"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-७
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत
--------------------------------------------------------------------------
.
जास्त-कमी मागासलेल्या जाती-जमातीमधील समन्वयाचा अभाव
१९९०च्या दशकात अन्य मागासलेल्या जाती-जमातींत (OBCत) गणना होणार्या आणि (जास्त करून) शेतीप्रधान व्यवसायातील मतदारांनी त्यांच्या सतत वाढणार्या आर्थिक बळाचे राजकीय बळात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेत्यांनी आपल्या बांधवांवर पूर्वी झालेल्या आन्यायांमुळे आलेल्या हलाखीच्या परिस्थितीला लक्षात घेऊन सरकारी नोकर्यांत आरक्षणाची मागणी केली आणि तसे आरक्षण त्यांना मिळालेही. पण हे नेते त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या आणि यापूर्वी अशाच आरक्षणाचे फायदे मिळविलेल्या वर्गांशी वैरानेच वागत राहिले. लोकशाहीमुळे मिळालेले अधिकार वापरण्याच्या संधी मिळूनही त्यांच्या मनात खोलवर बसून राहिलेली जाती-उपजातींबद्दलची कल्पना नष्ट तर झाली नाहींच, उलट अनेक तर्हेने ती जास्तच उभारून आली. निवडून आलेल्या प्रतिनिधींना आपल्या सामाजिक दर्जाबद्दल फारच तीव्र जाणीव असते मग त्यांची सामाजिक पार्श्वभूमी कुठली कां असेना! लोकशाही राबविणार्या भारतात त्यांना मिळणारे विशेषाधिकार आणि अभयदान (immunity) यांमुळे आलेला मोठेपणा कमी न होता वाढतच गेला आहे. या प्रक्रियेने पूर्वी उच्चवर्णीयांना मिळणार्या विशेषाधिकारांची नकळत नक्कल होऊ लागली आहे. लोकशाहीची कल्पना आणि सत्ता मिरविण्याची गरज हे दोन्ही झकासपणे एकजीव होऊन गेले आहेत. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी त्यांच्या सरकारी बंगला, नोकर-चाकर, त्यांचे उच्चस्थान जाहीर करणारी ठळक पाटी लावलेली सरकारी गाडी, सरकारी आणि स्वतः नेमलेले बंदूकधारी संरक्षक, मंत्र्यांचा लवाजमा, दरबा इ. सहज दाखविण्याजोगी नूतनप्राप्त अधिकारांची प्रतीके मिरवायला अजीबात नम्रता दाखवत नाहींत. थोडक्यात ही नवी ऐटदार जीवनशैली एकाद्या लोकप्रतिनिधीच्या नम्र जीवनशैलीऐवजी एकाद्या सरदार-दरकदाराचा उद्धटपणाच दाखवू लागली आहे. एकाद्या गरीब राज्याचे मुख्यमंत्री आपल्या घरातील लग्नकार्ये आणि वाढदिवस अशा कांहीं थाटात साजरे करू लागले आहेत कीं गतकाळातील राजा-महाराजांनाही अशा प्रमाणावर हे समारंभ करणे परवडले नसते. कदाचित् गांधीजींच्या शिकवणीच्या अल्पजीवी परिणामांमुळे असेल पण १९४७ नंतरच्या कांहीं वर्षांत जुन्या सरंजामी प्रथांबद्दलच्या नैसर्गिक कलांना आवर घालण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहींत. लोकशाहीच्या प्रयोगात उच्चासनावर बसविलेल्या या मौल्यवान विचारांना बाजूला सारून जुन्या प्रथांनी पुन्हा जोरात डोके वर काढले. उलट गेल्या कांहीं वर्षांत लोकशाही राबविण्याच्या प्रक्रियेत विजयी होणार्या उमेदवारांच्या कायदेशीरपणाला पुष्टी मिळाली व त्यामुळे विजयी लोकांच्या वागण्यात असा कांहीं मस्तवालपणा आलेला आहे कीं त्यापुढे लोकशाहीच्या नेमस्तपणा आणि ऋजुता या गुणांची कुचेष्टाच केली जात आहे.
लोकशाही कशासाठी? वैयक्तिक फायद्यासाठी!
सांसदीय लोकशाहीचा जेंव्हां भारतात प्रथम प्रवेश झाला तेंव्हां लोकशाहीच्या तत्वांपेक्षा किंवा कल्पनेपेक्षा लोकशाहीच्या प्रक्रियेद्वारा प्राप्त होणार्या फायद्यांनेच भारतीय राजकीय नेत्यांना आकर्षित केले. अगदी एकाद्या प्रादेशिक विधानसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधीचे स्थानसुद्धा सर्वोच्च सनदी नोकरापेक्षा वरचे ठरविण्यात आले. पूर्वी ब्रिटिशांच्या काळात सर्वेसर्वा असलेल्या आणि सहजासहजी जनतेला उपलब्ध नसलेल्या जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांच्याही वरच्या स्थानावर स्थानीय पातळीवर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी छलांग मारली. त्यामुळे स्थानीय राजकारणात विजयी झालेल्यांना झटपट वरच्या पातळीवर चढण्याची आणि त्याद्वारा वेगाने झालेली अधिकारातील वाढ यामुळे तुंबलेल्या पाण्यासारख्या थंडावलेल्या भारतीय समाजात अपेक्षांची एक नवी लाट आली. सत्तेवर आधीच पकड असलेल्या वर्गाने, विशेषतः खेडोपाडी, लोकशाहीकडे एक झटपट सत्तारूढ होण्याचे, सामाजिक दर्जा ऊंचावण्याचे आणि सध्या असलेल्या हुकूमतीला आणि पदक्रमाला अधीक बळकटी आणण्याचे साधन याच दृष्टीकोनातून पाहिले.
लोकशाही बरखास्त करणारी व्यक्ती सर्वात जास्त लोकप्रिय
मतदारांची संख्या, मतदानकेंद्रांची संख्या, मतमोजणी करणारी शेकडो यंत्रें, मतपत्रिकेची वाढती लांबी, निवडणूक आयुक्ताच्या अधिकाराची व्याप्ती यासारख्या लोकशाहीच्या पायाभूत घटकांत (infrastructure) अभूतपूर्व वेगाने झालेली वाढ आणि राजनैतिक आचरणात घुसलेल्या लोकशाहीविरोधी प्रथा भारतात एकत्र नांदत आहेत यात आश्चर्य ते कसले? संघटनांच्या निवडणुकांबाबत भारतीय राजकीय पक्ष स्वतः क्वचितच लोकशाहीवादी असतात. नेता जे म्हणेल ती पूर्व दिशा हाच खाक्या असतो! लायकी असो वा नसो पण राजकीय पक्षांत घराणेशाहीचाच जोर आहे. तीव्र मतभेदांना ना प्रोत्साहन दिले जाते ना ते सहन केले जातात. लाचारी आणि चमचेगिरी चोहीकडे पसरलेली आहे आणि तिला जणू परंपरागत मान्यता मिळालेली आहे. खंबीर आणि शक्तिशाली नेतृत्व पूजले जाते ते त्याच्या सत्तेमुळे व अधिकारामुळे, त्याच्या लोकशाहीवादी दृष्टिकोनामुळे नव्हे! एका नियतकालिकाने अलीकडेच भारतीय लोक कुठल्या नेत्यावर जास्तीत जास्त विश्वास ठेवतात याबाबत एक सर्वेक्षण केले होते. इथे १९७५ साली लोकशाही बरखास्त करून देशात आणीबाणी आणणार्या इंदिरा गांधींची निवड झाली यात आश्चर्याचा फारसा भाग नव्हता! त्यांची अधिकारयुक्त, उद्दाम शैली, आपल्या राजकीय विरोधकांशी किंवा त्यांच्या मर्जीतून उतरलेल्यांशी वागण्याची त्यांची भावनाशून्य पद्धती यातून भारतीयांच्या सुप्त मानसिकतेत सतत जागृत असलेला खंबीर नेतृत्वाबद्दलचा ओढाच कारणीभूत ठरला आहे. आघाडीचे मानसोपचारतज्ञ सुधीर कक्कड यांच्या मते भारतीय माणूस नेहमीच स्वत:साठी एक नेता किंवा गुरु शोधत असतो. तो कसा असावा याबाबत ज्या अपेक्षा असतात त्या म्हणजे तो आपल्या भावविश्वाच्या कल्पनेतला किंवा रोजच्या व्यवहारी जगातला असावा, आकर्षक व्यक्तिमत्व असलेला असावा वगैरे. अशा नेत्याने आपल्या सल्लागाराचे व जागतिक पातळीवरील मार्गदर्शकाचे काम करावे आणि त्यायोगे प्रत्येकाच्या आयुष्यात जवळीक आणि अधिकार पुनःप्रस्थापित करावेत अशी अपेक्षा असते व अशा एकाद्या आदर्श पण सर्वशक्तिमान व्यक्तीला तो आयुष्यभर शोधत असतो आणि अशी व्यक्ती मिळताच तिला अभावितपणे शरण जाण्याची त्याची प्रवृत्ती असते.
इंदिरा गांधींपुढे सुशिक्षितांनी घातलेले लोटांगण
ज्या नाजुक कौशल्याने आणि आत्मविश्वासाने इंदिरा गांधी सत्तेचे खेळ खेळल्या आणि आपली राजकीय ध्येये प्राप्त करून घेण्यासाठी ज्या निर्दयतेने त्यांनी हालचाली केल्या त्यासाठी त्यांच्याबद्दल चौफेर आदराची भावना आहे. सुशिक्षित भारतीयांच्या मनात लोकशाहीबद्दलच्या कळकळीचा संपूर्ण अभाव होता हे इंदिरा गांधींनी जेंव्हां आणीबाणीची घोषणा केली तेंव्हांच उघड झाले होते. कारण देशातील जवळ-जवळ सर्व विरोधी नेत्यांना त्यांनी तुरुंगात टाकले तरीही सार्या देशात कुठेच विश्वासार्ह विरोधाचा मागमूसही दिसला नव्हता. नोकरशाहीने मुकाट्याने राज्यकारभाराची नवी पद्धत अंगिकारली. उद्योगसमूहांनी तर आणीबाणीचे स्वागतच केले. एरवी भाषणस्वातंत्र्याच्या आणि मतभेद जाहीरपणे मांडण्याच्या अधिकाराचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या मीडियानेही जी शरणागती पत्करली ती सर्वात नेत्रदीपक होती. जरा कुठे वाकायला/झुकायला सांगितले तर हे सारे गुढग्यावर रांगत आले! बर्याचशा अव्वल संपादकांनी भारतीय परंपरेतील ’आदरपूर्ण शरणागती’चा पवित्रा घेतलेला दिसला. या पवित्र्यात त्यांची जी कांहीं शान होती ती पार नाहींशी झाली. तरी आणीबाणी उठविली जाईपर्यंत ते त्याच पवित्र्यात राहिले! त्यावेळी आपल्या सर्व शत्रूंचा निःपात करणार्या दुर्गामातेचे तीन एकत्र जोडलेल्या चौकटींवर काढलेले आणि मनात एकदम भरणारे हुसेन यांचे चित्र खूपच प्रसिद्ध झाले होते. आणीबाणीच्या काळातली सर्व जुलूम-जबरदस्तीचा सिंहाचा वाटा गरीबांच्या वाट्याला आली. आणि शेवटी जेंव्हां निवडणुका झाल्या तेंव्हां जनतेच्या या रोषामुळे इंदिरा गांधी चारी मुंड्या चीत झाल्या! पण जेंव्हां आणीबाणी लागू करण्यात आली त्यावेळी ती खूपच अभेद्य वाटल्यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी सर्व भारतीय जनता सत्तेचा हा दुरुपयोग मूकपणे स्वीकारायला तयार झाली होती.
हौतात्म्य पत्करलेले अनुयायी म्हणजे पारितोषिके नव्हेत!
लोकशाही पद्धतीत एकाद्या खंबीर आणि उमद्या व्यक्तिमत्वाच्या नेत्यासाठी अभूतपूर्व निष्ठेचे प्रकटन जनतेकडून होते. पडद्याआड गेलेल्या अनेक साम्यवादी राजवटीच्या कडव्या व्यक्तिमत्वाच्या नेत्यांना मिळालेल्या अशा निष्ठेच्या देखाव्याची अनेक उदाहरणे दिसतात. सप्टेंबर २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जेंव्हां तामिळनाडूच्या लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खटला करण्यायोग्य आहेत असा निर्णय देऊन खटला चालू ठेवण्याचा निर्णय दिला तेंव्हां त्यंच्या ११ अनुयायांनी तीव्र शोकापोटी आत्महत्या केल्या आणि दोन अनुयायी त्या धक्क्याने मरण पावले. जयललिता यांनी हौतात्म्य पत्करलेल्या या सर्व निष्ठावंत आणि प्रेमळ बंधू-भगिनींची यादी बनवली आणि त्यांनी कसा देहत्याग केला याचा तपशील दिला: सहा लोकांनी स्वतःला पेटवून घेतले होते, तीघांनी स्वतःला फासावर लटकाविले होते, दोघांनी विषप्राशन केले होते आणि दोघे धक्क्याने मरण पावले होते. त्याच वर्षीच्या जूनमध्ये अटक झाल्यावर जयललिता यांचे कट्टर प्रतिस्पर्धी करुणानिधी यांनी तर त्यांच्या साठ अनुयायांनी आत्महत्त्या केली किंवा त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू आला असे जाहीर केले. तामिळनाडूचा सर्वात दिग्गज नायक होते चित्रपटातील नट असलेले व नंतर नेतेपदावर आरूढ झालेले MGR. ते १९७७ पासून १९८७ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि लाखो लोक त्यांना पूजत असत. आणि हे सारे अशा राज्यात जिथे १९५१ मध्ये व्यक्तीपूजनाविरुद्ध मोठी चळवळ झाली होती. हे नेते अशा तर्हेच्या भक्तिभावनेच्या अतिरेकापासून अनुयायांना परावृत्त करत नाहींत आणि अनुयायीसुद्धा अशा तर्हेच्या भक्तीबद्दल नापसंती दर्शवत नाहींत! ज्या नेत्यांकडे स्वतःच्या गौरवाची प्रभा झळकवत ठेवण्यासाठी स्वतःचे असे कर्तृत्व किंवा व्यक्तिमत्व नसते आणि ज्यांना त्यासाठी बाहेरील भाटांची गरज असते अशा नेत्यांसाठी असे हुतात्मे म्हणजे जणू (ढाल-प्याल्यांसारखी) पारितोषिकेच असतात. अनुयायांत अशा तर्हेचे हौतात्म्य म्हणजे कसेही करून ’साहेबां’चे लक्ष वेधण्याचा एक क्षीण प्रयत्न असतो. राजकारणाचे आधुनिक रिंगण म्हणजे सर्व बाजूंनी वेढलेल्या एकाद्या आश्रमाची प्रतिकृती असते. तिथे गुरू म्हणजे सर्वोच्च शक्ती असते आणि भक्तगणाची सत्वपरिक्षा ते किती संपूर्णपणे आपल्या गुरूच्या इच्छेपुढे शरण जातात त्या प्रमाणावर ठरविले जाते. समर्थ राजकीय नेते आपल्या अनुयायांना नेमाने दर्शन देतात आणि अनुयायी गुरूचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी नव्यानव्या आणि कधी-कधी पोरकट आणि विचित्र क्लृप्त्या काढत असतात.
माधवराव शिंद्यांच्या अंत्ययात्रेतील त्यांच्या अनुयायांची संतापजनक वागणूक
वैयक्तिक निष्ठेचे प्रदर्शन हे केलेच पाहिजे आणि भक्ताने आपली निष्ठा कितीही निस्वार्थी असल्याची दवंडी पिटली तरी अशा निष्ठेच्या फलस्वरूप जर कुठलाही वैयक्तिक फायदा ताबडतोब झाला नाहीं तर ती निष्ठा काय कामाची? माधवराव शिंदे हे अस्सल लोकप्रिय नेते होते. ते अतीशय तरुण वयात विमान अपघातात सप्टेंबर २००१ मध्ये कालवश झाले. ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याचे वंशज असलेल्या माधवरावांचे अनुयायी लाखॊंनी होते. त्यांच्या शहरातील राजवाड्यात पार पडलेल्या अंत्यविधीला अख्खे ग्वाल्हेर लोटले होते. पण त्यातले कित्येक लोक चित्रवाणीचा कॅमेरा आपल्याकडे वळल्याबरोबर आपले दुःख विसरायचे. पत्रकार संकर्षण ठाकूर आपल्या अहवालात लिहितात:
तो एक अतीशय भ्रष्ट क्षण होता. एका बाजूला माधवरावांच्या अंत्ययात्रेची शोकपूर्ण मिरवणूक चालली होती. एका अलंकृत पालखीत त्यांचा देह ठेवलेला होता आणि तीन्ही सैन्याचे रक्षक त्या पालखीला धीम्या पावलांनी अंत्ययात्रेच्या ढोलाच्या ठेक्यावर आणि बॅगपाईपच्या हृदय पिळवटून टाकणार्या सुरांवर त्या पालखीला चितेकडे नेत होते. तर दुसर्या बाजूला मुद्दाम आरडाओरडा करणारे असभ्य लोक तात्पुरत्या उभारलेल्या बांबूंच्या कुंपणाशी झटापट करत, शिट्या वाजवत, टर उडवत, रेटारेटी करत दंगा करत होते जेणेकरून चित्रवाणीचा कॅमेरा त्यांच्याकडे वळून त्यांची छबी दाखवेल. त्यासाठी "माधवराव शिंदे अमर रहे" अशा घोषणा द्यायलाही ते तयार होते व कसेही करून कॅमेराचा रोख स्वतःकडे वळविण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता!
इंजिन आणि त्याला जोडलेले डबे?
खंबीर राजकीय नेत्यांना कळकळीच्या भक्तांची अपेक्षा असते. त्यांच्या कर्तबगारीचे यथायोग्य मूल्यमापन करणारे समजूतदार आणि गुणज्ञ नागरीक त्यांना सैद्धांतिक दृष्टीने हवे असतात पण प्रत्यक्षात अशा अनुयायांना दुर्लक्षिले जाते. अनुयायांना भक्कम नेते हवे असतात कारण अशा नेत्यांच्या ’इंजिना’ला त्यांना आपला ’डबा’ जोडायचा असतो. चित्रवाणीच्या कॅमेर्याचा वापर करून ते आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडू इच्छित होते व त्यासाठी ते प्रत्येक संधीचा फायदा घेऊ पहात होते. नेते आणि अनुयायी दोघेही एकाच उद्दिष्टाचा पाठलाग करत असतात: वैयक्तिक फायदा! नेत्यांचे सत्तेचा डामडौल मिरवणे आणि अनुयायांचे दास्यत्वाचे प्रदर्शन करणे या सत्तेच्या नाण्याच्याच दोन बाजू असतात.
राजकीय नेते अतीशय हेतुपुरस्सरपणे आपल्या सत्तेची आणि आपल्या भोवतालच्या अधिकाराची प्रभा आपल्या अनुयायांना आणि मतदारांना दिसू शकेल अशी स्वतःची एक प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न करत असतात. कधी-कधी ही प्रवृत्ती हास्यास्पद रूपात दिसते. याचे उदाहरण म्हणजे मूलतः मागासलेल्या वर्गाचे नेते असलेले लालूप्रसाद यादव यांची घोड्यांच्या पैदाशीबद्दल आणि निपजीबाबत निर्माण झालेली नवी आवड. या नव्या आवडीतून अजाणतेपणे क्षत्रीय परंपरेकडे वळण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. कारण पूर्वी राजाची ताकत कांहीं विशिष्ठ जीवनपद्धतीवर अवलंबून असे. राजाचे/राज्यकर्त्याचे शरीर सशक्त असावे ही अपेक्षा प्रजेला असे. कारण तरच राजा आपला अधिकार गाजवू शकेल असे त्यांना वाटे. आज वैयक्तिक रक्षक बाळगण्याला राजाश्रय मिळू लागला आहे. पण ते अद्याप सर्वसामान्य प्रमाण झालेले नाहीं. पण आजकाल कित्येक नेत्यांच्या ’पागे’त गरज पडल्यास कायदा आपल्या हाती घेऊन आपल्या नेत्याचे ईप्सित साध्य करून देऊ शकणार्या बाहुबलींचा मोठा ताफा ठेवलेला असतो. सत्तेची सहजासहजी दिसणारी बिरुदे म्हणून नेत्यांना सरकारी अंगरक्षकही हवे असतात. आपले संरक्षण करण्यासाठी किती गणवेशातले आणि हत्यारबंद अंगरक्षक आहेत इकडे या नेत्यांचे खूप सक्ष असते. त्या संख्येत काटछाट करण्याबद्दलची पावले कुणी घेताना दिसला तर लगेच निषेधाच्या आरोळ्या ऐकायला मिळतात. मग त्या नेत्याच्या जिवाला धोका असो वा नसो! या नेत्यांना स्वतःची परोपकारी, दयाळू पण अनिर्बंध सत्ता असलेला, आपल्या अनुयायांच्या बाबतीत दानशूर असलेला पण त्याच्या विरोधकांशी दोन हात करू शकण्याचे सामर्थ्य असलेला नेता अशी प्रतिमा उभी करायची असते. व्यंगचित्रकारांनी त्यांच्या धोरणाची कुचेष्टा करणारी व्यंगचित्रे काढलेले त्यांना चालते, पण आपली प्रतिमा बिघडविणारी व्यंगचित्रे काढल्यास मात्र त्यांना संताप येतो.
प्रतिक्रिया
20 Feb 2011 - 11:57 pm | आत्मशून्य
अंतर्मूख होणे भाग पडते आहे.
10 Mar 2011 - 6:54 pm | नरेशकुमार
ह्म्म्म !
किती कृर !
पुढचा भाग कधी ?
10 Mar 2011 - 10:46 pm | सुधीर काळे
सध्या "विश्वचषक क्रिकेट स्पर्धा" नावाचा एक नवा खलनायक क्षितिजावर उगवला आहे. त्यामुळे हल्ली लेखनाला वेळ कमी मिळतोय्. त्यात मी प्रवासात आहे (सध्या मुलाकडे वॉशिंग्टन डीसीला). पण तरीही लेखन चालू आहेच, पण कमी!
१९ ता.ला जकार्ताला पोचल्यावर पुन्हा जरा जोर येईल! सध्या जेट-लॅग-पीडित अवस्थेत आहे!