दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला. परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटेरन्शिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. तो आरामशीर खुर्चीत बसला. आणि त्याच्या नजरे समोरून काही मिनिटा पुर्वी त्याने केलेली अवघड शस्त्रक्रिया त्याच्या नजरे समोर पुन्हा एकदा दिसू लागली...
लेबर रूममध्ये जिवाच्या आकांताने प्रसुती वेदना सहन करणारी स्त्री, डॉक्टराना मदत करण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या परिचारिका, आपला सीनियर डॉक्टर काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी त्याच्याकडे पाहणारी नुकतीच रुजू झालेली त्याची सहयोगी डॉक्टर निशा सारेच तणावाखाली होते. नाही म्हणायला क्षण दोन क्षण तोही तेव्हा विचलित झाला. नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार होती. कापाकापी करावी लागणार या जाणिवेमुळे त्याच्यातील संवेदनशील, हळवा अवी जागा झाला होता. पण ते तेव्हध्या पुरतंच. पुढच्याच क्षणी त्याच्यातला डॉक्टर जागा झाला होता. सारं चित्त समोरच्या स्त्रीवर, तिच्या पोटातील बाळाच्या आगमनावर एकाग्र झालं होतं. त्याने हॅण्ड ग्लॉव्ज चढवले. निशाला, परिचारिकाना आवश्यक त्या सूचना देऊन त्याने चेहर्यावर मास्क चढवला आणि शस्त्रक्रिया चालू झाली. सारं काही यन्त्रवत, जणू ती माणसं नसून नव्या युगातले यंत्र मानव होते. यथावकाश ती शस्त्रक्रिया पूर्ण झाली. त्या बाळाने या जगातला पहिला श्वास घेतला आणि अविनाश नेही निश्वास सोडला.
"डॉक्टर काय झालं ?" तो बाहेर पडताच त्या स्त्रीच्या नातेवाईकानी त्याच्याभोवती गर्दी करत विचारलं.
"मुलगा" समोरच्या लोकांच्या फुललेल्या चेहर्याकडे पाहत त्याने आपल्या केबिनची वाट धरली...
अवी अचानकपणे भानावर आला. नव्या जीवाचं या जगातील आगमन इतकं आनंददायी असतं, मग आपल्याला कसं काहीच वाटत नाही ? तो स्वताशीच हसला. ''वेडा आहेस तू... तुझ्यासारख्या प्रसुती तज्ञ कसं समजून घेणार हे सारं... रोज पाच सहा बाळ तुझं बोट धरून या जगात येतात. आणि तसंही तो इवलासा जीव, त्याची या जगाशी जमवून घेण्यासाठी चाललेली धडपड पाहून तुझ्या चेहर्यावर स्मीत उमटतच की...
सहजच त्याचं लक्ष भिंतीवरच्या हूकला अडकवलेल्या पांढर्या शुभ्रा एप्रन कडे गेलं. तो एकटक खिशातील स्थेटास्कोपकडे पाहत राहिला. 'आपण डॉक्टर व्हावी ही आपली लहानपणापासूनची इच्छा होती. रोगपीडितान्ची सेवा, डॉक्टर या शब्दाला समाजात असलेला मान, या क्षेत्रात मिळणारा पैसा हे सारं नंतरचं होतं. आपण डॉक्टर व्हावं ही इच्छा मनात घर करून राहण्याचं मुख्य कारण होतं, तेव्हा असलेलं स्टेथस्कोप आणि एप्रन यांचं आकर्षण... तो बेसीनजवळ आला. ओंजळीत पाणी घेऊन चेहरा आणि हात स्वच्छ धुतले. भिंतीवरील हुकाला अडकावलेल्या टर्किश टॉवेलने पुसले. आता अगदी मोकळं वाटत होतं. त्याने मस्त शिळ घातली... आपण दवाखान्यात आहोत याची पर्वा ना करता... एम बी बी एस, एम डी या सगळ्या पदव्यांपासून आता तो जणू अलिप्त झाला होता. आता तो होता फक्त अविनाश, अवी ...
इतक्यात दारावर हलेकेच टकटक झाली...
'कम इन...'
हातामध्ये चहाचा थर्मास घेऊन निशा आत आली. निशा त्याची सहयोगी डॉक्टर. नुकतीच एम डी होऊन दवाखान्यात रुजू झाली होती. तोही तसा फार वरिष्ठ नव्हता. एम डी होऊन फार तर दीड वर्ष झालं होतं. त्याच्या गुणवत्तेमुळे या नावाजलेल्या दवाखान्याने त्याला संधी दिली होती. डॉक्टर करणिकांचा सहाय्यक म्हणून तो काम करत होता. पुढे वर्षभराने डॉक्टर कर्निकानि जेव्हा दवाखाना सोडला, तेव्हा दवाखाण्याच्या व्यवस्थापनाने अविनाश्ला त्यांच्या जागी बसवलं होतं. इतर वरिष्ठ डॉक्टरानी आरडाओरडा केला पण अविनाशची गुणवत्ता, त्याचं कौशल्य वादातीत असल्यामुळे त्याना नमतं घ्यावं लागलं होतं. आणि तो प्रसुती विभागाचा प्रमुख झाला होता.
'निशा, एक विचारू ?'
'परवानगी कशाला हवी आहे ?'
'तू हे सारं का करतेस ?'
'मी समजले नाही डॉक्टर...'
'मला अस म्हणायचं आहे की, माझ्यासाठी चहा आणणं, माझ्या टेबलावरच्या फुलदानीत रोज ताजी फुलं ठेवणं. आणि या बदल्यात मी तुला काय देतो तर, तू चुकलीस की ओरडा...'
'डॉक्टर, तुम्ही माझ्यावर जे ओरडता ते मी शिकावं म्हणूनच ना ? आणि मीही जे करते आहे ते माझ्या वरिष्ठांसाठीच करते आहे, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. डॉक्टर, प्रसुती साठी आलेल्या स्त्रीला जेव्हा तुम्ही धीर देता, तेव्हा वाटतं की, अस धीर देणं एक स्त्री असूनही आपल्याला जमणार नाही.'
'निशा चुकतेस तू. मी कधीही तुला कनिष्ठ मानलं नाही. तुही माझ्यासारखीच डॉक्टर आहेस. लेबररूम मध्ये नर्स जेव्हा बाळाला माझ्या हातात देतात, तेव्हा मी त्या बाळाच्या कानात सांगतो, मोठा जरूर हो, नव्हे तू मोठा होशीलच. परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको'
'हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे डॉक्टर.'
शहाणी आहेस अशा अर्थाने अवीने निशाकडे पाहिलं आणि तिने दिलेल्या चहाचा पेला तोंडाला लावला...
प्रतिक्रिया
24 Feb 2008 - 8:58 am | विसोबा खेचर
लेबररूम मध्ये नर्स जेव्हा बाळाला माझ्या हातात देतात, तेव्हा मी त्या बाळाच्या कानात सांगतो, मोठा जरूर हो, नव्हे तू मोठा होशीलच. परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको'
क्या बात है...
कथा बरी वाटते आहे. माहेर, कथाश्री, ललना यांसारख्या दिवाळी अंकात अश्या कथा वाचायला मिळतात...
असो, पुढील भागांची उत्सुकता आहे....
तात्या.
24 Feb 2008 - 10:14 am | सुधीर कांदळकर
शोभते.
परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको
हे आवडले. असेच साहित्य येऊद्यात. परंतु दर्जा उत्तरोत्तर वाढता ठेवा.