विकृत बुद्धिवादाची इस्त्री

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
6 Sep 2009 - 10:55 am
गाभा: 

मला असं वाटतं की ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष
उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास
शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय
टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता.
लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते
असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक
सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल. विज्ञानाने भले कितीही
प्रगती केलेली असो माझ्या जीवनातील अनिश्चितता झेलण्यास ते जितके उपयोगी पडेल,
तितकेच माझ्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व असेल. माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि
नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही. म्हणून ज्या प्रगतीचा
एखाद्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही उपयोग नाही, ती त्याला असून नसल्या
सारखीच...किं तया क्रियते धेन्वा या न सूते न दूग्धदा (जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय)?

तात्पर्य, ज्या विज्ञाननिष्ठेचा, बुद्धिवादाचा फारसा उपयोग नाही त्याची कास
सरसकट धरण्याचा आग्रह धरणे म्हणजे एक प्रकारचा आततायीपणा आहे असे मला वाटते.

आपल्याकडे ज्योतिषाकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहिले जाते. ज्योतिषाकडे बघायचा
आणखी एक दृष्टीकोन मला अमेरीकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीबाईनी (त्या आता हयात
नाही) मला दिला. त्यांचे नाव श्रीमती मॅरी डाउनिंग. त्यांच्या मते ज्योतिष हे
मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती आहे (Astrology is model of
circular reality in human life). हे चक्रीय वास्तव सुख आणि दू:ख,
अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग, प्रवृत्ती आणि निवृत्ती, अशा ध्रुवांमध्ये
आंदोलित होत असते.

माझ्या दृष्टीने मॅरी डाउनिंगच्या व्याख्येतील प्रतिकृती हा शब्द मला अतिशय
महत्त्वाचा वाटतो. कोणत्याही रचनेचे रूप आणि कार्य समजावून घेण्यासाठी
प्रतिकृती उपयोगी पडतात. आपण प्रतिकृती अथवा प्रतिक (प्रतिकृती अमूर्त होत जाते
तेव्हा त्याचे प्रतिक बनते) याचे सोपे उदाहरण म्हणून आपण वास्तूविशारदाने
बनवलेल्या घराच्या प्रतिकृतीचे घेऊ. या प्रतिकृतीमुळे आपल्याला वास्तूची कल्पना
करण्यास मदत होते. या प्रतिकृतीमध्ये वास्तूरचनेची सर्व तत्त्वे अमलात आणली जात
नाहीत. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, वास्तूची प्रतिकृती बनवताना आपण खर्‍या
दगड विटांचा आणी इतर बांधकाम सामानाचा उपयोग करीत नाही. संगणकावर बनवलेल्या
प्रतिकृती मध्ये तर ० आणी १ एवढाच कच्चा माल वापरला जातो. आणि म्हणून ती
प्रतिकृती बनवण्याचा आणी वापरण्याचा उद्योग अशास्त्रीय ठरत नाही किंवा तयार
झालेली प्रतिकृती अंधश्रद्धा होत नाही.

प्रतिकृतीला, ती ज्या उद्देशाने बनवली गेली आहे त्यानुसार, मर्यादा येतात.
पुठ्ठ्याचा वापर करून तयार केलेल्या वास्तूच्या प्रतिकृतीमध्ये प्रकाश किती
खेळेल किंवा याचा अंदाज बाधणे कठीण असते. शिवाय अशी प्रतिकृती बर्‍याचदा
वास्तूच्या बाह्य रुपाचाच अंदाज येण्यास उपयोगी ठरते. अंतर्भागाची तसेच हालचाल,
चलनवलन यांची कल्पना करण्यासाठी, संगणकीय प्रतिकृती उपयोगी पडतात.

हे सर्व सांगायचा खटाटोप एवढयाचसाठी की ज्योतिषाच्या मर्यादा आपण जर समजावून
घेतल्या तर ज्योतिषाचा योग्य उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. माझे आयुष्य
एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक
व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. एखादे सूत्र ही त्यातील विशिष्ट घटकांच्या
परस्पर संबंधांची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी
बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्‍या
वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?

ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.

याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला एक महत्त्वाचे मत येथे मांडावेसे वाटते. आधुनिक
ज्योतिषी ग्रहांचे परिणाम अजिबात मानत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणांचे किंवा
आकाशात तयार होणार्‍या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड
घालायचा प्रयत्न करतात. अशी सांगड घालण्याचा उद्योग अतिसुरक्षित आयुष्य
जगणार्‍या व्यक्तीच्या बाबत बर्‍याचवेळा फसतो. कारण त्यांच्या आयुष्यात नवे
काही घडायची शक्यता फारच थोडी असते. भरभराटीचे योग असणार्‍या सर्वच व्यक्तींची
भरभराट होताना दिसत नाही याचे कारण या स्पष्टीकरणात सापडेल. म्हणूनच ज्योतिष
अनिश्चितता असेल तेव्हाच पहावे.

ज्योतिषाचे निंदक विकृत बुद्धिवादाची इस्त्री सर्वसामान्य माणसाच्या मनावरून
फिरवून परिटघडीचा समाज बनवू इच्छितात काय़? बरं, हा बुद्धिवाद शाश्वत समाधानाची
हमी प्रत्येक प्रयत्नवादी व्यक्तीला देइल याची खात्री कोणीच देत नाही. तसे
असल्यास दूसरा एक प्रश्न उपस्थित होतो. निसर्गाने अशा बुद्धिवादाने मिळणारे
'समाधान' पचविण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिले आहे काय? तशा चाचण्या
किंवा संशोधन झाले असल्यास मी त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सूक आहे.

मूळ स्रोत - http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/11/blog-post_26.html

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

6 Sep 2009 - 12:54 pm | नितिन थत्ते

विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा/वैज्ञानिक दृष्टीकोन/बुद्धीवाद यात गल्लत होते आहे.

विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही या वाक्याचा अर्थ विज्ञान सामाजिक प्रश्नांवरची थेट उत्तरे देत नाही असा आहे. ती उत्तरे विज्ञानाने शोधून काढलेल्या फॅक्ट्सचा विचार करून समाजाने शोधायची असतात.

विज्ञाननिष्ठा किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे गेल्या अनेक शतकांतून
विविध शोध लागत असताना ते शोध लागण्याच्या आणि ते तपासून पाहण्याच्या प्रक्रियेतून तयार होत गेलेली विचार आणि विश्लेषणाची पद्धत आहे.

विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही हे तात्पुरते मान्य केल्यावरही वैज्ञानिक दृष्टीकोनातून कोणत्याही हायपोथेसिसचा स्वीकार कोणत्या पायावर/निकषांवर करावा हे समजते.

आपण डाउनिंग बाईंचे चक्रीय मॉडेल लिहिले आहे ते सुद्धा एक हायपोथेसिस समजायला कोणाचीच हरकत असणार नाही पण ते बरोबर/खरे/ग्राह्य आहे असे स्वीकृत होण्यास विज्ञाननिष्ठा या स्वरूपात अस्तित्वात असलेले निकषच वापरायला लागतील.

ते स्वीकृत होईपर्यंत त्यावर वाद चालू राहतील. बहुतेकवेळा त्यावरील बुद्धीवाद्यांची प्रतिक्रिया शर्तिया इलाज करणार्‍या भोंदू डॉक्टरांबाबत असलेल्या प्रतिक्रियेसारखीच असेल.

आजच्या प्रगत भौतिकशास्त्रातील अनेक शोधनिबंधातून सामान्यांना काही कळत नाही तरी त्या क्षेत्रातील तज्ञांना ते कळते (असे वाटते). आणि त्यांच्यातील वादविवाद हायपोथेसिसच्या तपासणीसाठी केल्या जाणार्‍या प्रयोगांतील निरीक्षणांच्या व निष्कर्षांच्या बाबत असते. ज्योतिष्यांच्या परिषदांमध्ये किंवा कुठल्याही फोरममध्ये अशा स्वरूपाचे वादविवाद होत नाहीत असे वाटते. उदा*. चंद्र व मंगळ अमुक स्थानात असतील तर तमुक परिणाम दिसतो. हे गृहीतक घेऊन माझ्याकडे आलेल्या अशा पाच पत्रिकांपैकी चारांच्या बाबतीत हा परिणाम झालेला निश्चित दिसला- हा त्यांचा विदा- असे एक ज्योतिषी म्हणतोय. तसेच दुसरा ज्योतिषीही सांगतोय. किंवा हायपोथेसिस मांडणार्‍या ज्योतिष्याने इतर ज्योतिष्यांबरोबर समन्वय साधून असा हजारो केसेसचा विदा मांडला आहे आणी तो इतर ज्योतिष्यांना (किंवा कुणालाही) तपासायला खुला आहे असे चित्र दिसत नाही.

*उदाहरण पूर्ण काल्पनिक

बाकी तुम्ही म्हणता तसा फरक चांभाराच्या आयुष्यात पडत नाही हे खरेच असते. म्हणूनच चांद्रयानाच्या मोहिमेवर खर्च करावा किंवा बीबियाण्यावर संशोधन करावे हे वैज्ञानिकांना समाजाला पटवावे लागते. तसाच समाजाश्रय ज्योतिषांना मिळू शकतो. पण ज्योतिष्यांना संशोधनच करायचे नाहीये. (म्हणजे संशोधन करू इच्छितो असे मी कुठल्याही ज्योतिष्याच्या किंवा समर्थकाच्या लेखनात कधीही वाचले नाही).

ज्योतिषाला पूर्वी मान्यता होती (अजून बर्‍याच प्रमाणात आहे) तिला चॅलेंज होत आहे. ज्योतिष हेही 'जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय' अशाच स्वरूपाचे आहे असे बुद्धिवादी सांगत आहेत. ती पूर्वीची मान्यता नव्या निकषांवर न तपासताच टिकून रहावी असा ज्योतिष्यांचा हट्ट आहे.

>>निसर्गाने अशा बुद्धिवादाने मिळणारे' समाधान' पचविण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिले आहे काय? तशा चाचण्या किंवा संशोधन झाले असल्यास मी त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सूक आहे.

असे 'समाधान' मिळत असल्याचा क्लेम/हायपोथेसिस हा अध्यात्मवाद्यांचा प्रांत आहे, बुद्धिवाद्यांचा नाही. त्यामुळे चाचण्याघेतल्या असण्याचा प्रश्न नाही.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

युयुत्सु's picture

6 Sep 2009 - 4:38 pm | युयुत्सु

पण ज्योतिष्यांना संशोधनच करायचे नाहीये. (म्हणजे संशोधन करू इच्छितो असे मी कुठल्याही ज्योतिष्याच्या किंवा समर्थकाच्या लेखनात कधीही वाचले नाही).

पुनरावृत्तीचा दोष पत्करून परत सांगतो आधुनिक ज्योतिषांना संशोधनाची अ‍ॅलर्जी नाही. मी याची असंख्य उदाहरणं देउ शकेन. Astrodatabank या प्रसिद्ध सॉफ्ट्वेअरची निर्मिती त्याकरताच झाली. अशी आणखी दोन साधने पाश्चात्य ज्योतिषी वापरतात.

भारतात भाबडे पणाचा पगडा जास्त असल्याने तसेच इतर अनेक कारणांनी संशोधन होत नसेल. पण संशोधनाविषयी/चिकित्से विषयी उत्सुकता दा़खवल्यास काय अनुभव येतो हे मी स्वतः अनुभवले आहे.

ज्योतिष हेही 'जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय' अशाच स्वरूपाचे आहे असे बुद्धिवादी सांगत आहेत. ती पूर्वीची मान्यता नव्या निकषांवर न तपासताच टिकून रहावी असा ज्योतिष्यांचा हट्ट आहे.

ही आपली विधाने मला खोडसाळपणे केलेली वाटतात. ज्योतिषांचे म्हणणे एवढेच आहे की जे काय करायचे आहे ते त्यांना विश्वासात घेऊन करा. Astrology should be tested within its scope and not outside it. हा स्कोप चिकित्सक परस्पर ठरवू शकणार नाहीत. उदा. मी जर असं विधान केलं की मी पत्रिकेच्या मदतीने व्यक्ती कोट्यधिश होईल की नाही हे सांगू शकतो. तर आणि तरच माझ्या दाव्याची सत्यता आपल्याला वैज्ञानिक कसोट्या वापरून तपासता येईल. पण जर तुम्ही मला एखादी पत्रिका दाखवून ती जिवंत अथवा मृत व्यक्तीची विचारलीत तर ती तपासणी outside the scope ठरेल. कारण मी तसा दावा केलेला नाही. सध्या अनिस घालत असलेल्या गोंधळात हीच मोठी गल्लत आहे की ते scope योग्य त-हेने निश्चित न करता चिकित्सा करायला आणि आह्वाने द्यायला निघाले आहेत.

असे 'समाधान' मिळत असल्याचा क्लेम/हायपोथेसिस हा अध्यात्मवाद्यांचा प्रांत आहे, बुद्धिवाद्यांचा नाही.

हे वाक्य वाचून मात्र बरीच करमणूक झाली...

दशानन's picture

6 Sep 2009 - 5:05 pm | दशानन

विकृत बुद्धिवाद म्हणजे काय वो :?

युयुत्सु's picture

6 Sep 2009 - 6:41 pm | युयुत्सु

खोडसाळ आह्वाने, प्रचार करून लादलेला बुद्धीवाद म्हणजे विकृत बुद्धीवाद.

दशानन's picture

6 Sep 2009 - 6:43 pm | दशानन

>>खोडसाळ आह्वाने

पण मी तुम्हाला दिलेले आवाहन... खरोखर मनापासून दिले होते :)

प्रभाकर पेठकर's picture

6 Sep 2009 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर

"विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही".

मला असे वाटत नाही. आज वैद्यक शास्त्र इतके पुढे गेले आहे की पुर्वीच्या काळाच्या तुलनेत ते नक्कीच जगण्याचे बळ देते. नैसर्गिक आपत्तीतही जगण्यासाठी विज्ञानाची मदत होते. हवामानाचे अंदाज, समुद्रातील वादळे, शेतीसाठी लागणारी खते, कातडे कमावण्याची आधुनिक साधने-पद्धती, चहाच्या विविध जाती आणि गायी-म्हशींच्या दुधातील स्निग्धांश मोजणी तसेच शीत टाक्यांमधून दूधाचे वहन आदींचा फायदा सर्वांना होतोच. (अगदी चांभाराला आणि चहाच्या टपरीवाल्यालाही.)

माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही.

वरील दोन गोष्टी म्हणजेच फक्त विज्ञान असे नाही. विज्ञानाचा आवाका कल्पनेबाहेर आहे. आगीच्या शोधापासून आणि चक्राच्या शोधानेही सर्वसामान्यांना भरपूर फायदा झाला आहे. होतो आहे आणि होत राहील.
महासंगणकांच्या विक्रितून, उपग्रह अवकाशात सोडण्यापासून देशाला जो आर्थिक लाभ होईल तो लाभ समाजातल्या तळातल्या वर्गापर्यंत झिरपेलही (निदान तो तसा झिरपावा).

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

दशानन's picture

6 Sep 2009 - 5:14 pm | दशानन

+१ काका..

हेच म्हणतो आहे.. मी पण !

पण नाडीमध्ये फसलेले व चार रेघामारुन ग्रहांचा खेळ मांडणा-यांना ह्याच्याशी काय देणे घेणे... त्यांचे दुकान चालू राहिले की बस .... ते खुष !

प्रभाकर पेठकर's picture

6 Sep 2009 - 5:20 pm | प्रभाकर पेठकर

भविष्य जरूर पाहावे. पण त्यावर अवलंबून राहू नये.
दररोज घडणार्‍या, विस्मयचकित करणार्‍या घटना पाहून भविष्यात डोकावण्याची उत्सुकता अनेकांना असते. त्यात मला तरी काही गैर वाटत नाही.
पण भविष्य पाहण्याला करमणूकी पलिकडे जास्त महत्त्व देऊ नये. असे मला वाटते.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2009 - 5:41 pm | बिपिन कार्यकर्ते

"विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही".

मला वाटते युयुत्सुना जे म्हणायचे होते आणि तुम्ही जो अर्थ काढला आहे त्यात काही तरी गफलत होते आहे. त्यांना एक मानसिक बळ आधार असा अर्थ अपेक्षित असावा, तुम्ही शारिरीक दृष्टीने विचार करता आहात. असो. अजून लेख नीट वाचला नाहीये. त्यामुळे बाकी काहीच लिहित नाही.

बिपिन कार्यकर्ते

प्रभाकर पेठकर's picture

6 Sep 2009 - 5:46 pm | प्रभाकर पेठकर

नाही बिपिन,

योग्य तोच अर्थ घेतला आहे. विज्ञानाच्या विविध शोधांमुळे जीवनात जी सुरक्षितता आपण अनुभवतो आहोत ती सुरक्षितता मानसिक बळही वाढवते.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Sep 2009 - 5:55 pm | बिपिन कार्यकर्ते

इथे फक्त जीवन आणि मृत्युच्या बाबतीतली सुरक्षितता असा अर्थ नाहीये. सामान्य आयुष्यात वावरताना ज्या अडिअडचणी येतात त्यावर मात करायला बळ लागते, आधार लागतो... लढायला मानसिक उत्तेजन हवे असते ... त्या अर्थाने हे चालले आहे. मानसिक खच्ची झालेल्या अवस्थेत विज्ञान नव्हे तर ज्योतिषासारखे स्युडो का होईना पण उपाय एक प्रकारचे मानसिक बळ देते.

(उगाचच कुसुमाग्रजांची 'पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा' ही ओळ आठवली.)

बिपिन कार्यकर्ते

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2009 - 10:51 am | प्रभाकर पेठकर

इथे फक्त जीवन आणि मृत्युच्या बाबतीतली सुरक्षितता असा अर्थ नाहीये.

बिपिन,
मलातरी सर्वात जास्त तिच सुरक्षितता महत्त्वाची वाटते.
बाकी तू म्हणतोस तशा बारीक सारीक सुरक्षितता वाचनातून, विचार विनिमयातून मानसिक परिपक्वता येते त्यातून लाभते. दैनंदिन जीवनातील अडीअडचणी बद्दल एक दोन उदाहरणातून असे सांगावेसे वाटते की मी परदेशात असताना माझ्या आप्तस्वकियांबद्दल वाटणारी काळजी त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलून कमी व्हायची. माझे वडील हॉस्पिटलात शेवटची घटका मोजत असताना ३ तासात मी १६०० किमी.चा प्रवास करून त्यांना भेटायला येऊ शकलो. परीक्षेची भिती मनात असताना छपाई शास्त्राच्या आधारे छापलेल्या पुस्तकांवरून अभ्यास करून त्या भितीवर मी विजय मिळवला. (हल्ली माझा मुलगा संगणकावरून माहिती मिळवतो). अनेक उदाहरणे देता येतील.

माझ्या पाहण्यातला चहाचा टपरीवाला (नेहमी खूष असतो) राजस्थानात त्याच्या आई-वडीलांशी मोबाईलवर बोलतो. दुकानात लावलेल्या ट्रांझिस्टरवर गाणी ऐकून मन प्रसन्न राखतो. बातम्या ऐकून राजकारणावर भाष्य करतो.
चांभार, 'गावकडे यंदा पाऊस झाला नाही, दूसरं पिक (कमी पाण्याचं) घ्यावं म्हणतोय.' हे पेपर वाचून सांगतो. पोरांचं शिक्षण गावापेक्षा इथे शहरात चांगलं होतय म्हणतो. त्याच्या गावच्या शाळेत एवढ्या सोयी सुविधा नाहित. 'पोरं टीव्ही बघून माझ्या पेक्षाही हुशार झाली आहेत' असे म्हणताना असा ठ्ठो करून हसतो की त्याच्या डोळ्यात पाणीच येत.

असो. वाद घालायचा नाही मला. पण मला असं वाटतं विज्ञानाने सर्वसामान्यांचा बराच फायदा झाला आहे.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अवलिया's picture

6 Sep 2009 - 6:21 pm | अवलिया

बिपीनदाशी सहमत आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभाकर पेठकर's picture

6 Sep 2009 - 6:29 pm | प्रभाकर पेठकर

(उगाचच कुसुमाग्रजांची 'पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा' ही ओळ आठवली.)

मान्य. मानसिक आधार फार महत्त्वाचा. तो अमान्य नाहीच. पण माझा वाद हा 'विज्ञानाचा सर्वसामान्यांना (चांभार आणि चहाचा टपरीवाला) काही उपयोग नाही.' ह्या मुद्यापर्यंत सिमीत आहे.
मानसिक बळ, आधार हा लागतोच. त्याला ज्योतिष शास्त्रच हवे असे नाही. घरातील प्रेमळ व्यक्ती (आई, वडील, बहिण, भाऊ, बायको, मुले, मित्र) असे अनेक जणं अनेक प्रसंगात आधारभूत होतात आणि लढण्यासाठी बळ मिळते. एखाद्याला ज्योतिष शास्त्रातून तो आधार मिळत असेल तर माझा काहीच आक्षेप नाही. अंधविश्वास नसावा एवढीच नम्र विनंती.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

युयुत्सु's picture

7 Sep 2009 - 10:59 am | युयुत्सु

चतुरंग, बिपिन आणि नितिन थत्ते यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यांच्या प्रतिसादाबद्दल आभार.

अनिस च्या चिकित्सेच्या उद्योगातील फोलपणा मी दाखवून दिला त्याबद्दल कुणिच फारसे भाष्य केले नाही, हे मात्र खटकले.

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2009 - 1:55 pm | प्रभाकर पेठकर

चतुरंग, बिपिन आणि नितिन थत्ते यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यांच्या प्रतिसादाबद्दल आभार.

नसेल कळले आम्हाला. नीट समजावून सांगाल अशी अपेक्षा होती. कि इतक्या बाळबोध स्तरावर हा विषय समजावणे शक्य नाही? असो.

ज्यांना समजले त्यांच्या (आणि फक्त त्यांच्याच) प्रतिसादांबद्दल आभार?
आभारासाठी हपापलेला नसलो तरी कुठेतरी ही गोष्ट खटकली. ते ही असो.

चतुरंग, बिपिन किंवा नितिन थत्ते ह्यांची भेट घेवून विषय त्यांच्याकडून नीट समजून घ्यायचा प्रयत्न करीन.

मझ्या बाष्फळ प्रतिसादांनी तुमचा अमुल्य वेळ वाया घालविल्या बद्दल क्षमस्व.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अमोल केळकर's picture

7 Sep 2009 - 4:18 pm | अमोल केळकर

सहमत
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

युयुत्सु's picture

7 Sep 2009 - 6:15 pm | युयुत्सु

कुणाशी सहमत माझ्याशी की पेठकरांशी...

युयुत्सु's picture

7 Sep 2009 - 10:21 am | युयुत्सु

आज वैद्यक शास्त्र इतके पुढे गेले आहे की पुर्वीच्या काळाच्या तुलनेत ते नक्कीच जगण्याचे बळ देते.

भारतापुरते तरी मी हे खरे मानणार नाही. अमेरीकेत iatrogenic cause of death is third leading cause of death असा दावा करणारा शोधनिबंध JAMA या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला होतो. त्याने बरेच वादळ पण उठले होते. भारतात iatrogenic cause of death will probably be first leading cause of death. कारण माणसाच्या जीवाची किंमत येथे जीव गेला तरीही कळत नाही. आपत्ती नियोजनाचे निघणारे धिंडवडे हा त्याचा पुरेसा पुरावा आहे...

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2009 - 1:45 pm | प्रभाकर पेठकर

टोकाच्या उदाहरणांचे सामान्यिकरण होत आहे असे वाटते. माझ्या प्रतिसादातील 'पुर्वीच्या काळाच्या तुलनेत ' ही शब्द योजना लक्षात घेतलेली दिसत नाही.
पुर्वी कुत्रा चावल्यावर १४ इंजेक्षने घ्यावी लागत होती. हल्ली ३ इंजेक्षनात भागते असे ऐकले आहे. (अनुभव नाही).
पुर्वी प्लेग, नारू, पटकी, मुदतीचा ताप, देवी, गोवर, क्षय आदी आजार महाभयंकर होते हल्ली परिस्थिती बदलली आहेसे ऐकतो. (अनुभव नाही.)

पुर्वी लहानसहान शस्त्रक्रियांसाठी क्लोरोफॉर्म देऊन रुग्णाला २-३ तास झोपवून ठेवायचे. हल्ली रुग्ण स्वतःचे ऑपरेशन स्वतः पाहू शकतो. (मर्यादीत स्वरूपात का होईना. पण त्याचाही अनुभव नाही.)

हल्ली महारोगही बरा करतात म्हणे. (अनुभव नाही).

पॅनक्रियावरील गाठीचे जगात २६ रुग्ण नोंदविलेले आहेत. सर्वांची शस्त्रक्रिया पोट फाडून केली आहे. (हा खुप मोठा कट असतो. त्याला 'पोस्टमॉर्टेम कट' असे डॉक्टरांच्या परिभाषेत म्हणतात.) भारतात हि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली गेली. रूग्ण मी स्वतः होतो. ती जगतली पहिली शस्त्रक्रिया होती असे डॉक्टरांनी मला सांगितले. इन्टरनेटवरही असा रेकॉर्ड मला सापडला नाही. सर्व शस्त्रक्रिया पारंपारिक पद्धतीनेच केल्याचे आढळले. असो. (माझा अनुभव बाकी एवढाच.)

वैद्यक शास्त्र पुढे गेले आहे असे म्हणताना मी वैद्यकशास्त्राच्या जुन्या प्रणालींची तुलना आजच्या प्रणालींशी केली आहे. भारतातील वैद्यक प्रणालींची तुलना अमेरिकेतल्या वैद्यक प्रणालींशी केलेली नाही. अमेरिकेतील वैद्यकशास्त्राचा, प्रणालींचा अनुभव नाही, क्षमा असावी.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

आपल्या सल्लावजा स्वाक्षरीत वैज्ञानिक संशोधनावर आधारीत बदल सूचवू इच्छितो...

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत मनातल्या मनात शिका

मनातल्यामनात केलेल्या व्यायामाचे पण प्रत्यक्ष फायदे मिळतात असं संशोधन काही दिवसापूर्वी वाचनात आले होते.

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2009 - 1:25 pm | प्रभाकर पेठकर

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिक

ते 'शिक' असे नसून 'शिका' असे आहे.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत मनातल्या मनात शिका

'मनातल्या मनात काय शिकू?'

विषयाला सोडून असलेले प्रतिसाद 'व्यनि' त किंवा 'खरडवहीत' टाकावेत.

धन्यवाद.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अजुन कच्चाच आहे's picture

6 Sep 2009 - 5:33 pm | अजुन कच्चाच आहे

माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही

प्रभाकर पेठकरांप्रमाणे मीही हेच म्हणतो की वरील दोन गोष्टी म्हणजेच फक्त विज्ञान असे नाही

आणि विज्ञानाचा फायदाच म्हणाल तर कातडे कमावणे आणी चहासाठी चुली ऐवजी गॅस वापरणे हे विज्ञानानेच शक्य झाले नाही का?

Astrology should be tested within its scope and not outside it. हा स्कोप चिकित्सक परस्पर ठरवू शकणार नाहीत

हे पटले पण मग असा स्कोप डिफाइन करण्यासाठी काही फलज्योतीष्यांनी पुढाकार का घेऊ नये?
कि इथेही 'आम्हास असे करण्याची गरज भासत नाही' सारखे प्रतिसाद येणार ?
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि
नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही.


निदान त्याच्या कडे आता वापरायला मोबाईल आल असेल. पुर्वी भेसळयुक्त दुधाचा चहा तुम्हाला पाजत असेल, निदान आता तुम्हाला पाश्चराईज्ड ज्यादा फॅट असलेल्या दुधाचा चहा पाजत असेल्.तसेच चांभारमामा पुर्वी टाका मारुन देत असत ते आजकाल अडेसिव्ह वापरुन चप्पल व बुट सांधवुन देत असतील. हा बद्दल विज्ञानाचा आहे.
आजकाल एकवेळ ज्योतीष्याशिवाय जगता येईल पण विज्ञान व त्याचे शोध नसतील जगणे मुश्किल होईल.
वेताळ

मनुष्य जमातीचा एक मोठा घटक (ज्याला आपण 'नाही रे' वर्ग म्हणून संबोधतो ) अजूनही वैज्ञानिक प्रगती पासून दूर आहे आणि तरीही निसर्गाशी संतुलन राखल्यामुळे समाधानी जीवन जगतो.

अमृतांजन's picture

7 Sep 2009 - 7:43 pm | अमृतांजन

बाबा आमटे, प्रकाष आमटे, अभय बंग आदि मंडळी व त्यांच्या संस्था त्याच आदिवासींच्या पाड्यावर जाऊन सेवा करतात; ते का बरं?

वैज्ञानिक प्रगतीचा ज्यांना राग आहे, आकस आहे त्यांनी हे बंद करावे-

नोटा, नाणी वगैरे पैसा व्यवहारात वापरु नये
मेडीकल हॉस्पिटलमधे जाऊ नये
बस वगैरे वाहनांचा वापर, फोन, गॅस, कुकर, नळातून आलेले पाणी, सिमेंट कॉन्क्रीटची घरे, साबण, बादल्या, इंटरनेट, टिव्ही, लिफ़्ट, चष्मा वगैरे वापरु नये.
मशिनने शिवलेले कपडे, मशिनने तयार केलेले कपडे वापरु नयेत
छपाई यंत्रावर छापलेले पुस्तक, पेपर, वापरु नये
मेणबत्त्या, वीज वापरु नये
भाजी, फळे, धान्य शेतातूनच आणावे, दुधासाठी गायी-म्हशी पाळाव्या, तसेच धान्य गिरणीतून दळून आणू नये
बसायला खूर्च्या, जेवायची ताटे/वाट्या/चमचे आदि भांडी वापरु नयेत
घराला लोखंडी खिडक्या, काचा बसवू नयेत
चहा पिऊ नये, रिफाईंड तेल वापरु नये

नितिन थत्ते's picture

7 Sep 2009 - 10:19 pm | नितिन थत्ते

वैज्ञानिक प्रगतीपासून दूर असलेला नाही रे वर्ग समाधानी जीवन जगतो हा क्लेम भयानक म्हणावा लागेल.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

जास्त काही बोलत नाही.

चतुरंग

सखाराम_गटणे™'s picture

8 Sep 2009 - 9:31 am | सखाराम_गटणे™

वैज्ञानिक प्रगतीपासून दूर असलेला नाही रे वर्ग समाधानी जीवन जगतो हा क्लेम भयानक म्हणावा लागेल.

त्यांना अति रेकी वैज्ञानिक प्रगती म्हणायचे असावे ;)

सखाराम_गटणे™'s picture

8 Sep 2009 - 9:31 am | सखाराम_गटणे™

वैज्ञानिक प्रगतीपासून दूर असलेला नाही रे वर्ग समाधानी जीवन जगतो हा क्लेम भयानक म्हणावा लागेल.

त्यांना अति रेकी वैज्ञानिक प्रगती म्हणायचे असावे :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Sep 2009 - 9:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवाय वैज्ञानिक प्रगती आणि त्यानुषांगिक येणारा पैसा, प्रगती तळागाळापर्यंत पोहोचणे या दोन संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गेली किती वर्ष आपल्याकडे शिक्षणसंस्था आहेत तरीही निरक्षर लोकंही आहेतच ना?

संशोधन हा पाया असला तरीही त्याची फळं गोरगरीबांपर्यंत पोहोचवणं हे राजकारणी आणि नोकरशहांचं काम आहे. ते होतं का नाही हे पहाण्याऐवजी संशोधनालाच का झोडपतात? हे म्हणजे साप सोडून भुई धोपटणं आहे.

अदिती

हा क्लेम भयानक म्हणावा लागेल.

एखाद्या मानववंश शास्त्रज्ञाने सकारण आक्षेप घेतला तरच मी याबाबत विचार करीन.

अवलिया's picture

9 Sep 2009 - 9:26 am | अवलिया

एखाद्या मानववंश शास्त्रज्ञाने सकारण आक्षेप घेतला तरच मी याबाबत विचार करीन.

+++++१
याबाबतीत युयुत्सुरावांशी सहमत.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे's picture

6 Sep 2009 - 7:49 pm | सुधीर काळे

ज्योतिष्यशास्त्र हे अविकसित संख्याशास्त्र आहे व आज बाल्यावस्थेत आहे हे माझे ठाम मत पुन्हा-पुन्हा सांगायचा मला कंटाळा आला आहे. आपले विरोधी अभिप्राय वाचून लेखकाला या विषयावर लिहायला आणखी चेव येतो व परिणामी आपल्याला उगीच पुन्हा विरोध केल्याशिवाय रहावत नाही. म्हणून या पुढे माझा अभिप्राय फक्त पू. अ. असा असेल (पूर्णपणे असहमत).
यावर लेखकाने उत्तर लिहिल्यास त्याला उत्तर दिले जाणार नाहीं.
हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. इतर सभासदांना माझा तसा किंवा इतरही काहीही सल्ला नाही!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

प्रा.जोगांनी ज्या लेखाचा उल्लेख केलाय त्यातले हे एकच वाक्य असे अधांतरी वाचून अर्थबोध होणे अवघड आहे. तरिही काय म्हणायचे असेल हे समजून घ्यायचा प्रयत्न करु.
"विज्ञान एका विशिष्ठ मर्यादेपलीकडे माणसाला जगण्याचे बळ देत नाही" हे जास्त संयुक्तिक वाटते. विज्ञानाच्या प्रगतीने आपल्या सर्वांच्याच आयुष्यात जो अमूलाग्र बदल झालेला आहे तो नाकारण्यात काहीच अर्थ नाहीये. (वरती पेठकर काकांनी उदाहरणे दिली आहेत त्यामुळे पुन्हा त्यात पडत नाही.) असा बदल होत असताना चांगला आणी वाईट असा दोन्ही प्रकारचा झालाय हेही आपण मान्य करायला हवे.
आता मुद्दा जगण्याचे बळ कुठून येते हा आहे. विज्ञानाच्या बळावर निसर्गाशी फारकत घेणे, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रयत्नात माणसाला आपल्या सीमा त्याच्या लक्षात यायला सुरुवात झाली. माणूस आणी विज्ञान हे निसर्गचक्राचा एक भाग आहेत, ते निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाहीत ही जाणीव जर स्पष्ट असेल तर जगण्याचे बळ हरवण्याचे कारण नाही. माणसामाणसातला दुवा हा जगण्याचा मूलाधार आहे, विज्ञान नाही. एकमेकांना समजून घेणं, प्रेम करणं, संवाद साधता येणं हे तुमच्या आमच्या आयुष्याचे स्रोत आहेत. विज्ञानाने ह्या मूळ स्रोतांना बळकटी येत असेल तर ते उपयुक्त ठरते.

प्रकाश आमटेंच्या 'प्रकाशवाटा' ह्या पुस्तकाचा उल्लेख इथे करावासा वाटतो. माडिया गोंड लोकात जाऊन त्यांचे आयुष्य सुधारताना आधी ते आणी त्यांचे सहकारी तिथे जाऊन राहिले. अपरिमित अडचणींचा सामना केला (हे खरंतर फारच अंडरस्टेटमेंट ठरावं हे पुस्तक वाचल्यावर कळतं, पण माझं शब्ददारिद्र्य आहे.) पण हे करताना ते माणूसपण विसरले नाहीत. विज्ञानाने बहाल केलेले वैद्यकीय ज्ञान वापरताना गोंड लोकांशी आधी माणुसकीची नाळ त्यांनी जोडून ठेवली मजबूत केली. त्यांना त्यांच्या मुळांपासून उखडून न टाकता नवे विचार हळूहळू कसे रुजवता येतील ह्यावर प्रयत्न केले. विज्ञान आणि त्याचे फायदे हे दुसर्‍या पायरीवर ठेवले. त्याआधी कै. बाबा आमट्यांना आलेल्या अडचणी तर त्यांनी जवळून पाहिलेल्या होत्या, त्यामुळे तर त्यांचं जगण्याचं बळ तर कितीदा तरी हरवून जायला हवं होतं पण तसं झालं नाही. उलट पहिल्यासारखाच कठिण असा नवीन प्रकल्प हाती घेऊन त्यांनी तो यशस्वी केला कारण माणूसपण हा त्यांचा जीवनाचा स्रोत आहे. माणुसकी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती ह्या द्वयींच्या बाळकडूवरच आमटे कुटुंबीय वाढलेले आहेत त्यामुळे हे कार्य त्यांनी यशस्वीपणे पेललं.

प्रत्येक माणसाने त्याच्या जवळच्या, संबंधातल्या व्यक्तींशी जरी खर्‍या अर्थाने चांगले संबंध ठेवले (बेगडी मुखवटे चढवून नव्हे) तरीही जीवनेच्छा शाबूत राहते. फक्त छानछान गोष्टी एकमेकाला सांगत राहणे आणी दु:खाचा, त्रासाचा विषय निघाला की काढता पाय घेणे ह्या बेगडी जीवनशैलीतून विकार उत्पन्न होतात. समोरच्या माणसाचे दु:ख ऐकून घेऊन त्याला निम्मे बरे वाटत असते. आनंद वाटला तर गुणित होतो, दु:ख वाटलं तर विभागलं जातं असं म्हणतात ते ह्यामुळेच. केव़ळ भौतिक प्रगती ही माणसाला जगण्याचं बळ देत नाही हे नक्की कारण तसे असते तर भौतिक समृद्धीने युक्त असलेल्या जगात युद्धे, डिप्रेशन आणी आत्महत्या कमी व्हायला हव्यात, भकासपण, रितेपण हे आयुष्याच्या चाळिशीपासून मागे लागायला नको पण तसं होत नाही आणी ते का होत नाही हे सुद्धा लक्षात येत नाही. अधिक भौतिक सुख हे त्यावर मात करील असे वाटत राहते आणी माणसे धावत राहतात. खरंतर थोडं थांबायला हवं, जास्त धावताना आपण नेमके कुठे जातोय, निसर्गाच्या जवळ की लांब हे एकदा पहायला हवं. इतर कोणी तसं का करत नाहीत असं वाटलं तरी स्वत:शी प्रामाणिक रहायला हवं, आपल्याला आतून जे योग्य वाटेल त्या तत्वाशी घट्ट रहायला हवं. तर समाधान हरवत नाही.

युयुत्सूंनी मांडलेला आणखी एक मुद्दा अनिश्चिततेचा आहे. तो मला फारच रंजक वाटतो. माझ्यामते अनिश्चितता हाही जगण्याच्या स्रोतांमधला एक मुख्य प्रवाह असतो/असायला हवा. खडबडीत रस्त्यावर गाडी जशी नीट चालत नाही तशी बर्फावरुनही चालत नाही. रस्ता आणी चाके ह्यात थोडे घर्षण हवे तरच वाहन घसरत नाही तसा हा अनिश्चिततेचा प्रकार असतो असे मला वाटते. अतिशय टोकाच्या अडचणींनी थकून माणसे हारतात, तसेच सगळ्याच गोष्टी ठरवून, शिजवून समोर आल्या तर त्यातला रस कमी होतो, आणि अति उपलब्धतेने माणसे इच्छाशक्ती गमावून बसून हारतात.
जगण्याच्या प्रक्रियेत थोडी धडपड, थोडी अनिश्चितता, थोडे यश, थोडे अपयश हे असायचेच. काही गोष्टी न मिळण्यातच दुसरे काही मिळवण्याची आकांक्षा दडलेली असते. प्रयत्नवाद जागा ठेवण्यासाठी गोष्टींच्या प्राप्तीतलं काठिण्य गरजेचं आहे. पण म्हणून फक्त दैववादी व्हाल तर तेही चूक आहे. भविष्य, पत्रिका, ग्रह, आडाखे ह्यावरच विसंबून रहाल तर निसर्गाशी प्रतारणा कराल. तुमचे जगणे तुम्ही जगत जा, स्वतःशी प्रामाणिक रहा, दिनक्रमात निसर्गचक्राला जितके चिकटून रहाता येईल तेवढे रहा तुमची मनाची शक्ती आपसूक टिकून रहाते असा अनुभव येईल.

चतुरंग

नितिन थत्ते's picture

6 Sep 2009 - 8:55 pm | नितिन थत्ते

>>आधुनिक ज्योतिषांना संशोधनाची अ‍ॅलर्जी नाही. मी याची असंख्य उदाहरणं देउ शकेन. Astrodatabank या प्रसिद्ध सॉफ्ट्वेअरची निर्मिती त्याकरताच झाली.

आपण सांगितलेले सॉफ्टवेअर काय आहे ते माहिती नाही पण नावावरून तरी ते विविध समजुतींचे संगणकावरील संकलन आणी त्या आधारे भविष्य कथन अशा स्वरूपाचे असावे (चू भू दे घे). तसे असेल तर त्यात संशोधन काहीच नाही. २+२ ही बेरीज कवड्या/मणी मोजून न करता संगणकावर केली म्हणजे गणितात संशोधन केले असे कुणि म्हणत नाही . त्याला फार तर संगणकातले संशोधन म्हणता येईल.

>>ज्योतिष्यांना विश्वासात घेऊन......
विश्वासात घ्यायला तयारी आहेच. त्यासाठी एक पाऊल पुढे टाकायला हवे. संख्याशास्त्रातील 'टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस'ची पद्धत मान्य नाही असे मात्र म्हणता येणार नाही.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

आपण सांगितलेले सॉफ्टवेअर काय आहे ते माहिती नाही पण नावावरून तरी ते विविध समजुतींचे संगणकावरील संकलन आणी त्या आधारे भविष्य कथन अशा स्वरूपाचे असावे (चू भू दे घे). तसे असेल तर त्यात संशोधन काहीच नाही. २+२ ही बेरीज कवड्या/मणी मोजून न करता संगणकावर केली म्हणजे गणितात संशोधन केले असे कुणि म्हणत नाही . त्याला फार तर संगणकातले संशोधन म्हणता येईल.

ही अर्धवट माहीतीवर केलेली विधाने असल्यामूळे मी त्याकडे दूर्लक्ष करू इच्छितो.

नितिन थत्ते's picture

7 Sep 2009 - 10:02 pm | नितिन थत्ते

चु भू दे घे असे प्रतिसादात म्हटलेच होते. त्यामुळे दुर्लक्ष करण्याऐवजी सॉफ्टवेअरचे स्वरूप काय आहे ते सांगितले असते तर बरे झाले असते.
गूगलल्यावर आढळले की बहुधा सर्वप्रकारच्या ग्रहांच्या माहितीचे संकलन केलेले असावे. भविष्य कथनाचे सॉफ्टवेअर नसावे. खुलासा केल्यास आम्हा अज्ञ लोकांच्या डोक्यत प्रकाश पडू शकेल.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

युयुत्सु's picture

9 Sep 2009 - 9:05 am | युयुत्सु

या सॉफ्टवेअरच्या मदतीने ज्योतिषात Stastistical research करता येतो.

तेन्नालीराम's picture

6 Sep 2009 - 9:16 pm | तेन्नालीराम

ते एक सुभाषीत आहे ना? एन केन प्रकारेन प्रसिधो पुरुशो भवेत! त्यातलाच प्रकार.
ते. रा.

खुसपट's picture

7 Sep 2009 - 10:15 pm | खुसपट

अगदी बरोबर . युयुत्सु यांना तेव्हढेच पाहिजे आहे. त्यांचे विषय प्रतिसादाशिवाय ( सर्व मिपाकरांनी ) सोडून दिले तरच तसले लिखाण थांबेल.
खुसपट ( राव )

अमृतांजन's picture

6 Sep 2009 - 9:34 pm | अमृतांजन

प्रत्येक व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळण्याचे काम त्या-त्या व्यावसायिकांवर असते.
एका मासिकात मी ऑगस्ट महिन्याचे भविश्य असे लिहिलेले वाचले, "साथीचे रोग बळावतील".

कोणत्या वर्षी पावसाळ्यात साथीचे रोग बळकावले नाहित आज पर्यंत? .........हे वाचून एवढेच म्हणावेसे वाटले- ग्रो-अप!

नितिन थत्ते's picture

6 Sep 2009 - 9:39 pm | नितिन थत्ते

>>मी जर असं विधान केलं की मी पत्रिकेच्या मदतीने व्यक्ती कोट्यधिश होईल की नाही हे सांगू शकतो.

चिकित्सा ही युयुत्सुंना अचूक भाकीत करता येते का? याची नसून युयुत्सु ज्या निकषांवर आधारून व्यक्ती कोट्याधीश होईल असे सांगत आहेत त्या निकषांची आहे. म्हणजे ते निकष ज्या पत्रिकेत पूर्ण होतात त्यांपैकी बहुतांश कोट्याधीश होतात/असतात या नियमाची चिकित्सा आहे. ज्योतिष्यांच्या जगातला हा व्यक्तिनिष्ठपणा हाही शास्त्र म्हणून मान्यता मिळण्यास अडसर आहे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

खुसपट's picture

7 Sep 2009 - 10:30 pm | खुसपट

नितिन,
ज्यांना ज्योतिष ह्या माध्यमाचा वापर करून पैसा मिळवायचा असतो तेच त्याच्या अचूकतेविषयी आणि म्हणूनच वादातीत उपयुक्ततेबद्दल तावातावाने बोलत व लिहीत असतात, मिळेल तिथे.युयुत्सु हे त्यातलेच आहेत. ... खुसपट

एकलव्य's picture

7 Sep 2009 - 9:41 am | एकलव्य

माझ्या देशाने पूर्वी महासंगणक तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही.

अगदी असाच प्रश्न मी शाळेत असताना एका शास्त्रज्ञांना विचारला होता. आता त्यांचे नाव विसरलो पण त्यांनी दिलेले उत्तराचा भावार्थ लक्षात आहे -

"अवकाशात झेपावणार्‍या यानांच्या निमित्त्याने धातूंचे मिश्रण, रबर/प्लॅस्टिक यांचा वापर यांवर प्रचंड संशोधन झाले. एकेक औंस वजनाचा विचार करायला हवा आणि त्याचबरोबर झीजही कमीतकमी व्हायला हवी या आणि अशा कसोट्यांवर पास झालेले चिवट पण हलके असे संमिश्र प्रयोगशाळेत या प्रक्रियेमध्ये तयार करण्यात आले. हे संमिश्र निव्वळ आंतराळयानांसाठी मर्यादित न राहता इतर विमाने, कार्स, खेळाडूंचे शूज अशा अनेकानेक ठिकाणी प्रोडक्शन मोडमध्ये आणण्यात आले. रस्त्यावरच्या चांभाराच्या आयुष्यात तर याने डायरेक्ट फरक पडलाच तसेच अनेक टपर्‍यांवरच्या चहालाही चांगली मागणी त्यामुळे आली."

चांभार आणि चहाच्या टपर्‍या यांच्यात आयुष्याची घडण्याची वर्षे गेल्यामुळे अगदी नक्की सांगू शकतो की कितीतरी जणांची आयुष्ये आज चांगल्या अर्थाने बदलली आहेत ती देशाने विज्ञानविषयी प्रगती केल्यामुळे आणि चिकित्सेला खतपाणी घातल्यामुळेच.

महासंगणक आणि चांद्रयान ही प्रतीके आहेत... खरी गम्मत आणि प्रगती आहे ती उगाच मुंड्या न डोलावता धडपड करून उत्तरे शोधून काढण्याचा किडा मनामध्ये वळवळण्यात.

- एकलव्य

निसर्गाचे जे नियम सप्रमाण आणि तर्कशुद्ध रीतीने सिद्ध झाले आहेत त्यांना मानणे म्हणजे विकृती? वा! भाई वा!!!
विज्ञान आणि तंत्रज्ञानातून निपजलेल्या रोजच्या उपयोगातल्या सर्व वस्तू ( वीज, नळाचे पाणी ते कागद- पेन्सिलीपासून संगणकापर्यंतची लेखनसामुग्री वगैरे असंख्य 'विकृत' गोष्टी आपण का वापरतो? त्याने कोणत्या सामान्य माणसाच्या जीवनात फरक पडलेला नाही?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

तर्कशुद्ध रीतीने सिद्ध झाले असले तरी त्यात निसर्गाला ओरबाडणे, इतरांवर लादणे या विकृत घटना असतातच. आपण जी वैज्ञानिक प्रगतीची भलावण करत आहात त्याच्या साठी भावी पिढ्या काय किंमत मोजणार आहेत याची कल्पना तुम्हाला दिसत नाही.

सखाराम_गटणे™'s picture

8 Sep 2009 - 9:34 am | सखाराम_गटणे™

>>तर्कशुद्ध रीतीने सिद्ध झाले असले तरी त्यात निसर्गाला ओरबाडणे, इतरांवर लादणे या विकृत घटना असतातच

काहीही सहमत नाही.
विज्ञानाचा उपयोग कसा करावा हे तुमच्या हातात आहे. सरसकट तुम्ही विकृती म्हणु शकत नाही.

विसुनाना's picture

7 Sep 2009 - 11:27 am | विसुनाना

समजा ज्योतिष हे १००% पारखलेले शास्त्र आहे.
त्याचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या व्यक्तीस जगातील सर्व घटनांचे भाकित करणे शक्य आहे आणि अशी सर्व भाकिते तंतोतंत बरोबर येणारच असतील तर-
घडू शकणार्‍या भविष्यकाळातील वाईट घटना बदलता येतील काय?
कशा?

दोन सकृतदर्शनी परस्पर विरोधी मते -
१. विधीलिखित कुणालाही चुकत नाही. : भविष्यात जे घडायचे ते घडणारच.
२. भविष्य पूर्णपणे अनिश्चित असते. : भविष्यात जे घडणार आहे त्याचे भाकित अचूक करताच येणार नाही.

एखादा ज्योतिषी समजा नेहमीच अचूक भविष्य वर्तवतो. त्याने वर्तवल्याप्रमाणे एक अत्यंत वाईट घटना भविष्यात घडणार आहे. तर तसे घडू नये म्हणून लोक प्रयत्न करतील. त्यामुळे ते भविष्य बदलेल. मग ते भविष्य भाकीत चूक ठरेल.

घडू शकणार्‍या भविष्यकाळातील वाईट घटना बदलता येतील काय?

या युक्तीवादातील गल्लत अशी -

माणसाच्या आयुष्यातील घटना दोन प्रकारच्या असतात -

यात पहिल्या प्रकारात जाणीवपूर्वक जोखिम पतकरून मनुष्य सहभागी होतो.

दूस-या प्रकारच्या घटनेत इच्छा असो वा नसो मनुष्य ओढला जातो.

१ल्या प्रकारच्या घटना टाळता येतात.

एखादा ज्योतिषी समजा नेहमीच अचूक भविष्य वर्तवतो. त्याने वर्तवल्याप्रमाणे एक अत्यंत वाईट घटना भविष्यात घडणार आहे. तर तसे घडू नये म्हणून लोक प्रयत्न करतील. त्यामुळे ते भविष्य बदलेल. मग ते भविष्य भाकीत चूक ठरेल.

इथे ज्योतिषाची उपयुक्तता हा कळीचा मुद्दा ठरतो. भविष्य वर्तवले म्हणून ते बदलण्याची संधी मिळाली. म्हणून ज्योतिषाचे तुम्ही आभार मानायला हवेत.

विसुनाना's picture

7 Sep 2009 - 12:29 pm | विसुनाना

यात पहिल्या प्रकारात जाणीवपूर्वक जोखिम पतकरून मनुष्य सहभागी होतो.

प्रत्यक्ष भगवंत (त्यातही पूर्णावतार) श्रीकृष्णच म्हणतात -
कर्मणि एव अधिकारः ते - मा फलेषु कदाचन|

कर्तुमकर्तुम सर्वशक्तीमान परमेश्वराचा पूर्णावतारच असे म्हणत आहे तर तिथे मर्त्य मानवांच्या भाकितांनुसार कोणत्याही कर्माचे फळ बदलता येईल असे कसे?

पुढे भगवान म्हणतात - कोणतेही कर्म फळाच्या अपेक्षेने करू नकोस आणि जे व्हायचे ते होईल म्हणून हातवर हात धरूनही बसू नकोस.

मग 'मी असे असे करणार आहे, त्याचे फळ मला काय मिळेल?' असा विचार करून ज्योतिषाला प्रश्न विचारणे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध नाही काय?

यातील मानसशास्त्राचा भाग महत्वाचा आहे. भविष्यकथनाने मिळणार्‍या पांगळ्या मानसिक आधारापेक्षा परमेश्वराने सांगितले आहे म्हणून कार्य करणे हे आद्य कर्तव्य आहे हा आध्यात्मिक-मानसशास्त्रीय आधार लोकांना पुरेसा का ठरू नये? त्यांनी भविष्यवेत्त्याकडे का धाव घ्यावी? याचाच अर्थ लोकांची श्रद्धा धेडगुजरी आहे. त्यांचा मर्त्य ज्योतिषावर विश्वास आहे पण ज्याच्या मर्जीने सर्व ग्रहगोल फिरतात त्या प्रत्यक्ष परमेश्वरावर नाही?

पर्नल नेने मराठे's picture

7 Sep 2009 - 11:39 am | पर्नल नेने मराठे

ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.

हे मात्र पटले.

चुचु

ए.चंद्रशेखर's picture

7 Sep 2009 - 1:20 pm | ए.चंद्रशेखर

भांग, दारू, चरस किंवा अल्प प्रमाणात बिडी तंबाखू हे जेवढे जीवनाला उपयुक्त आहेत तेवढीच उपयुक्तता भविष्यवाणीची असते. या सर्व गोष्टी काही कालासाठी मनुष्याला एक प्रकारचा दिलासा देतात.
चंद्रशेखर

JAGOMOHANPYARE's picture

7 Sep 2009 - 1:29 pm | JAGOMOHANPYARE

<<<<<<<<<<ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.>>>>>>>>>

फसवे वाक्य.......... :) हे वाक्य म्हणजे आपली गिर्‍हाईक वाढण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिन्ग आहे...........

पूर्वी राजे महाराजे, सरदार, धनिक लोक ज्योतिष जास्त बघत........ आजही राजकारणी, उद्योजक, सिनेमावाले... भविष्य, दगडधोन्डे, वास्तू, आकडे, स्पेलिन्ग बदलणे.. असल्या उचापती करत असतात.....

युयुत्सु's picture

7 Sep 2009 - 4:15 pm | युयुत्सु

फसवे वाक्य.......... Smile हे वाक्य म्हणजे आपली गिर्‍हाईक वाढण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिन्ग आहे...........

यात फसवं काय ब्लॅक मेलिंग काय आहे बुवा? स्पष्ट झाले नाही...

भारतात जन्मदर २३ प्रति हजारी आहे.

२००९ ची अंदाजे लोकसंख्या: 1,198,003,000 (http://en.wikipedia.org/wiki/India)

११९८००३०००/१०००= ११९८००३
११९८००३ * २३ = २,७५,५४,०६९ बालके प्रतिवर्ष भारतात जन्मतात (दोन कोटी, पंचाहत्तर लाख)
२,७५,५४,०६९/३६५= ७५, ४९० बालके प्रतिदिन भारतात जन्मतात
७५, ४९०/२४= ३१४५ बालके प्रतितास भारतात जन्मतात
५२ बालके प्रतिमिनिट भारतात जन्मतात

भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?

As of 2007, the average birth rate for the whole world is 20.3 per year per 1000 total population, which for a world population of 6.5 billion comes to 134 million babies per year.

वरील गणिताप्रमाणे जगभरात प्रतिमिनिट २५४ बालके जन्मतात; ह्या २५४ बालकांचे भविष्य सारखेच असते का?

भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?

ह्या २५४ बालकांचे भविष्य सारखेच असते का?

या दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही असे आहे.