छायाचित्रकला-५

शरद's picture
शरद in काथ्याकूट
19 Mar 2011 - 9:03 am
गाभा: 

ह्या भागात आपण फ़ोटो कॉम्पोझिशन यावर थोडी माहिती घेऊ. हा advance photography चा विषय आहे. नेहमी जेव्हा आपण भराभर फोटो काढत असतो तेव्हा याचा विचारही आपण करत नाही. पण जेव्हा तुम्हाला "खास" फोटो काढावयाचा असेल, मग ते व्यक्तीचित्र असेल किंवा एखादे निसर्गचित्र, तेव्हा तुम्ही याचा विचार करावयास पाहिजेच. केव्हापासून याच्या अभ्यासाला सुरवात झाली ?

जेंव्हा मानवाने गुंफ़ेतल्या भिंतीवर चित्रे काढण्यास सुरवात केली तेंव्हा त्याला एक विशाल फ़लक उपलब्ध होता. बैलाचे चित्र कोठे काढले आणि हत्तीचे कोठे याने फ़रक पडत नव्हता. पण जेंव्हा त्याने कागदावर चित्र काढावयास सुरवात केली तेंव्हा त्याला एक बंधन आले. आता त्याचे चित्र एका चौकटीत बंदिस्त झाले होते. बघणाऱ्याची दृष्टी आता त्या चौकटीतच फ़िरणार होती. हत्ती कोठे आणि बैल कोठे याला मह्त्व प्राप्त झाले. विशेषत : पाश्चिमात्य चित्रशैलीत. ऐतिहासिक भारतीय चित्रकलेने तिकडे दुर्लक्ष केले तर चीनमध्ये मोकळ्या सोडलेल्या जागेला असाधारण महत्व मिळाले. फ़ोटोग्राफ़ीबद्दल विचार करताना आपण पाश्चिमात्य शैलीचाच उपयोग करतो.

काय होते की आपण एखादा फ़ोटो/चित्र बघतो तेव्हा आपली दृष्टी एकदम सगळा फ़ोटो/चित्र पहात नाही. प्रथम आपली नजर चित्रातील एखाद्या प्रमुख बिंदूकडे आकर्षित होते. तेवढा भाग मेंदूत पोचे-पोचेतो नजर दुसरीकडे वळलेली असते. तेवढा भाग पाहून ती तिसरीकडे वळते.अशा रीतीने सर्व चित्र पहाण्यास आपण दोन-तीनदा किंवा जास्त वेळही नजर फ़िरवत असतो. ह्या पध्दतीने scanning झाल्यावरच संपूर्ण चित्राचे "ज्ञान " मेंदूला होते. हा प्रवास सरलतेने झाला तर सुखावह वाटतो. यात कोठे बाधा आली तर विरसता [jaarring note] निर्माण होते. लक्षात घ्या, हे सर्व sub-conscious level (अजाणतेपणे) वर होते. पण फ़ोटो चांगला वाटणॆ किंवा न वाटणॆ या वरच अवलंबून असते.खालील चित्रात आपली नजर कशी फ़िरते ते दाखवले आहे.

eyescan

हे जे scanning आपण करतो तेव्हा चौकटीतील काही जागा जास्त महत्वाच्या असतात. साधारणत: खालील चित्रात दाखवलेल्या A,B,C आणि D या जागांमध्ये जर सुरवात झाली तर जास्स्त सुखावह वाटते.

interest

अर्थात हे सर्व चित्राना लागू नाही. उदा. चेहऱ्याच्या close up मध्ये A,B,C D य़ॆणार नाहित. पण ज्या फ़ोटोत ३-४ वस्तू नजर खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतील, त्या वेळी तुम्हाला महत्वाची वाटणारी , ह्या चार बिंदूंपाशी असेल तर जास्त उत्तम. हा नियम नव्हे. चित्रकारांना तसे वाटते एवढे खरे. कॉम्पोझिशनला वेळ असेल तर व तुम्हाला व्ह्यु फ़ाइंडर मध्ये चांगले दिसत असेल तर उपयोग करा. जा वेळी फोटोतील घटकांची जागा बदलणे शक्य असते त्यावेळी जरा विचार करा. एखादी वस्तू काढून टाकणे, तिची जागा बदलणे, एखादी गोष्ट आणून ठेवणे यांचा विचार करण्याची सवय करा. अस बघा, नाटकात नेपथ्य महत्वाचे. कां ? प्रेक्षकांवर त्याचा जबरदस्त परिणाम होत असतो. तोच परिणाम तुमचा फोटो पाहणार्‍याच्या मनातही.

चित्राची चौकट विषयाला बंदिस्त करते. बघणाऱ्याच्या कल्पनाशक्तीला नव्हे. तिला वाव द्यावा. उदा. तुम्ही profile मध्ये एक फ़ोटो काढलात. व्यक्ती डावीकडे पहात आहे. ती काय पहात असावी याची कल्पना करावयाला बघणाऱ्याची नजर चौकट ओलांडून डावीकडॆ जाते.पलीकडे काही नाही हे तुम्हाला व त्याला माहित असले तरी. डावीकडे लगेच चौकटीची रेषा आली तर ती खटकते.म्हणून त्या बाजूला जास्त जागा सोडा. उजवीकडची कमी करा. उपक्रमवर प्रसिध्द झालेल्या एक फ़ोटोवर अशी सुचना नैसर्गिक पणाने आली होती. येथे reletivity चा उपयोग करा. डावीकडे जास्त जागा नसेल तर उजवीकडची कमी करा.

या सुचनेचा उपयोग फ़ोटोत क्षितिज येत असतानाही होतो. क्षितिजाची रेषा कधीही मध्यावर नसावी. आकाशातील रंगसंगती महत्वाची असेल तर तीला ५० टक्क्यापेक्षा जास्त जागा द्या किंवा जमीन-पाणी महत्वाचे असेल तर आकाश ३० टक्क्यातच बसवा. माझी मते विसरा. स्वत : फ़ोटो काढताना आकाशाला ३०, ५०, ७० टक्के जागा देऊन फ़ोटो काढा व काय भावते ते पहा.[हेही एक प्रकारचे bracketting झाले]. इमारतीचा फ़ोटो काढतानाही वरचा भाग ५० % ला लटकावू नका.

आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे चित्रातील तोल. हे समजावून सांगणे थोडे कठीण आहे. [थोडे कसले बरेच!] कारण हा भाग थोडासा तांत्रिक व थोडासा भावनिक.एक सोपे उदाहरण घेऊ. एखादे चित्र भिंतीवर लटकावयाचे आहे. मागची दोरी खिळ्यावर लावली की चित्र जागेवर रहाते. पण बहुतेक वेळी ते कललेले असते.[बायको ओरडली] म्हणजे परत खुर्चीवर चढून, दोरीची जागा बदलतो, खाली उतरले की [तिच्या] लक्षात येते की मगाशी डावी बाजू खाली होती आता उजवी आहे. पण आता आपण हुशार झालेले असतो. खुर्चीवरून न उतरताच तिचे मत विचारतो. अगदी हेच चौकटी मधील चित्राचे होत असते.चित्रात निरनिराळ्या वस्तूना स्वताचे वजन [gravitaional नव्हे] असते. सोपे करून सांगावयाचे म्हणजे तुमचे लक्ष ओढून घ्यावयाची ताकद. चित्रातील एकाच भागात अशा वस्तू जास्त झाल्या तर ती बाजू जड होईल, उरलेली हलकी. असे झाले की चित्र/फ़ोटो unballanced होते. दुसऱ्या बाजूला लक्ष ओढून घेणारी वस्तू असेल तर चित्र समतोल होईल. हे सर्व वर सांगितल्या प्रमाणे sub conscious level वरच होत असते.. असे काही होत नाही याकडे ध्यान दिले पाहिजे. ही थोडी advance photography झाली. पण सगळ्य़ा कलांमध्ये याचा विचार होतो. एक उदाहरण घेऊ. ताज महालच्या बाजूचे मिनार मुख्य इमारतीला ballance करतात. ही समतोलपणा राखणारी वस्तू दुय्यम असावी. ती वस्तू असेल [object] किंवा एखादा निराळा गडद रंगही ! वर सुचवल्याप्रमाणे अभ्यास हाच प्रत्यक्षातला गुरू. एका सुंदर इमारतीचा दुरून फ़ोटो काढा.कोन बदलून दुसऱ्या फ़ोटोत बाजूला थोडी जागा मोकळी ठेवा व त्यात एका माणसाला उभे करून परत इमारतीचा फ़ोटो काढा. जवळचा छोटा माणुस मोठ्या वास्तूला समतोलपणा देईल. दूरवरच्या टेकड्यांचा तोल राखावयास शेजारच्या झुडुपाचा उपयोग होतो.

फ़ोटोमध्ये खालील गोष्टी बघणाऱ्याचे ध्यान खेचतात व त्यांच्या सुयोग्य उपयोगाने फ़ोटो आकर्षक होतो.या पायाभूत गोष्टी पुढील :
१]shape आकार ,२] tone रंगाच्या छटा, ३] form , ४] colour रंग, 5] pattern व ६] texture. फ़ोटोमध्ये यातील एक, दोन किंवा अधीक गोष्टींचा वापर काळजीपूर्वक करता येतो. प्रत्येक फोटोत हे सगळे घटक असतीलच असे नाही. तसेच एकेकाचे महत्वही कमीजास्त असेल. व्ह्यू फाईंडरमध्येच या गोष्टी बघावयाची सवय करा. वेळ असेल तेव्हा , फोटो काढावयाचा नसेल तरीही, व्ह्यू फाईंडरमध्ये यातील कायकाय दिसते ते पहा. नंतर या गोष्टी आपोआप होतात.
उदा. सिल्हौटमध्ये फ़क्त shape दिसतो. जून्या दरवाजाचा फ़ोटो काढला तर त्यांत गंजलेली कडी, टवके उडालेले लाकडी दार, टेक्श्चर दाखवेल. दूरवरील डोंगरांच्या रांगा वा दाट झाडी तुम्हाला निरनिराळ्या रंगछटा दाखवेल.बागेमध्ये फ़ुलझाडांचे पॅटर्न मिळतील.रंग तर सर्वत्रच असतात पण नांगरलेल्या जमिनीचा एखाद-दुसऱ्या रंगातला फ़ोटोही छान येतो. फ़ोटो काढताना यातील कोणत्या element वर भर देता येईल त्याचा विचार करा.
असो. फ़ोटोग्राफ़ीमध्ये सुधारणा व्हावी असे मनापासून वाटत असेल तर दोन गोष्टी करा,

(१) चित्रांची / फ़ोटोग्राफ़ीची प्रदर्शने न चुकता बघा. तेथे अभ्यास म्हणून हा फ़ोटो मला का आवडला किंवा का आवडला नाही त्याचा विचार करा..आपण हा फ़ोटो कसा काढला असता ते ठरवा. फ़ोटोग्राफ़ीवरील पुस्तके / मासिके वाचा. तिथे भरपूर टिप्स असतात. इंटरनेटवर तर तुम्हाला अल्लाउद्दीनाची गुहाच भेटते. त्यात वेळ खर्च करा. सहजसाध्य आहे म्हणूनच तिकडॆ दुर्लक्ष होते.
(२) फ़ोटो हा Art व Technic यातून निर्माण होतो. दुसऱ्या भागाकरिता एकच सुचना : आपल्या कॅमेऱ्याचे मॅन्युअल तोंडपाठ करा. सुचना पोरकट वाटते ? नाही, मी गंभीरपणे लिहित आहे. आजचे कॅमेरे तांत्रीक दृष्ट्या इतके सुधारलेले आहेत की आपण त्यांचा ५०% सुद्धा वापर करीत नाही. मॅन्युअलमध्ये सगळे आहे हो, फ़क्त पहा आणि फ़ोटो काढताना विचार करत न बसता कॅमेरा वापरता यावा म्हणून मॅन्युअलवर वेळ खर्च करा.(तरीही काही अडलेच तर व्यनि करता येतोच !)

पुढील लेख कॅमेरा खरेदी करताना काय पहावे यावर.
शरद

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2011 - 9:39 am | श्री गावसेना प्रमुख

जाउ द्या मास्तर तुम्ही लै रागवताय (नो कॉमेंट्स्)फोटोची लींक द्या

मस्त कलंदर's picture

19 Mar 2011 - 10:11 am | मस्त कलंदर

वाचतेय..

मोहन's picture

19 Mar 2011 - 11:24 am | मोहन

वाचतो आहे....

शेलार मामा मालुसरे's picture

19 Mar 2011 - 2:42 pm | शेलार मामा मालुसरे

वाचेल तो वाचेल !!

अशोक पतिल's picture

19 Mar 2011 - 4:55 pm | अशोक पतिल

२/३ नियमावर जर लिहाल तर फारच छान ! !

शरद's picture

20 Mar 2011 - 7:35 am | शरद

२/३ चा नियम म्हणजे आपणास काय म्हणावयाचे आहे हे नीट कळले नाही. परंतु दुसर्‍या चित्रातील AB आणि CD रेषा २/३ (किंवा १/३) या अंतरावरच आहेत. फोटोतील फ़ोकल पॉइंट तेथे किंवा त्याच्या आसपास असेल तर रचना जास्त सुयोग्य व सुखद वाटते हे सांगितले आहेच.
पाश्चात्य चित्रकारांचे हे मत. पौर्वात्य चित्रकार तसे मानतातच असे नाही. तेव्हा याला नियम म्हणावयास पाहिजेच असे नाही. आपणास काय आवडते ते करावे. फोटोतील समतोल व प्रवाह हे माझ्या मते जास्त महत्वाचे. जर या दोन गोष्टी साधल्या असतील तर फ़ोकल पॉइंट जरा सरकला तरी बिघडणार नाही. इथे परत एकदा नमुद करावयास पाहिजे की हे मुद्दाम काढलेल्या फोटोंमध्येच शक्य आहे. अथवा तुम्ही एवढा अभ्यास करावयास पाहिजे की ही गोष्ट अजाणतेपणेच घडली पाहिजे. आपण काही व्यावसाईक फोटोग्राफर नाही; तेव्हा एक नोंदवून ठेवण्याची बाब.

शरद

प्राजु's picture

20 Mar 2011 - 2:17 am | प्राजु

वाचतेय..

इंटरनेटस्नेही's picture

20 Mar 2011 - 3:05 am | इंटरनेटस्नेही

चान चान.
-
इंट्या फोतोग्राफर.

अशोक पतिल's picture

20 Mar 2011 - 10:29 am | अशोक पतिल

माफ करा, मला १/३ नियम असे म्हणायचे होते. छान !

मैत्र's picture

21 Mar 2011 - 5:55 pm | मैत्र

मनापासून धन्यवाद ...
फ्रेम मध्ये टेक्निकली काय 'capture' केलं जातं ती छायाचित्राची तांत्रिक बाजू.
पाण आजू बाजूला अनेक 'objects' असतात. , व्ह्यू फाईंडरमधून त्यातून एक 'स्टोरी' शोधणं ही कला.
अशीच अनेक उदाहरणं द्या... त्यामुळे विचाराला आणि या शोधाला चालना मिळत जाते... त्यांचे फोटो दिले तर काय सांगायचे आहे ते त्यातून नेमकं उमगेल...
पुढच्या लेखांची वाट पाहतो...

महेश_कुलकर्णी's picture

21 Mar 2011 - 6:10 pm | महेश_कुलकर्णी

नमस्कार साहेब,
लेखमाला अत्यंत सुंदर आहे.
आपल्या माहिती मध्ये जर कोणती मराठी पुस्तके असतील छायाचित्रकला विषयाबद्दलची तर कृपया सुचवा.
जमेल तसे खरेदी करून शिकावे म्हणतो आहे ...
सध्या मी m मोड मध्ये बरेच फोटो काढतो आहे...पण मला बऱ्याचदा त्यामध्ये noise जास्त आणि sharpness कमी वाटतो.. कृपया याच्या तांत्रिक बाबी सांगाव्यात धन्यवाद,.

-महेश कुलकर्णी

शरद's picture

22 Mar 2011 - 11:31 am | शरद

आपण manual mode वापरत आहात. बर्‍याच कॅमेर्‍यात जेव्हा आपण M Mode वापरतो तेव्हा program mode मध्ये कॅमेर्‍याला काय एक्स्पोजर बरोबर वाटतो तेही M mode मध्ये पहाता येते. उदा. तुम्ही f 4, 1/500 sec असा एक्स्पोजर द्यावयाचे ठरविले व जर कॅमेर्‍याला वाटत असेल की f4, 1/250 sec हे सेटिंग बरोबर तर तसे तो व्ह्यू फाइंडरमध्ये दाखवितो. एकदा तपासून बघा. जर ev एकच असेल तर तुमचा अंदाज बरोबर आहे, अभिनंदन. फरक असेल तर कॅमेराच बरोबर असे समजून त्या ev ला तुम्हाला पाहिजे तो f no.निवडा व time adjust करा (किंवा पाहिजे ते timing निवडा व मग ev प्रमाणे f no बदला) असे समजून चालू कीं तुम्हाला जाणून बुजून ev बदलावयाचा आहे. हरकत नाही. त्या ev ला f no जास्तीत जास्त (उदा. f 8 ) घ्या व त्या प्रमाणे timing बदला. माझ्या अनुभवाप्रमाणे जर हलत्या वस्तूचा फोटो काढत नसाल तर लहान f no हाच फोटो शार्प न येण्याचे कारण असते. चार फोटो काढून, सेट्टिंग्ज तपासून काय झाले ते इथे कळवा.
noise दिसत असेल तर ISO नक्कीच ८०० च्या वर असणार. रात्रीचे फोटो नसतील तर ISO 200 च्या वर वापरावयाचे कारणच नाही. जास्त ISO असेल तर noise टाळणे अवघड आहे. फोटोशॉपच्या सहाय्यानेच काही करणे शक्य आहे.
मराठी पुस्तकांबद्दल चौकशी करून सांगतो.
शरद

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 6:29 pm | कच्ची कैरी

छान !नविन माहिती मिळाली .धन्यवाद .