शोनार बांगला...! भाग ७ – राजशाही बांगलादेश

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
25 Sep 2024 - 2:15 am

Temple

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश

राजशाही विभाग म्हणजे बंगालचे हृदय. प्राचीन काळचा हा पुंड्र देश. राजधानी पुंड्रवर्धन करतोया नदीच्या काठी, गंगा-ब्रह्मपुत्र यांच्या मध्ये. हे बंगालमधील सर्वात प्राचीन महानगर. आजही त्याचे अवशेष जिथे विखुरलेले आहेत ते "महास्थान" म्हणून ओळखले जाते. नंतर महाजनपदांच्या काळात अंग राज्य अधिक प्रभावशाली बनले तरी पुंड्र जनपद व हे महानगर आपले महत्व टिकवून होते. पुढे पाल व सेन हे पराक्रमी राज्यकर्ते बंगालच्याहि बाहेर गंगेच्या खोऱ्यामध्ये आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले, त्यांचीही बहुतांश राजधान्या वा सत्ताकेंद्रे याच भागात होती. सोमपूर व जगद्दल सारख्या भव्य विद्यापीठांची ही भूमी. सत्ताकेंद्र तसेच ज्ञानकेंद्र असलेल्या या प्रदेशाचे आणखी एक नाव म्हणजे वरेंद्र (बांगला अपभ्रंश - बारिन्द) त्यात उत्तरेतील रंगपूर विभागाचाही समावेश करतात. बौद्ध तत्वज्ञानाचा येथे विकास तसेच प्रचार झाला. बंगालच्या दारुण अवस्थेचे एक कारण अतिरेकी बौद्धमत प्रसार हेही सांगितले जाते. गांधार व सुदूर पश्चिम तथा बंगाल व सुदूर पूर्व या दोन्ही ठिकाणी सारखीच परिस्थिती असावी. १२०४ मध्ये बख्तियार खिलजीच्या आक्रमणात बंगालचा पाडाव झाला नालंदा ओदंतपुरी सहित बंगालच्या सर्व विद्यापीठांचा नायनाट या राक्षसाने केला. तेव्हापासून राजा गणेशाचा अपवाद वगळता बंगालने हिंदू राजा पहिला नाही. आश्चर्य म्हणजे यानंतर महाराष्ट्रात परचक्र येण्यास तब्बल नव्वद वर्षांचा कालावधी गेला परंतु या इतरत्र झालेल्या आक्रमणाचे कोणत्याही प्रकारचे संदर्भ ज्ञानेश्वरी किंवा तत्सम समकालीन वाङ्मयात आढळत नाहीत. प्रारंभी काही दशके संपन्न बंगालची लूट करण्यात गेली परंतु नंतर बंगालमध्ये स्वतंत्र सुलतानी राज्य स्थापिले गेले. यातच एका हिंदू राजाने योग्य संधी साधून आपली सत्ता स्थापन केली त्या गणेश किंवा दनुजमर्दन राजाचा १४१४ चा अपवाद वगळता बंगाल मध्ये इस्लामची सत्ता बहुतांशाने कायम आहे. या सर्व सुलतानांची राजधानी ‘पंडुआ’ आताच्या भारताच्या हद्दीत पण याच प्रदेशात.

पुढे मुघलांनी राज्य खालसा करून हा प्रदेश सुभा म्हणून जोडून घेतला व पुढे आसाम जिंकण्याचेही अयशस्वी प्रयत्न केले. परंतु मराठ्यांच्या उदयामुळे मुघलांची सर्व शक्ती दक्षिणेत एकवटली व कालांतराने निष्प्रभ होत लोप पावली. मराठ्यांच्या फौजा बंगालच्या उंबरठ्यापर्यंत आल्या परंतु बंगालचे दुर्दैव, ओडिशा स्वतंत्र झाले परंतु मराठी सत्ता येथे बंगालमध्ये मूळ धरण्याआधीच मराठेशाहीचा दुर्दैवी अंत झाला. प्राचीन काळाच्या वैभवाची साक्ष देत आजही येथे काही प्राचीन मंदिरे तेवढी शिल्लक आहेत. सोमपूर महाविहाराला आता जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. दगडांच्या अभावाने येथील मंदिरे विटांनी बांधलेली असल्याने इस्लामी वरवंट्याखाली इतकी शतके उलटल्यानंतर आता फारच कमी प्रमाणात काही शिल्लक राहिलेले आहे. पुढे बंगालचे हस्तांतरण पलाशीच्या लढाईत (पळसाच्या झाडावरून नाव, आपल्याला प्लासी शिकविले जाते) ब्रिटिशांकडे झाले. त्यांनीही याच प्रदेशातून सत्ता व संपत्तीची भूक भागवली. या प्रदीर्घ पारतंत्र्यात इस्लामचे सबलीकरण या राजशाही भागात झाले. पुढे फाळणीच्या वेळी निर्विवादपणे हा सर्व भाग पाकिस्तानात जाणार हे माहितीच झालेले होते परंतु गंगेचे विभाजन टाळण्यासाठी दिनाजपूर चा काही भाग व मालदा हे दोन्ही भारताला देण्यात आले व बदल्यात खुलन्यावरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे हिंदुबहुल असूनही खुलना सुंदरबनसहित पूर्व पाकिस्तानात समाविष्ट झाले.

map
संदर्भ नकाशा
.

सिल्हेटहून रात्रभराच्या प्रवासाची बोगुरा ला जाणारी बस पकडली. आता बंगालमधील संचार सवयीचा झालेला होता. हाही रस्ता ढाक्यामार्गेच, त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा चुकविण्यासाठी रात्रीचाच प्रवास उत्तम. पहाटेस विस्तृत असा ब्रह्मपुत्र ओलांडला. प्रथम गंतव्य भवानीपूर हे महामार्गापासून थोडे आत आहे. त्यासाठी शेरपूरला बसमधून उतरलो. पहाटेचे ५ वाजले होते. बरीच थंडी धुके यामुळे बाहेर अगदी शब्दशः काळे कुत्रे देखील नव्हते. तसे या चौरस्त्यापासून सुद्धा ११ किलोमीटर म्हणजे चालत जाण्यासारखे नाहीच खरे तर, पण चालायला सुरुवात केली. काही वेळाने एक सायकल रिक्षा आली व पुढचा मार्ग गारव्यात कुडकुडत पार पडला. भवानीपूर हे अगदी लहानसे खेडे. मंदिर लगेचच सापडले. महाद्वार छान रंगरंगोटी केलेले सुशोभित व तुलनेत भव्य. गावात अजून जाग येत होती. एक दोन महिला झाडलोट सडा सारवण करत होत्या. त्यांनी मंदिरात खबर देऊन दार उघडले. मंदिर प्रांगण आतापर्यंत पाहिलेल्यात सर्वात प्रशस्त. एक मोठा पत्र्याचा मंडप व सभोवताली ८-१० लहान मोठी मंदिरे. प्रांगणात एक फेरफटका मारला. एका बाजूस आधीच्या ठिकाणी दिसलेल्याप्रमाणे प्राचीन बांधकामाचे भग्नावशेष. एका भागात जुनी इमारत जाळली असल्याच्याही सुस्पष्ट खुणा. वातावरणात अजूनही हलक्या धुक्याचा कुंद सुगंध. बाहेरच्या बाजूस कोपऱ्यात प्रसाधन व्यवस्था होती व बाहेर नळावर मुखप्रक्षालनादि उरकले. तेवढ्यात ठाकूर दिसले. त्यांना स्नानाविषयी विचारले. तळ्यावर जा म्हणाले. मागील बाजूसच मोठे कुंड होते, शंख तीर्थ नाव. एक आकडी तापमान असल्याने उघड्यावर अंघोळ जरा दिव्यच होते पण केल्यावर मात्र छान आतून उब निर्माण झाली. हरिद्वारच्या गंगा स्नानासारखी.
तोवर मंदिरात बाकी लगबग सुरु झालेली होती. पहाटेची पूजा साग्रसंगीत ज्याला म्हणतात तशी ताशा सदृश वाद्याच्या गजरात पूर्ण झाली. अजूनही धुके रेंगाळत होते त्यात एखाद्या पुराना मंदिर वगैरे चित्रपटात शोभावेत असे काही फोटो व्हिडीओ घेणे झाले. (मंदिर व्हिडीओ: https://youtube.com/shorts/sAeFwnM4avo?feature=shared). पक्ष्यांची किलबिल सुरु झालेली होती त्यातच एक वेगळा आवाज आला बऱ्याच वर्षांनी ऐकत असल्याने ओळखायला दोन क्षण लागले. आवाजाच्या दिशेने शोध घेतल्यावर गरुडाचे जोडपे मुख्य मंदिरावर सावली धरणाऱ्या वृक्षावरच विसावले होते. अगदी टोकावर घरटेही होते. हे नक्कीच एका उत्तम निसर्ग संवर्धनाचे लक्षण होय. मंदिर परिसरातील वनराई त्यांना आवश्यक ते सुरक्षेचे कवच प्रदान करत असावी. तसेही त्यांचे नेहमीचे कडेकपारींचे ठिकाण सखल बंगालमध्ये मिळणे अशक्यच. नंतर सकाळच्या मंगल वातावरणात पठण पूजनादि संपन्न झाले. देवीचे नाव अपर्णा. ५० शक्तिपीठांमधील वाम कर्ण पीठ. वामन भैरव. देवीची पूजा शिलास्वरूपात असली तरी इथे त्यावर मुखवटा लावलेला आहे त्यामुळे दर्शन सगुण सायुध सालंकृत आहे. पुराणांतर्गत तसेच मध्ययुगीन साहित्यात करतोयातट वा पुंड्रवर्धन असे या स्थानाचे दोन्ही उल्लेख आढळतात. येथेही ठाकुरांनी भोजन प्रसाद ग्रहण करूनच जाण्याचा आग्रह केला. अन्य स्थानांप्रमाणेच भात भाजी वरण व वांग्याचे एक भजे व घट्ट खीर. साधे परंतु दिव्य चविष्ट!

TempleTempleTemple
अपर्णा देवी व परिसरतील मंदिरे
.

पुरातत्वीय महत्वाच्या जागांवर गंजलेल्या पाट्यांव्यतिरीक्त फारशी काही सुविधा नाही. महास्थानगडला एक संग्रहालय आहे परंतु बरेच महत्वाचे अवशेष चोरापोरीच गेलेले दिसते. जुन्या महानगराची अवाढव्य सरंक्षक भिंत आजही चकित करते. सोमपूरला जरा बारी देखभाल आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली बऱ्याच विटा जोडून जिथे तिथे विद्रुपीकरण करण्यात आलेले आहे, तेथील समाजाला या सर्वांची काडीचीही किंमत नसल्याने कोणीही तेथे कसेही अनिर्बंध वावरते. असो, पुढे आता ढाक्याकडे प्रयाण. आधुनिक सत्ताकेंद्र, औद्योगिक केंद्र तसेच इस्लामी बंगालचे वैचारिक केंद्र देखील. तिथून हि अखंड बंगालची यात्रा समाप्त होईल.

Somapur
सोमपुर महाविहार
.

भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश

प्रतिक्रिया

हा भागही आवडला, अनवट लेखमाला.

श्वेता२४'s picture

26 Sep 2024 - 3:24 pm | श्वेता२४

प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याने खूपच माहितीपूर्ण लेखमाला झाली आहे. याला काही पर्यटन म्हणता येणार नाही. तिर्थयात्राच म्हणावे लागेल. फोटो मस्त.

अत्यंत महत्वाचा दस्तऐवज तयार होत आहे.
आता सत्ता पालट झाल्यावर काय स्थिती असेल देव जाणे.
शक्ती पिठ असलेले मंदिर , अजिबात गर्दी नाही आणि भारतातल्या एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द गावातल्या मंदिरापेक्षा साधे मंदिर बघून काय वाटतेय ते शब्दात नीट मांडता येत नाही.
केव्हातरी 51 शक्तीपीठ दर्शन व्हावे अशी इच्छा मनात आली होती.
तेव्हा ही शक्तीपीठ सगळी भारतात आहे असा गैरसमज होता.
उत्तम लिहिताय.

खुप नवीन माहिती मिळाली.

बंगालची लोक तर मराठयाना लूट्मार करणारे म्हनतात.

किल्लेदार's picture

5 Oct 2024 - 3:42 am | किल्लेदार

छान...