कंटाळा.....

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
22 Feb 2008 - 9:09 pm

कंटाळा आला आहे यार!
कंटाळा आला आहे यार!
तोच तोच गंजलेला किनारा
त्याच बोथट पावसाच्या धारा
आणि जोडीला नेभळट वारा
चार दिशांचा पिंजरा
आणि आभाळाचं ओझं
नकोय हे सगळं...
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!

दुःखाचा गुडघाभर चिखल
सोबत विचारांचं जंगल
शंकांच्या वावटळी
अज्ञाताचा ताण
आणि तत्वांची हेळसांड!
नकोय हे सगळं
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!

जुन्या विचारांचा बुजबुजाट
पोथीवादाची रटरट आणि
कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार!
मूर्खांचा सुळसुळाट
भीतिची जळमटं!
नकोय हे सगळं
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!

झाडाला फ़ुलं येतात पण
झाड बहरत नाही
समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा
चंद्र-सूर्य येतात जातात
रुतू आपलं काम करतात
सकाळ रात्रीला भेटत नाही
आणि पहाटेला संध्याकाळ दिसत नाही
कंटाळा आलाय यार!
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2008 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेचा रचनाबंध आणि त्यातला आशय आवडला.

धनंजय's picture

23 Feb 2008 - 10:17 pm | धनंजय

असेच म्हणतो.
"गंजलेला किनारा" आवडला.

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 11:49 am | सुधीर कांदळकर

मलदेखील आवडेल.

चार दिशांचा पिंजरा
आणि आभाळाचं ओझं

या ओळी जास्त आवडल्या.

शुभेच्छा.

प्राजु's picture

25 Feb 2008 - 10:15 am | प्राजु

समुद्र रोज खवळतो पणत्यात गांभिर्य नाही,उगाच तोच तोच पणाचा बालीशपणाया ओळी चांगल्या आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु

नवीन पृथ्वी बांधायची कल्पना आवडली आपल्याला

स्वाती राजेश's picture

5 Mar 2008 - 4:13 pm | स्वाती राजेश

खुपच छान आहे. कल्पना आवडली.

chirag's picture

25 Nov 2008 - 12:50 pm | chirag

मित्रा,

कविता चोरण्याइतकी चांगली आहे का?

मग मी खरोखर भाग्यवान आहे !! धन्यवाद माझी कविता चोरल्या बद्दल !!

http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2584253509602561334

www.shabdayogi.blogspot.com/2008/02/blog-post_7312.html

www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2592603.cms

जैनाचं कार्ट's picture

25 Nov 2008 - 12:58 pm | जैनाचं कार्ट (not verified)

=))

सही पकडला चिराग ... !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ