छायाचित्रकला-५

शरद's picture
शरद in काथ्याकूट
16 Mar 2011 - 10:44 am
गाभा: 

प्रकाश योजना
छायाचित्रकलेतला सर्वात महत्वाचा भाग छाया-प्रकाश. याचे दोन भाग म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम.
नैसर्गिक प्रकाशात फ़ार फ़रक करणे शक्य नसते. उदा. दुपारचे कडक ऊन. आकाशात सावलीकरता ढग आणणे शक्य नसते. अशा वेळी आपण थोडासाच बदल करू शकतो. पण छायाचित्रात त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. दुपारी काढलेल्या फ़ोटोत चेहरा काळपट येतो. फ़्लॅशचा उपयोग रखरखीत उन्हात करावा असे आपल्या मनात येणे अवघड आहे पण इतर भागात फ़रक न पाडता चेहरा उजळ होऊन जातो. भिंतीसमोरील फ़ुलाचा फ़ोटॊ काढताना मागील भिंत भगभगीत दिसते. बरोबर कोणी असेल तर त्याला भिंतीच्या थोड्याशा भागावर सावली करावयास सांगणॆ सोपे आहे. दर वेळी जमेलच असे नाही पण प्रयत्न करून बघावयास हरकत नाही.ल्क्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे फ़ार त्रास न घेता असलेल्या प्रकाशात बदल करणे शक्य आहे का याचा विचार करण्याची सवय लावून घ्यावी. काही दिवस जाणीवपूर्वक काम केले की नंतर ते आपोआपच होऊन जाते. प्रथम घराबाहेरील चित्रणाबद्दल बघू.
१] डिजिटल कॅमेऱ्याला लेन्स हूड लावणे कटकटीचे असते.शक्य असेल तर हूड लावाच.तो नसेल तर लेन्सवर ऊन येऊ नये म्हणून कॅमेऱ्यावर सावली पाडावयाचा प्रयत्न करा. फ़्लेअर येत नाही.
२] शक्य असेल तर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत फ़ोटोमध्ये सूर्य येणार नाही याची काळजी घ्या. फ़ोटोतील सर्वच रंग बदलतात. [हा नियम Arctic circle पलीकडे लागू नाही] सूर्य जर डोळ्याला त्रासदायक वाटत असेल तर तो फ़ोटोत न येणेच चांगले. पूर्वी लेन्सच्या पुढे Neutral Density/ Polarising Filter लावता येत. दुपारी ४ वाजता काढलेला फ़ोटो
चांदण्यात काढला आहे असा भास करता येई.मजा येई.( माफ़ करा, असे उल्लेख आले की नॉस्टेल्जिआ म्हणा आणि दुर्लक्ष करा. अजून काहीजण फ़िल्म कॅमेरा वापरत असतील तर त्याना याचा उपयोग होऊ शकेल व मला खात्री आहे की थोड्या दिवसात या सोयी डिजिटलमध्येही मिळू लागतील.) स्पॉट मीटरिंगचा प्रयोग केला आहे का ? करून बघा.
३] तुमच्या कॅमेऱ्याला ऍडॅप्टर मिळत असेल तर थोडा खर्च करून घ्याच व जमेल तसतसे फ़िल्टर खरेदी करा. N.D. व Polarising हे पहिले दोन.भगभगीत ऊन कमी करावयास अती फ़ायदेशीर.
४] एक फ़ुल्स्केप पांढरा कागद घडी घालून जवळ ठेवलात तर त्याचा reflector म्हणून उपयोग होतो. सावलीच्या बाजूचा काळेपणा कमी करावयास एवढा कागद पुरेसा होईल.
५] सूर्याकडे [किंवा प्रकाशाकडे] तोंड करून फ़ोटो काढू नये हा जूना नियम मीटरींगच्या सोयींमुळे जवळजवळ बाद झाला आहे.
६] बाह्य छायाचित्रकलेत झूमचा उपयोग अपरिहार्य आहे. वाईड्पासून सुरवात करून टेली पर्यंत झूम करा व नंतरच कुठल्या फ़ोकल लेन्ग्थचा उपयोग करावयाचा ते ठरवा.शंका वाटत असेल तर थोडी वाईड फ़ोकल लेन्थ वापरावी व नंतर crop/enlarge करावे. लक्षात ठेवा : वाईड लेन्स वापरून काढलेला फोटो नंतर crop करून व एंलार्ज करून टेलीवर काढलेल्या फोटो सारखा करता येतो. उलटे करता येत नाही..हे इथे सांगावयाचे कारण फ़ोकल लेन्थ प्रमाणॆ प्रकाश बदलतो. वाईडने काढलेल्या फोटोत टेलीने काढलेल्या फोटोपेक्षा विस्तृत भाग येत असल्याने प्रकाश बदलण्याची शक्यता असते.
७] सिल्हौट फ़ोटोग्राफ़ी तशी कमी उपयोगात आणली जाते.सकाळ-संध्याकाळी निसर्गचित्रे व इमारतींचे फ़ोटो काढताना याकडेही ध्यान द्या. मुद्दाम कमी एक्स्पोझर दिल्याने काय होईल हे फ़ोटो काढून बघा.[ डिलिट लगेचही करता येते.] चार फ़ोटो पहाताना अशी चित्रे जास्त लक्ष खेचून घेतात कारण माणसाचा मेंदू काळ्या रंगातले details मनात शोधू लागतो.
८] सकाळ-संध्याकाळचे रंग एक्स्पोझर १/३ किंवा२/३ ev कमी-जास्त करून बदलता येतात. कसे बदलतात ते स्वत: शोधून बघा. कारण याबद्दल सूत्र नाही.
९] फ़ार ढगाळ वातावरणात फ़्लॅशचा वापर बेशक करा. विशेषत: ५-६ मीटरच्या आतले फ़ोटो काढताना. घराबाहेर दिवसा फ़्लॅश वापरावयास बंदी नाही.
घरातील फ़ोटो
घरात एखादे कार्य असेल तर अशा वेळी आपणास प्रकाश योजनेकरिता वाव नसतो. लुडबुड चालवून घ्रेतात हेच नशीब. पण इतर वेळी प्रकाश योजनेकडे लक्ष देण्यास विसरू नका.
प्रकाश नैसर्गिक आहे, दिव्याचा आहे, ट्युबचा आहे हे फ़ोटो काढण्यापूर्वी बघा. W.B.सेटिंगमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे का याचा विचार करा.व्यक्तीचित्र [portrait] काढताना शक्य तो नैसर्गिक प्रकाश वापरावा.खिडकीतून येणारा प्रकाश उत्तम. हा थोडासा तिरपा असेल तर छानच. चेहऱ्याची सावलीकडची बाजू काळजीपूर्वक बघावी.वर सांगितल्याप्रमाणे पांढरा कागद [वा चादर] उपयोगी पडतो. रिफ़्लेक्टर पांढराच पाहिजे असे नाही, प्रकाश कमी करावयास काळाही चालतो. बाहेरून येणारा प्रकाश [ऊन] कमी करण्यास विरविरित पांढरे कापड वापरा. फ़्लॅशचा प्रकाश कमी करावयाचा असेल तर फ़क्त फ़्लॅशवर पातळ कापड (हातरुमाल) टाका, अगदी सोपा पण फार उपयोगी पडणारा मार्ग.
फ़्लॅशचा उपयोग किमान करावा. प्रकाश कमी असेल स्टॅंड वापरा, तो नसेल तर कॅमेरा स्टूलावर ठेवा व self timer वापरा. फ़्लॅश वापरतांना red eye reduction ची सोय असेल तर न विसरता वापरा. तुम्हाला माणसाचाचे फोटो काढावयाचे आहेत, व्हॅंपायरचे नाहीत.
काही कॅमेर्‍यांमध्ये फ़्लॅश वापरतांनाही ev कमी जास्त (-१/३, -२/३,..+१/३, +२/३ वगैरे) करावयाचे सोय असते. आपल्या कॅमेर्‍यात असेल तर उत्तम, त्याचा उपयोग करावयाचा अभ्यास करा. न्सेल तर वर सांगितल्याप्रमाणे हातरुमाल आहेच.
high end डिजिटल कॅमेरे सोडले तर इतरांत external flash वापरावयाची सोय नसते. त्यामुळे फ़्लॅशवर फार लिहणे उचित नाही. अगदी थोडक्यात सांगावयाचे तर माझे वैयक्तिक मत असे की व्यक्तीचित्र काढतांना
(१) घरातील फोटो काढतांना फ़्लॅशचा उपयोग कमीतकमी करा. त्याचा उजेड कमी करा.
(२) घराबाहेर फ़्लॅशचा उपयोग करावयाला बिचकू नका.
शरद

प्रतिक्रिया

बरीच नविन माहिती कळली. धन्यवाद.

टारझन's picture

16 Mar 2011 - 1:03 pm | टारझन

वाखु साठवलीये !

- बाळा

मोहन's picture

16 Mar 2011 - 10:46 pm | मोहन

स्टेज वरच्या कार्यक्रमांचे फोटो काढतांना काय काळजी घ्यावी ? मी काढलेले स्टेज फोटो नेहमी धुपतात.

उत्तम लेखमाले बद्दल शतशः धन्यवाद.