फोटोशॉप
पूर्वी फोटो काढून झाले कीं रोल दुकानात नेऊन देणे एवढेच काम असे. प्रिंट घरी घेऊन आल्यावरच पाहता यावयाचे. मग त्या फोटोंकडे बघतांना लक्षात येई की " अरे, हा फोटो काढतांना बर्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या नव्हत्या. हे डोक्यातून उगवलेले झाड, उजव्या कोपर्यातला कुणाचा तरी खांदा, मागची अर्धवट दिसणारी तसबीर, यांकडे आपले लक्षच नव्हते काय ? " पण आता फार उशीर झालेला असे.वेळ निघून गेलेली असल्याने हळहळ करण्यापलिकडे काही करणे अवघड नव्हे, अशक्यच असे.
आता डिजिटल कॅमेर्यामुळे प्रिंट काढावयाच्या आधी आपणास काय दिसणार आहे ते कॅमेर्यातच किंवा कॉंप्युटरवर बघता येते. कॅमेर्याच्या छोट्या स्क्रीनवर एखादी चूक लक्षात आली तर परत फोटो काढणे अगदीच अशक्य नसते. कॉंप्युटरवर चूक दिसली तर निदान प्रिंट काढावयाचा का नाहे हे तरी ठरवता येते. आणि आपण फोटोशॉपची जुजबी का होईना माहिती करून घेतली असेल तर ते झाड, तो खांदा, ती तसबीर आता तुम्ही संगणकावरच काढून टाकूं शकता. पूर्वी माझ्यासारखा, डेव्हलपिंग-प्रिंटिन्ग (B &W) घरी करावयाचा प्रयत्न करणारा, त्यात थोडाफार (खरे म्हणजे, थोडासाच) यशस्वी व्हावयाचा. भरपूर वेळ व पैसा खर्च करूनही चांगले काम होईलच याची खात्री नसावयाची.
फोटोशॉप हाताशी असेल तर वरील दुरुस्त्या आता काही एक खर्च न करता पाच-एक मिनिटात करता येतात. सर्वसाधारणपणे फोटो पहाणार्याच्या लक्षातही ते येत नाही. एक्स्पोजर कमीजास्त झालेला असेल, रंग थोडे फिकट असतील तरी बिघडत नाही. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्यात बदल करू शकता. खराब फोटोही acceptable करता येतो. घाईघाईत फोटो काढतांना चुका होणे शक्य आहे, त्या दुरुस्त न करणे अक्षम्य आहे.
तर या फोटोशॉपमध्ये काय करता येते ? प्रश्न थोडा चुकीचा आहे कारण यादी फार लांबलचक होईल. उलट काय करता येत नाही ? असे विचारले तर उत्तर थोडक्यात देता येईल. असे करा, तुमचा एक उभा फोटो द्या. मग सांगा की हा फोटो तुम्ही ताजमहालला भेट दिलीत तेव्हा काढलेला आहे असा हवा किंवा तुमची आवडती नटी तुम्हाला खेटून उभी आहे असा हवा ? हे अगदी सोपे काम झाले आहे. १० मिनिटे रगड झाली. अशा बनवाबनवीमुळे फोटोशॉप थोडे बदनामच झाले आहे. श्री. लंबूटांग मला लिहतात, "मी फोटोशॉपला हातच लावत नाही. माझे फोटो अस्सल आहेत, fabricated नाहीत असे सगळ्यांना समजले पाहिजे". थोडे टोकाचे मत झाले. काही उपयोग अवष्य वापरावेत; काही गंमत म्हणूनच. मी असे विचारतो की एका फोटोत एक्स्पोजर कमी झाल्याने तो काळपट दिसत असेल व मी फोटोशॉपच्या सहाय्याने तो योग्य केला तर ही फसवणुक झाली कां ? मला वाटते, नाही. कारण योग्य एक्सपोजर देणे मला शक्य होते. ते मी जागेवर करावया ऐवजी इथे केले. काय फरक पडला ? खालून एखादा वर असलेल्या गोष्टीचा फोटो काढला तर तो तिरकस येतो. उंच स्टूलावरून तो काढला तर तो सरळ आला असता. हा तिरकसपणा फोटोशॉपने घालवणे म्हणजे फसवणूक नव्हे. आज मी तीन उदाहरणे देणार आहे.
पहिले आहे चाळीसेक वर्ष जुन्या असलेल्या फोटोचे नूतनीकरण. पहिला फाटका, डाग पडलेला, जुना फोटो आता नव्यासारखा दिसतो.
तो जुनाच आहे, पण फाटका व डाग पडलेला नाही असे दाखवावयाचे असेल तर पांढर्या रंगाऐवजी sepia रंग वापरा. एकदम well presserved, antique photo वाटेल. वेळ १० मिनिटे, खर्च शून्य. घरातील ज्येष्ठ नातेवाईकांना आनंदित करण्याचा एक सोपा मार्ग. मी माझ्या मावशीच्या ८० व्या वाढदिवसाला , ती १५ वर्षांची असतांना काढलेला तिचा फोटो, दुरुस्त करून,एन्लार्ज करून दिला होता. तिला सर्वात जास्त आवडलेली भेट !
दुसरे आहे श्री. वल्ली यांच्या फोटोचे. या एका चांगल्या फोटोत कॉंपोझिशन सुरेख आहे, डावीकडच्या कोपर्यात उतरत जाणारा प्रवाह छान आहे व रंगसंगती अगदी योग्य अशीच आहे. पण लोंबणार्या तारा व खांब फोटोची शोभा कमी करतात. मी त्या काढून टाकल्या आहेत.
फोटो आता नक्कीच जास्त सुंदर दिसतो. चांगल्या निसर्गदृष्यांत अशा खटकणार्या गोष्टी हमखास दिसतात; त्यावेळी आपल्या हातात काही करणे शक्य नसते पण नंतर ती अडगळ आपल्या स्मृतीचित्रात ठेवण्याचे काय कारण ?
spot metering च्या उदाहरणात दिलेल्या फोटोमधील मागची भिकार बिल्डिंग काढून टाकून मी तेथे एक world heritage ची बॅकग्राउंड टाकली आहे. एक गंमत म्हणून. कुणाला फसवण्याकरिता नाही. श्री. गावसेना प्रमुख यांच्यासाठी केलेला हा प्रयोग.
तर असा हा फोटोशॉप. आज तो फोटोग्राफीचा अविभाज्य भाग बनला आहे. आपले सोसो फोटो सुंदर करावयाला आणि सुंदर फोटो आणखी सुंदर करावयास उपयोगी पडणारा. याची एखादी जुनी प्रणाली (उदा. photoshop 7) जरी आपण संगणकावर उतरवलीत तरी आपण भरपूर आनंददायी काम करू शकाल. उपयोग करावयास शिकणे अगदी सोपे आहे. बघू. जमले तर फोटोशॉपची ओळख मिपावर देईन.
शरद
शरद
प्रतिक्रिया
29 Mar 2011 - 10:35 am | ५० फक्त
सर्, तुमची फोटोशॉपवर बरीच हुकुमत दिसते आहे, ब्लॅक अँड व्हाईट फोटो अगदि जबरा झालाय. मला ते लेयर अन बाकीचे टुलबॉक्स उघडुन आले की भितीच वाटते, फोटोशॉपची.
29 Mar 2011 - 10:45 am | प्रचेतस
फोटोशॉपने जणू काही जादुई परिणाम साधला गेलाय.
हर्षदची सहमत आहेच ते लेयर आणि टूलबॉक्स काही जमत नाही.
फोटोशॉप शिकायला नक्कीच आवडेल. त्याबद्दलचा लेखही तुमच्याकडून अपेक्षित आहे.
29 Mar 2011 - 11:49 am | यशोधरा
मस्त चालली आहे लेखमालिका.
29 Mar 2011 - 12:48 pm | श्री गावसेना प्रमुख
शेवटी जे करायचे ते उघड केलच कि तुम्ही,
बाकी किल्ल्यावर आता मेणबत्ती लावायचे दिवस नाहीत,
(तुम्ही लाइनीच्या तारा गायब केल्या म्हणुन)
तुमचा प्रिय शिष्य.
29 Mar 2011 - 1:02 pm | शरद
श्री सेना प्रमुख,
तुम्हाला मशाली तर म्हणावयाचे नाही नां ?
शरद
31 Mar 2011 - 10:01 am | श्री गावसेना प्रमुख
नाही हो शरद राव असच
29 Mar 2011 - 1:37 pm | वपाडाव
वल्लींच्या व मौशींच्या फटुत केलेले बदल सुंदर...
किल्ल्याचं सौंदर्य खुललंय...
चान..
30 Mar 2011 - 7:29 am | मदनबाण
आपण चांगली माहिती देत आहात... :)
30 Mar 2011 - 8:01 am | अप्रतिम
सुंदर लेखमाला.
फोटोशोपची पण महिती घेण्यास उत्सुक.