नमस्कार मंडळी..
आज एका अत्यंत चवीष्ट भाजीची तितकीच सोप्पी कृती घेउन आपल्या सेवेसी हजर आहे.
ही भाजी आमच्या गावी साधारण फेब-मार्च महिन्यात होळीच्या आसपास केली जाते. त्यावेळी वाडीत बर्या पैकी भाजीपाला असतो.
गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात.
पण आपल्या शहरात एक वेळ मडक मिळेल पण ते पुरायच कुठे आणि जाळ कसा करायचा ?
पण एवढ्याश्या कारणासाठी आपण या चवीष्ट भाजीला का मुकावं बर? म्हणुन आपल्या घरात करता येइल अशी कृती देत आहे.
जमल्यास कधी गवी गेलात तर मडक्यात पण करुन पहा.पण तो वर आपली शहरी कृती खालील प्रमाणे.....
साहित्य :
२५० ते ३०० ग्रॅम. कोनफळ.
२ मोठे बटाटे
२ मध्यम वांगी.
२ कच्ची भाजीची केळी.
२५० ते ३०० ग्रॅम पापडी/घेवडा.
आसल्यास वाल पापडी चे गोळे/दाणे.
३-४ शेवग्याच्या शेंगा.
१ रताळं.
१ वाटी किसलेला नारळ.
असल्यास पाती कांदा.
३-४ हिरव्या मिरच्या
मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, तेल.
कृती :
१) एका जाड बुडाच्या भांड्यात भाज्यांचे जरा मोठेच तुकडे करुन घ्या.
२) यात चवी नुसार मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, ३ मोठे चमचे तेल टाका.
३) भज्या टॉस करुन सगळा मसाला,मीठ नीट पसरवुन घ्या.
४) मध्यम आचे वर भांड्या वर झाकण (झाकणावर पाणी) ठेवुन दणदणीत वाफ येउद्या. ही भाजी पुर्ण पणे वाफेवरच शिजवायची. पाणी अजीबात टाकुनये.
जर भाजी खाली लागतेय अस वाटल तर आच लहान करा. तवा गॅसवर ठेवुन भांड तव्यावर ठेवा.
५) साधारधा १५-२० मिनिटां नंतर झाकण काढुन एकदा परता. किसलेला नारळ टाकुन परत एक वाफ काढा.
कोनफळ शिजल की गॅस बंदा करा.
तळटिप : ही भाजी आमच्याकडे खात नाहीत तर जेवतात ;) त्यामुळे सोबत चपाती, भात नसल तरी फरक पडत नाही :)
प्रतिक्रिया
26 Oct 2009 - 4:16 pm | प्रसन्न केसकर
छान लागते ही भाजी - विषेशतः भाज्या गावरान असतील, हायब्रीड नसतील तर. फोटो बघुनच तोंडाला पाणी सुटलं. आज सकाळीच विषय झालाय. मित्राच्या शेतावर हुरडा-उकडहंडी करायला कधी जायचं असा. वाटच बघतोय प्रोग्राम पक्का व्हायची.
26 Oct 2009 - 4:21 pm | प्रभो
छान.
>>गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात.
हा प्रकार चिकन वापरून पण करतात जनरली कोकणात अलिबाग साईडला.पोपटी म्हणतात त्याला.
ह्या पोपटीची स्पेशालिटी म्हणजे हे चिकन बनवल्यानंतर कडक न होता मऊ होत जाते..
भाजीचा प्रकारही मस्त रे गणपा...
(पोपटी खा-खा खाल्लेला)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
26 Oct 2009 - 4:22 pm | गणपा
अगदी खरय रे पण त्यात आम्ही फक्त चीकन आणि कडव्या वालाच्य शेंगा टाकतो, भन्नाट प्रकार अस्तो तो. =P~ नुसत्या आठवणीनेच लाळ गळली...
26 Oct 2009 - 5:34 pm | स्वाती२
काशाला हो पोपटीची आठवण काढलीत. देवा!
26 Oct 2009 - 4:18 pm | सहज
फोटो मुळे मजा आली.
बहुगुणी यांनी (अजुनही कोणीतरी देखील) अशीच पाकृ (पोपटी) दिली होती पण फोटोमुळे मजा आली.
27 Oct 2009 - 11:47 pm | बहुगुणी
सहजराव, ते पोपटी लिहिणारे 'बहुरंगी' आहेत हो, मी नव्हे! (एवढं चांगलं साग्रसंगीत मला कुठलं जमायला हो! आम्ही आपले 'झटपट थापटी' करणारे:-))
28 Oct 2009 - 6:16 am | सहज
सॉरी! बहुरंगी.
:-)
26 Oct 2009 - 4:17 pm | sneharani
छान आहे. पण कोनफळ म्हणजे ...?(कस असतं?)
26 Oct 2009 - 4:25 pm | किट्टु
अगदी हाच प्रश्न पडला की कोनफळ म्हणजे काय?
फोटो एकदम बेस्ट.......
26 Oct 2009 - 4:28 pm | गणपा
हे पहा कोनफळ..

26 Oct 2009 - 4:20 pm | नंदन
मर्हाटमोळी पाककृती! जियो गणपाशेठ.
[पुढच्या खेपेत डहाणू-सातपाटीचा दौरा पुन्हा करायला हवा :).]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Oct 2009 - 4:27 pm | विसोबा खेचर
क्लास! :)
26 Oct 2009 - 4:40 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या सासुबाइ ह्यात बेबी कॉर्न पण घालतात.
चुचु
26 Oct 2009 - 4:42 pm | टारझन
एस-क्लास !!
26 Oct 2009 - 5:09 pm | अवलिया
जबरा !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
26 Oct 2009 - 5:37 pm | स्वाती२
छान पाकृ.
26 Oct 2009 - 5:55 pm | मीनल
अजून एक शकाहारी पदार्थ.
व्वा!
ईझी दिसतो आहे करायला.
इथे सर्व भाज्या बारमाही मिळतात.फ्रोजन!!! :D
मीनल.
26 Oct 2009 - 6:02 pm | सुबक ठेंगणी
पोपटी आणि उकडहंडी दोन्ही करून बघायलाच पाहिजेत! :)
फक्त लाल तिखट, शेवग्याच्या शेंगा, पातीचा कांदा, खोबरं सोडल्यास उंधियुची आठवण झाली. ह्या उकडहंडीच्या भाजीतही मेथीचे मुठिये सही लागतील! :)
26 Oct 2009 - 6:23 pm | रामदास
ब्रिटीश यांच्या रिसार्टात पोपटी चा कार्यक्रम नित्यनेमाने होतो.अलीबाग जवळ चौलला रिसॉर्ट आहे.
26 Oct 2009 - 6:25 pm | प्रभो
कधी जायचं बोला रामदासकाका???
-प्रभो
26 Oct 2009 - 9:42 pm | धनंजय
यात भाज्यांच्या निवडीत बरेच स्वातंत्र्य आहे का? थोड्या पिठूल भाज्या, थोड्या शेंगा, थोड्या ओल्या शेंगांच्या बिया...
आज घरी वरीलपैकी काही भाज्या आहेत पाकृ करून बघतो.
28 Oct 2009 - 1:48 am | अक्षय पुर्णपात्रे
धनंजय, काही वृत्तांत द्या जरा. :)
28 Oct 2009 - 1:50 am | निमीत्त मात्र
ते 'कोनफळ' आहे का घरी?
28 Oct 2009 - 6:51 am | धनंजय
पाककृतीत केलेले फरक :
१. माझ्याकडे होत्या त्या भाज्या घेतल्या. मुद्दामून कोनफळ आणले. बरोबर पांढरे रताळे (गोड नाही), भाजीचे केळे, बटाटा, फरसबी, मटार, पातीचा कांदा हे प्रकार घेतले.
२. भांड्यावर चांगले बसणारे झाकण ठेवून ओव्हनमध्ये पदार्थ शिजवला. ("वर-खाली निखारे ठेवा किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या", असा पर्याय कमलाबाई ओगले देतात.)
गणपांचा पदार्थ म्हटला तर काय, चवीला मस्तच झाला - त्यात काय सांगायचे :-)
28 Oct 2009 - 7:21 am | निमीत्त मात्र
अरे वा!! फोटू कुठाय????
आणि हे काय आमच्या गणपाने कृती दिलेली असताना तुम्ही शेवटी ओगलेबाईंचीच कृती वापरलीत?
बरं नुसतीच खाल्ली की भात/चपातीला लावून? त्याविषयी ओगले बाईंनी काही टिप्पणी केली आहे का?
मीही करुन पाहावी म्हणतो...
28 Oct 2009 - 7:36 am | धनंजय
ओगलेबाईंकडून फक्त वरून-खालून-निखारे=ओव्हन ही कल्पना घेतली.
बाकी पाकृ गणपा यांचीच (कोनफळ + घरच्या भाज्या वापरून हा फरक केला).
तयारी :

तयार :

भाताशी खाल्ली.
28 Oct 2009 - 12:45 pm | गणपा
क्या बात है, धनंजय राव सही.
26 Oct 2009 - 9:59 pm | नंदू
गणपा शेठ,जियो.
सुंदर पाकृ , अप्रतिम फोटोज.
नंदू
26 Oct 2009 - 10:05 pm | दिपाली पाटिल
मस्त दिसतेय उकडहंडी...मी पहिल्यांदाच पाहीली, इकडे केरळी दुकानांत मातीची हंडी मिळते, ते आणुन घेइन, मातीच्या मडक्यातल्या अजुन काही पाकृ असतील तर नक्की द्या....
दिपाली :)
26 Oct 2009 - 11:45 pm | अश्विनीका
मस्त रेसिपी. करून बघायलाच हवी.
कोनफळाला इंग्लीश मध्ये काय म्हणतात? अमेरिकन स्टोअर मधे मिळेल का? काय नावाने?
- अश्विनी
27 Oct 2009 - 5:05 pm | प्राजक्ता पवार
प्राजक्तापवार![]()
कोनफळाला Yam ( one of the roots) असेही म्हणतात. :)
28 Oct 2009 - 2:59 pm | भडकमकर मास्तर
कोनफळाला इंग्रजीत हूफ्रुट / हूजफ्रुट असे म्हणत असावेत.
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
27 Oct 2009 - 3:48 am | चित्रा
सुंदर रंगसंगती! अजून काय बोलायचे?
27 Oct 2009 - 12:21 pm | मसक्कली
मस्तच... =P~
27 Oct 2009 - 9:25 pm | हरकाम्या
गणपाशेठ," अमर राणे "आणि "संजीव कपुर "यांच्या नंतर तुझाच नंबर गड्या.
27 Oct 2009 - 9:40 pm | गणपा
आता धागा आलाच आहे वर तर सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार मानुन घेतो.
नाही तर लोक म्हणायचे लेकाने आभाराच्या निमित्ताने धागा वर खेचला ;)
27 Oct 2009 - 9:55 pm | प्रभो
म्हणाले तर म्हणाले...तुला ऐकू आलं का भावा???
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
28 Oct 2009 - 1:41 am | निमीत्त मात्र
गणपाशेठ,
फोटो वगैरे नेहमीसारखेच भारी असले तरी एकूणच पाककृती उठवळ वाटत आहे.
भाज्या चिरुन, फोडणी करुन, वाफाऊन, परतुन रीतसर बनवायचा कंटाळा आलेल्या माणसाने ही रेसिपी शोधलेली दिसते.
28 Oct 2009 - 12:51 pm | पर्नल नेने मराठे
एवढ्या भाज्या जाऊन आणणे , त्या धुणे, चिरणे हे काम करुन दाखवाच. मग उठवळ
म्हणा.
>:P
चुचु
28 Oct 2009 - 1:50 pm | गणपा
जाऊ दे ग चुचु, जर मात्रसाहेबांनी ही भाजी कधी चाखली असती तर ते असे म्हणाले नसते. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.
या 'निमित्ता'ने का होइना आपला प्रतिसाद आला बरे वाटले. :)
28 Oct 2009 - 9:05 am | दशानन
अरे तो भाजी कापायचा चाकू कुठे आहे रे :?
जरा दे बघू...
च्यामायला स्वतःच्या हातानेच आता... पोटात घुसवतो ;)
च्यामायला !
अरे कोणी तरी ह्या गणपाला किडनॅपतरी करा काही दिवस.... =))
28 Oct 2009 - 5:11 pm | कराडकर
कोनफळाला मराठीत दुसरा शब्द आहे काय ? आणी महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात मिळते ? रताळ्या सारखे दिसतंय
30 Oct 2009 - 12:59 pm | नेहमी आनंदी
या कोनफळाला हिंदीत गराडू म्हणतात का?
23 Mar 2010 - 4:03 pm | इंटरनेटस्नेही
वाचुनच भुक लागली..
ही रेसिपी मातोश्रीनां आजच करण्याचे निर्देश दिले आहेत..
--
(खादाड) इं. प्रे.