कॅमेरा रॉ फ़ाईल्स
आजकाल डिजिटल कॅमेर्यावर मिळणारी छायाचित्रे खरोखरीच नेत्रदीपक असतात. आणि अशी चित्रे मिळवावयाला फार भारी, १०-१२ मेगा पिक्झलचा कॅमेराच पाहिजे असेही नाही.त्यामुळे हल्ली छायाचित्र काढतांना आपण काहीतरी गमावतो आहोत इकडेही आपण लक्ष देत नाही. नक्की काय होत आहे?
आपण फोटो घेतो तेंव्हा कॅमेर्याच्या सेन्सरवर चित्राची छबी तयार होते. याला डिजिटल निगेटिव्ह म्हणावयास हरकत नाही. कॅमेरा ही निगेटिव्ह कॅमेर्यात प्रोसेस करतो व आपणास तयार पॉझिटिव्ह देतो. ती आपण कॅमेर्यात, संगणकावर पहातो, त्याची प्रिंट काढतो. चांगली ८"x१२" अशी मोठीही करता येते. मग गमावले काय ? तेच आता बघू.
समजा तुमचा एक छान फ़ोटो तुम्हाला मित्राला पाठवावयाचा आहे. त्याचा आकार जर १५ मेगा पिक्झल असेल तर ही मोठी फ़ाईल इंटरनेटवरून पाठविणे अडचणीचे होते. तुम्ही तीचा आकार कमी करता, १-२ मेगा पिक्झल. मग पाठविणॆ सोयीचे होते. आकार लहान करता, कॉम्प्रेस करता, म्हणजे १३-१४ मेगा पिक्झल काढून टाकता. हे करतांना चित्राची गुणवत्ता (quality) कमी होते. उदा.JPEG या प्रकारच्या lossy compressions मध्ये सोय पाहिली जाते पण गुणवत्ता कमी होतेच.
तुमचा कॅमेरा हेच करत असतो. सेन्सरवरील फ़ाईलची काटछाट करून तो पोझिटिव्ह तयार करतो. ही काटछाट फार काळजीपूर्वक करतात म्हणून तुम्हाला चांगला फोटो मिळतो. पण गुणवत्ता कमी होतेच.जर तुम्हाला उत्कृष्ट,केवळ चांगला नव्हे, फोटो पाहिजे असेल तर ही कॅमेर्यातील लुडबुड नसलेली छबी तुमच्या हातात पडली पाहिजे. मध्यम-भारी किंमतीच्या कॅमेर्यांमध्ये ही सोय उपलब्ध झाली आहे. या छबीला म्हणतात camera raw file. आज ही सोय असलेले ५०-६० कॅमेरे, निरनिराळ्या कंपन्यांचे बाजारात मिळतात.अगदी १०-१५,००० रु. किंमत असलेल्या कॅमेर्यातही अशी सोय असते. कॅमेर्याची निवड यावर लिहतांना माझे मत असे की raw formatची सोय असेल तर प्राधान्य द्या. आता आपण जरा जास्त माहिती पाहू.
काटछाट नाही म्हणून ही छबी थोडी मोठी, जवळजवळ १० मेगा पिक्झलच्या आसपास असते. तुमच्या कॅमेर्यात २-४ जिबि.चे कार्ड असतेच, म्हणजे ही काही मोठी अडचण नाही. तुम्ही जेंव्हा रॉ मध्ये फ़ोटो काढता तेंव्हा कॅमेरा तुम्हाला एक साधा, नेहमीचा फोटो देतोच. याचा फायदा हा की तुम्ही रॉचे काही केले नाही तरी नेहमीचा फोटो हाताशी असतोच. आता कॅमेर्याची लुडबुड नको म्हटले की पुढचे सोपस्कार तुम्हालाच करावयास पाहिजेत, नाही कां ? आणि येथेच खरा स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. white ballance, exposure, contrast, colour cast, sharpness, lens abberation corrections अशा कित्येक गोष्टी तुम्ही ठरवू शकता. तुम्ही राजे ! बस. संध्याकाळची लालसर छटा कोणती हवी, मी ठरवणार! contrast ? मला पाहिजे तो! . हे केवळ रॉमध्येच शक्य आहे. तर असा आनंद मिळवत उत्कृष्ट , केवळ चांगला नाही, फोटो तयार करावयाचा. तयार करतांना तो तुमव्या डोळ्यासमोर आकार घेत असतो. आपल्या मनाजोगती छबी झाली की ती डेव्हलप करावाची, कारण आतापर्यंत ती निगेटिव्हच असते. पूर्वी मी घरी निगेटिव्ह(B W) डेव्हलप करत असे.अजून त्यातला आनंद आठवून मन उल्लसित होते.
ही डेव्हलपमेंट करावयाला निरनिराळे प्रोग्रॅम मिळतात, काही विकत, काही फुकट. फोटोशॉपमध्ये ही सोय आहे.Silkypix Developer Studio 3.0 मोफ़त उतरवून घेता येत होते. उपयोग कसा करतात हे थोडक्यात सांगणार आहे. रॉ बद्दलची एक गोची आहे. रॉ फ़ाईल कशी तयार करावयाची याबद्दल standardisation झालेले नाही. प्रत्येक कॅमेरा कंपनी आपल्याला पाहिजे तसे करते. त्यामुळे कॅननची पद्धत निराळी, निकॉनची निराळी. बरे कॅननच्या सगळ्या कॅमेर्यातही एकच असेल असेही नाही.प्रत्येक वर्षी १० नवीन कॅमेरे येणार. पण ती प्रोग्रॅमवाल्यांची डोकेदुखी. आपल्या कॅमेर्याला जुळणारा प्रोग्रॅम आपल्याकडे असला म्हणजे झाले.
शेवटी एक दोन गोष्टींबद्दल सांगून थांबू. वर दिलेल्या गोष्टी कॅमेर्यात असतात व फोटोशॉपमध्येही आहेत. मग रॉ कशाला ? याचे उत्तर असे की कॅमेर्यामध्ये WB, esposure वगैरे आहेत पण त्यांचा वापर केल्यानंतर प्रोसेसमध्ये पिक्झल जातात. आणि फोटोशॉपचा उपयोग पिक्झल गेल्यानंतरच्या अवशिष्ट भागावरच करता येतो.आता एकदा गेलेले पिक्झल कायमचे गेलेले असतात. ते कुठेही,कसेही परत आणता येत नाहीत. तेंव्हा रॉ फ़ाईल एकमेवाद्वितीय. काही चित्रांत रॉ फ़ाईल डेव्हलप करून मग फोटोशॉप वापरणे उपयोगी पडते.
रॉ फ़ाईल्सची सोय कॅमेर्यात असेल तर तो कॅमेरा तुम्हाला प्रोसेस करण्याकरिता लागणार्या प्रणालीची सिडी देतो हे बरोबर. खरे म्हणजे तुम्हाला सिल्कीपिक्स वगैरेची गरज पडू नये. परंतू बरेच जण ही सुविधा वापरतच नाहीत म्हणून केवळ रॉचे उपयोग कळल्या नंतर तरी रॉचा वापर वाढावा ही इच्छा. तसे हे सोपे आहे. सिडीमधील सर्व सुविधा वापरल्या पाहिजेतच असेही नाही. नेहमी लागणार्या व तेव्हढ्याने भागणार्या गोष्टी प्रथम बघू.
(१) कॅमेर्यातील रॉ फ़ाईल संगणकावर घेतली की ती प्रणालीत उघडावी. आकार मोठा घ्यावा म्हणजे केलेले बदल झटकन लक्षात येतात.
(२) एक्स्पोजर :कॅमेर्यात एक्स्पोजर शटर स्पीड व ऍपर्चर यांच्या संयुक्त उपयोगावर ठरते. सहसा ते स्टेप्समध्ये बदलते. उदा. स्पीड निम्मा-निम्मा किंवा दुप्पट-दुप्पट होत जातो. इथे तुम्ही लहान पायर्यांमध्ये (०.१) तो कमी किंवा जास्त करू शकता.किंवा स्लाईडर वापरून स्टेपलेस बदला. आरामात, कॉफ़ी पितपित,बदल करा. "निसटून जाई संधीचा क्षण" ही भीती नाही.
(३) व्हाईट बॅलन्स : पांढरा रंग निरनिराळ्या प्रकाशांत निरनिराळा दिसतो. विजेचा दिवा, ट्युब, दुपारचा सुर्य प्रकाश, संध्याकाळ, ढगाळ हवा, प्रत्येक वेळी तो बदलत असतो. कॅमेर्यात ८-१० सेटिंग असतात. आपण दरवेळी योग्य ते वापरतोच असे नाही. हरकत नाही, इथे काय तो बदल करून घ्या. शिवाय इथे परत स्टेपलेस बदलाची सोय आहेच. कलर टेम्परेचर ३००० ते १०००० या रेंजमध्ये बदलत रहा. फोटो चारला काढा, ६चा आभास निर्माण करा.साधारणत: कोणत्या वेळी कोणते टेम्परेचर असते याचे टेबल दिलेले असते. सुरवातीला त्याचा उपयोग करावा पण त्याचे बंधन घालून घेवू नये. आपल्याला काय भावते ते महत्वाचे.
(४) कलर ऍडजस्टमेंट : हे एक महत्वाचे साधन तुम्हाला चित्रातील रंग आपल्याला पाहिजे तसे मिळवावण्याकरिता वापरावयाचे. यातही प्रणालीमध्ये असलेले पूर्व-रचित किंवा स्वत: बदल करून (Mannually) अशा दोन प्रकारांनी वापरून पाहिजे ते खेळ करा.
वापर थोडा थोडा बदल करून पहा.पाहिजे तेथे थांबा. या वेळीच tone मध्ये प्रयोग करा.
(५) शार्पनेस व नॉइज रिडक्शन : ही दोन एकमेकाविरुद्ध काम करतात. शार्पनेस वाढवला तर तर नॉइजही वाढतो व नॉइज कमी केला तर शार्पनेसही कमी होतो. म्हणजे यांचा उपयोग हे Ballancing Act आहे. इथे कॅमेर्यावर सर्व गोष्टी सोडण्याऐवजी आपण सुत्रे हातात घेतल्याचा फायदा दिसून येईल. मोठा आकार केल्याचा खरा उपयोग येथे बघा.
(६) सुरवातीला एवढ्या गोष्टी पुरेत. Lens Correction,Vignetting वगैरे बाबी व Development च्या वेळी करता येणारे बदल सावकाश शिकता येतील.
(७) असे तयार केलेले चित्र व कॅमेर्याने दिलेले चित्र तुलना करून पहा.आपण इतके दिवस रॉ फ़ाईल्स न वापरल्याबद्दल वाईट वाटेल (ते विसरा).
वर दिलेले कशाकरिता लिहले ? शेवटी तुमचे काम तुम्ही स्वत:चे मॅन्युअल वाचूनच करावयाचे आहे.इच्छा एवढीच की जर तुम्ही रॉ फाईल्स वापरावयास सुरवात केलीत तर मिपावर येणारी छायाचित्रे आणखीन जास्त चांगली येतील. एक करून बघा. पुढील छायाचित्र पाठवतांना कॅमेर्यावरचे व रॉवर तुम्ही प्रोसेस केलेले दोन्ही द्या. सगळ्यांनाच फरक बघता येईल व इतरही या फंदात पडतील.
एक सांगावयाचे राहिलेच. चित्र घेतांना प्रकाश कमी असेल तर कोणतीच प्रणाली तो पैदा करू शकत नाही. तेंव्हा थोडा over expose फोटोच काम करावयाला ठीक पडतो.
शरद
प्रतिक्रिया
4 Apr 2011 - 11:29 am | यशोधरा
छायाचित्रकलासंबंधित ह्या सर्व लेखांची वाचनखूण साठवलेली आहे.
धन्यवाद.
4 Apr 2011 - 11:58 am | नन्दादीप
तुमच्या सर्व लेखांची वाचनखूण साठवलेली आहे.
अतिशय उत्तम माहिती देता आहात आपण... धन्यवाद...!!!
4 Apr 2011 - 12:15 pm | तिमा
अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही उलगडून सांगितली आहे. बहुतेक जणांना हे माहितच नसते.
4 Apr 2011 - 12:29 pm | ५० फक्त
शरद सर, रॉ इमेज घ्रेणारा कॅमेरासाठी मेमरी कार्डाची साईझ कमीत कमी किति असावी ? म्हणजे २ जिबि मध्ये किती रॉ इमेज बसतात, ४ जिबि मध्ये किती ?
अणि रॉ इमेज साठी कॅमेरा जास्त बॅटरी खातो काय ?
4 Apr 2011 - 3:21 pm | शरद
एका फाईलला १० एम्बी धरले तर २ व ४ जिबीच्या कार्डावर अनुक्रमे २००व ४०० चित्रे निघाली पाहिजेत. रॉ फाईलमुळे जास्त वीज खर्च व्हावयाचे कारण नाही.
शरद
5 Apr 2011 - 1:39 pm | मोहन
छान ! वा खु साठवली आहे .
धन्यवाद शरदजी.