपॅक्ट असाव्यात.
शिंकाळे व चूल.....एका झोपडीत.
घरातील आसनव्यवस्था साधी व सुटसुटीत असायची. एक बऱ्याच ठिकाणी चौरंग व त्यावर टेकायला मागे लोड अशी व्यवस्था दिसते. बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवण्यास पुढे एक छोटा चौरंग ठवण्यात येत असे. यावरुन असे कळते की मुख्य चौरंगाची उंची जास्त ठेवत असत जेणे करुन खाली बसणाऱ्या लोकांपेक्षा हा माणूस उंचावर बसेल. या चौरंगाचे पाय बघण्यासारखे आहेत. त्यांची नक्षी बऱ्याच ठिकाणी सारखीच दिसते.
चौरंग.... व पाय ठेवायचा चौरंग-
शिंकाळ्यांचा वापर सर्रास होत असणार. जेवतानाही ताट चौरंगावर ठेवण्याची पद्धत होती जी आजही आपल्याला दक्षिण भागात दिसते. अजंथामधे विदर्भातील समाज रेखाटलेला असावा असे वाटते. काही माणसे व स्त्रीया काळ्यारंगात रंगविलेल्या आहेत. त्यांची नाके बसकी आहेत. ही चित्रे बहुदा विदर्भातीला नागवंशीय समाजातील माणसाची असावीत. त्यांचे दागिने बघण्यासारखे आहेत. स्त्री व पुरुषांमधे वरचे वस्त्र घालण्याची पद्धत नसावी कारण सगळे कमरेवर उघडेच दाखविलेले दिसतात. ज्यांनी कपडे घातले आहेत ते परदेशी असावेत. ब्राह्मण, राजे, राण्या त्यांच्या दास्या हे वेगळ्या वंशाचे स्पष्ट कळतात बहुदा ते आर्य वंशाचे दाखविण्याचा प्रयत्न असावा. शक, पार्थिया व कुशाण वंशाचे अनेक व्यापारी त्या काळात या भागात स्थायिक झाले होते असे म्हणण्यास हरकत नाही. काही चित्रात आपल्याल ते दिसतीलही. एक दोन चित्रात इराणी व चिनी माणसेही दाखविली आहे.
वाकाटकांच्या काळात दागिन्यांची रेलचेल असावी. स्त्री पुरुष खाली गुडघ्यापर्यंत वस्त्र नेसीत असत. कानातील आभुषणे मोठी असत व केस लांब असत. काही दागिने आपणास मी दिलेल्या चित्रात पहाण्यास मिळतील.
दागिन्यांची रेलचेल.......एका सामान्य स्त्रिचे दागिने.
पायात जोडे (अक्षरश: सँडल्स्) घातलेली काही माणसे आपल्याला चित्रात दिसतील ती आपण बघावीत.
सँडल्स.....
शिकारीला जाताना शिकारी वेगळा पोषाख घालत. अजंठातील चित्रात घोडे व हत्ती चिक्कार दिसतात यावरुन इराणशी घोड्यांचा व्यापार जोरात चालू असावा असे अनुमान काढण्यास हरकत नाही. काही वस्त्रे तलम कापडाची बनवलेली असत. एका जातक कथेत एका सामान्य माणसाच्या वस्त्रातून त्याचा हात दिसत असल्याचे स्पष्ट दिसते. हे फारच छान रंगविले आहे. अजंठाच्या चित्रात सर्व राजे वर उघडे दाखविलेले आहेत तर सामन्य माणसे दागिने व वस्त्रात दिसतात. हे पहाण्यास विचित्र वाटेल पण त्यांची वस्त्रे इतकी तलम असत की जवळ जवळ पारदर्शक असावीत. या वस्त्रांना संस्कृत काव्यांमधे निश्र्वासार्ह्य (म्हणजे जी श्र्वासानेही उडत असत) असे संबोधले आहे. ती वस्त्रे सापाच्या कातेहूनही मुलायम असल्यामुळे त्यांचे वर्णन रघुवंशामधे ‘सर्पनिर्मोकलघुतर’ असे केलेले आढळते. याच काव्यात या वस्त्रातून या श्रीमंत लोकांचे अंग दिसत असे असा स्पष्ट उल्लेख आहे. काही स्त्रिया हल्लीच्या ओढणीसारखे वस्त्र त्यांच्या वक्षस्थळावर घेत असत. त्यांना पायोधरपट्टा असे म्हणत. याच वस्त्राला मागे गाठ असल्यास त्याल कंचुकी म्हणत. कंचुलिका म्हणजे बाह्यांचे पोलके जे आजकाल वापरले जाते.
राजे किंवा महत्वाच्या व्यक्ती डोक्यावर मुकुट किंवा कपाळावर सोन्याचा पट्टा घालत. पुरुषांचे केसही पाठीवर मोकळे सोडलेले दिसतील. काही चित्रात बाळेही दिसतात. त्यांच्या गळ्यात सध्या घालतात तसा गोफ व हातात वाळे घातलेले दिसतात व ती चांगली गुटगुटीत दाखविली आहेत.
एका चित्रातील बाळ...
काही पुरुष कपाळावर रेशमी पट्टा बांधत जे बाणानेही लिहून ठेवले आहे. गंमत म्हणजे भिक्खू डोक्यांवर केस ठेवत नसत पण अजंठातील चित्रात त्यांना श्मश्रू केलेले दाखविलेले नाही. स्त्रियांच्या विविध प्रकारच्या केशरचना आपले मन चक्राऊन टाकतात तर डोक्यावर पदर घेतलेली एकही स्त्री या चित्रांमधे नाही. बहुदा ही पद्धत बऱ्याच नंतर चालू झाली असावी. एका चित्रात मात्र एका दासीने नर्स घालतात तसले वस्त्र डोक्यावर घातलेले दिसते. स्त्रियांमधे कुंकू लायायची पद्धत नसावी जी सध्या आहे. याचा अर्थ सामान्य जनतेत कुंकू विवाहदर्शक नसावे. असे म्हणायचे कारण कालिदासाच्या काव्यात कुंकवाचा उल्लेख आहे पण त्या सर्व राजघराण्यातील स्त्रियांच्या संबंधित. बांगड्या मात्र अनेक स्त्रिया घालताना दिसतात. काही स्त्रिया बिंदी घालताना तर काही मोत्याच्या माळा घालताना दिसतात. काहींनी तर केसातही मोती माळलेले दिसतात. काहींच्या माळा लांब आहेत तर काहीच्या अगदी गळ्याभोवती घट्ट बसणाऱ्या (सध्याचे चोकर्स). एकही स्त्री नाकात नथ किंवा चमकी घालताना दिसत नाही. पायातील पैजण मात्र बहुतेक स्त्रियांनी घातलेले दिसतात.
घोड्यांचे खोगीर ही युद्धशास्त्रातील एक महत्वाचा शोध मानला जातो असे म्हणतात तसे असेल तर एका चित्रात घोड्यावर खोगीर चढविलेले स्पष्ट दिसते.
एका चित्रात धनुष्यबाण, तलवारी, भाले, खंजीर, झेंडे इ. सैनिक घेऊन चाललेले दिसतात. ढाली चौकोनी आकाराच्या असाव्यात. गंमत म्हणजे कुठल्याही हत्तेवर अंबारी दिसत नाही. राजाही हत्तीवर तसाच बसलेला आढळतो.
अनेक स्त्रिया छत्र्या घेऊन जाताना दिसतात यांचा आकार गोल किंवा चौकोनी आहे. या छत्र्यांच्या आत वरचे कापड (किंवा जे काही असेल ते) ताणून बसविण्यास खास योजना केलेली आढळते. काहींच्या हातात चौरसाकृती पंखेही चितारलेले दिसतात. एका चित्रात तर झोका खेळणारी लहान मुलगीही दाखवली आहे.
हत्ती, घोडे, सिंह, गाय, बैल, हरीण माकडे इत्यादींची चित्रे विपूल प्रमाणात दिसतात तर अनेक प्रकारचे पक्षीही दिसतात. एका चित्रात
नारळाचे झाड दिसते व त्याला नारळही लागलेले दाखवले आहेत. तबकात नजराणे, मद्य देण्याची पद्धत असावी.....
या भागात आपण पाचव्या शतकातील समाजजीवनावर एक नजर टाकली. हे पुराण आता पुरे. पुढच्या भागात आपण लेणे क्र. २६ ला भेट देणार आहोत........
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
आता भेट तीन महिन्यानंतर...अमेरिकेला चाललोय. तेथे दोन पुस्तके पूर्ण करायची आहेत......BBye...
प्रतिक्रिया
20 Mar 2014 - 4:36 am | रामपुरी
वाचतोय
20 Mar 2014 - 7:30 am | सुधीर कांदळकर
जनजीवनाचे रेखाटन मस्त जमले आहे. धन्यवाद.
20 Mar 2014 - 7:53 am | कंजूस
प्रवासाला शुभेच्छा .
अजिंठाची चित्रे आता अजिबात दिसत नाहीत .एखाद्या चित्रातील एखादीच अस्पष्ट आकृतीकडे पाहून गाईडलोक कथा सांगत असतात .फारच कठीण काम आहे .बाकी लोक उगाचच सर्व दालनांतून अर्ध्या तासांत भटकून बाहेर पडतात .
जुनी चित्रे पाहून त्याची स्पष्ट प्रतिकृती जळगाव अथवा दौलताबाद किल्याजवळ बनवायला हवी .लेण्यातील वर्दळतरी कमी होईल .चित्रे टिकतील .
20 Mar 2014 - 11:00 am | अनुप ढेरे
आवडला हा भाग पण !
20 Mar 2014 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहिती. आवडली.
20 Mar 2014 - 2:06 pm | अजया
केवढ्या बारकाव्याने अभ्यास केला आहे हे शब्दाशब्दातून जाणवते आहे. कथेसह या चित्रांचा संदर्भ घेउन परत अजिंठ्याला जाणार हे नक्की!!
22 Mar 2014 - 9:17 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
27 Mar 2014 - 10:56 pm | पैसा
त्या काळच्या समाजजीवनाची खरीच चित्रे! मात्र यातली बरीच आता नष्ट झाली आहेत हे दुर्दैवच!