काहीतरी राहिले आहे इथे
असाच आलोय इथवर.
येताएत अजून
माझी पत्रे या पत्त्यावर...?
हो, काही मिळाली
वरचा पत्ता बदलून
पोस्टात परतवलेली...
पण राहिले होते
कपाटात, मला वाटते,
माझे काही कपडे.
नाही मागवलेत
फोनवरून, म्हटले -
मीच येऊन शोधावेत.
नाहीत सापडले.
अरेच्चा! आहे की बोचके
इथे बांधूनही ठेवले.
.
ती आतली खोली
माझ्या आठवणीतली
तशी नाही राहिली...
हो, दिवाणखाना
आहे तसाच... पण
कोरेपणा आहे तक्क्यांना
नव्या धुतल्याचा.
मऊ गोधडीवर लोळत
वेळ माझा जायचा
इथे तासंतास.
हक्काचे कपाट, बिछाना,
टेबल, कप नि ग्लास
आठवते खूप काही.
आज कशासाठी आलो
तेच आठवत नाही.
काय ते भेटलेच नाही.
प्रतिक्रिया
1 Oct 2009 - 2:30 am | निमीत्त मात्र
वेगळीच कविता मस्त आहे.
हे मस्त!
1 Oct 2009 - 3:19 am | मुक्तसुनीत
कविता वाचून अनेकानेक संदर्भ जागे झाले. You Can't Go Home Again. घर बदलल्यावर परत तेथे जाणे म्हणजे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने परके होऊन परत भेटण्यासारखे. "हक्काचे कपाट, बिछाना, टेबल, कप नि ग्लास.." हे वाचताना क्षणभर अडखळलो. घरे बदलतानाच्या आठवणी दाटल्या.
कविता आवडली हेवेसांनल. :-)
1 Oct 2009 - 8:05 pm | संदीप चित्रे
असाच विचार मनात आला...
अगदी हेच वाक्य लिहायला घेतलं आणि मुसुचा प्रतिसाद दिसला
1 Oct 2009 - 11:27 pm | बिपिन कार्यकर्ते
http://www.misalpav.com/node/5989
बिपिन कार्यकर्ते
1 Oct 2009 - 5:15 am | सहज
मला क्षणभर वाटले की बोंबला "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है" चा अनुवाद केला की काय? ;-)
आठवते खूप काही.
आज कशासाठी आलो
तेच आठवत नाही.
दिल और दिमाग नेहमीच काही एकत्र काम करत नाहीत याचा एक नमुना. :-)
स्वप्नही वाटू शकते...
बरेच अर्थ निघु शकतात..
आवडले.
1 Oct 2009 - 5:40 am | बेसनलाडू
मला क्षणभर वाटले की बोंबला "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है" चा अनुवाद केला की काय?
अगदी याच गाण्याची आठवण झाली पटकन!
(स्मरणशील)बेसनलाडू
वरील प्रतिसादात 'बोंबला' बाकी अस्थायी वाटले. 'च्यायची कटकट' असा काहीसा भाव डोकावला. ('च्यायला! या येरकुंडकराचा सत्कार?!' असे काहीसे :) )
(अवांतर)बेसनलाडू
1 Oct 2009 - 8:20 am | मिसळभोक्ता
सहज, बेसनलाडू,
मलाही "मेरा कुछ् सामान" हेच वाटले. पटकन प्रतिसाद टाकणार, एवढ्यात तुमचा प्रतिसाद पाहिला.
आणि म्हणून हा उपप्रतिसाद.
धनंजय, अत्यंत तरल आणि भावस्पर्शी कविता.
(मिपावरील सर्व आजोबांना विनंती. वाचा, आणि शिका. ईट इज नेव्हर टू ओल्ड टू लर्न.)
धन्यवाद.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Oct 2009 - 7:36 am | क्रान्ति
कविता खूप आवडली.
एक खूप जुने मराठी गाणे "हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?" आठवले. :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
1 Oct 2009 - 8:19 am | प्राजु
कुछ पाकर खोना है... कुछ खो कर पाना है..
जीवन का मतलब तो आना और जाना है!!..
या ओळी आठवल्या..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Oct 2009 - 10:28 am | मिसळभोक्ता
धन्याशेट,
वरचा प्रतिसाद सहज, आणि बेसनलाडू साठी.
हा खास तुझ्यासाठी !
हे "मेरा कुछ सामान" चे भाषांतर असो किंवा नसो, त्याचे काही नाही.
मी आजवर मिसळपावावर, किंवा इतर कुठेही वाचलेली, सर्वात सुंदर कविता !
जियो धन्याशेट, जियो !!!!!
आजकाल हे कवींचे लोण पसरले आहे (मुख्यतः संदीप खरेने कवितादेखील आज पाप्युलर होऊ शकते, असे दाखवून दिल्यानंतर, अनेकांना आपण कवी आहोत, ह्याचा साक्षात्कार झाला आहे) त्यामुळे ट ला ट, र ला री जोडून कवितांचा घाणा सुरू केलाय बर्याच लोकांनी. कुणी भटांची बाराखडी वाचून आणखीच राडा घातला आहे, गझलांचा.
ह्या अशा वातावरणात, तुझी ही नितांत सुंदर कविता मन प्रसन्न करते. "कविताच हवी ना? ही घ्या !" असा अभिनिवेश नाही. सहज, सुंदर, मोजके आणि अचूक शब्द, उगाच अलंकार ठासून भरणे नाही, शब्दालंकार तर नाहीच, पण अर्थालंकारही नाहीत. साधी सोपी, मनाला भिडणारी कविता.
बस बॉस, आज दिल भर आया ! धनंजय वैद्य माझा खूप जवळचा मित्र आहे, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे. आज तो तुमने चार चांद लगा दिये !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Oct 2009 - 8:59 am | चतुरंग
मागे राहून गेलेल्या गोष्टी मनाच्या आत कुठेतरी घर करुन बसतात आणि कधीमधीच एखाद्या प्रसंगाने डोकं वर काढतात. फार कल्पक मांडणी! आवडली. :)
मूळ कविता इंग्रजीत सुचून त्याचे भाषांतर केल्यासारखी काही ठिकाणी वाटते आहे पण हा काही दोष नव्हे.
चतुरंग
1 Oct 2009 - 9:12 am | अनामिक
सुंदर कविता.
कविता वाचून 'मेरा कुछ सामान...' जरी आठवलं तरी त्याचबरोबर काही आठवणीही डोळ्यासमोर तरंगल्या. ज्या घरात वाढलो ते घर काही काळासाठी सोडून परत त्या घरात आलो तो प्रसंग आठवला. तसेच अमेरिकेतून साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदाच घरी गेलो तो क्षणही आठवला. घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन तिथल्या त्याच वस्तू बघून, त्यांना स्पर्श करून जो आनंद मिळतो तो शब्दात कसा सांगावा? एवढंच म्हणू इच्छितो, की तुमच्या कवितेनं आठवणी जाग्या केल्या आणि नकळत डोळ्यात पाणी आलं!
-अनामिक
1 Oct 2009 - 9:40 am | अजय भागवत
खूप आवडली कविता. साधेसुधे विचार पण सुंदर रचना असल्यामुळे परिणामकारक झालेत.
1 Oct 2009 - 10:07 am | पार्टनर
सुंदर !
काही चुकाही जाणवल्या, पण त्या अजिबात महत्त्वाच्या ठरत नाहीत !
- पार्टनर
1 Oct 2009 - 10:11 am | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच आहे कविता
1 Oct 2009 - 10:29 am | पाषाणभेद
लई भावूक क्येलं की भाऊ तुमी.
कदी कदी वाटतं की ईतकं भावूक होवू न्ये. आपन खरा मानूस बनायला लागतो त्यामूळं. आन आजकालच्या जगात त्ये काय उपेगाचं नाय.
-----------------------------------
-हळवा होणारा पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
1 Oct 2009 - 10:31 am | नंदन
कविता आवडली.
- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 Oct 2009 - 10:41 am | युयुत्सु
कवितेमध्येकडवीकिंवाब्रिदिंगस्पेसनसलीतरअसेकाहीतरीहोते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
1 Oct 2009 - 10:41 am | श्रावण मोडक
उत्तम, तरल कविता...
1 Oct 2009 - 10:48 am | विदेश
-अरेच्चा! आहे की बोचके
इथे बांधूनही ठेवले.
आठवणींचे बोचके सुरेखपणे उघडूनही दाखवले आहे!
1 Oct 2009 - 10:56 am | विजुभाऊ
मेरा कुछ सामान ची आठवण झाली.
तरल शब्द आनि फापटपसारा न करता अचूक भावना व्यक्त झाल्या आहेत. मस्तच.
1 Oct 2009 - 10:58 am | अवलिया
छान.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
1 Oct 2009 - 11:10 am | राघव
खूप सुंदर!
मलाही अगोदर "मेरा कुछ सामान" ची आठवण झाली.
कविता अतिशय भावपूर्ण! :)
राघव
1 Oct 2009 - 11:15 am | घाटावरचे भट
खूपच सुंदर कविता.
1 Oct 2009 - 2:06 pm | शरदिनी
दोन चौकोनात मांडलेली ( दूरदेशी गेलेल्यांसाठीची) मर्मभेदक कविता मस्तच..
चौकोनात लेखनाचा वैचित्र्याचा अट्टाहास आवडला...
1 Oct 2009 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते
सकाळपासून इतर धाग्यांवर आणि चॅट्सवर या कवितेबद्दल बरंच काही ऐकलं आणि एकंदरीत काय लिहिलं असावं असा अंदाज आला. त्रास होणार हे नक्की कळले होते... कविता वाचणे टाळत होतो. राहवले नाही, धन्याशेठची कोणतीही कलाकृती फार काळ टाळता येत नाही. शेवटी वाचलीच एकदाची. अतिशय सुंदर आणि थोडक्या शब्दात फार काही...
त्रास झालाच. खूप काही वर आले... ज्या गावात सुंदर दिवस उपभोगले त्याच गावात दहा वर्षांनी गेलो तर पूर्वी जिथे राहत होतो तिथला वॉचमन (ओळखत असून सुध्दा) आत जाऊ देईना... खूप तडफड झाली होती.
@मुसु : बरोब्बर त्याच ओळींशी अडखळलो...
बिपिन कार्यकर्ते
1 Oct 2009 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पसरलेल्या आठवणी शोधतांना, कवीच्या
मनातील तगमग पोहचली.
'मऊ गोधडीवर लोळत
वेळ माझा जायचा'
इथे तासंतास.
अहाहा ! उन्हात वाळायळा ठेवलेल्या गोधड्यांवर आम्हीबी लै लोळायचो. (गोधडी शब्द फारसा दिसत नाही म्हणून तो शब्द विशेष आवडला)
-दिलीप बिरूटे
1 Oct 2009 - 5:48 pm | मीनल
आवडली कविता.
विषय न हाताळलेला, लेखनाचा प्रकार वेगळा. प्रेझेंटेशन ही निराळ आहे.
मीनल.
1 Oct 2009 - 5:58 pm | विसोबा खेचर
लै भारी!
1 Oct 2009 - 6:05 pm | चित्रा
तरल कविता, खूप आवडली.
1 Oct 2009 - 11:18 pm | नितिन थत्ते
सुंदर कविता.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
1 Oct 2009 - 11:52 pm | ऋषिकेश
हे जुन्या घरी जाणे? की इच्छा नसताना ताटातूट केलेल्यांची पुन्हा दिर्घकाळानंतरची भेट?
फार भावपूर्ण कविता!! लै भारी
ऋषिकेश
------------------
नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
2 Oct 2009 - 12:47 am | सुवर्णमयी
कविता आवडली.
2 Oct 2009 - 10:38 am | विश्वजीत
बरीच वर्षे परगावी किंवा परदेशी स्थायिक झालेला माणूस आईवडिलांना भेटायला आल्यावर असे होत असेल किंवा एखाद्या मुलीची सासरहून माहेरी आल्यावर अशी अवस्था होत असेल.
कविता फार आवडली.