मीटरिंग
लेन्समधून फ़िल्मवर पडणारा सर्व प्रकाश मोजण्याचे काम सेन्सर करतो.व त्याप्रमाणे स्पीड व ऍपर्चर किती असावे ते ठरवतो. अशावेळी संपूर्ण प्रकाश भागिले संपूर्ण आकारमान असा हिशोब केला जातो.[मल्टिपल मीटरिंग] आणि काही वेळी हा चूकीचा ठरतो. उदा. खोलीतून खिडकीजवळून काढलेला बाहेरचा फ़ोटो. खिडकीतून येणारा प्रकाश इतका जास्त असतो की त्याच्या हिशोबाने काढलेल्या सरासरीमुळे खोलीतला सर्व भाग काळपट होतो. किंवा झाडाच्या सावलीतल्या माणसाचा फ़ोटो काढताना बाहेरच्या रखरखीत उन्हामुळे सेन्सर फ़सतो व चेहरा काळपट येतो.हे सुधारण्याकरिता मीटरिंगमध्ये निरनिराळे फ़रक करण्यात आले. ’ सेंटर मीटरिंग,स्पॉट मीटरिंग ’ वगैरे.सेंटर मीटरिंगची कल्पना अशी की साधारणत : चित्रातील महत्वाचा भाग मध्यभागी असतो, तेथील मोजमाप बरोबर करावयाचे व कडेचे थोडे कमी-जास्त झाले तरी चालवून घ्यावयाचे.
स्पॉट मीटरिंगमध्ये तुम्ही कोणता भाग महत्वाचा ते ठरवता,सेन्सर त्या भागातल्या प्रकाशाप्रमाणे मोजमाप घेतो. मगाचचे उदाहरण घेतले तर सावलीतल्या माणूस (चेहर्यावर फ़ोकस करून) बरोबर एक्स्पोज करता येईल.[त्यामुळे झाडाबाहेरची जमीन, आकाश वगैरे थोडे जास्त एक्स्पोज होईल.] पण आपले काम होते. माणूस महत्वाचा.सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये एवढ्या सोयी असतातच. काहींमध्ये अधिक. मॅन्युअलमध्ये जास्त माहिती दिलेली असेल. इथेही सरावाचा फ़ायदा होतो. वेळ असेल तेंव्हा , bracketing च्या वेळी सांगितल्याप्रमाणे मीटरिंग बदलून फ़ोटो काढावेत व काय फ़रक पडतो त्याचा अभ्यास करावा. हळूहळू व्ह्यू फ़ाईंडरमधे पाहिल्याबरोबर लक्षात येते की कोणते मीटरिंग वापरावे. व्यक्तीचित्रे काढतांना सावलीच्या बाजूकडे विशेष ध्यान द्यावे. "प्रकाशयोजना"वर लिहताना यावर जास्त जोर देईनच.
हे दोन फोटो बघा. पहिला फोटो आपण नेहमी वापरतो त्या multipal metering ने काढला आहे. मागच्या प्रखर उजेडाने कॅमेरा फसला. त्याला कळले नाही की मला मुलीचा फोटो काढावयाचा आहे, मागच्या बिल्डिंगचा नाही. त्याने मुलीचा चेहरा काळपट झाला. दुसरा फोटो काढतांना मी spot metering चा उपयोग केला व मुलीच्या चेहर्यावरचा प्रकाश मोजावयास कॅमेर्याला सांगितले. यामुळे फोटोतील तेवढा भाग बरोबर एक्स्पोज झाला. मागची इमारत over expose झाली. पण मला काय पाहिजे ते मिळाले. मी नंतर मागचा तेवढा भाग सहज दुरुस्त करू शकतो.
ISO किंवा Sensitivity
फ़िल्मच्या संबंधात आपण ISO ची माहिती घेतली होती.प्रकाशाचा फ़िल्मवर होणारा परिणाम मोजण्याचा निर्देशांक म्हणजे ISO. याचे ६४/८०/१००/२००/४००/८०० इत्यादी प्रकार. यातील निरनिराळे प्रकार केंव्हा वापरावयाचे व त्यांचे फ़ायदे-तोटे बघताना
कमी क्रमांक......जास्त प्रकाशाची गरज .... कमी ग्रेन्स .....मोठी एन्लार्जमे सोपी
जास्त क्रमांक ... कमी प्रकाश चालतो..... जास्त " ..... " " अवघड
नेहमीच्या वापराला १००वा२००, कमी उजेडात ४००, असा ठोकताळा पाहिला.
डिजिटल फ़ोटोग्राफ़ीत सर्व साधारण हे नियम पाळावेत पण काही महत्वाचे फ़रकही लक्षात ठेवावेत.
१] पूर्वी ISO बदलावयाचा म्हणजे फ़िल्मच बदलणॆ किंवा special processing, डिजिटलमध्ये प्रत्येक फ़ोटोकरिता ISO बदलता येतो, विनासायास. उजेड कमी आहे असे वाटले तर १/३० से. स्पीड ठेवण्या ऐवजी ISO बदला.१०० ऐवजी खुशाल २०० किंवा ४०० करा. आपल्याला पाहिजे तो स्पीड किंवा ऍपर्चर येण्याकरिता ४०० पर्यंतचा कोणताही ISO निवडण्यास हरकत नाही. याचे कारण असे की फ़िल्मसारखे इथे आकार वाढवावयास अडचण येत नाही.आपणास साधारणत: १०"X१२" पेक्षा मोठा फ़ोटो लागत नाही.तेवढे एन्लार्जमेन्ट आरामात मिळते.
२] फ़िल्मवर ग्रेन्सचा त्रास व्हावयाचा. फ़ोटो रफ़ दिसावयाचा. डिजिटलमध्ये याचा समांतर भाग म्हणजे Noise. म्हणजे काय ? प्रकाशाचे किरण ccd वर पडले की ते सिग्नल पाठवतात. त्यांनी आपणाला चित्र मिळते. ISO वाढवला की या सिग्नल्सबरोबर नको असलेले फ़ालतू सिग्नल्सही तयार होतात.त्यांच्यामुळे नसलेले रंगही चित्रात येतात. पण गंमत म्हणजे हे जास्तकरून चित्राच्या DARK भागातच येतात.उदा. तुम्हाला काळ्या रंगात थोडासा निळसर रंग दिसण्याची शक्यता असते. नेहमी होईलच असे नाही. आणि सगळ्याना तो दिसेलच असेही नाही. आपल्याला आवडते ते खरे. हललेल्या चित्रापेक्षा थोडासा नॉइज परवडला.
३] माझ्या कॅमेऱ्यात १०० ते पार ३२०० पर्यंत ISO सेटिंग करता येते.जे वापरताच येणार नाही असे कोण कशाला तयार करेल ? गरज पडली तर पोस्ट प्रोसेसिंगमध्ये नॉइज कमी करता येतो.
White Ballance, Colour Temperatrure वगैरे
फ़ोटो निनिराळ्या वेळी घेतले जातात.सकाळी, दुपारच्या उन्हात, संध्याकाळच्या तांबूस प्र्काशात, फ़्लॅश वापरून, घरात बल्ब किंवा ट्युबच्या प्रकाशात फ़ोटो काढतो तेंव्हा प्रत्येक वेळी प्रकाशाची जात निराळी असते. स्वच्छ पांढरा कागदसुध्दा वेगळ्या वेगळ्या रंगाचा वाटतो. हा रंगातील फ़रक सुधारून घेण्यासाठी कॅमेऱ्यात सोय असते. सर्वसाधारपणे उन्हाची वेळ नेहमी लागणारी धरली जाते व इतर प्रकारांकरता निरनिराळी सेटिंग्ज असतात. उदा. बल्बच्या प्रकाशात काढलेल्या फ़ोटोवर पिवळ्सर झाक येते. ढगाळ वातावरणात किंवा ट्युबलाईटच्या प्रकाशात निळसर झाक येते. योग्य सेटिंग्ज वापरली तर ही झाक टाळता येते. साधारणत: एका सेशनमध्ये सेटिंग बदलावे लागत नाही. उदा.संध्याकाळी काढलेले घराबाहेरचे फोटो. पण मग घरी येवून फोटो काढावयाचे असतील तर सेटिंग बदलावयास पाहिजे. आणि हो, परत फोटो काढाल तेव्हा ते तपासले पाहिजे.थोडे बेफ़िकिर असाल तर Auto WB हा उत्तम पर्याय. स्वत:च्या कॅमेराचे मॅनुअल वाचा. कलर टेंपरेचर म्हणजे प्रकाशाच्या स्त्रोताचे ऍबसोल्युट टेम्परेचर. काही ठिकाणी याचा उल्लेख असतो. काम वरील प्रमाणेच. याचा उपयोग करणे थोडे अवघड आहे. विसरा. white ballance चे icon सहज कळतात व वापरावयास सोपे. जर आजपर्यंत आपल्या फोटोमधील रंग भलतेच येत असतील तर ते चुकीच्या WB मुळे हे ध्यानात येईल.. पुढील दोन फोटो बघा. दोन निरनिराळे wb वापरल्याने रंग किती बदलतात ते कळेल. सरावाकरता एखादी रेशमी साडी घ्या व निरनिराळ्या ठिकाणी उदा. उन्हात, सावलीत, ट्युबच्या प्रकाशात, योग्य WB वापरून फोटो काढा. एखादा चुकीचाही वापरा. रंग कसे बदलतात ते एकदम लक्षात येईल. एखाद्या वेळी चुकून WB बरओबर वापरला नाही तर, चुकून भलती झाक आलीच तर फ़ोटोशॉपमध्ये ती काढून टाकता येते. पण काम वाढते.
पुढील लेखात "प्रकाशयोजना ".
शरद
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 6:10 pm | ५० फक्त
शरद सर, आमची उदाहरणांची मागणि मान्य केल्याने अतिशय धन्यवाद. तसेच सोलापुरी चादरीचा फोटो टाकल्याबद्दल पण आभार.
10 Mar 2011 - 6:34 pm | नरेशकुमार
वाचत आहे. उत्तम माहीती.
10 Mar 2011 - 7:33 pm | यशोधरा
वाचते आहे आणि वाचनखुणा साठवत आहे. उत्तम माहितीसाठी आपले आभार.
तिसरा भाग कुठे आहे? सापडत नाही...
10 Mar 2011 - 7:35 pm | शेखर
धन्यवाद शरदजी.... ज्ञानात भर पडत आहे.
10 Mar 2011 - 7:45 pm | सूर्य
चारही भाग आजच वाचुन काढले. उत्तम माहीती मिळाली. धन्यवाद. पुढच्या भागांची वाट बघतो आहे.
- सूर्य
11 Mar 2011 - 5:14 am | नेत्रेश
अतीशय उत्तम माहीती दिल्यापद्दल धन्यवाद.
बरेचसे माहीत होते, पण पॉईंट अॅन्ड शुटच्या अती वापरामुळे विस्मरणात गेले होते.
तसेच नवीन माहीतीही खुप मीळाली.
11 Mar 2011 - 5:56 am | विंजिनेर
माहिती उत्तम आहे. कॅमेर्यात असलेल्या सेटींग्ज नुसार प्रयोग करीत आहे
11 Mar 2011 - 8:59 am | श्री गावसेना प्रमुख
फोटोशॉप वापरल आहे
(अस आमचे कलेचे सर म्हणाले)
11 Mar 2011 - 11:46 am | शरद
आपले "कलेचे सर " यांचा फोटोग्राफी/फोटोशॉप याचा अभ्यास किती त्याची कल्पना नाही. पण त्यांना तसे वाटले असेल तर त्यांना त्यातले काही कळत नाही. चारही फोटो काढले तसेच आहेत. ( आपल्या इतर ठिकाणी दिलेल्या प्रतिसादांप्रमाणे हा ही "इनोदी" म्हणून घ्यावयाचा असेल तर एक स्माईली दिली आहे असे समजा व सरांना सलाम सांगा.)
शरद
12 Mar 2011 - 8:50 am | श्री गावसेना प्रमुख
आता तुम्ही आमच्या कलेच्या सरांची थट्टा करता राव
सध्या आमचेकडे इस्तेमा असल्याने सर प्रतीक्रीया नाय देउ शकत,
(बाकी चुक भुल देणे घेणे)
11 Mar 2011 - 9:04 am | प्राजु
मस्तच!! अतिशय उपयोगी लेखमाला आहे ही. :)
11 Mar 2011 - 11:35 am | स्वैर परी
शरद सर, मी एका मित्राकडुन हे शिकले होते की, सामान्यत: आकाशावर 'फोकस' करावे आणि मग इच्छित वस्तूचा फोटो काढावा. यालाच व्हाईट बॅलॅन्स म्हणतात का?
तसेच, डिजीकॅम मध्य मीटरींग कसे करतात तेदेखील सांगावे. धन्यवाद!
11 Mar 2011 - 12:19 pm | जयंत कुलकर्णी
ते त्याचा उपयोग ग्रे कार्ड म्हणून करत असावेत. पण ते एवढे काही बरोबर नाही. मला वाटते श्री. शरद यांच्या पुढच्या लेखात हेही येईलच.
11 Mar 2011 - 1:24 pm | शरद
सर्वश्री स्वैर परी व जयंत कुलकर्णी यांचे प्रश्न : प्रथम फ़ोकसिन्ग व WB यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. तसेच "आकाशात" फ़ोकसिंग कसे करणार ? फारफार तर एखादा ढग असेल तर त्यावर फ़ोकसिंग म्हणजे infinity ला फ़ोकसिंग. ते सोडा. सर्वसाधारणत: कॅमेर्यात WB करता पुढील सेटिंग असतात. सूर्यप्रकाश, छाया, फ्लॅश, विजेचे दिवे, ट्युब. पहिले दोन घराबाहेर करता व उरलेले तीन घरात. या शिवाय AWB, (auto white ballance) ही सुविधाही असते. कॅमेरा प्रकाशाची जात स्वत:च ठरवतो. माझा सल्ला असा की आपण स्वत: सेटिंग करणे उत्तम पण दरवेळी फोटो काढून झाले की AWB सेटिंग करून ठेवावे. पुढचा फोटो घाईघाईने काढतांना मागचे सेटिंग बदलालच असे नाही. चुकीच्या सेटिंगने रंगात किती फरक पडतो ते आपण पाहिलेच आहे. AWB घोडचुका तरी टाळतो. मात्र आपले फोटो जास्त चांगले यावेत असे वाटत असेल तेव्हा स्वत: सेटिंग करावयाची (व ते परत बदलावयाचे न विसरण्याची) सवय पाडून घ्या. माझी परत एकदा विनंती. एकदा १० मिनिटे खर्च करून दोन दोन फोटो सेटिंग्ज बदलून काढा व येथे डकवा. अहो, मला तरी कसे कळणार की मी जे सांगावयाचा प्रयत्न करतो आहे ते तुमच्या पर्यंत पोचले आहे की नाही ?
ग्रे कार्ड ही भूतकाळातील गोष्ट. ज्या वेळी manual processing करावे लागे तेव्हाची. ३६ फोटोंचा रोल कॅमेर्या भरला की मी पहिला फोटो १८% ग्रे कार्डचा काढावयाचो. फ़िल्म धुवावयाला टाकली की तेथला माणुस पहिला फोटो ग्रे कार्डशी मॅच करावयाचा. ते जमले की उरलेले फोटो त्याच पद्धतीने प्रिंट करावयाचे. आता Auto processing आले. ग्रे कार्ड इतिहासजमा. ( पुण्यात अजूनही mp करतात म्हणे पण त्याची जबरदस्त फी लावतात.) येथे ग्रे कार्ड post processing करता उपयोगी आहे, त्याचा फोटो काढतांना उपयोगी पडणार्या WB शी संबंध नाही.
शरद
11 Mar 2011 - 12:35 pm | महेश_कुलकर्णी
नमस्कार शरद भाऊ,
तुमची ही लेख मला सध्या मी मन लावून वाचत आहे.
आपण सोलापुरी चादरीच जो फोटो दिला आहे त्याचे अजून तपशील असते तर बरे झाले असते.
आणि त्या फोटो मध्ये कुठला फोटो योग्य आहे असे आपणास वाटते ते सुद्धा सांगितले तर बरे होईल.
(मला तरी चादरीच २रा फोटो जास्त चांगला आणि योग्य वाटला)
गमतीचा भाग म्हणजे मी घरी असे अनेक प्रयोग करून बघतो मजा येते...(घरचे वैतागतात ही गोष्ट वेगळी)
12 Mar 2011 - 11:11 am | शरद
पहिल्या फोटोमध्ये निळसर झाक आली आहे ती शेड वा ट्युबचे सेटिंग ठेवले की येते. आता तुमच्या प्रयोगांचे फोटो इथे डकवा. (आम्ही वैतागणार नाही!)
शरद
11 Mar 2011 - 6:59 pm | निवेदिता-ताई
छानच माहिती..
11 Mar 2011 - 7:03 pm | विश्नापा
मी एक जुना पेन्टक्स के १००० कमेरा घेतला आहे.फिल्म फोटोग्राफी ला काही भविश्य आहे काय?
12 Mar 2011 - 11:05 am | शरद
हा एक ३०-४० वर्षांपूर्वीचा कॅमेरा आहे. आता २०-२५ वर्षी सातत्याने तो तयार केल्यानंतर पेंटॅक्सने तो तयार करावयाचे बंद केले आहे. माझ्याकडेही होता. अतिशय मजबूत कॅमेरा, अजून २० वर्षे तुम्ही तो वापरू शकाल. पण फार साधा (entree-level) आहे. माझा सल्ला हा की लवकरात लवकर काढून टाका. किंवा माझ्याकडील अनेक कॅमेर्यांप्रमाणे "ऍंटिक पीस" म्हणून ठेऊन द्या. तुम्हा-आम्हासारख्या हौशी लोकांकरिता फ़िल्म कमेर्यांचे दिवस संपले आहेत. फ़िल्मचा खर्च, एका वेळी सगळी फ़िल्म संपत नाही, मग नको असलेले फोटो काढा किंवा कॅमेर्या महिनोमहिने फ़िल्म ठेवा वगैरे बाबी लक्षात घेता डिजिटल फोटोग्राफीलाच वाव आहे. फ़िल्म कॅमेर्यान्चे दिवस गेले.
शरद