या आधीच्या तीन भागांत मी कव्वाली या गायनप्रक्राराची ओळख, सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वाल्या आणि १९५५ ते १९७५ या कालावधीतील हिंदी चित्रपटांमधील कव्वाल्या यांची माहिती दिली होती. या चवथ्या आणि शेवटच्या भागात वळूया (प्रामुख्याने *) १९७६ ते २००५ या कालावधीतील चित्रपटांतील काही गाजलेल्या कव्वाल्यांकडे.
या आधी लिहिल्याप्रमाणे मी ही लेखमाला लिहिण्याचा घाट घातला तो केवळ मला आवडलेल्या आणि आता लक्षात असलेल्या कव्वाल्यांची यादी तुमच्या बरोबर share करण्याच्या स्वान्त-सुखासाठी, पण माझ्या सुदैवाने तुम्ही वाचक लोकही मी नमूद करायला विसरलेल्या आणि आपापल्या आवडत्या अशा अनेक कव्वाल्या इथे पुरवून एक ऑनलाईन मेहेफिल-ए-समाच निर्माण करत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद!
या भागात तसंच आधीच्या भागांत यापुढेही आठवेल तशी भर घालत चला, आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मन:पूर्वक आभार!
* या आधीच्या भागात एक १९७३ ची गाजलेली कव्वाली टाकायची राहून गेली, ती इथे सुरुवातीला देतो आणि मग सुरु करुयात १९७६ पासून पुढे:
"मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती"
१९७३ चा हा चित्रपट होता 'गर्म हवा'. बलराज सहानी यांची बहुधा सर्वोत्तम भूमिका असणारा, फाळणीनंतर भारतात राहणे पसंत करणार्या मुसलमान कुटुंबाची ही सुंदर कथा. कव्वाली गायन आणि संगीत होतं अझीझ अहम्मद खान वारसी यांचं, तर शायर आहेत कैफ़ी आज़मी:
जितनी बलाएं आई, सबको गले लगाया
खूं हो गया कलेजा शिकवा ना लब पे आया
हर दर्द हमने अपना अपने से भी छुपाया
तुमसे नहीं है कोई पर्दा सलीम चिश्ती
मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती
अझीझ अहम्मद खान वारसी यांचे दोन नातू 'वारसी ब्रदर्स' यांनी गायलेली हीच कव्वाली इथे ऐकायला मिळेल.
पुढे सरकूया १९७६ च्या दो खिलाडी या चित्रपटातील कव्वाल जानी बाबू यांनी गायलेल्या, गौहर कानपूरी यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार उषा खन्ना यांनी संगीतसाजाने सजवलेल्या 'रात अभी बाकी है, बात अभी बाकी है' या कव्वालीने.
चित्रपटातील या कव्वालीचा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल.
यानंतरची कव्वाली आहे १९७७ साली आलेल्या आणि तुफान गाजलेल्या हम किसीसे कम नही या चित्रपटातली. है अगर दुष्मन जमाना गम नही. (ही कव्वाली तिसर्या भागाच्या प्रतिसादात 'प्रभो' यांनी दिली होती, पण ती या कालखंडातली आहे म्हणून इथे परत देतो आहे.) ऋषीकपूर आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेली ही कव्वाली लिहिली होती मजरूह सुलतानपुरी यांनी, गायलीय महंमद रफी आणि आशा भोसले यांनी संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
याच वर्षी (१९७७) आला आणखी एक मल्टी-स्टार चित्रपट, 'अमर, अकबर, अँथनी'. पुन्हा एकदा ऋषी कपूर (या वेळी नीतू सिंग बरोबर), गायक कलाकार पुन्हा रफी आणि आशा, गीतकार होते आनंद बक्षी, आणि संगीत होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं.
याच चित्रपटातील ''शिर्डी वाले साई बाबा' ही कव्वाली देखील खुप गाजली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रफी
१९७७ सालीच वरील दोन प्रसिद्ध चित्रपटांच्या महापुरात वाहून गेलेला एक चित्रपट होता 'चरणदास'. पाहुणे कलाकार अमिताभ आणि धर्मेन्द्र यांनी सादर केलेली 'देख लो इष्क़ का मर्तबा देख़ लो' ही कव्वाली मात्र खूप गाजली. अमिताभ साठी आवाज दिला होता येसूदास यांनी तर धर्मेन्द्रासाठी पार्श्वगायन होतं अझीझ नाझायांचं. गीतकार राजेन्द्र कृष्ण आणि संगीतकार राजेश रोशन
मग १९७८ साली आला श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला शशी कपूर चा 'जूनून' हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो तोच मुळी या कव्वाली पासून.
तन मेरा मन पियु का, दोनों हो गए इक रंग
लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल
लाली देखन मै चली तो मै भी हो गयी लाल..........
मूळ अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या या कव्वालीचे इथे गायक आहेत जमील अहम्मद, आणि संगीत आहे वनराज भाटिया यांचं.
आज रंग है, मेरे मेहेबुब के घर रंग है
सुरुवातीचं निवेदन करणारा आवाज कुणाचा आहे ते तुम्ही ओळखालच!
१९८० साली आला 'द बर्निंग ट्रेन'. जीतेन्द्र, नीतू सिंग, आशा सचदेव आणि राजेन्द्र नाथ यांच्या वर चित्रीत असलेली 'पल दो पल का साथ हमारा' ही कव्वाली भरपूर गाजली. गायली होती रफी आणि आशा भोसले यांनी. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार राहुल देव बर्मन.
नंतर १९८२ मध्ये आला दीदार-ए-यार, या चित्रपटात ऋषी कपूर आणि जीतेंद्र बरोबर होत्या टिना मुनीम आणि रीना रॉय.
'गुरूर-ए-हुस्न के सदके मुहब्बत यूं नही करते'
आशा भोसले आणि महंमद रफी यांनी गायलेल्या या कव्वालीचे संगीतकार होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल.
१९९७ साली आला 'और प्यार हो गया' हा चित्रपट. नुसरत फतेह अली खान यांनी स्वतः संगीत दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट (आणि त्यांच्या हयातीतला शेवटचा! याच वर्षी त्यांचं निधन झालं.) 'कोई जाने, कोई ना जाने' ही कव्वाली चित्रपटात त्यांच्यावरच चित्रीत आहे. सोबतीला आवाज होते आशा भोसले आणि उदित नारायण यांचे. या चित्रपटातील कलाकार होते ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल.
१९९९ साली 'कच्चे धागे' या सैफ अली खान, अजय देवगण, नम्रता शिरोडकर आणि मनीषा कोईराला यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटातील 'इस शाने करम का क्या कहेना' कव्वालीला पार्श्वगायन आणि संगीत दिग्दर्शन होतं नुसरत फतेह अलींचं, या दोन्ही कामगिर्या असलेला हा त्यांच्या निधनानंतर आलेला पहिला चित्रपट.
नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला तिसरा चित्रपट याच वर्षी आला, १९९९ चा सनी देओल, बॉबी देओल, सुष्मिता मुखर्जी आणि उर्मिला मातोंडकर यांनी अभिनीत केलेला 'दिल्लगी'. कव्वाली होती 'साया भी साथ जब छोड जाये, ऐसी है तनहाई', संगीत शंकर-एहसान-लॉय किंवा जतीन ललित यांचं असावं (या चित्रपटाला चक्क ५ संगीतकार होते!)
शतक संपता संपता २००० साली आला 'धडकन'. नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला हा अखेरचा चित्रपट. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है' ही बर्यापैकी गाजलेली कव्वाली संगीतबद्द केली होती जतीन-ललित यांनी तर लिहिली होती 'समीर' यांनी.
२००० सालीच आला हृतिक रोशन, करिश्मा कपूर आणि जया भादुरी यांचा ''फिजा'.
कादर ग़ुलाम मुश्ताफा, मुर्तजा ग़ुलाम मुश्ताफा, श्रीनिवास यांनी गायलेली 'पिया हाजी अली' ही कव्वाली संगीतबद्द केली होती ए आर रहेमान यांनी, तर शब्द होते शौकत अली यांचे.
२००२ साली आला चित्रपट 'ये दिल है आशिकाना'. अरुण बक्षी आणि जीविधा या नवोदित कलाकारांना घेउन काढलेला, चित्रपट चालल्याचं आठवत नाही, त्यामुळे एक चांगली कव्वालीही दुर्लक्षित राहिली. यातील 'अल्ला अल्ला तारीफ तेरी अल्ला अल्ला' या साब्री ब्रदर्स नी गायलेल्या कव्वालीचे शब्द होते तौसिफ अख्तर यांचे अणि संगीत होतं नदीम-श्रवण यांचं.
२००३ साली आलेल्या 'हजारों ख्वाइशे ऐसी' या चित्रपटात होती 'मन ये बावरा, तुझ बिन माने ना' ही लयबद्द कव्वाली. अतिशय 'intense' अशा या चित्रपटातील कलाकार होते के. के. मेनन आणि चित्रांगदा सिंग, कव्वाली गायक होते स्वानंद किरकिरे आणि अजय धिंग्रन, गीतकार पुष्पा पटेल आणि संगीतकार शंतनु मोइत्र.
हा २००४ पर्यंतच्या भारतात गाजलेल्या कव्वालींचा उण्या-पुऱ्या पन्नास वर्षांचा प्रवास इथे संपवतोय तो 'मै हुं ना' या शाहरुख खान-सुष्मिता सेन, ज़ायेद खान- अमृता राव अभिनीत चित्रपटातील 'तुम से मिल के दिल का है जो हाल क्या कहें' या कव्वालीने, गायक कलाकार होते सोनू निगम बरोबर आफताब आणि हाशिम हें साब्री बंधू, गीतकार जावेद अख्तर आणि संगीत होतं अन्नू मलिक यांचं.
तर या पन्नास वर्षांमधल्या प्रवासात कव्वालीत काय स्थित्यंतरं घडली?
निदान भारतात तरी, 'मेहेफिल-ए-समा' या कव्वाल आणि श्रोते यांच्यामधील थेट आदान-प्रदान होण्याच्या प्रकारापासून दूर सरकून कव्वाली चित्रपटांमध्ये जाऊन 'प्रेक्षणीय' आधिक झाली. याचा परिणाम थोडासा असा झाला की आधी कव्वालांना श्रोत्यांची दाद मिळण्याचं जे instant gratification होतं, त्याची जागा घेतली कव्वालीमुळे आधिक प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या यशाने.
दुसरा परिणाम असा झाला की चित्रपट हे माध्यम हिंदी समजणार्या प्रेक्षकांचं आधिक असल्याने उर्दू शब्दांची पखरण कमी होऊन कव्वालीचं 'हिंदी-करण' झालं (उदाहरणः शिर्डी वाले साई बाबा). यात बिघडलं काही नाही, पण नजाकत नक्कीच कमी झाली.
तिसरी गोष्ट, चित्रपटांत येऊन कव्वाल्या 'सुंदर आणि दिलखेचक' दिसणं आणि 'धुंद' करणारा ठेका असणं यांकडे आधिक भर असल्याने, कव्वाल्यांमधील शब्दांना दुय्यम महत्व आलं
१९८० च्या दशकानंतर एक आणखी सहज जाणवणारं स्थित्यंतर म्हणजे कव्वाली धर्माविषयी कमी आणि प्रियकर-प्रेयसी यांच्या भावनांविषयी आधिक बोलू लागली.
आणि शेवटचा मला तरी जाणवणारा (आता यात माझं सध्याच्या चित्रपटांविषयीचं अज्ञान असण्याचा ऩक्कीच संभव आहे) मुद्दा असा, की २००५ पासून आजतागायत मला चित्रपटांमध्ये (दमदार, लक्षणीय सोडाच) एकही कव्वाली आढळलेली नाही. (I sincerely hope I am wrong here, and if you know of them, do please update and add links to good qawwalis since 2005.)
हे सर्व जरी असलं, तरीही एक सत्य शिल्लक राहतंच: सुफी परंपरेतून कव्वाली जन्माला आली, आणि सहिष्णुता (इथे मला 'inclusive non-discrimination' हा अर्थ अभिप्रेत आहे, त्यावरून वाद नकोत) हा जिचा पाया आहे अशा सुफी परंपरेने कव्वालीच्या माध्यमातून हिंदू कीर्तन, अरेबियन आणि पर्शियन उक्ते या सर्वांना सामावून घेत वाटचाल केली, संगीत हे अखेर एकतेची आणि दिव्यत्वाची जाणीव करून देण्यासाठी असतं हा या प्रवासाचा पाया होता. कव्वालीने काळाबरोबर बदलावं, आणि कपडे, रंग, भाषा, नव-नवीन वाद्यं यांना अंगीकारून पुढे सरकावं, असा लवचिकपणा (flexibility) ठेवला. प्रत्येक बदलाबरोबर नव्या पीढीला सामावून घेत पुढे सरकत राहण्याची जिद्द ठेवली. असा हा सुंदर, उत्कट गायनप्रकार बदलत्या जगरहाटीत मागे पडून विस्मृतीत जाऊ नये. सर्वांनी गुण्या-गोविंदाने एकत्र, एकमेकांना सांभाळून रहावं अशी आजची आत्यंतिक गरज आहे, कव्वाली त्यात महत्वाचा सहभाग घेऊ शकेल, म्हणून पूर्वी-इतक्याच दमदार कव्वाल्या जन्माला येत रहाव्यात असं मनापासून वाटतं.
पुन्हा एकदा, सर्व वाचकांच्या सहभागाबद्दल, प्रतिसादांबद्दल आणि व्यक्तिगत निरोपांमधून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 4:19 am | पुष्करिणी
मस्त , खूप छान झालाय हाही भाग !
मंगल पांडे मधे ही एक कवाली आहे
7 Aug 2010 - 5:36 am | बहुगुणी
धन्यवाद, पुष्करिणी!
लेख वाचतांना एकाच स्क्रीन मध्ये सर्व व्हिडीओज् पहाता यावेत म्हणून तुम्ही आणि मेघवेडा यांनी दिलेल्या दुव्यांवरच्या कव्वाल्या इथेच embed करतो आहे, त्यांची आठवण करून देण्याचं श्रेय अर्थातच तुम्हा दोघांचं.
शब्द जावेद अख्तर यांचे, संगीत ए आर रहेमान, आणि गायक कलाकार स्वतः ए आर रहेमान, कैलाश खेर, मुर्तझा खान आणि कादिर.
चित्रपटातील कलाकारः अमीर खान, राणी मुखर्जी आणि अमिशा पटेल.
"
7 Aug 2010 - 3:56 am | मेघवेडा
मस्तच! आधुनिक काळातील एक प्रसिद्ध 'टेकनो कव्वाली' उरली बहुगुणीजी.. :)
7 Aug 2010 - 4:08 am | बहुगुणी
अभिषेक, अमिताभ आणि राणी मुखर्जी, कव्वाली साठी स्पेशल अॅपीअरन्स ऐश्वर्या राय.
गीतकार गुलझार (या 'कलाकारा'विषयी कितीही लिहिलं तरी कमीच!), संगीतकार शंकर-एहसान-लॉय
गायक/गायिका: आलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली
कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना
7 Aug 2010 - 4:15 am | गणपा
बहुगुणी मस्त आढावा घेतलाय चित्रपट कव्वालींचा.
अस सगळ एका धाग्यात बांधल्यावर कव्वालीत होत गेलेला बदल नक्कीच जाणवला.
मालिका आवडली. हे शेवटच पुष्प होत का या मालिकेतल?
7 Aug 2010 - 5:24 am | बहुगुणी
..शीर्षकातील चूक नंतर लक्षात आली, पण मला दुरूस्त करता येत नसल्याने संपादकांना विनंती केली आहे.
7 Aug 2010 - 5:58 am | आमोद शिंदे
फारच छान! तुमची ओघवती शैली आणि तंत्रज्ञानाची कमाल (ज्यामूळे लगेच ती कव्वाली ऐकायला मिळणे) दोन्ही ए-वन!! संपूर्ण लेखमाला आवडली.
7 Aug 2010 - 4:33 pm | गणपा
जयभिम शिंसे साहेब,
चक्क कौतुक करणारा प्रतिसाद :)
7 Aug 2010 - 6:08 am | सुनील
लेखमाला आवडली. विशेषत: शेवटी घेतलेला स्थित्यंतराचा आढावा छानच. शिवाय, एक कव्वालींचा चांगला संग्रहदेखिल जमला!
7 Aug 2010 - 6:56 am | सहज
अगदी हेच म्हणतो.
'दिल्ली ६' सिनेमातील एक अप्रतीम सुफी संगीत गीत द्यायचा मोह होत आहे. कव्वाली म्हणायची की नाही कळत नाही. पण गाणे अतिशय आवडले. ह्या गाण्याचा उल्लेख आधी झाला असल्यास क्षमस्व.
7 Aug 2010 - 6:39 am | धनंजय
आवडली.
7 Aug 2010 - 7:41 am | दिपोटी
बहुगुणीजी, अभिनंदन !
उत्तम मालिका ! बहोत खूब !
आता इतके सुंदर संकलन केल्यानंतर हा धागा 'वाचनखूण' म्हणून साठवावा कसा तेही कृपया सांगा ... मिपाच्या नवीन आकर्षक मांडणीमध्ये 'वाचनखूण साठवा' कोठे आहे हे मात्र सापडत नाही आहे.
- दिपोटी
7 Aug 2010 - 8:01 am | बहुगुणी
...दिपोटी साहेब.
हाच वाचनखुणांचा प्रश्न मला याआधी एका सद्स्याने विचारला होता, म्हणून त्यांना दिलेलंच low-tech उत्तर इथे देतो आहे.
इथे मिपा वर वाचनखूणेची सोय येईपर्यंत तुमच्या पी सी वर हा प्रश्न तात्पुरता असा सोडवता येईल (अर्थात्, मिपा दुसर्या पी सी वर उघडलं तर याचा उपयोग नाही, त्यासाठी मी शेवटी* दिलेला मार्ग आपण वापरू शकाल) -
फायरफॉक्स मध्ये Bookmarks--> Organize Bookmarks--> Bookmark toolbar-->New Folder
आणि मग 'मिपा' वगैरे नावाचं फोल्डर तयार करा. जेंव्हा एखादा धागा आवडेल तेंव्हा त्या पानावर
Ctrl+D --> 'Page Bookmarked" अशा नावाची Dialog box उघडेल, त्यात "Folder" या ऑप्शन च्या ड्रॉप-डाऊन मेन्यू मध्ये तळाशी 'Choose' असं दिसेल, त्यावर क्लिक केलंत की तुमचं "मिपा" फोल्डर दिसेल, ते सिलेक्ट करा. "Done" वर क्लिक करा.
एकदा हे केलंत की पुढच्या वेळी जेंव्हा Ctrl+D प्रेस कराल तेंव्हा हे 'डीफॉल्ट फोल्डर' म्हणून आपोआप उघडेल, good luck!
* तुमचा पी सी सोडून इतर पी सी वर इथल्या लेखांच्या वाचनखुणा हव्या असतील तर तुमच्या जी मेल वगैरे अकाऊंट मध्ये 'ड्राफ्ट' स्वरूपात मध्ये हे दुवे जमवून ठेवा. जेंव्हा हवं तेंव्हा या ड्राफ्ट मधून तुम्हाला हे दुवे दुसर्या पी सी वरून इंटरनेट वर जाऊन उघडता येतील.
हा सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा वाचनखुणेचीच सोय पुनर्प्रस्थापित झाली तर फारच छान.
7 Aug 2010 - 8:04 am | प्रभो
मस्त लेखमालिका, पण ती संपणार म्हणून मन खट्टू झाले... :)
7 Aug 2010 - 8:55 am | मदनबाण
अप्रतिम... :)
इथे एक गाणं द्याव वाटत आहे,नक्की माहित नाही की हे कव्वाली मधे बसेल की नाही ते...
7 Aug 2010 - 9:21 am | बहुगुणी
ठेक्यावरून आणि कोरस वरून वाटतं, पण साथीला टाळ्या नाहीत म्हणून कव्वाली वाटली नाही, म्हणून दिली नाही,
पण असेलही. प्रदीपजी/डॉ. दाढे/नंदन वगैरे मंडळी सांगू शकतील.
२००७, चित्रपट अन्वर, (सिद्धार्थ कोईराला, नौहीद सायरूसी)
गायकः रूपकुमार राठोड
शब्दः सईद कादरी
संगीत: मिथून शर्मा
7 Aug 2010 - 10:21 am | विकास
मस्त लेखमालीका! मी आत्ता वाचत असल्याने अजून एक आठवलेले गाणे लिहीत आहे. इतरत्र आधीच आले असल्यास आणि माझे लक्षात येयचे राहीले असल्यास क्षमस्व!
7 Aug 2010 - 10:23 am | आवडाबाई
ख्वाजा मेरे ख्वाजा - ही कव्वालीच आहे का ? आणि सरफरोश मधील जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारों ?
एक शंका - सलाम्-ए-इष्क नक्की सुद्धा कव्वाली ? ते कसे ?
आपण लिहिल्याप्रमाणे गज़ल पण कव्वालीचाच प्रकार आहे, त्यामुळे गज़ल बर्याच सापडतील हिंदी चित्रपटांतून
7 Aug 2010 - 4:38 pm | गणपा
>>एक शंका - सलाम्-ए-इष्क नक्की सुद्धा कव्वाली ? ते कसे ?
हंम्म शंका रास्त वाटतेय, कव्वाली पेक्षा मुजराच जास्त वाटतोय.
7 Aug 2010 - 5:36 pm | बहुगुणी
विकासः परी हो आसमानी तुम, पल दो पल का साथ; आणि
आवडाबाई: ख्वाजा मेरे ख्वाजा,
या कव्वाल्या भाग ३ व ४ मध्ये दिल्या होत्या, पुनर्स्मरणाबद्दल आभार.
आवडाबाई व गणपा: Upon review, टाळ्या व कोरस हे महत्वाचे elements नसल्याने 'सलाम-ए-इष्क' ही कव्वाली नाही, मुजरा आहे, असं आता वाटतं, चोखंदळपणे चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! [त्याच निकषावर (टाळ्या नाहीत) सरफरोश मधील 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारों' हे मी समाविष्ट केलं नाही. (अनाहूतपणे झालेल्या double standard विषयी दिलगीर आहे.) अशी 'बॉर्डर लाईन' वरची गाणी आली की गोंधळ उडतो, उदाहरणार्थ, लैला मजनू मधील 'तेरे दीवाने की ज़िद है' या गाण्यात टाळ्या, ढोलक, सारंगी हे सर्व आहे म्हणून मला ती कव्वाली वाटली, पण त्यात कोरस नाही, म्हणून ती कव्वाली नसावी असं इथले संगीतज्ञ प्रदीप यांनी लक्षात आणून दिलं.]
लेखातील 'सलाम-ए-इष्क' चा भाग मला स्वतःला काढता येत नसल्याने संपादकांना या दुरूस्तीची विनंती करतो आहे.
7 Aug 2010 - 5:42 pm | पुष्करिणी
देवदास ( शहारूख्-ऐश्वर्या ) मधलं 'मार डाला' ही कवाली म्हणायची की मुजरा ?
7 Aug 2010 - 6:09 pm | बहुगुणी
मुजरा-कव्वाली यांच्या सीमारेषेवरचं आणखी एक गाणं! डोळे मिटून फक्त ऑडिओ ऐकला तर तबला, सारंगी, ढोलक, टाळ्या, कोरस, सरगम, हे सर्व काही आहे, पण दृश्य स्वरूपात यांपैकी सारंगी, ढोलक, टाळ्या हे दिसत नाही, आणि हा मुजरा असावंसं वाटतं... शरत्चंद्र चट्टोपाद्याय यांची देबदास ही कादंबरी १९१७ सालातली, त्याकाळी बंगालमध्ये कव्वाली होती की नाही? इतरत्र भारतात ती नक्कीच पोहोचली होती, पण कादंबरीची पार्श्वभूमी पहाता हा मुजरा असण्याची शक्यता आधिक आहे. तेंव्हा judgment call म्हणून मी या गीताला मुजरा म्हणेन. चुक भूल क्षमस्व.
But I think this just proves the point: कव्वाली या गायनप्रकाराने कालौघात जसं बरंच काही स्वीकारलं (उदाहरणार्थ, भाषा, कपडे, ताल, विषय, यांतील बदल, आणि इतर गायनप्रकारांमधील आलाप, रागदारी, आधुनिक वाद्ये), तसंच बरंच काही दिलंही इतर संगीताला. 'मार डाला' हे "देवदास" मधील गाणं किंवा 'सलाम-ए-इष्क' हे "मुकद्दर का सिकंदर" मधील गाणं ही या प्रभावाचीच लक्षणं आहेत असं मी म्हणेन.
8 Aug 2010 - 12:43 am | मस्त कलंदर
पुन्हा एकदा छान छान कव्वालींची उजळणी झाली... प्रतिसाद वाचता वाचताच पुढच्या भागाची थीम सुचली, हिंदी चित्रपटातल्या गझला. अर्थातच बहुगुणी, प्रदीप नाहीतर दाढेंसाठी. मी वाचक म्हणून भर घालेन. :)
8 Aug 2010 - 1:13 am | पुष्करिणी
+१ , मकं ला अनुमोदन, दर्दी लोकांनी गझल वरच्या लेखमालेचं मनावर घ्यावं