आज आपण दुसऱ्या भागास सुरवात शटर स्पीडने करू. प्रकाश नियंत्रीत करावयास शटर [पडदा] असतो. भिंगातून येणारा प्रकाश हा थोडा वेळ फ़िल्मवर पडू देतो. शटरचे निरनिराळे प्रकार असले तरी त्याना मह्त्व नाही. मह्त्व वेळेला.हा स्पीड सर्वसाधारणत: २,१,१/२, १/४, १/८, १/१५/ १/३०, १/६०, १/१२५, १/५०० ...सेकंद असा असतो. म्हणजे प्रत्येकवेळी निम्मा निम्मा होत जाणारा.ऍपर्चरसारखाच. फ़िल्मवर पडणारा एकूण प्रकाश हा या दोहोंवर अवलंबून असतो.आता एक सारिणी करू.
ऍपर्चर क्षेत्रफ़ळ स्पीड गुणाकार
१.४ १/ २ १/२५० १/५००
२ १/ ४ १/१२५ १/५००
२.८ १/ ८ १/६० १/४८०
४ १/१६ १/३० १/४८०
५.६ १/३२ १/१५ १/४८०
८ १/६४ १/८ १/५१२
याचा अर्थ असा की एकच एक्स्पोजर किंवा ev [येथे १/५०० ] आपण निरनिराळ्या ऍपर्चर-स्पीड्च्या मदतीने मिळवू शकतो. याचा फ़ायदा असा की आपणास हवा तो स्पीड निवडण्याची मुभा मिळाली; फ़क्त त्याप्रमाणे ऍपर्चर बदलेले की झाले. किंवा उलटे. अपर्चर निवडा,योग्य तो स्पीड ऍडजस्ट करा म्हणजे झाले.
इथेच modes व priorities यांची माहिती घेऊं. कॅमेरा हा संगणकासारखा (किंवा बिचार्या नवर्यासारखा) ईमानदार नोकर आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तो काम करतो. संगणकात program असतात; तुम्ही पाहिजे तो निवडता व तुम्ही सांगाल त्याप्रमाणे त्या प्रोग्राममधील आज्ञांचे पालन केले जाते. कॅमेर्यामध्ये याला modes म्हणतात. यांची एक dial कॅमेर्यात असते. तेथे निवड केली की त्याप्रमाणे काम सुरू. .सर्वसाधारणपणे चार modes प्रत्येक कॅमेऱ्यात असतातच. M, P, S, A. शिवाय तुम्हाला अक्कल नाही अशी कंपनीची खात्री असल्याने ती इतरही भरपूर modes देते. उदा. scene, beach, party, वगैरे. पार्टीमध्ये फोटो काढताय ? हा mode निवडा व aim and shoot. पोरखेळ. कॅमेरा हाताळवयाची सवय होईपर्यंत ठीक आहे पण नंतर अजिबात वर्ज. तुम्ही कशाला प्राधान्य देता त्याला priority म्हणतात.
Manual..[M] ..... यात तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. पाहिजे तो ऍपर्चर व पाहिजे तो स्पीड. हा पर्याय शक्यतो सुरवातीला हाताळू नये.(सुरवातीला म्हणजे पहिले ३ महिने, प्रकाशाचा अंदाज येईपर्यंत) हल्ली एलेक्ट्रोनिक्स इतके पुढे गेले आहे की प्रकाश मोजण्याचे काम कॅमेऱ्यावर सोडून देणे उत्तम. आमच्या वेळी, जेंव्हा फ़िल्मकरता पैसे मोजावे लागत, तेंव्हा ही निवड चैनीची गोष्ट होती. डिजिटलमध्ये पैसा खर्च होत नाही म्हणून प्रयोग करावयास हरकत नाही. शक्य असेल तर, प्रथम कॅमेऱ्याला निवड करू दे. (P) फ़ोटो काढा व मग M मध्ये जावून आपल्याला योग्य वाटेल ते कॉंबिनेशन निवडून फ़ोटो काढा. दुसऱ्यात काय चुकले आहे ते कळेल.चुका(चुकीचे फोटो) डिलिट [मराठी शब्द ?] करा. हळू हळू सुधारणा होईल. आनंद देणारा कष्टप्रद मार्ग.
Programme [P] .... सर्व निवड कॅमेरा करतो. ९९% वेळी फ़ोटो छान येतो. स्वनिर्मितीचा आनंद शून्य. तुमचा भारी कॅमेरा लहान मुलांचा Aim & Shoot कॅमेरा होतो.[हा पर्याय बायकोच्या/ मैत्रीणीच्या हातात कॅमेरा देताना सर्वोत्तम!] माझा [फ़ुकटचा] सल्ला. महत्वाचे फ़ोटो P वर काढा. नंतर ते लगेच A किंवा S वर काढा. नको असलेले खोडून टाका. नंतर हळहळ वाटणार नाही !
Shutter [S]...... शटर प्रायॉरिटी मध्ये तुम्ही स्पीड निवडता.उदा. धावती गाडी, धबधब्यातून पडणारे पाणी या सारखे फ़ोटो काढताना, कमीतकमी स्पीड पाहिजे .१/५०० किंवा त्याहून कमी. तेंव्हा कॅमेऱ्याने स्पीड ठरवण्याऐवजी तुम्हीच निर्णय घ्या व कॅमेऱ्याला अपर्चर ठरवू द्या. candid photo काढताना कमितकमी स्पीड जास्त चांगला फ़ोटो देण्याची शक्यता अधीक. स्टॅंड न वापरता, हातात कॅमेरा घेऊन, आपण फ़ोटो काढतो, तेंव्हा हलण्याची शक्यता वाढते; अशा वेळीही स्पीड कमितकमी ठेवणे योग्य ठरते. थोडक्यात ह्या पर्यायाचा अभ्यास करणे फ़ायदेशीर. येथेही P Mode मध्ये फोटो काढा; नंतर S मध्ये जावून शटर स्पीड स्वत: ठरवून, फोटो काढा. दोघात काय फरक पडला ते पाहून नको तो डिलिट करा. ( श्री. लंबूटांग यांचे फोटो पाहिलेत ना ? तुम्हीही प्रयोग करा.)
Aperture[A] .... इथे ऍपर्चर आपण ठरवतो व कॅमेरा स्पीड. हा पर्याय वापरण्याचे कारण यात तुम्ही Depth of Field नियंत्रीत करू शकता. वर जरी म्हटले असले की एका EV ला A/S निरनिराळे पर्याय असतात, तरी हा एक महत्वाचा फ़रक त्यांमध्ये असतो. प्रथम DoF म्हणजे काय ते पाहू.
पहिल्या भागात ab चे प्रतिबिंब cd येथे मिळते हे आपण पाहिले. cd येथे ते sharp आहे. ab च्या जरा मागे-पुढे असलेल्या subject चे काय ? त्याचे प्रतिबिंब तेवढे sharp असणार नाहीच. पण किती हललेले असेल ? येथे आपल्या डोळ्याचा संबंध येतो. किती अंतरावरील फ़रक लक्षात येतो याला मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या आतील फ़रक आपणास कळतच नाही. ते sharp नसले तरी sharp च वाटते.म्हणजे ab च्या जरा पुढे व थोडे मागे असलेल्या वस्तूचीही प्रतिमा स्पष्टच वाटते. हे ab च्या मागचे पुढचे अंतर, जातील वस्तूंचे छायाचित्र आपणास रेखीव भासते, त्या अंतराला Depth of Field म्हणतात. हे अंतर ab च्या पुढे जेवढे असते त्याच्या तुलनेने मागे जास्त असते. DoF अपर्चरवर अवलंबून असते. जेवढा अपर्चर नंबर लहान तेवडे DoF कमी. अपर्चर २ ठेवण्याऐवजी ८ ठेवले तर DoF जास्त मिळेल. DoF अंतरावरही अवलंबून असते. जास्त अंतर, जास्त DoF. जवळचे फ़ोटो घेताना जास्त काळजी घ्यावी.DoF भिंगाच्या फ़ोकल लेन्थवरही ठरते. जास्त फ़ोकल लेन्थ, कमी DoF. ३५ एमेम च्या भिंगाने १०५ एमेमच्या भिंगापेक्षा जास्त DoF. भरपूर गोंधळ घातला ? थोडे सोपे करू.
DoF वाढवण्याकरिता...
१] अपर्चर नंबर वाढवा......२ ऐवजी ८
२] जास्त अंतर उत्तम.... ५ फ़ूटाऐवजी १० फ़ूट
३] कमी फ़ोकल लेन्थची लेन्स .... १०५ एमेम ऐवजी ३५ एमेम.
पूर्वी SLR lens वर DoF च्या खूणा असावयाव्या.तुम्ही फ़ोकस केले की किती DoF आहे हे लेन्सवरच दिसावयाचे. डिजिटलवर ही सुविधा नाही. DoF महत्वाचे का ? साधारणत: आपल्याला फोटोतील सर्व वस्तू शार्प दिसाव्यात असे वाटते. मित्रांबरोबर ताजमहाल पाहतांना दूरचा ताजमहाल व जवळचे मित्र, सगळे शार्प पाहिजे. उलट काही वेळां (उदा. पोर्ट्रेट) मुख्य वस्तू शार्प व मागील अस्पष्ट असल्यास फोटो सुरेख वाटतो. दुसरे उदा. म्हणजे संध्याकाळचे Landscape. इथे सर्वच धूसर, अस्पष्ट असेल तर छायाचित्र चित्रासारखे (Painting)दिसेल. अशा वेळी DoF आपल्या ताब्यात असणे आवष्यक
आज एवढे पुरे. (DoF वर एक संपूर्ण लेख लिहावा का?) लेख मुद्दाम छोटे छोटे आहेत. या लहान भागात दिलेली माहिती तुम्ही तुमच्या कॅमेर्यावर फोटो काढून चेक करा. काही शंका असली तर विचारा.
शरद
छायाचित्रकला-२
गाभा:
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 7:04 am | शेखर
वाचनखुण साठवली आहे.....
4 Mar 2011 - 7:38 am | विंजिनेर
काका, तुमच्या सोप्या लेखमालिकेला छायाचित्रांची जोड असेल (उदा, अॅपर्चर वाढवत तर काढलेल्या फोटोंत कसा फरक पडत जातो.)तर उपयुक्ततेत नक्कीच भर पडेल
4 Mar 2011 - 8:09 am | यशोधरा
असेच म्हणते.
4 Mar 2011 - 9:28 am | दिपाली पाटिल
मी पण असेच म्हणते...तुम्ही फुड फोटोग्राफीबद्दल पण थोडीफार माहीती द्यावी... बाकी ही लेखमाला फार उपयोगी येइल...
धन्यवाद,
दिपाली
4 Mar 2011 - 8:20 am | ५० फक्त
+१ टु विंजिनेर, पहिल्या भागाच्या प्रतिसादात मी हेच म्हणले होते, नाहीतर हे लेख फक्त अनुवाद वाटतील. शरदजी जे लिहिताहेत त्या प्रकारे लिहिल्या जाणा-या खुप इबुक आहेत जालावर फोटोग्राफिबद्दल.
शरद्जी, रागावु नका. पण उदाहरणांशिवाय ही तांत्रिकता क़ळायची नाही, निदान माझं तरी आता ते ए टु बि आणि सि टु डि समजायचं वय गेलंय.
4 Mar 2011 - 10:43 am | स्वैर परी
शरद काका, उपयुक्त महिती आहे. आजवर माझ्या कॅमेर्यावरचे ते मोड फक्त बघुन माहित होते. आता त्यांचे महत्व कळले. वाचऩखुण साठवलेली आहे!
4 Mar 2011 - 10:51 am | शरद
एकदम मान्य. पुढील लेखापासून छायाचित्रे देतो. पण जरा एका गोष्टीकडे लक्ष द्या. ही लेखमाला लिहण्याचा उद्देश प्रथमच सांगितला आहे. ही वर्गातील व्याख्याने नाहीत. जे लोक आपल्या छंदात सुधारणा करू इच्छितात त्यांना मार्गदर्शन करावे एवढीच माफक इच्छा. त्यामुळे वाचल्यानंतर जर आपणास काही नवीन कळले असेल तर लगेच दोन चार फोटो घेवून प्रत्यक्षात फरक बघावा ही अपेक्षा. जर खरेच फरक आढळला तर ते फोटोच इथे पाठवा. तुम्ही कोणत्या गोष्टी बदलल्या व त्याने काय फरक पडला हे सर्वांना कळेल. जर फरक वाटला नाही तर जास्त बदल करून फोटो काढा. काय झाले ते सगळ्यांना कळू द्या. जर अपेक्षित बदल दिसले नाहीत तर तसे का घडले असावे या बद्दल विचार करता येईल. मलाही माझ्या सांगण्यात काही उणिवा असतील तर त्याही कळतील. बरे यात काही खर्च नाही. सगळेच चकटफू. तर माझी विंजिनेर, दीपाली, यशोधरा आदी सर्वांना नम्र विनंती की तुमचेच फोटो पाठवा. फोटो चांगले पाहिजेतच असे नाही. ती नंतरची गोष्ट. आता फक्त फरक काय पडतो तेवढेच आपण पाहणार आहोत.
श्री. ५० फक्त. आपण म्हणता ते बरोबरच आहे. मी ते पहिल्यांदीच मान्य केले आहे. गेल्या पन्नास वर्षांच्या छंदात (आणि अभ्यासात) मी फोटोग्राफीवरची बरीच पुस्तके गोळा केली आहेत. त्यावरूनच तर हे लेख. पण हा कोण्या एखाद्या पुस्तकाचा अनुवाद नाही. तसे असते तर मी त्याचा उल्लेख नक्कीच केला असता. पण आता आपण म्हणता त्याप्रमाणे बदल करू. तुमचे दुसरे विधान मात्र मला मान्य नाही. हल्ली आपल्या फोटोग्राफीत सुधारणा करणे कुणालाही सहजशक्य आहे. तुमचे म्हणणे विनयाचा भाग समजून सोडून देतो. असो.
जाता जाता. मी पुण्यात रहातो. माझ्याकडील पुस्तके कुणाला वाचावयास पाहिजे असतील तर त्याने घरी येऊन पुस्तके (व कॉफी) घेऊन जावी. पुस्तके परत करावयास याल तेव्हा परत एकदा कॉफी मिळेल. अशा निमित्ताने श्री. प्रकाश घाटपांडे, चाणक्य आदी मंडळी घरी येऊन गेली व आता निर्निमित्त भेटतात. अशा वेळी अनेक विषयांवर गप्पाही मारता येतात. आपणास सप्रेम निमंत्रण. (२५६७१३८४)
शरद
4 Mar 2011 - 12:33 pm | टारझन
जरा चिकना मटणाचा पाहुणचार होत असेल तर बघा, रोज एक एक पुस्तक घेऊन जाईन म्हणतो :) सिरियस्ली ;)
बाकी फोटुसकट माहिती हवी ह्याच्या शी सहमत . लेखमाला खुप उपयोगी आहे.
- अजित
4 Mar 2011 - 3:48 pm | मैत्र
Av मध्ये जवळचे मित्र आणि लांबचा ताजमहाल दोन्ही फोकस मध्ये कसे ठेवतात?
मागे मोठं लँडस्केप असेल तर जवळ असलेल्या बायको / मैत्रीण / मित्राचा फोटो कसा काढावा.
एका गोष्टीवर फोकस केलं तर DoF मुळे दुसरी गोष्ट आउट ऑफ फोकस होतेच.
DoF वर सगळ्यांच्या सोयीसाठी उदाहरणासह लेखच लिहा. त्यात जसं DoF बदलत जातं तसं तेच दृष्य आणि वस्तु वरचा फोकस कसा बदलतो ते समजल्या शिवाय DoF म्हणजे समजणं अवघड आहे.
उत्तम लेखमाला.
नेहमीच्या अॅपरचर आणी शटरस्पीडच्या व्हॅल्युज, वेगवेगळी काँबिनेशन्स अशी थेट माहिती दिली तर सोपं जाईल समजायला. उलटा एफ (१/f) ची रचना.
इतरांसाठी -
लेन्स चे एक दोन सोपे दुवे - यावरून अॅपरचर कसे दिसते याचा अंदाज येईल.
http://en.wikipedia.org/wiki/File:Aperures.jpg
http://thephotogformula.com/Blog/lens-aperture-for-dummies/
5 Mar 2011 - 11:56 am | सुधीर
छायाचित्रकला-१ (पुढील/मागील लेखां)ची लिंक सुरुवातीस दिलात तर बरे होईल, धन्यवाद!
11 Mar 2011 - 12:22 pm | महेश_कुलकर्णी
+१
10 Mar 2011 - 10:16 am | जयंत कुलकर्णी
मी पहाटे काढलेले दोन फोटो खाली देत आहे. एक आहे तो सगळे कॅमेर्यावर सोपवून काढला आहे तर दुसरा मॅन्युअल वर मला पाहिजे तसा आला आहे. हे फोटो मला वाटते उदा. म्हणून चांगले आहेत.