हज़ारों ख्वाहिशें ऐसी ...

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
22 Feb 2008 - 2:06 pm

मी मनात तो विषयच येउ देत नाही,अगदीच मनाचे सगळे बंध तोडुन आला जरी; तरी दुर ढकलुन देतो मी त्याला, अगदी दुर.

खरे तर मी तिच्या अस्तित्वालाच नकार दिलाय..... तरीपण स्वप्नाच्या अन सत्याच्या धुसर सीमेवर ती मला भेटतच रहाते ... वेगवेगळ्या रुपातुन .. कधी सहचारिणी बनुन तर कधी अभिसारिका बनुन. कधी रागावते ओरडते तर कधी काळजी घेते, माझ्या जखमांना औषध लावते. कधी त्याच्या बरोबरच्या प्रेमाच्या सुरस गोष्टी मला सांगते अन मला स्वप्नातल्या जिवंतपणी उभा जाळते. मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय.

तसेच तुझे अचानक जाणे. रणरणत्या उन्हातुन थंडगार पाण्याचा माठ भरुन आणावा अन सावलीत आल्याआल्या कोणीतरी टचकन त्याला खडा मारुन फोडुन टाकावा, आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे. तु गेलीस हे मात्र खरे, अगदी कायमची गेलीस माझ्या आयुष्यातुन. अशी गेलीस की कधी होतीस का नव्हतीस असा प्रश्न पडतो मनाला. तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी.

हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले ।
निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन,
बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले । --- -- गालिब.

- आनंदयात्री

मुक्तक

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Feb 2008 - 2:13 pm | विसोबा खेचर

मी खडबडुन उठतो .. तोंडावर पाणी मारतो अन तयार होतो खर्‍या खर्‍या जगातल्या खोट्या खोट्या आयुष्यात जायला .. स्वप्न कोणते असते तेच समजत नाही!! जागेपणी जगतो ते का झोपल्यावर अनुभवतो ते ? अजुन अशा बर्‍याच गोष्टींचा थांगपत्ता लागायचाय.

आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे! असे काहीसे तुझे जाणे.

!!!

क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...!

जियो आनंदयात्री....!

आपला,
(हे सगळं वाचून क्षणात काही वर्षांपूर्वीच्या गतस्मृतीत गेलेला!) तात्या.

तात्या विन्चू's picture

22 Feb 2008 - 3:52 pm | तात्या विन्चू

अतिशय अप्रतीम .......जोपर्यन्त "दिल मे दर्द" असत नाही, तो पर्यन्त लेखणीतून असे शब्द निघणे केवळ अशक्य.....वाचून अगदी Nostalgic व्हायला झाल.

आणखी एक शेर इथे अर्ज करावासा वाटतो.

जब दर्द नही था सीने मे, क्या खाक मझा था जीने मे,
अब के बरस हम भी रोए, सावन के महीने मे

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

मुक्तसुनीत's picture

22 Feb 2008 - 6:55 pm | मुक्तसुनीत

तुमचे हे स्फुट चटका लावणारे झाले आहे.
कोवळ्या वयात झालेल्या अशा घावांमुळे - मग तो प्रेमभंग असेल, अपेक्षाभंग असेल , कारकीर्दीतील अपेश असेल... झालेल्या काही जखमा बुजत नाहीत. त्यावर खपली सहज धरली जात नाही. आणि बुजल्यासारखी झाली तरी आठवणींचे व्रण रहातातच. अपेक्षाभंग, परित्यक्ततेची जाणीव, एकाकीपण या सर्व मानवी अवस्था आहेत. आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला कधी न कधी याचा स्पर्श झाला असेलच.

गमत्या's picture

22 Feb 2008 - 7:33 pm | गमत्या

तुझ्या लेखनावरुन अंदाज़ येतो की खुप मोठी जखम तुला झाली आहे.
पण मला वाटते की ह्या आणि ह्याही पेक्षा मोठया जखमा असणार्या व्यक्ति ह्या जगात आहेत.

अरे ज्याच्या नावातुन इतका आनंद ओसांडत आहे आणि तुझ्यासारखा जो आनंदाच्या मार्गाचा यात्रि आहे त्याला रे कसली आली आहे दुखा़ ची चिन्ता.

मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी)

क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...!

खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....!

गमत्या

विसोबा खेचर's picture

23 Feb 2008 - 12:14 am | विसोबा खेचर

मला तात्यांनी वापरलेले वाक्य परत वापरावे वाटतात पण थोडासा बदल करुन. (तात्या माफि असावी)
क्या बात है! अतिशय सुंदर लेखन...!
खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....!

येस्स! तुमचे बरोबर आहे गंमत्याराव! :)

आता मी ही,

खुश रहो आनंदयात्री ! ओर १०० साल जियो आनंदयात्री....!

असेच म्हणेन! :)

असो, सर्वांचे प्रतिसाद आवडले, गाण्यांचे दुवेही छान आहेत...

तात्या.

स्वाती राजेश's picture

22 Feb 2008 - 7:50 pm | स्वाती राजेश

माझे बाबा कायम एक उदाहरण द्यायचे ते म्हणजे...

कार मध्ये बसलेल्या माणसाने स्कुटर वाल्या माणसाकडे पाहावे,
स्कुटर वर बसलेल्या माणसाने पायी चालत असलेल्या माणसाकडे पाहावे,
पायी चालत असलेल्या माणसाने लंगडया माणसाकडे पाहावे.... म्हणजे आपण किती सुखी आहोत ते कळते.

सृष्टीलावण्या's picture

22 Feb 2008 - 7:52 pm | सृष्टीलावण्या

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे,
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,
सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत?
बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात...

- वा.रा. कान्त.

हर मुलाकात का अंजाम जुदाई क्युं हैं,
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे...

- चित्रपट: उमराव जान

चतुरंग's picture

22 Feb 2008 - 8:01 pm | चतुरंग

किती छान आठवण दिलीत -
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात!
स्व.वसंतराव देशपांड्यांनी गायलेलं हे गाणं त्यांच्या नातवाने, राहुल देशपांडेने गायलेले इथे ऐकता येईल.

चतुरंग

विद्याधर३१'s picture

23 Feb 2008 - 7:52 am | विद्याधर३१

तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे,
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,
सलते का तडफड ती कधि तुझ्या उरांत?
बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात...

- वा.रा. कान्त.

अतिशय सुन्दर काव्य ... आत्ता तेच ऐकतो आहे.

( मनकवडा) विद्याधर

सृष्टीलावण्या's picture

22 Feb 2008 - 8:06 pm | सृष्टीलावण्या
कोलबेर's picture

23 Feb 2008 - 1:31 am | कोलबेर

राहूलने गाणं छानच म्हंटलं आहे पण थोडं नैसर्गिक गायला हवं होत असं माझं ('ढ') वैयक्तिक मत आहे.. तसेच पावसाचे अभ्रकाचे ह्यातला 'च' चैतन्य मधल्या 'च' सारखा उच्चारला आहे ते समजले नाही...त्यामूळे एखादा सिंधी माणूस गातो आहे असे वाटते :)

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2008 - 8:30 pm | llपुण्याचे पेशवेll

तुझ्या असण्याचे हजार पुरावे असतात अवतीभोवती, सगळ्यांना खोटे ठरवण्याची कारणं शोधता शोधता माझीच ओळख विसरायला होते कधी कधी.

"मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे
वेल दारी सायलीची रोज अजूनी बार देते
लाख पुष्पे तोडील्याविण ये भरोनी पात्र माझे
ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहीले"

हे ही असेच आमच्या वसंतरावांनी म्हटलेले आणि मला वेड लावणारे गाणे..

पुण्याचे पेशवे

मुक्तसुनीत's picture

22 Feb 2008 - 9:39 pm | मुक्तसुनीत

एका अनोख्या , अतिशय सुंदर गाण्याची आठवण जागवल्याबद्दल तुम्हाला दाद द्यावी तितकी थोडी !

हे संपूर्ण गाणे इथे वाचता येईल.
आणि इथे ऐकता/उतरवून घेता येईल.

चतुरंग

ऋषिकेश's picture

22 Feb 2008 - 10:16 pm | ऋषिकेश

मनाला चटका लावणारे मुक्तक.. खूप छान
-ऋषिकेश

प्राजु's picture

22 Feb 2008 - 11:08 pm | प्राजु

एकदम भिडलं मनाला..

- प्राजु

धनंजय's picture

22 Feb 2008 - 11:15 pm | धनंजय

आपण तहानल्या नजरेने फक्त मातीत जिरणार्‍या पाण्याकडे पहात रहावे!
अत्यंत समर्पक दृष्टांत!

गा़लिबच्या त्याच ग़जलेतला हा शेर त्या मानाने थोडा आशादायी वाटतो :
मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का
उसी को देख के जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले

आणि तुमच्या मुक्तकालाही लागू आहे असे वाटते - लेखकाचे भावविश्व "तू"मुळे उद्ध्वस्त झाले, पण "तू"च्या आठवणींनीच तग धरून आहे.

आनंदयात्री's picture

24 Feb 2008 - 11:48 am | आनंदयात्री

केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद.

-आनंदयात्री.

बंडा मामा's picture

24 Oct 2011 - 6:20 am | बंडा मामा

मला इमेलमधुन या लेखाची लिंक मिळाली होती. लगेच इथली मेंबरशीप घेतली. फार छान लेखन!