छायाचित्रकला
वरील विषयावर एक लेखमालिका लिहावयाचा विचार आहे. अर्थात नवागतांकरिता. नवागत कोण ? जर तुम्हाला तुमच्या कॅमेर्यातील सर्व सुविधा माहित नसतील वा तुम्ही त्यांचा उपयोग करत नसाल तर तुम्ही नवागत. (व्याख्या आवडली नाही तर विसरून जा.) आपण तज्ञ असाल तर लेखातील तृटी/चुका अवष्य कळवा. पुढील विषय थोडक्यात सांगावयाचा प्रयत्न करणार आहे.
१] कॅमेऱ्याचे मुख्य घटक, २] लेन्सेस, ३] शटर, ४] ऍपर्चर,५] डेप्थ ऑफ़ फिल्ड,६]मोड्स,७] प्रकाश योजना,८] कलात्मक रचना,९] Raw Format व Photoshopचा उपयोग,१०] कॅमेऱ्याची निवड कशी करावी,
या विषयावर बरेच लेख येऊन गेलेले असणार पण या सर्वांचा एकत्र विचार येथे वाचावयास मिळेल. आजकाल सर्वच जण डिजिटल कॅमेरा वापरतात पण या बद्दल सुरवात फ़िल्म कॅमेर्याने करणे सोपे आहे. फिल्म सोडून जवळजवळ सर्व तांत्रिक गोष्टी तेथूनच उचललेल्या आहेत. शिवाय अजूनही बरेच जण फ़िल्म कॅमेरे वापरत आहेत. साधारणत: तीन चार दिवसांनी एकेक लेख येईल. तोपर्यंत आपणास काही शंका असल्या वा काही जास्त माहिती हवी असेल तर अवष्य विचारा.
आता हा प्रश्न विचारता येईल की या लेखांचा उपयोग काय ? मोबाईलवर कॅमेर्याची सोय उपलब्ध झाल्यापासून सगळेच फोटो काढतात. फार चांगले येतात असे नाही पण सोपे नक्कीच असते. हल्ली डिजिटल कॅमेरे स्वस्तही झाले आहेत. त्यांनी चांगले फोटो काढणे शक्य असले तरी बरेच जण त्यातील सुविधांचा वापर करतांना दिसत नाहीत. जर आपण कॅमेर्याचा उपयोग aim and shoot असाच करत असाल तर हे लेख वाचल्यानंतर आपल्या फोटोत लक्षणीय फरक पडल्याचे आपणास आढळून येईल याची खात्री बाळगा. तांत्रिक माहिती घेतांना काही इंग्रजी शब्द वापरावे लागणार आहेत. एक म्हणजे दरवेळी छायाचित्र लिहावयाऐवजी फोटो लिहणे सोपे जाते व shutter ऐवजी झडप शब्द लिहला तर तो कळणे अवघड जाते. असो. (काही वर्षांपूर्वी उपक्रमवर या वर लिहले होते; ते लेख व काही प्रतिसाद यावरून सुधारित केलेल्या या लेखांना सुरवात करू.) येथे Transperancies चा विचार केलेला नाही..
फ़िल्म :- अगदी सुरवातीला १०x१२ इंचावी काच वापरली जायची. नंतर ६x४, ४x४ इंचाची व आता ३६x२४ एम एम ची प्लस्टिक फ़िल्म. हीच ३५ एमेम म्हणून ओळखली जाते.त्यातील निरनिराळे प्रकार म्हणजे ISO ६४,८०,१००, २००, ४०० वगैरे.जितका आकडा कमी तितका फ़ोटोचा आकार मोठा करता येतो व grains कमी दिसतात.पण कमी प्रकाशांत फ़ोटो काढता येत नाही. फ़ार जास्त नंबरची फ़िल्म घेतली तर कमी प्रकाशात फ़ोटो घेता येतो पण grains जास्त दिसतात. रात्री फ़ोटो काढतांना किंवा हलत्या वस्तूचा फ़ोटो काढतांना ४०० किंवा जास्त नंबरची फ़िल्म वापरतात. नेहमीच्या कामाला १०० वा २०० ची वापरणे उत्तम.
कॅमेरा :- यातील दोन महत्वाचे घटक म्हणजे Lens व Shutter. इतर गोष्टी उदा. फ़िल्म पुढे सरकवण्याची सोय, लेन्स बदलणॆ, ISO बदलणे,ट्रिपॉड सॉकेट,फ़्लॅश गन इ.
लेन्स :- खास प्रकारच्या काचेपासून बनविलेले बहिर्गोल भिंग. निरनिराळे दोष [Aberrations] टाळण्याकरिता ८-१० निरनिराळे भाग [Elements] जोडून लेन्स तयार करतात.लेन्सेस निरनिराळ्या Focal Length च्या असतात. साधारणत; २५ ते ४०० मि.मि. जास्त उपयोगी पडतात. या पेक्षा कमी-जास्त फ़ोकल लेन्ग्थच्या मिळतात पण त्या विशेष कामाकरिताच उपयोगी पडतात. आपण डोळ्याने पाहतो तेवढ्या दृष्याचे छायाचित्र ५० मिमि. च्या लेन्सने मिळते. तिला Standard Lens म्हणतात.५० पेक्षा कमी फ़ोकल लेन्थ असली तर जास्त रुंद भागाचे चित्र काढता येते. तिला Wide Angle Lens म्हणतात. फ़ोकल लेंथ ५० पेक्षा जास्त असणाऱ्याना Tele Lenses म्हणतात. घरामधील किंवा इमारतीचे फ़ोटो काढावयास wide वापरतात व लांब असलेल्या वस्तूव्रे फ़ोटो tele ने काढतात.एक लक्षात ठेवावे की १०० वा ३५ मिमि.च्या लेन्सने काढलेला फ़ोटो तुम्हाला तुमच्या ५० च्या स्टॅन्डर्ड लेन्सनेही काढता येईल; फ़क्त जरा पुढे-मागे सरकावे लागेल.पूर्वी निरनिराळ्या फ़ोकल लेन्थकरिता निरनिराळ्या लेन्सेस खरेदी कराव्या लागत. नंतर एका लेन्समध्येच निरनिराळ्या फ़ोकल लेन्थ मिळू शकणारी झूम लेन्स आली. उदा. ३५-१०५ एम.एम. याचा अर्थ तुम्हाला ३५एमेम वाईड पासून १०५ एमेम टेली पर्यंत कुठलीही फ़ोकल लेन्थ निवडता येते.१०५भागिले३५ = ३ हा झूम रेशो झाला. प्रत्येक लेन्सवर तो ३x, ४x, १२x असा लिहलेला असतो. कॅमेरा निवडताना इथे विशेष लक्ष द्यावे. सर्वसाधारण लेन्सने ५-६ फ़ूटापलिकडचे फ़ोटो काढता येतात. त्याहून जवळचा फ़ोटो काढण्याकरिता( उदा. एकच फ़ूल,) माइक्रो लेन्स लागते. हल्ली अनेक लेन्समध्ये ही सोय(micro mode) अंतर्भूत असते.
भिंग कसे काम करते ते आपण शाळेत शिकलो आहोत. आकृती पहा.
AB ची प्रतिमा CD येथे मिळते, म्हणजे तेथे कॅमेर्याची फ़िल्म असते. AB च्या मागची-पुढची प्रतिमा CD येथे पडणार नाही; म्हणजे फोटो sharp येणार नाही. Depth of Field मध्ये याचा विचार केला आहे.AB ची जागा बदलली तरी CD कॅमेर्यात जागेवरच आहे व प्रतिमा तेथेच पडली पाहिजे. या करिता आपण लेन्सची जागा बदलतो. फ़ोकसिंग करतो म्हणजे आपण लेन्स मागेपुढे करतो.
पुढील आकृतीत अनेक elements नी तयार झालेली लेन्स दिसेल. झूम लेन्समधील elements ची मागे-पुढे सरकासरव केली की zoom lens ची फ़ोकल लेन्थ बदलते.
आता EXPOUSURE value ची माहिती घेऊ. EV म्हणजे भिंगातून फ़िल्मवर पडणारा प्रकाश.तो नियंत्रित करण्याकरिता दोन सोयी असतात.पहिली Aperture[f]. दुसरी Shutter Speed.
Aperture म्हणजे भिंगाच्या किती टक्के भागातून प्रकाश जातो त्याचा निर्देशक.ही लहान लहान होत जाणारी वर्तुळे असतात.सर्वात मोठ्या वर्तुळाच्या आकाराच्या निम्मा आकार दुसऱ्या वर्तुळाचा; त्याच्या निम्मा तिसऱ्या वर्तुळाचा वगैरे. म्हणजे पहिल्याचे क्षेत्रफ़ळ १ असेल तर दुसऱ्याचे १/२, तिसऱ्याचे १/४ , चवथ्याचे १/८.
वर्तुळाच्या क्षेत्रफ़ळाऐवजी व्यासाचा विचार केला तर तो अनुक्रमे १,१/१.४, १/२, १/२.८, १/४, १/५.६, वगैरे. [१.४ चा वर्ग=२, २चावर्ग=४, २.८ चावर्ग=८ ] १.४, २, २.८, ४, ५.६ यांना Aperture [f] म्हणतात.प्रत्येक भिंगावर सर्वात लहान आणि सर्वात मोठे ऍपर्चर लिहलेले असते.व तेवढ्या मर्यादेतच तुम्हाला निवडीस वाव असतो. .[उदा. f2.8--f11] इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. Aperture No लहान म्हणजे मोठे वर्तूळ व जास्त प्रकाश. f4 वापरले असतांना जेव्हडा प्रकाश फ़िल्मवर पडेल त्याच्या १/2 च f5.6 वापरल्याने पडेल व त्याच्याही निम्मा f8 वापरल्यास. जास्त प्रकाश असेल तर मोठा f no. व कमी प्रकाश असेल तर लहान f no.
प्रत्येक भिंगावर पुढील गोष्टी लिहलेल्या असतात.कंपनी, लेन्सचा क्रमांक, फ़ोकल लेंथ,[झूम असेल तर किमान-कमाल उदा. 70-210] , कमाल ऍपर्चर उदा. f२.८
slr कॅमेऱ्याची मागची बाजू [फ़िल्म नसताना] उघडून लेन्सकडे पहावे व अपर्चर रिंग फ़िरवावी. ओपनिंगची वर्तुळे लहानमोठी होतांना दिसतील.
अवांतर : तांत्रीक गोष्टी थोड्याफ़ार सोप्या करून लिहाव्या लागतात. निर्दोषपणाऐवजी समजण्यास सोपे महत्वाचे. एखाद्यास जास्त खोलात माहिती हवी असेल तर देता येईल.
आज येथे थांबू. चार दिवसांनी पुढचा भाग. या भागाबद्दल काही शंका असल्या, जास्त माहिती हवी असेल तर विचारा. त्याबद्दल लिहून मग पुढचा भाग.
शरद
प्रतिक्रिया
1 Mar 2011 - 1:48 pm | टारझन
लै लै लै लै लै भारी ... च्यायला .. अजुन डिट्टेलवार .. आणि हवं तेवढं लिहा बॉ .. मला लै गरज होती ह्या मार्गदर्शनाची ..
मी लवकरंच कॅनन ६०डी घेणार आहे :)
- तोफु ६०
2 Mar 2011 - 1:11 am | लंबूटांग
Excellent Choice मित्रा :).
T2i almost घेतलाच होता मी पण मग 60D पाहिला आणि मग T2i फालतू वाटायला लागला.
1 Mar 2011 - 1:55 pm | अवलिया
लिहा ! विस्तृत लिहा !!! मुख्य म्हणजे लवकर लवकर लिहा !
:)
1 Mar 2011 - 1:58 pm | प्रचेतस
धन्यवाद. ही माहिती पाहिजेच होती.
वाचनखूण म्हणून साठवत आहे.
1 Mar 2011 - 2:16 pm | नगरीनिरंजन
असेच म्हणतो.
1 Mar 2011 - 2:03 pm | स्वैर परी
शरद जी, प्रथम तुमचे धन्यवाद! मोस्ट अवेटेड आर्टिकल आहे हा माझ्यासाठी. :)
माझ्या शंका पुढील प्रमाणे:
कधी कधी, मायक्रो मोड न वापरता देखील फोटो आपल्याला हवे तसे म्हणजे, एकाच फूलाचा फोटो (फोकस्ड) वगैरे! हे कशामुळे होत असावे?
तसेच, बरेचदा उन्हात फोटो काढले असता, फोटोमध्ये प्रकाशाशिवाय बाकि काहीच दिसत नाही. हे Aperture च्य सेटींग मुळे होत असावे का?
1 Mar 2011 - 8:52 pm | लंबूटांग
शरद हेच जास्ती चांगल्या रीतीने explain करू शकतील पण हे माझे २ पैसे.
त्या mode ला macro (मॅक्रो) mode असे म्हणतात. सर्वसामान्य पणे camera मध्ये auto detection नावाचे एक feature असते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या खूप जवळ कॅमेरा नेलात तर तो automatic macro mode मध्ये जातो. Manual mode असेल तर f stop setting ने depth of field कमी जास्ती करता येते.
aperture अथवा shutter मुख्यत: किती वेळ प्रकाश फिल्म वर / sensor वर पडू द्यायचा हे ठरवते. रात्री फोटो काढताना shutter जास्ती वेळ उघडे ठेवायचे आणि दिवसा ह्याच्या अगदी उलटे. दिवसा आधीच जेव्हा जास्ती प्रकाश असतो तेव्हा shutter जास्ती वेळ उघडे राहिल्यास over expose झाल्याने नुसताच पांढरा रंग दिसतो.
कधी कधी जेव्हा blur अथवा light trails effect किंवा धबधब्या मधील पाणी दुधासारखे दिसायला हवे असते तेव्हाही shutter जास्ती वेळ उघडे ठेवून तो साधता येतो. दिवसा shutter जास्ती वेळ उघडे ठेवून फोटो काढायचे असल्यास lens वर filter लावावे लागते जेणेकरून प्रकाश कमी प्रमाणात film वर पडेल.
http://www.misalpav.com/node/4537 आपण माझे काही photography मधील प्रयोग पाहू शकता. त्यातील train चा फोटो shutter जास्ती वेळ उघडे ठेवून काढला आहे.
तसेच खालील फोटोंमधील effects सुद्धा shutter speed चा वापर करूनच साध्य केले आहेत.

-(हौशी फोटोग्राफर) लंबूटांग
2 Mar 2011 - 10:13 am | शरद
श्री.लंबूटांग यांचे इथले फोटो चांगले आहेतच पण त्यांनी आधी दिलेल्या फोटोंमधील प्रयोग जास्त लक्षणीय आहेत. वैयक्तिच मत द्यावयाचे तर सर्व फोटो saturated colour मुळे थोडे जास्तच भडक वाटतात. bracketting करून ev बदलल्याने एखादेवेळी जास्त आकर्षक वाटले असते. हे झाले माझे मत.सगळ्यांना पटले पाहिजेच असे नाही. माझी श्री. लंबूटांग यांना विनंती अशी की आता त्यांनी हेच फोटो फोटोशॉपवर थोडे desaturate करून परत इथे डकवावेत. आपण bracketting, photoshop यांचे फायदे पहाणार आहोत त्यावेळी एक चांगली तुलना पहावयास मिळेल.
श्री. स्वैर परी .. ऍपर्चर थोडे कमीजास्त झाले म्हणून सगळा फोटो पांढरा होणे अवघड वाटते. B or T setting चुकून राहिले नव्हते ना ?
डिजिटल कॅमेरा असेल परत एकदा निरनिराळ्या सेटिंग्जना उन्हात फोटो काढून बघा. (प्रिंट काढावयाची गरज नाही). कॅमेर्यातच बघा व केव्हा सगळे पांढरे होते ते बघा. ती माहिती इथे दिलीत तर सर्वांना उपयोगी ठरेल.
मॅक्रो मोड नेहमी वापरलाच पाहिजे असे नाही. डेलीयाचा फोटो काढतांना मॅक्रोमोड लागणार नाही. एका फूलाचा म्हणतांना, लहान फूलाचा दीड फूटापेक्षा कमी अंतरावरून काढलेला फोटो असे म्हणावयाचे होते. शिवाय श्री. लंबूटांग यांनी सांगितलेलेही शक्य आहे. आपल्या कॅमेर्याच्या मॅन्युअलमध्ये काय माहिती दिली आहे ते वाचून बघा.
शरद
2 Mar 2011 - 9:47 pm | लंबूटांग
माझ्याकडे DSLR नाही आहे. माझ्या point and shoot cameraमधील manual mode वापरून हे सर्व फोटो काढलेले आहेत. माझ्या माहिती प्रमाणे तरी त्यात color saturation change करता येत नाहीत. Color mode बदलता येतो तो मात्र natural color च ठेवलेला होता.
मी फोटोशॉप शक्य तितके avoid करतो वापरणे पण तुम्ही सांगितलेले संस्करण करून बघेन.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
1 Mar 2011 - 2:11 pm | ५० फक्त
शरद्जी, चांगला विषय निवडला तुम्ही, मी नाहीतरी कोणितरी दुरवरचा गुरु हुडकत होतोच, तुम्ही सापडलात.
विनंती आहे, लवकर लिहा आणि फार तांत्रिक खोलात नका जाउ, त्या पेक्षा प्रत्येक गोष्टीची उदाहरणं द्या फोटोंची, म्हणजे लगेच समजेल.
हर्षद.
1 Mar 2011 - 4:27 pm | नन्दादीप
+१.
1 Mar 2011 - 2:31 pm | अन्या दातार
साधारणपनणे फुलाचे वगैरे फोटो काढण्यासाठी मायक्रो कि मॅक्रो?
(कॅनन ५०० डी वापरणारा)
अनिरुद्ध दातार
1 Mar 2011 - 2:56 pm | स्वैर परी
मॅक्रो मोड! (macro)
1 Mar 2011 - 6:02 pm | सुकामेवा
मला नितांत गरज होती अश्या लेखमालेची.
2 Mar 2011 - 12:39 am | पुष्करिणी
+१ असंच म्हणते
1 Mar 2011 - 6:36 pm | इरसाल
शायेब लै भारी हेच पायजेल होत.
1 Mar 2011 - 6:57 pm | शरद
मॅक्रो मोड हेच बरोबर. चुक दुरुस्त करून घ्यावी.
शरद
1 Mar 2011 - 7:04 pm | मनराव
पुढच्या भागाची वाट पहात आहे.......
1 Mar 2011 - 8:25 pm | गणेशा
येवुद्या..
पण फोटो दिसत नाहियेत ...
1 Mar 2011 - 10:12 pm | रंगोजी
लै भारी काम केलंत तुम्ही..
धन्यवाद.. येऊ देत पुढचे भाग लवकर!!
-रंगोजी
2 Mar 2011 - 12:32 am | शैलेन्द्र
धन्यवाद... एस एल आर बद्दल वाचयला आवडेल... तुम्ही यालच तिकडे हळुहळु...
(निकॉन डी ९० घेवु इच्छीनारा)
शैलेन्द्र
2 Mar 2011 - 2:06 am | इंटरनेटस्नेही
लिहा ! विस्तृत लिहा !!! मुख्य म्हणजे लवकर लवकर लिहा !
पुढच्या भागाची वाट पहात आहे.......
-
(१६.१ एमपी सोनी सायबषॉट धारक) इंट्या फोट्रॉन!
2 Mar 2011 - 5:53 pm | अशोक पतिल
मी ह्याच विषया वरील लेखाचि अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो तो हाच लेख! मागे मायबोलि वर सावली हिचा ह्या विषया वरील लेख वाचला होता. त्या लेखा मधे फार उपयुक्त माहिती दिली होति . पुढच्या लेखाची आतुरतेने वाट बघत आहे .
3 Mar 2011 - 9:35 am | श्री गावसेना प्रमुख
नाहितर तुम्हाला या पे़क्षा जास्त माहीती दिली असति
3 Mar 2011 - 11:20 am | यशोधरा
वाचनखूण साठवली आहे.