पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात! तर कधीच, कुठंच, काहीही न बोलताना दिसणारे नैष्ठीक पावकरी दररोज मुक्यानं मंदीरात येऊन, घंटा वाजवून, क्षणभर देवाकडं पाहात राहून मुक्यानंच परत जाताना दिसतात. यांना मध्येच अडवून नमस्कार घालण्याचं सुध्दा धैर्य होत नाही - उगाच हुं: !!!! करून तरातरा चालत पुढे निघून जायचे.
म्हणून बरड ओलांडत पुढे खरडघाटावर जावे तर आयाबायांची धुणी धोधो वाहाणार्या घाटावर ठेवलेल्या दगडांवरून सुरू होऊन एकमेकींच्या दगडात शिरलेली असतात - माग काढता-काढता यात अडकून वाहुन जायचा एखादा. थोडं पुढं गेलं की काही लोकांच्या हातभट्ट्या धगधगून उठलेल्या दिसतात - अगदी पहिल्या धारेचा माल मिळायचा तो इथंच. हम्म्म. कुटं बोलीयाचा नाय हां आपन इकडं येतो ते. ;-)
तसंच याचा त्याचा आधार घेत चालत-चालत थोडं पुढं गेलं की ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डाखाली बिड्या फुकीत बसलेली, त्या बोर्डावरच खडूनं रेघोट्या मारणारी मंडळी दिसतात. यांना कधीतरी सांगावं वाटतं - अरे, चावडी तिकडं आहे! तिकडं जा. तिकडे चावडीत तीच रोजची भांडणं लागलेली असोत, कथेकर्यांच्या कथा रंगलेल्या असोत की कौल फुटून घरात पाणी साचलेले असो - हे नोटीसबोर्डाशेजारी बसणारे लोक तिथून ढिम्म हलत नाहीत.
तिकडे चावडीवर चालणार्या कुटीरोद्योगात लटकवून ठेवलेल्या विषयांवर मस्त मालमसाला चढून ते विषय खरपूस भाजून निघालेले असतात. मध्येच काही लोकांनी शिंपडलेल्या तिखट, मीठ, लोणच्याच्या पाण्याने त्यांची लज्जत आणखीच वाढलेली असते. खरपूस भाजला जाऊन, मालमसाला अगदी अचूक चोपडलेल्या दुर्मिळ लेगपीस सारखे! आता हिकडं यायचं म्हणजे सर्वभक्षीच असायला पाहिजे.
आळणी आन रोजचा भाजीपाला खुडल्यासारखा माल पाहिजे असेल तर तिकडं जायचं - कवीरवी लोकांच्या लाईनला! हे लोक गिर्हाईक असो, नसो - आपल्या भाजीपाल्याचा रतीब नेमानं घालीत असतात. वर पुन्हा दुकानात ठेवलेल्या मालाबद्दल चार शब्द ऐकवले तरी काही बोलत नाहीत, उलट म्हणतील - "मालात खोट आसंन तर बेलाशक कान धरा मालक- पन आपलं दुकान इसरू नका!" "पुढच्या खेपंला अक्षी ताजा माल आनतो - ह्या बारीस जरा बार कच्चाच र्हायलाय!" पण हे वाचून एखादं ओळखीचं वाटणारं फटकूर पक्कं बांधून झाकून ठेवलेली डाल उघडायला जाल तर भप्पकन अंगावर येणार्या कोळंब्यासुध्दा कधीमधी याच लाईनला दिसतील.
हा सगळा बाजारातला खराखुरा माल शिजून पडलेला असतो तिकडं - स्वयंपाकघरात! काय चढाओढी म्हणता - समिष म्हणू नका, निरामिष म्हणू नका. छ्या:! ती स्वयंपाकघरात मांडून ठेवलेली पक्वान्नं नुसती डोकावून पाहुनपाहुन किती हॉटेलं पालथी घातली असतील? पण एक तरी जिन्नस इथल्या स्वयंपाकघरातल्या सारखा दिसावा!
नुसत्या दृश्यावर तृप्त होऊन ढेकर द्यावा आणि कलादालनात जाऊन थोडं लवंडावं म्हटलं तर मध्येच कुणाचेतरी छंदबध्द गाणे ऐकू येते - मग ते बघणं आलंच. अनुष्टुभ किंवा वसंततिलका अशा भारदस्त नावाचा अगदीच अनोळखी छंद नसेल, तर मग तो कान देऊन ऐकणं आलंच.
ते ऐकायचं आणि अंगातली सुस्ती घालवण्या सरळ कलादालनाकडं चालू लागायचं. इथं देशविदेशातून आणून चिकटवलेली, डोंगरदर्यात फिरून काढलेली चित्रं बघा, रांगोळ्यांचे रंग न्याहाळा, कुणाची रेषेवरची हुकूमत पहा की कोलाजातून साकारलेले चित्रविचित्र आकार पहा की विणकाम-भरतकाम-हस्तकलेतल्या खुब्या शोधत बसा.
हे झालं की घसरून पडायला होईल असा ढिला झालेला कौल खुबीनं ओलांडायचा आणि थेट जायचं आजकाल बाहेरून बंद दिसणार्या मातबर लोकांनी दणाणून सोडलेल्या संपादकीय विभागात - इथं मग जुन्या लेखांची कात्रणं उचकून पाहायची- हे कुणासारखं लिहीतात बरं? हं..हं!! त्या आपल्या यांच्यासारखे!
दारातून आपल्या खोलीत आत आलं न आलं की दिवसभराचे टपाल हातात पडते आणि राहिलीसाहिली कसर दोस्तांनी करून ठेवलेल्या कानगोष्टीतून भरून निघते. मग याच्या कानाला लाग-त्याच्या कानाला लाग.
असा हा आमचा पाव - एक गावच! पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही.
प्रतिक्रिया
29 Nov 2010 - 8:30 am | नगरीनिरंजन
हा हा! लै भारी!
29 Nov 2010 - 8:34 am | स्पंदना
यशवंताऽ ऽ ऽ ऽ!!!
मला मात्र हा 'पाव' गावा सारखा न वाटता घरा सारखा वाटतो. ओसरी वर मंडळी पान तंबाखुच तबक इकडुन तिकडे देत कधी राज कारण कधी समाज कारणावरुन गम्भीर गप्पा मारताहेत, वाद विवाद रंगताहेत, तिथच बाजुला पडवी वर जरा रंगेल लोक काव्याबिव्याच्या छटेल गप्पा मारताहेत. माज घरात एखादी काकु ' अग त्यान ना अस्स केल्हो!' अस पाल्हाळ लावतेय . तिथच बाजुला कोणी हसवुन हसवुन पुरेवाट होइल असा किस्सा सांगतोय. त्यतच एखदी चिमुरडी वा चिमुरड ' माझ्या शालेत ना ' चा सुर लावतय. कुठला पिक्चर बघणेबल वा एकदम भिकार याची चर्चा रंगतेय. मग आत मुदपाक खाना . तिथ ताट वाट्यांचीच काय ती कमी. अम मग मागच्या पडवीत निवांत पाय पसरुन कुठ भरत काम शिवण कामाचे नमुने , इथल्या तिथल्या सहलींचे अल्बम . यच्या दारातली त्याच्या दारातली रांगोळी अश्या गप्पा, अन लय भारी अश्या वाखाणण्या! मग परड्यात हे करावे ते न करावे अन मग शेवटी गोडावुन मधला भरगच्च माल. त्यातच एखाद उनाड पोर वा पोरगी अगदी बाहेरच्या ओसरी पासुन मागच्या गोदामा पर्यंत पायाला भिंगरी असल्या सारखी उनाडक्या करत फिरत असतात.
आता हा माझा जरा सम्कुचीत पण घरेलु दृष्टीकोण!
29 Nov 2010 - 1:40 pm | धमाल मुलगा
यशवंतबुवांचा लेख तर फर्मासच, त्यावर अपर्णाचा हा आपुलकीचा प्रतिसाद! जगात भारीए :)
आपल्याला तर ह्या गावात शॉल्लेट मजा येते. कधी सूरपारंब्या खेळ, कधी आट्यापाट्या खेळ, कधी कुणाला दोन लगाव-कधी कुणाकडून दोन लगाऊन घे असं करत आला दिवस मजेत जातो.
29 Nov 2010 - 1:43 pm | नगरीनिरंजन
शब्दाशब्दाशी सहमत! या पावात येऊन वडापण होतो आमचा कधीकधी :-)
29 Nov 2010 - 9:44 am | गवि
ग्रेट आहेस रे मित्रा..
29 Nov 2010 - 10:33 am | ५० फक्त
श्री. यशवंत, छान लिहिलं आहे. मजा आली वाचुन.
हर्षद.
29 Nov 2010 - 11:11 am | प्रीत-मोहर
मस्तच हो..
29 Nov 2010 - 6:49 pm | छोटा डॉन
अरे यशा, मला आधी कळालेच नाही की लेख कशाबद्दल आहे.
लेखाच्या शेवटी शेवटी कुठे अर्थ लागला, मस्त लिहला आहेस.
साला आपला पण जीव आहे ह्या गावावर, उगाच भटकत भटकत ह्या गावात आलो होतो आणि इकडचाच होऊन गेलो.
उत्तम लेख, अपर्णाचा प्रतिसादही सुरेख !
मजा आली
- छोटा डॉन
21 Dec 2010 - 6:26 pm | स्वैर परी
:)
29 Nov 2010 - 8:14 pm | स्पा
जबर लेख लिहीलायेस यशवंता
29 Nov 2010 - 8:23 pm | पैसा
मस्त, खरपूस भाजलेल्या खमंग ताज्या पावासारखा जमलाय लेख. त्यावर अपर्णाची प्रतिक्रिया पण लंबर वन!
यात आणखी भर म्हंजे, गप्पा टप्पांचे फड रंगवणारे गावकरी आणि एकामेकांच्या अंगणात जाऊन कानगोष्टी करणार्या बाया आणखीनच मजा आणतात! या कानगोष्टी एवढ्या मोठ्यानं सांगाव्यात की आणखी १० जणाना तरी कळल्याच पायजेत. मग त्याची मजा औरच!
29 Nov 2010 - 8:23 pm | सूड
खरंय !!
29 Nov 2010 - 8:37 pm | मस्तानी
यापुढे कुणाला मिपा ची ओळख करून द्यायची असेल तर हाच धागा वाचायला सांगेन इतक मस्त लिहील आहेत !
29 Nov 2010 - 9:55 pm | गणेशा
छानच ....
29 Nov 2010 - 11:17 pm | मी-सौरभ
मस्त जमलाय...
'पाव' शेर आमच्याकडून लागू तुला.
30 Nov 2010 - 12:11 am | यकु
सर्व पावकर्यांचे धन्यवाद!! :)
30 Nov 2010 - 12:35 am | रेवती
वाह! क्या बात है!
तुम्हाला कसं काय बुवा सुचतं इतकं चांगलं लिहायला?
इतके वेगळाले शब्द वापरणारे एक तुम्ही आणि दुसरी ती अपर्णाबाई!;)
माझे डोक्यात असलेले विषय डोक्यातच आहेत अजून. लिहिता मात्र येत नाही.
30 Nov 2010 - 9:52 am | स्पंदना
अग बाई बाई बाई बाई मी बाई झाले!
30 Nov 2010 - 8:56 pm | रेवती
अगं फारच सौम्य शब्द वापरला आहे. काहीजण मला आज्जी म्हणतात.
30 Nov 2010 - 2:32 am | इंटरनेटस्नेही
मस्त लेख आणि चांगली शब्दकळा*. आवडला.
-
(पावकरी) इंटेश.
शब्दकळा* म्हणजे काय ते मलाही माहित नाही.. षाळेत असताना कधीतरी वाचला होता हा शब्द.. लोल्स!
मिनींग माहित असल्यास स्क्रॅप द्वारे टेलावे.
30 Nov 2010 - 5:01 pm | राजेश घासकडवी
भट्टी छान जमून गेली आहे. कोणी विचारलं की इतका वेळ काय त्या कॉंप्युटरच्या थोबाडाकडे बघत बसलेला असतोस, मध्येच येड्यासारखा हसतोस, मध्येच तावातावाने लिहितोस... तर हा लेख वाचायला देईल.
21 Dec 2010 - 7:16 pm | सहज
चोता दोन उर्फ वायदे आझम यांनी म्हणल्याप्रमाणे सुरवातीला समजलेच नाही कोणत्या गावाबद्दल लिहले आहे.
जबरी!!!