शोनार बांगला...! अखंड बंगालची अविस्मरणीय यात्रा

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
13 Aug 2024 - 10:14 pm

Bridge

भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ - चितगाव, बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश

भाग १ - कालीक्षेत्र कलकाता

बंगाल! भारताचा सर्वात समृद्ध प्रांत! गंगेची सहस्र रूपे स्वतःच्या हाताने इथे शिंपण करतात. सुजला-सुफला-अमला-अतुला हि मातृभूमीची सर्व विशेषणे खरे तर कवीला बंगभूमीकडे पाहतच स्फुरलेली. प्राचीन काळापासून सुपीकतेचा वरदहस्त असल्याने विविध कला-विद्या इथे भरभराटीस आल्या. चहूबाजूंनी किरात राष्ट्रांनी वेढलेला असल्याने बंगाल प्रांताची विशेष अशी एक ओळख अवरुद्ध प्रकारे एकांतात विकसित होत गेली कि अन्य राष्ट्रांना अजूनही त्यात काही 'गौडबंगाल' वाटावे... परचक्राच्या काळात भारतावरील अधिपत्यासाठी बंगालमधील सत्तांतर निर्णायक ठरलेले दिसते. बंगाल जिंकल्यावर मुघल स्थिरावले, ब्रिटिश निर्ढावले, कारण अफाट संपत्ती व सुबत्ता एकहाती ताब्यात येत असे. अशा संपन्नतेमुळे 'सोनार बांगला' हे सार्थ अभिधान! पृथ्वीमातेचे वरदान त्यात गंगामातेचे सिंचन आणि वाग्देवीचा आशीर्वाद अशा प्रदेशात शक्तिपूजा लोकप्रिय नसावी तरच नवल!

बंगाल नावाविषयी थोडे, महाभारतातील एका कथेनुसार गिरिव्रजेतील (राजगिर-मगध) एका ऋषींच्या वरदानामुळे जन्माला आलेल्या सहा राजपुत्रांना वाटून दिलेली राज्ये पुढे त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाली. त्यातील ओड्र-कलिंग म्हणजे आजचे ओरिसा. तर सुम्ह, वंग, पुंड्र म्हणजे अखंड-बंगाल तर अंग म्हणजे झारखंड चा काही भाग, अशी हि सहा. यातील वंग चा पुढे मागधी प्राकृतातून अपभ्रंश बंग झाला, व त्याचेच बंगाल. पुढे गौड, राढ, समतट, गंगारिध्दी अशी स्थानिक राज्येही आली आणि गेली. बंग नाव तेवढे दीर्घ टिकले.

मध्ययुगीन काळात येथील पाल व सेन राजांनी मोठा पराक्रम उत्तरेत गाजवला व आपली सुसंपन्न राज्ये राखली. परंतु दृष्ट लागावी तसे म्लेंच्छसंसर्गाचे ग्रहण या सुप्रदेशाला लागले ते आजतागायत काही सुटले नाही. रक्ताचे पाट वाहिले, अब्रूची लक्तरे झाली आणि देशाची शकले विखुरली. एका सुंदर स्वप्नाची शोकांतिका... अजूनही भळभळणारी जखम...

बंगालची पहिलीच गळाभेट. रुक्ष ठेठ मराठ्याला या प्रांताची गोडी पचवायला चांगलेच कष्ट पडणार हे कळायला लागले ते बंगालीचा अभ्यास सुरु झाल्यावर. मराठीशी खूप साम्य आहे अशी तोंडओळख एका मैत्रिणीने करून दिलेली परंतु ते फारच वरवर. दारुण-सुंदर, भीषण-मधुर हि कौतुकाची विशेषणे आहेत हे नव्याने समजून घेणे होते. लिपी अजून कठीण पण वाचण्यापुरती यायला लागली. काही मध्ययुगीन बंगाली संदर्भ ग्रंथांचा अभ्यासही सुरु होताच तो सुलभ झाला. रवींद्रसंगीताचा खजिना खुला झाला आणि आधुनिक स्वरूपातील 'लो-फि' ट्यून्स इंस्टाग्रामवर साथ द्यायला लागल्या. राईचे तेल हा खाण्यातील फारच अवघड भाग पण तो सुसह्य होईल इतका परिचयाचा असणे आवश्यक. अशा प्रकारे पूर्वतयारीचा अध्याय जोमात चालू असता थोडा खंड करून परिचयातील एका आदरणीय व्यक्तीच्या आयुष्याच्या शेवटची सुश्रुषा करताना व्यतीत केला. एक ऋषितुल्य व्यक्तित्व, कर्तृत्ववान आयुष्याची पूर्ती करत स्थितप्रज्ञपणे मृत्यूस सामोरे जाताना सेवा-साक्षी राहणे हे खरेच पुण्य! कुठल्यातरी जन्मातले काही ऋणानुबंध शिल्लक असावेत, तदनंतर आठवड्याभरातच बंगालकडे प्रयाण, सर्वप्रथम त्यांची रक्षा गंगेस सुपूर्त. भारतमातेचा सुपुत्र तिच्या स्वरूपात विलीन.

तूर्तास अमेरिकेत वास्तव्य असल्याने कलकत्त्यापर्यंतचा पहिलाच पल्ला बराच लांबचा होता. कलकत्त्यात पूर्वी पुर्वोत्तरेकडच्या प्रवासादरम्यान केवळ विमानबदली केली होती, पण शहरात जाणे यावेळी पहिल्यांदाच. राहणे जुन्या कलकत्त्यात कॉलेज स्ट्रीट परिसरात केले. आजकाल सॉल्टलेक वगैरे नव्या शहरात बरीच उत्तम व्यवस्था आहे पण मग मूळ शहराचा तो अनुभव नाही. अरुंद गल्ल्या, जुन्या वसाहती, दशकानुदशके प्रस्थापित असलेली खाऊची ठिकाणे अशा ठिकाणी शहराच्या काळजाजवळ वस्ती.

बंगालच्या कणाकणात गंगा सामावलेली आहे त्यामुळे गंगास्नान हा बंगालमध्ये सामावण्यासाठी सोपा उपचार. मकरसंक्रांतिच्या दिवशी सूर्योदयास पलीकडच्या तीरावर असलेला रामकृष्ण घाट त्यासाठी निवडला. हलक्या धुक्यात निरव शांततेत गंगेची भेटी. तदनंतर काही काळ हावडा क्षेत्र पाहण्यात घालवला. सकाळच्या वेळी त्यातल्या त्यात कमी गजबज असलेला हावडा ब्रिज, गंगेवरचे काही जुने घाट इत्यादी. त्यानंतर कलकत्त्याची अधिष्ठात्री देवता दक्षिण कालिकेचे दर्शन.

फार प्राचीन काळी गंगा नदी मैदानी प्रदेशातून वाहत येत ऋक्ष पर्वताला (झारखंड) वळसा घालून दक्षिणवाहिनी होत गंगासागर येथे समुद्राला मिळत असे. गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या वितरिका एकमेकांमध्ये मिसळत असल्या तरी मुख्य प्रवाह पृथकपणे समुद्रास मिळत असत. बंगालची मैदानेच इतकी सपाट आहेत कि महापुरात नद्या त्यांचे काठ भेदून इतस्ततः धावत सुटतात व परिणामी मार्गही बदलतात. तशाच कुठल्याशा घटनेत गंगेचा मुख्य प्रवाह गंगा व पद्मा (बांगलादेश मध्ये जाणारा प्रवाह) अशा दोन वितरिकेत विभागला. पुढे पाण्याचा मुख्य अंश पद्मेत प्रवाहित होऊन जुना मुख्य प्रवाह आदिगंगा नावाने ओळखला गेला त्यालाच आज आपण हुगळी म्हणतो. या आदिगंगेनेही अनेक वेळा प्रवाह बदलले. मूळ कालीघाट हा या आदिगंगेच्या काठी होता.

Ganga

आता कालीघाट हुगळीच्या एका लहानशा वितरिकेच्या काठी आहे. आजचे शहर हे त्याच्या उत्तरेस वाढले. कालीघाट मंदिर हे तसे अलीकडचे, १८०० च्या काळातले. विग्रह तीन मोठे नेत्र रेखाटलेला तांदळा व मोठी सुवर्णजिव्हा अशा कालिका स्वरूपातील. ५० शक्तिपीठांमधील पादांगुली पीठ. स्वतः देवी दक्षिण कालिका सात्विक रूपात असली तरी सोबत कात्यायिनी व चामुंडा असल्याने त्यांच्यासाठी सामिष नैवेद्याची परंपरा पाकशाळेत आहे.

Kali
कालीघाट शक्तीपीठ : दक्षिण काली

रामकृष्ण परमहंसांमुळे प्रसिद्धीस आलेले दक्षिणेश्वर काली मंदिर शहराच्या तसे उत्तरेकडे आहे. संपूर्ण सगुण स्वरूपातील विग्रह, चतुर्भुजा शस्त्रधारिणी कालिका 'भवतारिणी'. परिसरात १२ ज्योतिर्लिंग मंदिरे व अन्य लहान मंदिरे आहेत. गंगेच्या काठीच मंदिराजवळ उद्यान विकसित केलेले आहे. येथून बेलूर मठ येथे जाण्यासाठी थेट नावेची सेवा आहे. बेलूर मठ रामकृष्ण मिशन चे मुख्यालय व स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतून साकारलेले अनेक कलाशैलींचा मिलाफ असलेले एक भव्य स्थापत्य.

Belur
बेलूर मठ

शेवटी जाता जाता कलकत्त्याची खास खाबुगिरी -
राधाबल्लभी (कचोरी) व दम आलू. लूची (पुरी) व छोलार दाल (चण्याचे वरण), झालमूडी (कोरडी भेळ), बसंती पुलाव व धोकार डालना (डाळीच्या चौकोनी वड्यांची भाजी), पोस्तो (खसखस) बडा व आलू पोस्तो, गंधराज लिबूर घोल (ईडलिंबू ताक), पुचका (पाणीपुरी) हे उल्लेखनीय. बंगाली मिठाई सुपरिचित आहेच पण त्यातल्या त्यात स्थानिक वेगळे 'खिरेर गाजा' कोरड्या गुलाबजाम सारखे...

पुढील भागात निमशहरी व ग्रामीण बंगाल कडे...

Sunset
गंगेवरील सूर्यास्त

भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ - चितगाव, बांगलादेश , भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया , अखंड बंगाल

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Aug 2024 - 7:07 am | मुक्त विहारि

छान लिहीत आहात...

पुभाप्र...

कर्नलतपस्वी's picture

14 Aug 2024 - 8:39 am | कर्नलतपस्वी

अतीशय सुंदर अशी बंगाल ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आपले सर्व लेखन धागे बघीतले,वाचले नाहीत, सवडीनुसार नक्कीच वाचणार. पैकी त्रिपुरा हा लेख मुद्दाम वाचला कारण अगरतला येथे बदली झाली होती. तसे अगरतला शहर बघता आले नाही कारण गेल्या गेल्या पंधरा दिवसाचे ट्रेनिंग आणी लगेच उचल बांगडी झाली.
मिटरगेज बराकव्हॅली एक्स्प्रेस, नावालाच एक्स्प्रेस, गोहाटी, लामडिंग, हाफलाॅग धर्म नगर असा बराच वळसा घालणारा प्रवास केला व धर्म नगर अगरतला बस ने प्रवास केला.

खुपच सुंदर लिहीलय आणी ते सुद्धा खालीस मराठीत....

कोलकत्ता सुद्धा दोन दिवस पाहीले आहे ते म्हणजे भोज्याला शिवल्या सारखे.
आपल्या लेखामुळे बर्‍याच ठिकाणची भटकंती होणार असे दिसते.

सैन्यात असल्याने बरेच बंगाली सहकारी,दोस्त आणी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने मैत्रीणी सुद्धा होत्या.. बांगलादेशातील ही गोड भाषा आहे यात शंका नाही.

कवीवर्या तांबे यांचे एक गीत "तिन्हीसांजा सखे मिळाल्या", हे बंगाली भाषेत लता दीदींचा सुंदर गायले आहे.

दूरे आकाश शामियाना...

https://youtu.be/D3kMZGgCn9k?si=294zq3ZEfXvLTggi
पु.भ.प्र.

समर्पक's picture

14 Aug 2024 - 9:57 pm | समर्पक

धन्यवाद! हे महितीत नव्हते...

प्रचेतस's picture

14 Aug 2024 - 10:21 am | प्रचेतस

सुरेख सुरुवात. बेलुर मठाचे स्थापत्य आवडले. विविध शैली सहज ओळखू आल्या.

सुंदर लेख आवडला! रविंद्र संगीत,गंगा,मिष्टी खवय्येगिरी ,काली माता , विवेकानंद खरोखरच बंगालचा आत्मा आहे.

कंजूस's picture

14 Aug 2024 - 11:12 am | कंजूस

कोकण किंवा बंगाल पाहण्यापेक्षा तिथे नातेवाईक किंवा मित्रांकडे राहिल्यास अधिक चांगला अनुभवता येतो. चार दिवसांचे पर्यटन करून समजणार नाही.
कोकणच्या जीवनावरच्या कादंबऱ्या वाचून तो आपल्याला थोडा उमटलेला असतो. बंगाल साठी ......
बंगाल आणि हुगळी नदीची ओळख अमिताभ घोष यांच्या Ibis triology (तीन पुस्तके), The hungry tide या पुस्तकांतून झाली.
टागोर वाचून उपयोग नाही. शरत्चंद्र वाचायला लागेल.
बंगाली भाषा शिकण्यासाठी यूट्यूबवर बरेच विडिओ आहेत. त्यापैकी दोन -
१) https://youtu.be/C_WmUWPT51g?si=lR6H4QZg3X6hUaFt
२) https://youtube.com/@kolisstudypoint?si=m8N6JLma-aaGXw4X

टर्मीनेटर's picture

14 Aug 2024 - 3:36 pm | टर्मीनेटर

नेहमीप्रमाणेच छान लेखन 👍
मला वैयक्तिकदृष्ट्या भारताचा पूर्वेकडचा म्हणजे नकाशावर उभी रेषा आखल्यास बंगालच्या उपासगाराकडचा भाग विशेष आवडत नसला तरी कोलकाता शहराचा काही भाग मनापासून आवडतो.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

गोरगावलेकर's picture

14 Aug 2024 - 4:58 pm | गोरगावलेकर

बंगालची सुंदर ओळख आवडली

अनिंद्य's picture

14 Aug 2024 - 7:31 pm | अनिंद्य

भीषोण भालो.

अनेक महिन्यांनी मिपा लॉगिन करून प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटली. सुंदर लेखनाचे चुंबकत्व :-)
पद्मा-गंगेबद्दलचा परिच्छेद विशेष आवडला.

फोटो खूप सुंदर आलेत, दक्षिण काली मंदिरात विग्रहाचे फोटो तुम्हाला काढू दिले म्हणजे तुमचा वशिला जबरदस्त असणार !

पु भा प्र

श्वेता२४'s picture

14 Aug 2024 - 7:45 pm | श्वेता२४

तुमचे भटकंतीचे लेख सुरेख असतात. वर्णन करण्याची पद्धत ही खूप छान आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.